नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक क्रमवारीत पहिल्या दोनशेमध्ये भारताचे एकही विद्यापीठ नाही हे वास्तव पुढे आले आहे.  याची कारणे आपल्याकडच्या शिक्षण पद्धतीत शोधावी का? आपली शिक्षण पद्धती उत्कृष्ट आहे, मात्र तिच्यात थोडासा बदलही अपेक्षित आहे हे प्रतिपादन करणारा लेख.
गेल्या महिन्यात दोन प्रतिष्ठित संस्थांकडून जगातील विद्यापीठांचा आढावा घेण्यात आला. त्यात अतिउच्च दर्जाच्या २०० आणि ४०० विद्यापीठाची क्रमवारी प्रसिद्ध करण्यात आली. टाइम हायर एज्युकेशन ळ्रेीTime Higher Education (THE) आणि क्वाकारेली सायमंड Quacquarelli Symonds (QS) यांनी प्रसिद्ध केलेल्या क्रमवारीत पहिल्या दोनशेमध्ये भारताचे एकही विद्यापीठ नाही ही वस्तुस्थिती आहे. एकोणिसाव्या  शतकात विकासाची कास धरलेला मानव विसाव्या शतकात औद्योगिक क्रांतीने आमूलाग्र बदलला तर एकविसाव्या  शतकातील वाढत्या गरजा व त्या पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून विश्वच माझे घर म्हणू लागला. टॉप २००  विद्यापीठांमध्ये आपण नाही हे आपले अपयश नाही. आयआयटी आणि आयआयएम या संस्था आपली  पत टिकवून आहेत. दर क्रमवारीमध्ये आयआयटी, दिल्ली (२१२) आणि आयआयटी, कानपूर (२७८) हे २०११ च्या  क्रमवारीपेक्षा वर गेले आहे. तसेच THE  च्या यादीनुसार आयआयटी, खरगपूर (२३८), आयआयटी, बॉम्बे (२५८)  आणि आयआयटी, रूरकी (३६७) अशी क्रमवारी आहे. चीनमधून सात संस्था टॉप २०० मध्ये मोडतात. ही क्रमवारी भारताला एवढी उत्साहवर्धक नसली, तरी एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते, की संशोधन आणि नावीन्यपूर्ण क्षेत्रात आपण फारच मागे पडलो आहोत. ही क्रमवारीची पद्धत पश्चिमेकडील देशांना, त्यांच्या शिक्षण पद्धतीला योग्य आहे.
परंतु भारतासारख्या देशातील शिक्षण पद्धतीत ही पद्धत योग्य आहे का हे शोधायला हवे. जर त्यात त्रुटी असतील, तर त्यानुसार बदल करावयास हवे. अशा तंत्रज्ञानाच्या युगात भारत मागे पडू नये यासाठी ठोस पावले उचलावयास हवीत. शिक्षण हे कोणत्याही देशाच्या यशाची गुरुकिल्ली आहे. प्रत्येकाच्या जीवनास उभारी देण्याचे कार्य शिक्षण करीत असते. शिक्षण हे आयुष्याच्या नवीन संधीचा पाया घालण्याचे काम करते. आपले भविष्य निर्धारित करतो. शिक्षण हे व्यक्तीमध्ये सर्जनशीलता, कलात्मकता, कुतूहल आणि वैचारिक क्षमता निर्माण करते. ही कधीही न थांबणारी म्हणजेच निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ज्या देशात शिक्षणाचा पाया मजबूत आहे तो देश जागतिक स्तरावर आपला निर्वविाद ठसा उमटवेल आणि अगदी कठीण प्रसंगी येणाऱ्या अडचणीवर मात करेल यात शंकाच नाही. आपण जागतिक स्तरावर मागे पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे संशोधन आणि नावीन्याचा अभाव होय. अजूनही आपल्यात संशोधन वृत्ती आणि अभिनवता रुजली नाही. खरे तर (Invention) शोध आणि (Innovation) अभिनवता यात बरीच गफलत  होते. शोध ही एक नवीन संकल्पना, मूलतत्त्वे काही गृहीतके वापरून तयार केलेली वस्तू होय. उदाहरणार्थ एडिसनने शोधलेला बल्ब तर ग्रॅहम बेलने शोधलेला टेलिफोन ही त्याची उदाहरणे होय. नावीन्यता ही अस्तित्वात असलेल्या शोध व वस्तूत योग्य तो बदल करून नवीन रूप देते. जसे पंखा सर्वाना माहीत आहे पण त्यामध्ये थोडासा बदल करून एअर कूलर (AC) तयार केला ही  झाली नावीन्यता. तसेच बँकिग पद्धती आपणास माहीत आहे पण मायक्रोफायनान्सची संकल्पना ही झाली नावीन्यता.
परदेशातील शिक्षण पद्धती
परदेशातील शिक्षण पद्धतीत विद्यार्थी त्याला आवडेल तो विषय निवडू शकतो. त्यानुसार तो त्या विषयात पारंगत होतो. तसेच तो निर्भीडपणे आपले मत व्यक्त करतो. जेणेकरून शिक्षकास त्यामधील असलेल्या त्रुटी समजतात. त्या सुधारण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले जाते. तेथे फक्त पुस्तकातील ज्ञान दिले जात नाही तर समाजातील, निसर्गातील वेगवेळ्या स्रोताच्या मदतीने ज्ञान दिले जाते. त्यांच्या परीक्षा पद्धतीत काही परीक्षा आकलन क्षमतेवर असतात. मुलांना असाइनमेंट व प्लेसमेंटसाठी फक्त मार्गदर्शन केले जाते पण प्रत्यक्षात मदत केली जात नाही.  विशेषत: अमेरिकेतील विद्यार्थी हे परीक्षेत येणाऱ्या प्रश्नाची उत्तरे शोधतात पण ते त्याच्या मुळापर्यंत पोहोचत नाहीत व पटकन नोकरी करतात. तेच युरोपातील व भारतातील विद्यार्थी प्रश्नाच्या मुळापर्यंत पोहोचतात. तेथील पालक हे अभ्यासाव्यतिरिक्त दुसऱ्याही गोष्टीस अधिक महत्त्व देतात तेही त्या विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार हे विशेष. त्यात ते मदानी खेळ, कला, सामाजिक कार्यावर भर देतात. तेथील विद्यापीठे संशोधनात अधिक पशांची तरतूद करतात त्यानुसार शिक्षकास चांगले वेतन, विद्यार्थ्यांस फेलोशिप, प्रयोगशाळा इत्यादी सुविधा देतात. प्रयोगशाळा अद्ययावत करण्यासाठी प्रशासकीय लवचीकपणा असतो. या सर्व गोष्टीमुळे तेथील विद्यापीठे जागतिक क्रमवारीत उच्च स्तरावर आहेत.
भारतातील शिक्षण पद्धती
आपल्या देशातील शिक्षण पद्धतीत काही अंशी साम्य आहे. जो काही थोडासा बदल आहे तो नक्की काय आहे हे पाहणे आवश्यक आहे. प्राथमिक स्तरावर जवळपास सारखेपणा आहे. परदेशातील विज्ञानाच्या पहिल्या वर्षांला असलेलं गणित आपल्याकडे शाळेतच शिकवलं जाते. म्हणूनच मुलांना ताíकक आणि तर्कशुद्ध विचार करण्याची सवय लागते. सूक्ष्म विचार करण्याची वैचारिक प्रवृत्ती फक्त गणितामुळेच  निर्माण होते, तेच तर सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी आवश्यक असते. त्याचमुळे जागतिक स्तरावर सॉफ्टवेअर इंजिनीयरमध्ये भारताचा बोलबाला आहे. आपल्याकडे प्रायोगिक ज्ञान विद्यार्थाना कमी प्रमाणात असते. तसेच आपले विचार भीतीपोटी परखडपणे व्यक्त करत नाहीत. प्रत्येक पायरीत विद्यार्थ्यांला मार्गदर्शन केल्याने तो स्वावलंबी बनत नाही. त्यामुळे उपलब्ध नोकरीच्या संधी कमी होतात. बरेचदा विद्यार्थी कोणत्या सामाजिक स्तरावरून आला आहे, त्यानुसार त्याची समजण्याची कुवत-आकलनक्षमतेत फरक असतो हे नाकारता येणार नाही. भारतीय पालकांना वाटते मुलांना चांगले गुण मिळाले तरच मुले यशस्वी होतात. त्याचमुळे ते अवांतर शिक्षणाकडे लक्ष देत नाहीत. ते शिकवणीसाठी पसा खर्च करून त्या विषयात पारंगत बनतात. यात कधीकधी मुलांच्या आवडीचा विचार केलेला नसतो परिणामी तो त्यात यशस्वी होईल की नाही हे सांगता येत नाही. जर त्याच्या आवडीनुसार त्यास त्याचे क्षेत्र निवडावयास दिले, तर नक्कीच तो त्यात अव्वल बनेल.
जरी सरकार ‘सर्व शिक्षा अभियान’ चालवत असले, तरी समाजातील प्रत्येक व्यक्तीला शिक्षण घेण्यासाठी प्रेरित करून त्याच्यामध्ये सर्जनशीलता, कुतूहल जागृत करणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाचा सामाजिक-आíथक आलेख शिक्षणाद्वारे कसा उंचावेल हेही पाहणे गरजेचे आहे. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. एकदा पदवी मिळाली की झाले असे नसून ते आपल्याला विचार करावयास, नवीन संधी शोधावयास तसेच जीवनात येणाऱ्या अडचणीवर मात करावयास शिकवते. मुलांना फक्त वर्गातूनच शिक्षण देण्यापेक्षा विश्वच माझे घर याप्रमाणे निसर्गाशी आपले नाते जुळवून घेण्यास प्रवृत्त करावे. एखादी गोष्ट अशी का होते याचं कुतूहल निर्माण करून त्याचा पाठपुरावा करावा.
आपली विद्यापीठे जागतिक क्रमवारीत मागे पडण्याची बरीच कारणे आहेत. तसे पाहिले तर आपली शिक्षण पद्धती उत्कृष्ट आहेच फक्त त्यामध्ये थोडासा बदल करून घेणे आवश्यक आहे. केंद्र सरकारकडून विज्ञान आणि  तंत्रज्ञांनासाठी ०.८ टक्के एवढीच तरतूद आहे. तेच अनेक देशात त्याची तरतूद १ ते २ टक्के असते, किमान १ टक्के खर्च करणे अपेक्षित आहे. देशामध्ये उच्च शिक्षणातील जवळपास ३५ टक्के पदे रिक्त आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय आíथक मदत ही आयआयटी, आयआयएसी आणि आयआयएम या संस्थांस अधिक प्रमाणात असते त्याबद्दल दुमत नाही परंतु भारतातील विद्यापीठांना त्या मानाने फारच कमी अनुदान मिळते. ते वाढवणे अपेक्षित आहे. जागतिक क्रमवारीत जी  विद्यापीठे आहेत. त्यात २५ टक्के वाटा नोबेल पारितोषिक विजेत्याचा असतो तर ७५ टक्के वाटा संशोधनाचा असतो. भारतीय वंशाच्या व्यक्तीस नोबेल पारितोषिके मिळतात. पण आपल्या देशातील संशोधकास, विचारवंतास नोबेल का मिळत नाही? याचे मंथन करणे आवश्यक आहे. आपल्याकडे बुद्धी नाही असे नाही फक्त योग्य ती दिशा, मार्गदर्शन, सोयी सुविधा, शैक्षणिक धोरणे यांची गरज आहे. या दोन्हीमध्ये आपण फारच मागे आहोत त्यासाठी संशोधनास प्राधान्य देऊन त्याच्या दर्जाचे परीक्षण केले, तरच आपण आपली पत वाढवू शकतो. आयआयटी, आयआयएसी आणि आयआयएम हे कुशल तंत्रज्ञ, पदवीधर तयार करतात पण त्यांनी आपली कुशलता परदेशात वापरल्याने भारतास त्याचा उपयोग होत नाही. त्यास आपण ‘ब्रेन ड्रेन’ म्हणतो. परिणामी आपल्याकडे संशोधक राहत नाहीत ही खरी विचार करण्याची बाब आहे. यावर पर्याय म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाने संशोधनास वाव देण्यासाठी मुख्य आणि दुय्यम संशोधन प्रकल्पास प्रोत्साहन दिले आहे. इनफ्लीबीनेटअंतर्गत कार्यक्रमामध्ये जागतिक स्तरावरील जर्नल्स, ई पुस्तके प्रत्येक प्राध्यापकास उपलब्ध करून दिली आहेत, ही खरीच स्वागतार्ह बाब आहे. तसेच विद्यापीठ आणि महाविद्यालयाला नॅक दर पाच वर्षांनी भेट देते, त्यांच्या कार्यानुसार श्रेणी देते. नॅकमुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सोयी सुविधा द्याव्या लागतात. तसेच नवीन तंत्रज्ञान उपलब्ध  झाल्याने व त्याच्या मदतीने शिकवल्याने विद्यार्थ्यांची आकलन क्षमता आणि वैचारिक पातळी वाढते. संशोधनास प्रोत्साहित करण्यासाठी विविध सोयी दिल्या जातात. त्याचा फायदा विद्यार्थी, शिक्षक आणि समाजाला नक्कीच होतो. संशोधन आणि चांगले शिक्षण मिळू लागल्याने नक्कीच भारत आपला ठसा उमटवेल यात शंकाच नाही.
   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा