नाशिकच्या घोटी येथे घरात मन:स्वास्थ्य लाभण्यासाठी मांत्रिक बाईच्या सल्ल्यानुसार दोन भावांनी आईचा बळी दिल्याची भीषण घटना बाहेर आल्यानंतर आता आणखीनच नवी माहिती उजेडात आली आहे. मांत्रिक बाईच्या घराजवळ आणखी दोन स्त्रियांची प्रेते सापडली असून प्राथमिक माहितीनुसार असे कळते की तिला मठ बांधायचा होता आणि त्यासाठी सात बळी द्यायचे होते. अंगावर शहारे आणणारी ही बातमी आहे.
दाभोलकरांचा लढा शेवटपर्यंत नेणे म्हणूनच फार गरजेचे आहे. प्रगत महाराष्ट्रात हे घडावे हे लांच्छन नाही का?
‘राजपेय’.. जयपूर संस्थानचे!
गिरीश कुबेर यांचा जपानी व्हिस्कीला २०१४ सालचा जगातली सर्वोत्तम व्हिस्की असा बहुमान मिळाल्यानिमित्ताने सुंदर आणि लालित्यपूर्ण लेख (अन्यथा, २७ डिसेंबर) वाचताना काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
१) उदयपूर हे राजपुतान्यातले जुने संस्थान. या राणा प्रतापांच्या वंशजांकडे परंपरेने आलेले एक मद्यपेय होते. (होते याचा अर्थ आता संस्थान नाही.) या पेयाचे नाव ‘केशर-कस्तुरी’. हे तयार करणारी संस्था उदयपूर संस्थानच्या मालकीची होती. पेयासाठी उत्तम दर्जाचे केशर (आयात- स्पेनमधूनच) व कस्तुरीचा मंद सुगंध असलेल्या या व्हिस्कीसदृश मद्याचा आस्वाद साठीच्या दशकात मी घेतलेला आहे. पुढे ‘कस्तुरी’ गोळा करण्याऐवजी त्या मृगाला मारून हस्तगत करणे सुरू झाले. ही प्रजाती नष्ट होऊ नये म्हणून शासनाने कस्तुरी वापरावरच बंदी घातली. संस्थान विलीन झाल्यावर तो कारखाना राजस्थान सरकारच्या मालकीचा झाला. त्यांच्या दुकानातून मी या पेयाची खरेदी केली आहे. कस्तुरीचा उपयोग थांबला, पण नाव मात्र तेच (ब्रँडनेम) पुढेही चालले .
भारताला परदेशी चलनाची प्रचंड चणचण निर्माण झाल्यावर केशर पुरेसे मिळेना म्हणून याची निर्मिती काही वर्षे बंद करण्यात आली. कारण दर्जा टिकला नसता. पुढे परकीय चलन परिस्थिती सुधारल्यावर निर्मिती पुन्हा सुरू झाली, जी आजही सुरू आहे. हे पेय सहसा दुकानांमधून मिळत नाही, पण उदयपूरला कारखान्याच्या दुकानात मिळते.
२) एक ऐकीव माहिती अशी की, असेच एक राजपेय (रॉयल ड्रिंक) जयपूर संस्थानचेही होते. मात्र त्याचा आस्वाद घेण्याचा योग कधी आला नाही. नक्की माहिती कुणाला असेल तर अवश्य पुढे यावी. पेयाचे नाव ‘आशा’ असे ऐकल्याचे स्मरते.
काही विषय आपण उगाचच हद्दपार केले आहेत. ही कोंडी फोडल्याबद्दल धन्यवाद.
-विश्वास दांडेकर, सातारा
मुद्दा उपेक्षित राहू नये
सध्या कृषीकर्ज माफीवरून ‘लोकसत्ता’ मध्ये आलेल्या अग्रलेखांवरून बरीच चर्चा सुरू आहे. मात्र ही सर्व चर्चा या लेखांमागची भूमिका लक्षात न घेताच होते आहे, असं वाटतं. दुसऱ्या अग्रलेखात मांडलेला मुद्दा कर्जमाफीला विरोध असा नसून ‘सरसकट कर्जमाफी आजारी अर्थव्यवस्थेला परवडेल?’ असा आहे. याचे भान राहिले नाही तर लोकसत्ताने मांडलेला कृषिकर्ज-माफीसंदर्भातील एक महत्त्वाचा मुद्दा उपेक्षित राहील.
सध्या जी वाचकपत्रे येत आहेत ती ‘कार्यालयात वरिष्ठाने एका कारकुनाला कामचुकारपणाबद्दल बोल लावावे पण त्याने निर्ढावलेपणा दाखवावा आणि प्रामाणिक कर्मचाऱ्यांनी मात्र भडकून उठावे की, आमच्या कष्टांचं यांना काहीच नाही’ या प्रकारची आहेत.
डॉ. गणेश जोशी
हा नवा पंथ उभारण्याचा प्रकार नाही
‘ओबीसी मंडळींचा बौद्ध धर्मात प्रवेश’ ही हनुमंत उपरे यांच्यासंदर्भातील बातमी आणि तत्पश्चातचा संजय सोनवणी व मारुती कुंभार (लोकमानस, १ व २ जाने.) यांचा पत्रव्यवहार यानिमित्ताने ‘धम्मांतर्गत जातीव्यवस्था’ हा मुद्दा चच्रेत आला हे बरे झाले.
बौद्ध धर्मात पूर्वी जातव्यवस्था अस्तित्वात होती की नव्हती यापेक्षा आज ती नाहीय हा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे.
धम्मप्रवेश म्हणजे फक्त धर्मातर नव्हे, तर जातीअंताच्या लढाईतील हा महत्त्वाचा टप्पा आहे.
जन्मावरून, वर्णावरून जात-पात ठरवणे हे जितके मोठे पातक आहे, तितकेच मोठे पातक नागवंशीय मूळ, कूळ शोधणे हेदेखील आहे.
पुरोहित संस्कृतीला विरोध म्हणून धम्माचा उदय झाला, पण गेल्या काही दशकांत धम्माचीही मक्तेदारी घेण्याचे काम काही दीडशहाण्या मंडळींनी चालवले आहे. िहदू धर्माचा त्याग करून ज्यांनी धम्मात प्रवेश केला त्यात काही अर्धवट आणि काही अतिशहाणे या दोहोंनीही धम्माचे नुकसान आरंभिले आहे. या मंडळींकडून होणारा बुद्धिभेद घातक आहे. धम्माची विवेकवादी, विज्ञाननिष्ठ मांडणी ही जगाला समता, बंधुत्व आणि करुणेच्या वाटेवर घेऊन जाणारी आहे, नवा पंथ उभारण्याचा हा प्रकार नाही!
डॉ. अमोल अशोक देवळेकर, पुणे</strong>
लेटलतिफांचे हे लाड कशासाठी?
नवीन सरकारने मंत्रालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सकाळी कामावर एक तास उशिरा येण्याची नववर्षांची भेट दिली आहे! कारण काय तर हे कर्मचारी खूप लांबून कामावर येतात आणि रेल्वे गाडय़ांचा गोंधळ आणि वाहतूक कोंडीमुळे त्यांना कामावर येण्यासाठी उशीर होतो! हे म्हणजे लेटलतीफ कर्मचाऱ्यांचे अति लाड होत आहेत असे वाटते. मुंबईत काय फक्त मंत्रालयातच कर्मचारी काम करतात का? मुंबईतील अनेक खासगी आस्थापनांत काम करणारा कर्मचारी वर्गही लांबून आपल्या इच्छित स्थळी अगदी बरोबर कामावर पोहचतो. पण हे खासगी आस्थापनातील कर्मचारी कधीही रेल्वे गाडय़ांची सबब पुढे करत नाहीत. रेल्वे गोंधळाचा त्रास फक्त मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनाच होतो? हा प्रामाणिकपणे कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे.
अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण
पोलिसांना ‘हेल्मेटसक्ती’ नाही?
हल्ली जागोजाग कर्तव्यतत्पर वाहतूक पोलीस हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांना नेमके ‘मोक्याच्या’ जागी अडवून जाब विचारताना दिसत आहेत. ही निर्वविादपणे स्तुत्य बाब आहे, परंतु त्यात किती जण दंड भारतात आणि किती जण ‘कसे’ सुटतात, हे कळणे कठीण आहे. या प्रश्नाची दुसरी बाजू अशी, की नेहमीच वाहतूक आणि शहर पोलीस हेल्मेटशिवाय दुचाकीवरून जाताना दिसतात. त्यांना हेल्मेट वापरण्यापासून सूट दिली आहे का? हेल्मेट न घातलेल्या पोलिसांना अपघाताचे भय नसते काय?
सुभाष जोशी, ठाणे</strong>