तत्त्वज्ञानाचा इतिहास हा तत्त्वज्ञान विषयाच्या अभ्यासकांसाठीच असतो का? गतकालीन विचारवंतांनी आपापल्या काळात कल्पना आणि संकल्पनांचा जो मेळ घालून तत्त्वज्ञानात भर घातल्यामुळे आपल्याला आजही जी तात्त्विक बैठक मिळू शकते, ती हवी असणाऱ्या कोणीही या इतिहासाकडे गेले पाहिजे, ते का?
‘‘सर्व उत्कृष्ट ग्रंथांचे वाचन करणे म्हणजे, हे ग्रंथ ज्यांनी लिहिले; त्या भूतकालीन शतकातील अनेक उन्नत मनांच्या उदात्त माणसांशी संभाषण करणे आहे, याचे मला भान होते. त्यांच्या ग्रंथांचे अतिशय काळजीपूर्वक वाचन, अध्ययन केले तर लक्षात असे येते की ही माणसे आपणास त्यांच्या केवळ सर्वोत्तम विचारांचेच दर्शन घडवितात, अन्य कशाचे नाही.’’
-रेने देकार्त (१५९६-१६५०) आधुनिक तत्त्वज्ञानाचा जनक
सामान्य माणसांचा इतिहास ज्या प्रेरणांनी, मानसिकतेने घडतो त्या प्रेरणांच्या मुळाशी काही तात्त्विक विचारसरणी असतात. त्या मानवी जीवनाची दिशा ठरवितात, माणसाला त्याच्या जगण्याचे उद्दिष्ट देऊ पाहतात. हा इतिहास म्हणजे तत्त्वज्ञानाचा इतिहास असतो. ‘पाश्चात्त्य तत्त्वज्ञान’ ही मानवी ज्ञानाची संपदा म्हणजे इतिहासातील व्यक्ती आणि त्यांच्या विद्यमान पिढय़ा यांच्यातील २६०० वर्षांच्या संभाषणाचा इतिहास आहे, हे मान्य केले तर तत्त्वज्ञान शिकण्यासाठी पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा इतिहास शिकणे आवश्यक ठरते.
तत्त्वज्ञान म्हणजे विविध प्रकारच्या कल्पना, संकल्पना, विचार यांची रचना अथवा सुरचित साठा असतो, असा समज असतो. साधारणत: कल्पना आणि तत्त्वज्ञान यात फरक केला जात नाही. कल्पना अमूर्त असतात तसे तत्त्वज्ञानही अनेक अमूर्त संकल्पनांनी युक्त असते. तत्त्वज्ञानात संकल्पना, कल्पना मांडलेल्या असतात, हे खरे असले तरी संकल्पना (कन्सेप्ट), कल्पना (आयडिया) आणि तत्त्वज्ञान (फिलॉसॉफी) तीन गोष्टींत फरक करणे आवश्यक असते, असे मत प्रोफेसर सर बर्नार्ड विल्यम्स (१९२९-२००३) या ब्रिटिश तत्त्ववेत्त्याने स्पष्टपणे लक्षात आणून दिले. विशेषत: तत्त्वज्ञानाचा इतिहास या नावाची वेगळी ज्ञानाची रचना कोणताही समाज समजावून घेणे व त्या समाजात सुधारणा करणे यासाठी अनिवार्य असते, याची जाणीव त्यांनी दिली.
विल्यम्स यांनी कल्पनांचा इतिहास आणि तत्त्वज्ञानाचा इतिहास यात भेद केला. त्यांच्या ‘देकार्त : दि प्रोजेक्ट ऑफ प्युअर इन्क्वायरी’ (१९७८) या ग्रंथाच्या प्रस्तावनेत प्रथम त्यांनी ही भूमिका मांडली. नंतर तिची आणखी प्रगत व जास्त काटेकोर मांडणी त्यांच्या ‘सेन्स ऑफ दि पास्ट : एसेज इन दि हिस्ट्री ऑफ फिलॉसॉफी’ या ग्रंथात केली.
विल्यम्स यांच्या मते कल्पनांचा इतिहास आणि तत्त्वज्ञानाचा इतिहास यात दोन प्रकारे फरक करावा लागतो. प्रथम, या दोन्ही गोष्टी जे काही उत्पादन करतात, त्या उत्पादनानुसार फरक करता येईल. त्यानंतर ते ज्या वेगळ्या रीतीने आपले लक्ष वेधून घेतात त्या रीतीनुसार दुसरा फरक करता येईल. साध्या भाषेत विल्यम्स यांच्या मते ‘कल्पनांचा इतिहास हा तत्त्वज्ञान असण्यापूर्वी इतिहास असतो. उलट तत्त्वज्ञानाचा इतिहास हा इतिहास असण्यापूर्वी ते तत्त्वज्ञान असते.’ याचा अर्थ असा की, तत्त्वज्ञानाचा इतिहास हा प्रथम तत्त्वज्ञान असल्याने चच्रेसाठी त्यात विचारांचे अधिक काटेकोरपणे सुव्यवस्थित विभागीकरण केलेले असते.
कल्पनांचा इतिहास हा तत्त्ववेत्त्याच्या तत्त्वज्ञानाच्या संदर्भात त्याच्या समासातील नोंद असते, तर तत्त्वज्ञानाचा इतिहास म्हणजे संबंधित तत्त्ववेत्ता त्याच्या संकल्पना त्याच्या काळात कशा उचित व उपयुक्त ठरू शकतील हे पाहण्याचा उपक्रम असतो. म्हणजेच तत्त्ववेत्ता आपले विचार कोणत्या रीतीने विद्यमान समस्यांशी निगडित करतो आणि तत्त्वज्ञानाच्या एकूण पारंपरिक रचनेवर त्याचे विचार व त्याची विचारपद्धती कोणता प्रभाव टाकते, याची नोंद तत्त्वज्ञानाच्या इतिहासात घेतली जाते. थोडक्यात तत्त्वज्ञानाचा इतिहास म्हणजे तात्त्विक उत्पादन असलेले विचार ‘तत्त्वज्ञान’ या ज्ञानाच्या व्यापक रचनेचा हिस्सा कसा बनतात आणि काळानुसार त्यांचा प्रभाव कसा टिकून राहतो किंवा ओसरतो अथवा नाहीसा होतो किंवा पुनरुज्जीवित होतो यांचा इतिहास असतो.
विल्यम्स यांच्या मते कल्पनांचा इतिहास आणि तत्त्वज्ञानाचा इतिहास यात भेद करता येतो, पण त्यांना एकमेकांपासून अलग करता येत नाही. शिवाय बऱ्याच प्रमाणात त्यांना एकमेकांची नितांत गरज असते. तथापि कल्पना आणि तत्त्वज्ञान यांचे नाते समजावून घेण्यासाठी व त्यांचे आकलन सुलभ होण्यासाठी त्यांच्यात फरक करणे गरजेचे असते. असा फरक करून तत्त्वज्ञानाचा इतिहास लिहिणे, या प्रक्रियेला ‘ऐतिहासिक तात्त्विकीकरण’ म्हणता येईल. ही संकल्पना नीत्शे या तत्त्ववेत्त्याने १८७८ साली मांडली, असे विल्यम्स ‘तत्त्वज्ञानाला त्याच्या इतिहासाची गरज का असते?’ या अन्य एका निबंधात सांगतात. त्यांच्या मते नीत्शेने प्रतिपादन केल्यानुसार आपणास ऐतिहासिक तात्त्विकीकरण या नव्या तात्त्विक उत्पादनाची गरज आहे.
तत्त्वज्ञान अनेक संकल्पनांनी अस्तित्वात येते, पण तत्त्ववेत्ते केवळ तत्त्वज्ञानाकडेच आपले लक्ष केंद्रित करीत होते आणि जीवनाच्या इतर क्षेत्रांतून त्यांना लाभू शकणाऱ्या इतर संकल्पनांकडे, या संकल्पनांच्या इतिहासाकडे तत्त्ववेत्त्यांनी दुर्लक्ष केले, ही गंभीर बाब आहे; असा खेद सर विल्यम्स व्यक्त करतात. खरे तर संकल्पना समजावून घेणे, त्यांना समासातून मुख्य ज्ञानाच्या रचनेत आणणे, हे काम तत्त्ववेत्त्यांचे असते. ज्या संकल्पना आपण वापरतो त्यांना बौद्धिक प्रतिसाद देऊन आपण जणू काही आपल्यालाच समजावून घेत असतो, त्यातूनच तत्त्वचिंतनाची पद्धती तयार होते. त्यांच्या मते ज्ञानाचे निर्माते आणि ज्ञानाचा विषय या अर्थाने आपण स्वत:लाच नीटपणे समजावून घेत नसतो. शिवाय नतिक कत्रे म्हणूनही आपण आपल्याकडे दुर्लक्ष करतो, आपण आपल्या राजकीय संकल्पना समजावून घेत नसतो. आपल्याला कल्पना कशा सुचतात आणि अनुभव कसा येतो हेही समजावून घेत नसतो. परिणामी जग समजावून घेण्यातही आपण कमी पडतो. म्हणूनच आपण आपल्याला समजावून घेण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे.
आता, ही प्रक्रिया कशी सुरू केली पाहिजे? तर, मानवी इतिहासाच्या िबदूवर आम्ही कोठे आहोत? आम्ही कोण आहोत? ‘आम्ही’ या संकल्पनेचे आणखी कोण कोण लोक भाग आहेत, विशेषत: राजकीयदृष्टय़ा आणि नतिकदृष्टय़ा हे प्रश्न महत्त्वाचे असून त्यांना उत्तरे देता आली तर ती उत्तरे म्हणजेच आपली जीवनरीती बनते, आपले राजकीय व सामाजिक तत्त्वज्ञान बनते, मग तेच राजकीय पक्षांचे तत्त्वज्ञान बनते आणि सामान्यांच्या तनमनावर अधिराज्य गाजविते.
तत्त्ववेत्त्याने या संकल्पना विचारात घेताना नेहमी हे प्रश्न कोण विचारीत आहे आणि आपण कुणाशी बोलत आहोत, आपण कुणाला तत्त्वचिंतन कसे करावे याचे धडे देत आहोत, याचे सजग भान ठेवले पाहिजे. निर्माण होणारे प्रश्न आपले आहेत म्हणून उत्तरेही आपलीच असली पाहिजेत, याचे भान बाळगले पाहिजे.
हे सारे आपण भारतीय, महाराष्ट्रीय नागरिकांनी, का लक्षात घ्यावयाचे आहे? तर भारताला प्राचीन इतिहास, संस्कृती आणि दार्शनिक परंपरा आहे. पण भारताचा सारा इतिहास मिथके, पुराणे, कथा, प्रवचने यात झाकोळून गेला आहे. ‘भारतीय दर्शनांचा इतिहास’ याचे भान व्यावसायिक तत्त्ववेत्ते वगळता जनसामान्यांत जणू काही अस्तित्वात नाही. मग हा इतिहास, त्यातील संकल्पनाच समजल्या नाहीत तर तथाकथित प्रामाणिक सांप्रदायिक िहदुत्ववाद आणि सेक्युलर पण भ्रष्ट काँग्रेस, भूखंडकेंद्रित राष्ट्रवाद, निर्मितीक्षमता अद्यापि विकसित न केलेला नवनिर्माणवाद अथवा भारतीय न झालेला मार्क्सवाद कसा समजावून घेणार? तत्त्वज्ञानाचा इतिहास हाच मानवी जीवनाचा इतिहास असतो, म्हणून तत्त्वज्ञान अपरिहार्य असते.
*लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.
तत्त्वज्ञानाचा इतिहास.. कशासाठी?
तत्त्वज्ञानाचा इतिहास हा तत्त्वज्ञान विषयाच्या अभ्यासकांसाठीच असतो का? गतकालीन विचारवंतांनी आपापल्या काळात कल्पना आणि संकल्पनांचा जो मेळ घालून तत्त्वज्ञानात भर घातल्यामुळे आपल्याला आजही जी तात्त्विक बैठक मिळू शकते, ती हवी असणाऱ्या कोणीही या इतिहासाकडे गेले पाहिजे, ते का?
आणखी वाचा
First published on: 01-05-2014 at 01:08 IST
मराठीतील सर्व तत्वभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why history of philosophy