‘इशरत जाते जिवानिशी’ हा अग्रलेख (५ जुलै) आवडला. एखाद्या धर्मातील धर्माध लोकांबद्दल (विरोधात) कसे लिहायचे.. असला दांभिक-धर्मनिरपेक्ष प्रश्न मनात न आणता लेख लिहिला गेला आहे, हे स्पष्टपणे दिसते आहे. त्याबद्दल अभिनंदन.
हल्ली इशरत जहाँ या नावावर आणि संबंधित प्रकरणाच्या ‘एकाच बाजूवर’ इतका भर दिला जात आहे, की..बस्स! जणू संपूर्ण भारतासमोर हा एकच विषय आहे. काही वृत्तवाहिन्या इतर तीन तरुणांची नावेही घेत नाहीत. निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे खरे, अत्यंत महत्त्वाचे विषय / मुद्दे (इश्यूज) मागे टाकून लोकांमध्ये फूट पाडणारे, भावना चेतवणारे मुद्दे (नॉन-इश्यूज) पुढे आणायचे.. हेच षड्यंत्र यामागे आहे. एकुणातच, ‘‘इशरत जहाँ आणि कुटुंबीय हा एक सरळ-साधा परिवार गुजरातमध्ये पर्यटनासाठी/ सहज गेला होता.. आणि गुजरातमध्ये विशिष्ट धर्माच्या लोकांना शोधत फिरणाऱ्या (शस्त्रधारी) लोकांनी त्यांना गंमत म्हणून सहज मारून टाकले; गुजरातमध्ये अशा घटना वारंवार घडतच असतात.. आणि हो, मोदी आपले येता-जाता फोनवर अशा ‘विशिष्ट पर्यटकांना’ ‘टिपण्याचे’ आदेश त्या शस्त्रधारी लोकांना देत असतात..’’ असेच वातावरण निर्माण केले जात आहे.
अर्थात, ती चकमक बनावट असेल, तर त्याबद्दलची कायदेशीर शिक्षा संबंधितांना भोगावीच लागेल. पण गुन्हेगारांना शिक्षा होण्यापलीकडचेही ‘अधिक असे काहीबाही’ अनेकांना या प्रकरणातून मिळवायचे आहे. त्यामुळेच या प्रकरणाचा गेली १० वष्रे खेळ चालू आहे. प्रसारमाध्यमे-विचारवंत-अभ्यासक असे सर्वच जण या प्रकरणाचा इतिहास विसरले होते / आहेत. तो धक्कादायक व आश्चर्यकारक इतिहास या अग्रलेखाद्वारे लोकांपुढे आला आहे. २००७ साली दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्रानेच ही चकमक खरी होती असे नमूद केले होते.आतादेखील बुधवारी दाखल केलेल्या आरोपपत्रात गुप्तचर आयोगाने नऊ वर्षांपूर्वीची ती कारवाई केंद्रीय आणि राज्य सरकारी सुरक्षा यंत्रणांची संयुक्त मोहीम होती, असेच म्हटले आहे.
ही वरील माहिती खरोखरीच धक्कादायक आहे. मतांसाठीच्या लाचारीचे आणि लांगूलचालनाचे हे एक अत्युच्च उदाहरणच ठरावे.
संपादकांनी अनेक प्रश्न निर्माण केले आहेतच. इतर राज्यांमध्ये ‘बनावट चकमकी’ झाल्या नाहीत का? झाल्या असतील, तर त्या संबंधित अधिकाऱ्यांचे व लोकप्रतिनिधींचे (मुख्यमंत्र्यांचे) काय झाले? इशरतसारखे कोवळे तरुण-तरुणी धर्माधतेला बळी पडून दहशतवादाकडे वळतात, हे सामाजिक अनारोग्याचेच लक्षण आहे. असे होणे दु:खदच आहे..पण उगाच खपल्या काढून, रक्त तापवून ‘..खतरे में’च्या घोषणा देऊन आपल्याला का भडकवले जात आहे; यात कोण स्वार्थ साधत आहे.. या मुद्दय़ांचा तरुणांनी गांभीर्याने विचार करायला हवा. अन्यथा, २०१९ लाही पुन्हा एखाद्या इशरत जहाँचे प्रकरण उकरले जाईल, चघळले जाईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा