चित्रांचे लिलाव होत राहतात. चित्रकारांना कोणताही प्रत्यक्ष फायदा न मिळता चित्रांच्या किमती परस्पर वाढून चित्र या धनिकाकडून त्या धनिकाकडे फिरत राहते. त्यामुळे दिवंगत चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या दोन चित्रांनी लंडनमध्ये ११ जून रोजी काही तासांच्या अंतराने झालेल्या दोन लिलावांमध्ये अनुक्रमे ६.३३ कोटी रुपये आणि ५.६७ कोटी रुपये अशी एकंदर १२ कोटींची बोली मिळवली, या बातमीत अभिमान वाटण्यासारखे काही नाही. गायतोंडे मराठी भाषक, मुंबईकर व जेजेत शिकले आणि अमूर्तचित्रांच्या जागतिक इतिहासात त्यांनी स्वत:च्या शैलीचे योगदान दिले, म्हणून एरवीही त्यांचे कौतुक सामान्य मराठी भाषकांना असायला हवे. मात्र तसे झाले नव्हते. गायतोंडे यांच्या चित्राने २००२ साली भारतात थाटल्या गेलेल्या ‘बाव्रिंग्ज’ या अल्पजीवी लिलावसंस्थेच्या पहिल्या लिलावात २१ लाखांहून अधिक रुपयांची बोली मिळवली, तेव्हा मात्र गायतोंडे यांचे नाव महाराष्ट्रात ज्याच्या त्याच्या तोंडी झाले. गेल्या १५ वर्षांत, सुनील काळदाते यांनी गायतोंडे यांच्यावर तयार केलेला मूकपट, चिन्ह वार्षिकाचा गायतोंडे विशेषांक, यांपेक्षा अधिक चर्चा गायतोंडे यांच्या किमतींची झाली. एकीकडे बाजाराचे वाढते महत्त्व असे स्वीकारायचे, तर दुसरीकडे कलेला कसे बाजारी स्वरूप आले आहे याबद्दल नाके मुरडायची, असा प्रकारही सुरू झाला. हे हुसेनबद्दल झाले किंवा तय्यब मेहतांच्या चित्राला २००२च्या नोव्हेंबरात सुमारे दीड कोटींची विक्रमी बोली मिळाल्यावर मेहतांबद्दलही झाले. या चित्रकारांच्या कलागुणांची चर्चाही लिलावाच्या आधारे होऊ शकली असती, तसे न होता जास्त कमावले म्हणून जास्त मान हे यशवादी सूत्रच अधिक खरे ठरले! लिलावात बोली न लावणाऱ्या, इतकेच काय लिलाव पाहिलेलाही नसलेल्यांना केवळ यश आणि आकडेच दिसावेत यात नवल नाही. बोली लावण्यासाठी नोंदणी करून, ८० ते ९० चित्रांसाठी तीन तास घालवणाऱ्या संग्राहकांना मात्र, आपण कोणत्या चित्रासाठी व का इतका पैसा ओतणार आहोत, हे माहीत असते. चित्रांमधली गुंतवणूक ही चित्रांची आवड आणि इतिहासाची माहिती असल्याखेरीज यशस्वी होत नाही. आवड उपजत असावी लागेल, परंतु लिलावासाठी काढलेल्या पुस्तिकांमध्ये (कॅटलॉग) त्या-त्या चित्राची परिच्छेदभर माहिती असल्याने चित्र-परिचयासाठीदेखील ती उपयोगी आहे, याची कल्पना कला विद्यार्थ्यांखेरीज फार कुणाला नसते. भारतीय आधुनिक आणि समकालीन चित्रांचे लिलाव लंडन वा न्यूयॉर्कमध्ये दरवर्षी होऊ लागले, त्याला आता ११ वर्षे झाली. ‘सदबीज’, ‘ख्रिस्टीज’सारख्या आंतरराष्ट्रीय लिलाव कंपन्यांनी वा ‘सॅफरॉन आर्ट’सारख्या देशी कंपनीने काढलेले कॅटलॉग रद्दीतही मिळू लागले, तरी कुतूहल म्हणून ते घेणाऱ्यांची संख्या कमीच. लिलावांचे महत्त्व वाढते आहे, यावर टीका जरूर व्हायला हवी. परंतु अपुऱ्या माहितीमुळे ही टीका ‘लिलाव म्हणजे कलेची बाजारबसवेगिरी’ अशा पातळीस जाते व अन्य रास्त आक्षेप बाजूला राहतात. लिलावांमुळेच भारतीय चित्रांकडे, चित्रकारांकडे आणि प्रसंगोपात्त त्यांच्या किमतींकडे सामान्यजनांचे लक्ष वेधले जाते, ही स्थिती आपल्याकडील संग्रहालयांच्या अभावामुळे आली आहे. लिलावांच्या पुस्तिकाच माहिती अधिक देतात, एखाद्या चित्रकारास अतिप्रसिद्धी दिल्याचे प्रकार घडतात, ही वेळ योग्य प्रकाशनांच्या अभावी येते आहे. पोहोचतो तो बाजार, चित्रे नव्हेच, ही कोंडी लिलावांच्या सार्वत्रिकीकरणानंतरही कायम आहे.

Story img Loader