जयेश राणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
देशभरातील १२ वर्षांवरील सर्वांसाठी कोविड लसीकरण खुले झाले, तेव्हापासून ९८ कोटी ८३ लाख २० हजार २८७ आबालवृद्धांनी लशीची पहिली मात्रा घेतल्याचे १५ जुलैपर्यंतची सरकारी आकडेवारी (स्रोत : पत्र सूचना कार्यालय- भारत सरकार) सांगते. पण याच ताज्या आकडेवारीनुसार, वर्धक मात्रा किंवा बूस्टर डोस म्हणून ओळखली जाणारी तिसरी मात्रा अवघ्या पाच कोटी २६ लाख ८१ हजार ४२२ जणांनीच घेतली आहे. दुसऱ्या मात्रेलादेखील ८९ कोटी ७१ लाख ६९ हजार २९८ आबालवृद्धांनी प्रतिसाद दिला, असे या आकडेवारीतून समजते. यापैकी १८ वर्षांखालील मुले साडेसात कोटी, हे गृहीत धरले तरी दुसरी मात्रा घेतलेल्या ८२ कोटी भारतीयांपैकी ७७ काेटी जनतेने ‘वर्धक मात्रा’ घेतलेली नाही.
वर्धक मात्रा घेण्याविषयी उदासीनता आहे, हे सत्य आहे. करोना प्रतिबंधात्मक लशीच्या दोन मात्रा घेऊनही करोना संसर्गाने गाठलेच, त्यामुळे आता वर्धक मात्रा घेऊन काय उपयोग ? असा विचार करणारेही कमी नाहीत. केवळ सोपस्कार म्हणून लस घेणे नको, तर ती घेतल्यावर करोना संसर्गापासून रक्षण देणार याची हमी नाही. त्यामुळे उगाचच कशाला रांगेत ताटकळत राहायचे ? अशा सर्वसाधारण मानसिकतेचा विचार वर्धक मात्रेचा प्रतिसाद वाढवण्यासाठी करावा लागेल. त्यासाठी अर्थातच, जनजागृतीला पर्याय नाही.
लशीची पहिली मात्रा घेतल्यावर दुसरी मात्रा घेण्यासाठीसुद्धा पुष्कळ जागृती करावी लागली. कायदेशीरपणे लस सक्ती नव्हती. पण प्रवास करण्यासाठी, मॉल्समध्ये प्रवेशासाठी दोन्ही मात्रा अनिवार्य करण्यात आल्या तेव्हा कुठे दुसरी मात्रा घेणाऱ्यांची संख्या वाढली. मात्र महाराष्ट्रासारख्या राज्यात आजही दुसरी मात्रा न घेतलेल्यांची संख्या पावणे दोन कोटींहून अधिक आहे. लस सक्ती कोणावर करता येत नाही, असे असले तरी ‘नाक दाबले की तोंड उघडते’, तसे वर्धक मात्रेच्या संदर्भात करण्याची नामुष्की येऊ नये. ‘वर्धक मात्रा घेतलेल्यांनाच प्रवासाची मुभा’ असा काहीतरी नियम जारी होण्याची वाट न पाहता वर्धक मात्रा घेतलेली बरी.
लस ( विशेषतः कोविशिल्ड ) घेतल्यावर तीन – चार दिवस ताप येणे, कणकण वाटणे, अशक्तपणा जाणवणे आदी त्रास काहींना झाले, तर काहींना त्रास जाणवला नाही. त्रास झाल्यामुळे धास्तावलेल्या मंडळींनी वर्धक मात्रेकडे पाठ फिरवली नाही ना ? विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्षांची कार्यालये यांनी स्वयंसेवा म्हणून तसेच विभागातील लोकांना सोयीचे होण्यासाठी पहिल्या दोन मात्रा देण्याची सुविधा ठिकठिकाणी उपलब्ध केली. वर्धक मात्रेच्या संदर्भात असे दिसत नाही. तसे ऐकण्यात – वाचनात आणि पाहाण्यातही नाही. असे केले तर चांगले होईल आणि वर्धक मात्रा घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल.
करोनाचा संसर्ग कमी होत आहे तर कधी वाढत आहे. वाढला तरी करोनाची तीव्र लक्षणे असणाऱ्यांची संख्या कमी आहे. परिणामी रुग्णालयात भरती व्हावे लागणाऱ्या रुग्णांची संख्याही कमीच आहे. याविषयीची माहिती प्रसारमाध्यमांतून येतच आहे. त्यामुळे करोनाचा संसर्ग पूर्णपणे थांबलेला नसला तरी तो आटोक्यात आहे आणि त्यामुळे जिवावर बेतण्याचा धोका ही नाही. असा विचार करून बिनधास्त राहिले जात आहे. त्यातच मुखपट्टीचीही सक्ती नाही. असे असल्याने वर्धक मात्रा का घ्यावी, असा प्रतिप्रश्न केला जात आहे.
ही मात्रा घेण्यासाठी ठोस कारण हवे. या पद्धतीने विचार होत आहे. ‘लोकसत्ता’च्या वृत्तानुसार सात लाख २९ हजार ३२३ आरोग्य कर्मचारी तर १३ लाख ४२ हजार ८१३ आघाडीच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरिकांनीही वर्धक मात्रेकडे पाठ फिरवली, हे दुर्दैवी आहे. या नागरिकांचा अनेक लोकांशी संपर्क येत असतो. आरोग्याविषयी किती सतर्क राहिले पाहिजे, याचे निराळे मार्गदर्शन यांना करण्याची आवश्यकता नाही. वर्धक मात्रा घेऊन यांना कार्यरत रहाण्यास काय अडचण आहे?
वैयक्तिक जीवन जगणे असो अथवा नोकरी-व्यवसाय-शिक्षण यांत कार्यरत राहणे असो आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहावे याकडे काटोकोरपणे लक्ष ठेवून सामाजिक आरोग्य बळकट करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यात निष्काळजीपणा करून स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेऊ नये. मुख्य म्हणजे, लसीकरणासारख्या उपक्रमात सहभाग नाेंदवण्यासाठी कुठल्या ना कुठल्या सक्तीची वाट पाहू नये!