आपले पती, रॉबर्ट वड्रा यांच्यावरील आरोपांनी व्यथित झालेल्या प्रियांका गांधी यांनी परवा अखेर आपले मौन सोडले. त्यांना ते सोडावेच लागले. त्याची कारणे प्रामुख्याने दोन दिसतात. एक म्हणजे पराभूत मानसिकतेत गेलेले काँग्रेसचे नेते. एकीकडे भाजपचे नेते नरेंद्र मोदी आपल्या भात्यातील उपहास, वक्रोक्ती आदी रामबाण वड्रा यांच्यावर सोडत असताना ही काँग्रेसी नेतेमंडळी मात्र तोंड चुकवत फिरताहेत. यापूर्वी हरयाणातील एक सनदी अधिकारी अशोक खेमका यांनी वड्रा यांच्यावर जमीन गैरव्यवहाराचे आरोप केले होते. त्या वेळी दिग्विजय सिंह, मनीष तिवारी यांच्यासारख्या १० जनपथी नेत्यांनी वड्रा यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र मोदींचा तोफखाना त्यांना भारी पडत आहे आणि माध्यमेही अलीकडे त्यांना हिंग लावून विचारत नाहीत. सोनिया आणि राहुल यांनीही वड्रा यांच्यावरील आरोप खोडून काढण्याचा थेट प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे अखेर आपल्या पतीची ढाल बनून प्रियांका यांनाच उभे राहावे लागले आणि हे काम त्यांनी मोठय़ा तडफेने केले. यामागील दुसरे कारण हे अधिक महत्त्वाचे आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात वड्रा यांचे नाव चर्चेत नव्हते. पण मोदी यांनी अदानी यांना गुजरातेत कवडीमोलाने जमिनी दिल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आणि लगोलग भाजपच्या प्रचारतज्ज्ञांनी ‘जीजा-जी’ प्रकरणाला हवा दिली. नरेंद्र मोदी शहजादेकडून जीजाजीकडे वळले. तिकडे उमा भारती यांनी तर वड्रा यांना तुरुंगात पाठविण्याची तयारीच सुरू केली. या सगळ्या गोष्टी खरोखरच दूरदृष्टीने केल्या जात आहेत का याबद्दल आताच काही सांगता येणार नाही. पण ही पुढच्या पाच वर्षांनंतरची तयारी दिसते. सोनिया गांधी यांची प्रकृती बरी नसते. निवडणुकीनंतर राहुल यांची राजकीय प्रकृतीही चांगली नसणार. अशा वेळी प्रियांका पुढे येण्याची दाट शक्यता आहे. त्यांचे पंख छाटण्याची कात्री रॉबर्ट यांनी आयतीच भाजपच्या हाती दिली आहे. प्रियांका यांनी अत्यंत भावनाशील आणि कणखरपणे रॉबर्ट यांचा बचाव सुरू केला आहे, त्याचे कारण हे आहे. वड्रा यांच्याभोवतीचा चक्रव्यूह भेदण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. परंतु आता वेळ गेली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दैनिकातून अलीकडेच वड्रा यांच्या गैरव्यवहारांचा सातबारा प्रसिद्ध झाला. त्यानुसार त्यांनी आपल्या कंपन्यांच्या माध्यमातून हरयाणा आणि राजस्थानात मोठय़ा प्रमाणावर जमीन खरेदीविक्रीचे व्यवहार केले. त्यातून कोटय़वधी रुपये कमावले. या व्यवहारांत त्यांना अर्थातच कौटुंबिक संबंधाचा उपयोग झाला. त्यांनी जमिनींची खरेदीविक्री केली, त्या वेळी त्या त्या राज्यात काँग्रेसचे सरकार होते. त्यांनी या व्यवहारांत काहीही गैर नसल्याचा निर्वाळा दिला. त्यावर कोण विश्वास ठेवणार? राजस्थानातील भाजपच्या सरकारने आता त्या प्रकरणांची चौकशी सुरू केली असून त्यासंबंधात एक याचिकाही दिल्ली न्यायालयात दाखल झाली आहे. अशा वेळी प्रियांका यांनी पुढे येऊन त्या आरोपांबद्दल बोलावयास हवे होते. परंतु त्याऐवजी त्यांनी लोकांच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न केला. आपल्या पतीविरोधात हे कुभांड आहे, असे त्या म्हणतात. याला कांगावखोरी म्हणतात. प्रियांका यांना त्यातून सहानुभूती निश्चित मिळेल. पण न्यायालयात त्याला काडीची किंमत नसते. तेथे आपले ‘सत्य’ त्यांना सिद्ध करावेच लागेल. मात्र या प्रकरणात भाजपला यापुढे फारच सावधगिरीने पावले उचलावी लागणार आहेत. उमा भारतींसारख्या बोलभांड नेत्यांना वेसण घालावी लागणार आहे. अन्यथा वड्रा यांच्या आडून गांधी घराण्याला तुकविण्याच्या नादात भ्रष्टाचाराच्या या प्रकरणाला सुडाचा वास येऊ लागेल. भाजपच्या पुढच्या राजकारणास ते अडसर ठरेल.

Story img Loader