मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या अभिनेता संजय दत्त याने सर्वोच्च न्यायालयात शिक्षा भोगण्यास आणखी सहा महिने मुदत वाढवून मागणारा अर्ज करणे आणि त्याचवेळी माजी न्यायमूर्ती मरकडेय काटजू यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन दत्त याच्यासाठी रदबदली करणे या घटना वरवर सरळ वाटणाऱ्या आहेत. १९९३ मध्ये झालेल्या या स्फोटांमध्ये अवैधरीत्या शस्त्रे बागळल्याबद्दल संजय दत्त याच्याबरोबरीनेच झेबुन्निसा काझी, इसाक मोहमद हजवणे आणि शाहीद अब्दुल गफूर यांनाही तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. ते तिघेही येत्या १८ एप्रिल रोजी तुरुंगात रवाना होणार आहेत. त्यांनी याप्रकरणी राष्ट्रपतींकडे अर्ज केला असून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना कोणतीही सवलत देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. २१ मार्चला ही शिक्षा जाहीर झाल्यानंतर संजय दत्त याच्या बाजूने काटजू यांनी पुढाकार घेतला. घटनेच्या ७२व्या कलमातील तरतुदीनुसार संजय दत्तची शिक्षा माफ होऊ शकते, असा युक्तिवाद करण्यात आला. त्यासाठी त्याने राष्ट्रपतींकडे अर्ज करणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले. तेव्हा मात्र संजय दत्त याने आपण शिक्षा भोगणार असल्याचे जाहीर करून सगळ्यांना धक्का दिला होता. यापूर्वी १८ महिने शिक्षा भोगलेली असल्याने उरलेली साडेतीन वर्षे तुरुंगात घालवण्याची आपली तयारी त्याने अगदी फिल्मी स्टाइल जाहीर केली. आता असे काय झाले की, त्याने पुन्हा न्यायालयाकडे धाव घेऊन शिक्षा भोगण्यासाठी काही मुदत मागावी? त्याने सांगितलेली कारणे चित्रपट व्यवसायाशी निगडित आहेत. आपण तुरुंगात गेलो, तर काहीशे कोटी रुपये अडकलेले चित्रपट डब्यात जातील आणि पर्यायाने मोठे आर्थिक नुकसान होईल, असे त्याचे म्हणणे आहे. असे घडेल, हे त्याला आधीही माहीत होतेच. मग तेव्हा मात्र कधी एकदा शिक्षा भोगतो, असा आव आणण्याचे काय कारण होते? जे शस्त्र बाळगणे हा गुन्हा आहे, ते केवळ कुतुहलापोटी बाळगणे आणि त्याहीपुढे जाऊन स्फोटाच्या सूत्रधाराशी संपर्क ठेवणे या गुन्ह्य़ांसाठी संजय दत्तला कमीत कमी शिक्षा झाली आहे. तीही दयेपोटी रद्द होऊ शकणार असेल, तर आपण काय करतो आहोत, याचीही जाणीव नसलेल्या झेबुन्निसाला शिक्षा भोगण्याचा आग्रह का धरायचा, याची उत्तरे आता मिळवावी लागणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत जी कठोर भूमिका घेतली, त्याचे स्वागतच केले पाहिजे. अशा प्रकरणात एखाद्याला सामाजिक पातळीवर आधीच शिक्षा झाली आहे, तेव्हा आणखी कशाला, या प्रश्नाचे उत्तर कायद्यासमोर सर्व जण एक असतात, असेच असायला हवे. संजय दत्तच्या निमित्ताने कायद्याच्या चौकटीला आव्हान देण्याची जी स्पर्धा आता सुरू झाली आहे, ती थांबायला हवी, अशीच सर्वाची अपेक्षा आहे. गेल्या २० वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले, असे म्हणण्यापेक्षा ‘देर है, अंधेर नहीं’ असे मानणे अधिक उपयुक्त आहे. संजय दत्तला त्याच्या गुन्ह्य़ापेक्षा झालेली शिक्षा जास्त आहे, असा समज यामुळे पसरण्याची शक्यता अधिक आहे. बातमीसाठी ‘सेलिब्रिटी’ एवढा एकच निकष पुरेसा नसतो, याचे भान इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी ठेवले असते, तर समाजाच्या दृष्टीने संजय दत्त आणि झेबुन्निसा व इतर आरोपींमध्ये फारसा फरक राहिला नसता. पोटाशी दोन लहान मुले आहेत, चित्रपट व्यवसायातील बरेच पैसे आपल्यामुळे अडकले आहेत, अशा प्रकारची समांतर कारणे अन्य आरोपींनाही पुढे करता येतील. प्रश्न आहे, तो गुन्ह्य़ाचे स्वरूप आणि त्यासाठी झालेली शिक्षा भोगण्याचा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा