चित्रपटातील गाणी सहजपणे गुणगुणणाऱ्यांच्या मनावर शास्त्रीय संगीताबद्दल एक दडपण का वाटते, याचे खरे उत्तर आजवरच्या कलावंतांनी त्याकडे लक्ष दिले नाही असे आहे. गाणे कळणे आणि गाणे आवडणे या दोन पायऱ्यांपैकी पहिली पायरी आवडण्याचीच असली पाहिजे, असे वातावरण अभिजात संगीताच्या क्षेत्रात निर्माण होण्याची आवश्यकता आहे. तसे झाले, तर नव्याने संगीत ऐकू पाहणाऱ्यांमध्ये अपरिचित असलेल्या निर्मम आणि निखळ आनंदाला मुक्तपणे सामोरे जाण्याची क्षमता येईल..
भारतीय अभिजात संगीताला ‘शास्त्रीय संगीत’ असे का म्हणतात, या प्रश्नाला संगीतातील कलावंतांनी मुदलातच बाजूला काढायला हवे होते. कलावंतांनी जसे त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तसे संगीतावर लिहिणाऱ्यांनाही त्याचे फारसे महत्त्व जाणवले नाही. या जगात नव्याने येणाऱ्या पिढीतील नव्या रसिकांना ‘शास्त्रीय’ हा शब्द सर्वप्रथम खटकू शकेल, असे यापैकी कुणाला जाणवलेच नाही. त्यामुळेही असेल कदाचित नव्या पिढीच्या मनात या संगीताबद्दल विनाकारण काही ग्रह निर्माण होण्यास मदत झाली. तंत्रज्ञानाच्या जगात जन्मलेल्यांना सगळे जगणेच एका ‘क्लिक’वर असते, याची खात्री असते. त्यांच्याकडे असलेल्या एका मोबाइलमध्ये बोलणे, फोटो काढणे, खासगी दैनंदिनी ठेवणे, घडय़ाळाचा गजर वाजणे यांसारख्या मूलभूत गोष्टी एकाच वेळी उपलब्ध असतात. त्याशिवाय नव्या तंत्रामुळे त्याच यंत्राचा वापर करून एकाच वेळी अनेकांना एकमेकांना संदेश पाठवणे, फोटो, आवाजाची आणि दृश्यांची फीत पाठवणे यांसारख्या अगदी पाच वर्षांपूर्वीपर्यंत अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी या मोबाइलने अगदी सुटसुटीत करून टाकल्या. तंत्राच्या या वेगाने यंत्राबद्दल भीती वाटणाऱ्या मागच्या पिढीला आपण सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात बाहेर फेकले जात आहोत, असे वाटणेही त्यामुळेच स्वाभाविक ठरले. नव्या पिढीला शास्त्रीय या शब्दाची भीती वाटत असली तरी ते या शास्त्रीय जगाचेच प्रतिनिधी आहेत. तरीही त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताची एवढी ‘भीती’ का वाटते? ते कळत नाही किंवा कळणारच नाही, असेही का वाटते? गाणे आवडणे आणि कळणे या दोन भिन्न गोष्टी असतात आणि आवडले, तर कळणे सोपे होते. पण चित्रपटातील गाणी सहजपणे गुणगुणणाऱ्यांच्या मनावर शास्त्रीय संगीताबद्दल एक दडपण का वाटते, याचे खरे उत्तर आजवरच्या कलावंतांनी त्याकडे लक्ष दिले नाही असे आहे. समोर बसलेला प्रत्येक श्रोता ‘रसिक’ आहे, असे गृहीत धरल्याने त्याची बौद्धिक मशागत करावी लागते याचे भान कलावंतांना राहिले नाही. काही वेळा तर रसिकांना अडचणीत टाकण्यातच धन्यता मानणाऱ्या कलावंतांना आपण संगीतालाच अडचणीत आणत आहोत, हे मात्र लक्षात आले नाही. त्यामुळे ‘राग ओळखा’ अशी स्पर्धाच जणू प्रत्येक मैफलीत सुरू झाली. जे गाणे शिकत असतात, ते अशा वेळी आपल्याच ज्ञानाची परीक्षा पाहू लागतात, ज्यांना काहीच माहीत नाही, ते पूर्वीच्या अनुभवाची उजळणी करू लागतात.
रागाचे नाव, बंदिशीचे शब्द, तालाचे नाव या तीन गोष्टी समजल्या म्हणजे ‘शास्त्रीय’ संगीत कळू लागले, असे समजण्याची पद्धत आहे. पण संगीताचे सारे जग त्यात सामावलेले नसते. रागाचे नाव कळले म्हणजे संगीत अधिक चांगल्या रीतीने ऐकता येते असे होत नाही. नाव कळण्याने श्रवणाच्या आनंदात भर पडते, एवढेच. पण सामान्यत: राग, बंदिश आणि ताल कळणारे हे रसिक इतरेजनांकडे ज्या तुच्छतेने कटाक्ष टाकतात, त्याने ते गळाठून जाण्याचेच काय ते बाकी असते. समजा, नाही कळले रागाचे किंवा तालाचे नाव, तर संगीतातून मिळणाऱ्या आनंदात अशी फार मोठी बाधा येईल का? खरे तर यायला नको. चित्रपटातले आवडणारे गाणे कोणत्या रागात आहे आणि कोणत्या तालात आहे, हे शोधण्याचाही कुणी प्रयत्न करत नाही. गाणे आवडते, एवढीच वस्तुस्थिती उरते. तेवढीच पुरेशी असायला हवी. पण या रागसंगीतातील लालित्यापेक्षा त्यातील शास्त्रीयतेचे जे अवडंबर माजवले गेले, त्याने भारतीय अभिजात संगीताची फार मोठी हानी झाली. संगीताचे शिक्षण देणाऱ्या वर्गामध्ये ‘किती राग येतात?’ हा कळीचा मुद्दा का ठरतो, याचे कारण संगीत किती कळते, याकडे दुर्लक्ष होते म्हणून. खूप राग आले म्हणजे खूप संगीत आले अशा समजातून हा घोटाळा तयार होतो. संगीत कळणे म्हणजे सौंदर्याची अनुभूती येणे. एखादे सुंदर चित्र पाहिल्यानंतर, सुघड इमारत पाहिल्यानंतर जे जाणवते, तेच संगीत ऐकल्यानंतरही जाणवण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण करणे म्हणजे रसिक होणे असते, हे श्रोत्यांनाही कुणी सांगितले नाही. त्यामुळे गडबड अशी झाली की शास्त्रीय संगीताच्या मैफलींमध्ये कळते असे वाटणाऱ्यांचीच संख्या जास्त दिसू लागली. कळत नाही, कळणार नाही असे वाटणारे तिकडे फिरकेनासे झाले. तंत्रज्ञानाच्या आविष्काराने संगीताची ही माहिती सहजपणे उपलब्ध झाली, तरी ती मिळवण्यासाठीची धडपड होत नाही.
यमन कल्याण नावाचा राग म्हणजे काय असते? त्यातील स्वर? त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध (संगीताच्या भाषेत वादी- संवादी असा सुरेख शब्दप्रयोग वापरात येतो.), बंदिशीचे शब्द, त्यांचा अर्थ की त्या बंदिशीतून व्यक्त होणारे भाव की त्याहीपलीकडे जाऊन संगीत ऐकताना येणारा अपूर्वतेचा अनुभव. कोण गाते आहे, यावर ते आवडणार आहे की नाही, हे ठरवणे जसे गैर असते, तसेच काय गायले जात आहे, याच्याशीही त्याचा काही संबंध असायला नको. पण साधारणत: घडते ते असे. कोणताही कलावंत मैफल सुरू करण्यापूर्वी सादर करणार असलेल्या रागाचे नाव सांगत नाही आणि कोणत्या तालात आपण या रागातील बंदिश सादर करणार आहोत, हे लपवून ठेवतो. असे घडते, कारण कलावंताला त्याची गरज वाटत नाही एवढेच असू शकते. संगीत ऐकणाऱ्या नव्या पिढीला आपण संगीतातील एवढासा तांत्रिक भाग समजावून सांगितला, तर असे काय बिघडते, हे कळण्यापलीकडचे आहे. संगीतातील मजा कशात असते? याचे उत्तर प्रत्येक जण वेगवेगळे देऊ शकेल. कुणाला रागाच्या मांडणीत म्हणजे नुसत्या स्वरांच्या साहाय्याने होणाऱ्या रागाच्या विस्तारात आनंद वाटेल, तर कुणाला बंदिशीच्या रचनेत. कुणाला ताना आवडतील, तर कुणाला बंदिशींच्या शब्दांच्या आधारे होणारी बढत. पण संपूर्ण श्रवणानंतर येणारा अनुभव मनात किती काळ रेंगाळतो, यावरच सारे काही अवलंबून असते. त्या आनंदात या छोटय़ा छोटय़ा आनंदाचे एकत्रीकरण असते. शास्त्रीय संगीत हे सौंदर्याचा देखणा आविष्कार करण्यासाठीच जन्मलेले आहे, याची जाणीव पक्की झाली, की सौंदर्य जाणवते की नाही, यावरच गाणे आवडते की नाही हे ठरू शकते. प्रत्येकाची सौंदर्याची जाणीव वेगवेगळी असते. त्याच्या जन्मापासून त्याला मिळालेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीतून ती जाणीव होत असते. समजायला लागल्यानंतर काय सुंदर आणि का सुंदर याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न जेव्हा सुरू होतो, तेव्हा ही माहिती कामाला येते. मग आपणच आपल्याला काय आवडते हे ठरवू लागतो. काय आवडते, याचाही शोध घेऊ लागतो. त्याचे ठोस उत्तर शब्दांत देता आले नाही, तरी आपल्याला अमुक एक राग खूप आवडतो. एखाद्या कलावंताचे गाणे खूप भावते. आपली ही सौंदर्यदृष्टी हेच या संगीताच्या जगातील सर्वात महत्त्वाचे केंद्र असते. असायला हवे.
भारतीय संगीताची उलगडच मुळी समोरच्या रसिकाच्या प्रतिसादातून होते. हा प्रतिसाद कलावंताच्या नवोन्मेषी प्रतिभेला साद घालणारा असतो आणि त्यातूनच प्रत्येक वेळी नवी कलाकृती जन्म घेते. म्हणजे तोच राग पुन:पुन्हा नव्याने जन्म घेतो. त्याचे नवे दर्शन घडवतो आणि ऐकणाऱ्याच्या कल्पनांना सुखद धक्काही देतो. नव्याने गाणे ऐकणाऱ्याला कलावंतांनीच कवेत घेतले, तर संगीताच्या श्रवणातील बरेचसे प्रश्न आपसूक सुटायला लागतील. पण कलावंतांनीही त्यासाठी आपली कवाडे उघडली पाहिजेत. आपण ज्या सौंदर्याची निर्मिती करतो, ते सौंदर्य ‘आकळण्या’साठी त्यानेच रसिकाला मदत करायला हवी. चित्रकाराने चित्राखाली काहीही लिहिले नाही, तरी पाहणाऱ्याच्या मनात उमटणारे तरंग हे त्याच सौंदर्याचा साक्षात्कार घडवणारे असतात. एखादी कलात्मक वस्तू समोर आल्यानंतर ती कशी बनवली, याचे शास्त्र समजून सांगण्याची गरजच पडत नाही. कारण पाहणाऱ्याला त्याची गरज वाटत नाही. भारतीय अभिजात संगीताच्या प्रांतात मात्र असे घडत नाही. गाणे कळणे आणि गाणे आवडणे या दोन पायऱ्यांपैकी पहिली पायरी आवडण्याचीच असली पाहिजे, असे वातावरण अभिजात संगीताच्या क्षेत्रात निर्माण होण्याची आवश्यकता आहे. तसे झाले, तर नव्याने संगीत ऐकू पाहणाऱ्यांमध्ये अपरिचित असलेल्या निर्मम आणि निखळ आनंदाला मुक्तपणे सामोरे जाण्याची क्षमता येईल. सौंदर्यनिर्मिती करण्याच्या या आविष्कारात रसिकाला गृहीत धरण्यापेक्षा त्याला सर्जनाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी एवढासा बदल झाला तरी मोठा परिणाम घडू शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा