नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी निवडले गेले, तर या देशात मी राहणार नाही, अशा स्वरूपाची यू. आर. अनंतमूर्ती यांची विधाने आपल्याकडील बुद्धिवंतांच्या अप्रामाणिकपणाची द्योतक आहेत. केवळ बुद्धीशीच बांधीलकी असणारे दुर्गाबाई वा नरहर कुरुंदकर यांच्यासारखे प्रामाणिक विचारवंत आज नाहीत. त्यामुळे या वाचाळवीरांचे फावते.
कोणत्याही प्रश्नावर एकांगी आणि कर्कश भूमिका घेऊन गोंधळ उडवून देणाऱ्या सामाजिक भाष्यकार आणि सुमार माध्यमवीरांची कमतरता आपल्याकडे कधीच नव्हती. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या असो वा काही राजकीय विषय. अंतिम सत्य जणू आपल्यालाच गवसले असल्याच्या थाटात ही मंडळी वचावचा करीत गावगन्ना हिंडत असतात आणि माझ्या मताचा पुरस्कार म्हणजेच लोकशाही असा त्यांचा सूर असतो. अशा या वाचाळवीरांत ज्ञानपीठ विजेते लेखक यू. आर. अनंतमूर्ती यांनी सामील होण्याची गरज नव्हती. नरेंद्र मोदी हे आगामी निवडणुकांत पंतप्रधानपदी निवडले गेले, तर या देशात मी राहणार नाही, अशा स्वरूपाचे विधान अनंतमूर्ती यांनी नुकतेच केले. त्यांचे म्हणणे असे की मोदी यांच्यामुळे जनतेच्या मनात भीती तयार होते आणि अशी भीतीची भावना निर्माण करणारा देशाच्या सर्वोच्चपदी निवडला गेला तर त्या देशात राहण्यात अर्थ नाही. अनंतमूर्ती यांची ही विधाने आपल्याकडील बुद्धिवंतांच्या अप्रामाणिकपणाची द्योतक आहेत. याआधीही महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीच्या संदर्भात पुष्पा भावे वगैरे मंडळींनी अशीच भूमिका घेतली होती. त्या वेळी या वाचाळवीरांना चार शब्द सुनावण्याचे काम दुर्गाबाई भागवतांनी केले. केवळ बुद्धीशीच बांधीलकी असणारे दुर्गाबाई वा नरहर कुरुंदकर यांच्यासारखे प्रामाणिक विचारवंत आज नाहीत. त्यामुळे या वाचाळवीरांचे फावते. त्यात आजची बरीचशी माध्यमेही याच जातकुळीतील अर्धवटरावांच्या हातात आणि त्यातून चॅनेलीय चर्चातील स्वैर भाष्य म्हणजे पांडित्य असे मानण्याचा प्रघात. दुय्यम वा तिय्यम दर्जाच्या राजकारण्याकडील पैशांवर यांची साप्ताहिके वा वाहिन्या चालणार आणि वर तरीही हे सर्व नैतिकतेचे टेंभे मिरवणार. माध्यमे हाती असल्यामुळे अशा वाचाळवीरांचे वाह्यात बोलणे विनाआव्हान खपून जाते. त्यामुळेच त्यांचा समाचार घ्यावयास हवा.
हे वाचाळवीर एका बाजूला आपण मोठे लोकशाहीवादी आहोत असा आव आणतात. परंतु यांच्याच मताला जोपर्यंत दुजोरा दिला जात असतो तेथपर्यंतच यांच्या लोकशाहीचा परीघ असतो. ज्या क्षणी या मंडळींच्या मताचा प्रतिवाद सुरू होतो, त्या वेळी या मंडळींची लोकशाहीनिष्ठा संपुष्टात येते, हा इतिहास आहे. त्या अर्थाने हे सर्व उजव्या फॅसिस्टांइतकेच असहिष्णू असतात. परंतु आपल्याकडे डाव्या बाजूच्या असहिष्णुतेस बौद्धिक मखरात ठेवण्याची परंपरा आहे. त्यात उजवीकडून वादप्रतिवाद करणारे डाव्या बाजूने युक्तिवाद करणाऱ्यांइतके माध्यमस्नेही नाहीत. त्यामुळे त्यांचे चातुर्य दिसून येत नाही. परिणामी हे दांभिक वाचाळवीर जे बोलतात त्याचा परिणाम वास्तवापेक्षा अधिक भासतो. परंतु त्यांच्या विचार आणि विधानांतील विरोधाभास उघडा करावयास हवा. अनंतमूर्ती वा तत्सम मंडळी स्वत:स लोकशाहीवादी मानतात. लोकशाहीत बहुसंख्यांचे जे काही मत असेल त्याचा आदर करणे अभिप्रेत असते. हे बहुसंख्याकांचे मत आपल्या मतास छेद देणारे असले तरी लोकशाही व्यवस्थेवर विश्वास असणाऱ्याने ते मान्य करावयास हवे. हे तत्त्व एकदा मान्य केले की त्याचा निवडक आणि सोयीस्कर वापर ही लबाडी ठरते. अनंतमूर्ती ती करताना दिसतात. नरेंद्र मोदी वा त्यांचा भाजप यांना सत्ता मिळावी की न मिळावी हा वादाचा मुद्दा असू शकतो आणि ती मिळू नये असे अनंतमूर्ती वा तत्समांचे मत असू शकते. तरीही समजा उद्या मोदी यांना सत्ता मिळालीच तर त्यामागील बहुमताचा अनादर करण्याचा अधिकार अनंतमूर्ती यांना कसा काय मिळतो? मी म्हणतो तेच बरोबर, तेच सत्य आणि त्यापुढे सर्वानीच मान तुकवावयास हवी, हा आग्रह हे लोकशाहीवाद्याचे लक्षण आहे काय? अनंतमूर्ती यांचा तसा समज दिसतो. नपेक्षा बहुसंख्यांच्या निर्णयाचा अवमान करण्याचे पाप त्यांच्या हातून घडते ना. मोदी यांचे विकासाचे प्रारूप हे अयोग्य आहे असे अनंतमूर्ती यांचे मत आहे आणि त्यांच्या मताचा अनादर करण्याचे काहीही कारण नाही. वैचारिकदृष्टय़ा अनंतमूर्ती हे जनता दलाचे हंबल फार्मर (की फंबल हार्मर?) देवेगौडा यांचे समर्थक. त्यांच्या पक्षाच्या हाती जेव्हा कर्नाटकातील सत्ता आली आणि या देवेगौडा यांचे चिरंजीव कुमारस्वामी जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून कर्नाटकाच्या अधोगतीला सुरुवात झाली, हा ताजा इतिहास आहे. बंगलोर आणि परिसरातील जमिनींचे एकापेक्षा एक तगडे घोटाळे हे कुमारस्वामी देवेगौडा यांच्या काळात घडले. या कुमारस्वामी यांनी भाजपशी सोयरीक केली म्हणून अनंतमूर्ती यांनी त्यांची साथ सोडली. हे अनंतमूर्ती यांच्या भूमिकेशी साजेसेच झाले. परंतु तरीही त्यांनी देवेगौडा यांच्या विकास धोरणास कधी विरोध केल्याचे ऐकिवात नाही. तेव्हा देवेगौडा आणि कंपूंचे विकास प्रारूप योग्य आहे, असे त्यांचे मत आहे काय? अनंतमूर्ती यांची आणखी एक लबाडी उघड करावयास हवी.
मोदी हे विचारांनी आधुनिक नाहीत, असे अनंतमूर्ती यांना वाटते. ते खरे असेलही. त्यांच्या मताचे खंडन करण्यात वा मोदी विचारांनी किती आधुनिक आहेत, हे दाखवण्यात आम्हास काडीचाही रस नाही. त्यांचे साजिंदे ते कार्य आनंदाने करतील. तेव्हा मोदी हे किती प्रागतिक वा आधुनिक आहेत, हा मुद्दा नाही. परंतु मोदी यांच्यावर आधुनिकतेच्या अभावाची टीका करणारे अनंतमूर्ती हे प्रागतिक आहेत काय, हा प्रश्न आहे आणि प्रामाणिकपणे विचार केल्यास त्याचेही उत्तर नाही असेच द्यावे लागेल. किंबहुना अनंतमूर्ती हे नरेंद्र मोदी यांच्याइतकेच मागास आहेत असे साधार म्हणता येईल. त्यासाठी एक दाखला पुरे. कर्नाटकातील सर्व शहरांचे नामकरण नव्याने करण्याची टूम मध्यंतरी निघाली होती. तिचे प्रणेते कोण? बंगलोर या शहराचे नामकरण बंगळुरू करण्याचा अट्टहास कोणाचा होता? या राज्यातील दहा शहरांची नावे पुराणात होती तशीच ठेवली जावीत यासाठीच्या मोहिमेची कल्पना कोणाची? या प्रश्नांचे उत्तर अनंतमूर्ती असे आहे. या मंडळींचा दांभिकपणा असा की बॉम्बेचे नामकरण मुंबई असे करण्याचा आग्रह भाजपच्या राम नाईक यांनी धरला तर ते मागास आणि बंगलोरचे नाव बंगळुरू करण्याची मागणी अनंतमूर्ती यांनी केली तर ते प्रागतिक, हे कसे? तेव्हा अन्य कोणाइतकेच बौद्धिकदृष्टय़ा अप्रामाणिक असणाऱ्या अनंतमूर्ती यांनी अशी भाषा करण्याची गरज नव्हती. त्यातून प्रगट झाला तो त्यांचा अपरिपक्वपणा.
मुंबईत जनतेच्या सोयीसाठी हाजी अली येथे पूल बांधण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तो बांधला गेला तर उच्चभ्रू अशा मलबार हिल परिसरातील रहिवाशांना त्याचा उपद्रव होणार असल्याने तेथील काहींचा त्यास विरोध आहे. या अल्प नाराजांचे प्रतिनिधित्व करताना विख्यात गायिका आशा भोसले यांनी हा पूल झाला तर आपण देशत्याग करू अशी भूमिका घेतली होती. अनंतमूर्ती यांचे आताचे विधान हे आशा भोसले यांच्या विधानाचे स्मरण करून देणारे आहे. परंतु दोघांतील फरक असा की आशा भोसले यांनी आपण देशत्याग केल्यावर दुबईत जाऊन राहू असे सांगितले होते. तो त्यांचा प्रामाणिकपणा म्हणावयास हवा. परंतु अनंतमूर्ती यांनी तोही दाखवलेला नाही. देशत्याग करावा लागल्यानंतर अनंतमूर्ती यांना राहावयास आवडेल अशी आदर्शभूमी (त्यास रामराज्य म्हणावे काय?) कोणती हे त्यांनी सांगितले असते तर बरे झाले असते आणि तेवढीच जनतेच्या ज्ञानात भर पडली असती. जे झाले त्यातून दिसला तो अनंतमूर्तिमंत अप्रामाणिकपणाच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा