ठाणे येथे पकडलेला बिबटय़ा पाहायला राजकीय नेते वायुदलाच्या प्रतिबंधित क्षेत्रात गेले आणि तेथे छायाचित्रणसुद्धा केले अशी बातमी वाचली. ( २५ सप्टेंबर) ती वाचून मनात विचार आला की पुढे कधी अतिरेकी जर त्यांच्या साथीदारांबरोबर राजकीय नेत्याच्या वेशात आणि आविर्भावात एखाद्या ठिकाणी गेले तर आपले पोलीस, लष्कर आणि अशा सुरक्षा यंत्रणा काय करतील? थोडा आवाज चढविल्यास सर्वाना एक कडकडीत सलाम ठोकून कदाचित आत सोडतील का? कारण नियम आणि कायदे हे कधी पाळायचे आणि कधी नाही या बाबत त्यांचा गोंधळ झालेला या प्रसंगातही दिसून येतो. आपल्या संसदेच्या दारात अतिरेकी पोहोचू शकतील अशी परिस्थिती देशात कशी काय निर्माण होते त्याचे अचूक उत्तर या प्रसंगात दिसते. या प्रकरणात संबंधितांवर कारवाई होणार की नाही याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.
सध्या सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे बरेच नेते एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयाबद्दलचे निर्णय मोडीत काढण्याकरिता कायदे करीत आहेत, स्वत:ला माहिती अधिकाराच्या बाहेर ठेवत आहेत. वैद्यकीय शिक्षणाचा बाजार मांडून स्वत: परदेशी उपचार घेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये याहून वेगळी अपेक्षा काय ठेवायची हासुद्धा प्रश्नच आहे.
-प्रसाद दीक्षित , ठाणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा