चिकित्सा करणे हा भारताचा स्वभाव नाही. भारतात ऐतिहासिक घटना एकतर गौरवशाली असतात किंवा कलंकित असतात. चीनबरोबरच्या युद्धात १९६२साली झालेला पराभव हा कलंक समजला जातो तर १९६५ व १९७१च्या युद्धाबद्दल बोलताना आपण भारावून जातो. या पाश्र्वभूमीवर मेजर जनरल कुलदीपसिंग बाजवा यांचा ७१च्या युद्धाचा चिकित्सक आलेख काढून या युद्धात निर्विवाद लष्करी विजय मिळाला असला तरी राजकीय पराभव झाला असे परखड विवेचन करण्याचे धाडस केले आहे. ‘इंडिया-पाकिस्तान वॉर १९७१- मिलिटरी ट्रायम्फ अॅन्ड पॉलिटिकल फेल्युअर’ या पुस्तकाच्या नावातच बाजवा यांचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. सिमला करार करताना भारताने अनेक गोष्टी हातातून घालविल्या असे बाजवा यांना वाटते. पाकिस्तानचे युद्धकैदी सोडण्याबरोबर लष्करीदृष्टय़ा मोक्याची ठाणी भारताने सोडली. ही ठाणी हातून गेल्यामुळे पश्चिम आघाडीवरील भारताचे नियंत्रण संपले. पाकिस्तानबरोबर सौदार्हाचे संबंध निर्माण होतील या आशेवर सिमला करार करण्यात आला. मात्र दुखावलेला पाकिस्तान कुरापती काढीत राहील याची कल्पना राज्यकर्त्यांना येऊ शकली नाही. पाकिस्तान पराभूत झाला असला तरी जेरबंद झाला नाही. परिणामी प्रथम फुटीर चळवळींना प्रोत्साहन, घातपाती कृत्यांना मदत अशा पद्धतीने सुरुवात करून लवकरच कारगिल, संसद हल्ला, मुंबई हल्ला अशी हल्ल्यांची मालिका पाकिस्तानकडून सुरू झाली. खरे तर ७१च्या युद्धापूर्वी इंदिरा गांधी यांनी रशियाबरोबर करार करून मुत्सद्देगिरीचे उत्तम प्रदर्शन केले होते. मात्र सिमला करारात ही मुत्सद्देगिरी दिसली नाही. अर्थात आंतरराष्ट्रीय दबाव हे कारण यामागे असणार. त्या वेळी भारताची आर्थिक स्थिती बेताची असल्याने लष्करी विजयाचा पूर्ण फायदा उठविणे भारताला शक्य झाले नसावे. बाजवा यांनी ही बाजू विचारात घेतली नसावी. युद्धाच्या लष्करी अंगाबद्दलचे त्यांचे विश्लेषण मात्र अचूक आहे. या युद्धात तिन्ही दलांमध्ये विलक्षण साहचर्य होते. वायुदल व नौदल यांच्या आक्रमणामुळे पश्चिम आघाडीवर पायदळाचा विजय सोपा झाला. सॅम माणेकशा यांचे कुशल नेतृत्व याला कारणीभूत होते. युद्ध तातडीने सुरू करण्याची इंदिरा गांधींची सूचना त्यांनी मानली नाही व डिसेंबपर्यंत थांबण्याचा सल्ला दिला. हिवाळ्यात हिमालयातील खिंडी बंद झाल्यामुळे चीनकडून आक्रमण होण्याचा धोका टळला. ही बाब ६२च्या युद्धातून माणेकशा शिकले होते. ६२च्या युद्धात भारताने वायुदल वापरलेच नाही. चीनकडून विमानहल्ला झाल्यास खूप नुकसान होईल आणि लोकांमध्ये घबराट पसरेल अशी पत्रे बंगाल व तामीळनाडूच्या त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांनी नेहरूंना लिहिली होती. ते युद्ध म्हणजे सावळागोंधळ होता. मात्र त्यानंतर तीनच वर्षांनी पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात, आधीच्या चुकांतून धडे घेत, तिन्ही दलांनी उल्लेखनीय कामगिरी केली. तरीही गुप्तचर खात्याचा ढिला कारभार लष्कराला भोवला होता. पायदळाच्या व्यूहरचनेला पोषक असे हल्ले वायुदलाने त्या वेळी केले नव्हते. लेफ्टनंट जनरल हरबक्षसिंग व मेजर जनरल राजिंदरसिंग ‘स्पॅरो’ अशा अधिकाऱ्यांनी अतुलनीय युद्धकौशल्य दाखविले तरी तिन्ही दलांचा एकत्रित तडाखा पाकिस्तानला बसला नव्हता. तो ७१मध्ये बसला व याचे श्रेय माणेकशा यांच्या नेतृत्वालाच जाते. पाकिस्तानचे भावी डावपेच लक्षात घेऊन भारताने सामरिक उद्दिष्टांचीही पूर्ती सिमला करारात करून घेतली असती, तर पुढील बऱ्याच घटना टळल्या असत्या. अशी सामरिक उद्दिष्टपूर्ती फार महत्त्वाची असते. त्याबद्दल आजचे नेतृत्वही पुरेसे आग्रही नाही.
जिंकले, जेरबंद नाही केले..
चिकित्सा करणे हा भारताचा स्वभाव नाही. भारतात ऐतिहासिक घटना एकतर गौरवशाली असतात किंवा कलंकित असतात. चीनबरोबरच्या युद्धात १९६२साली झालेला पराभव हा कलंक समजला जातो तर १९६५ व १९७१च्या युद्धाबद्दल बोलताना आपण भारावून जातो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-12-2012 at 03:55 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wins but not smashed in jail