थंडीचे दिवस सुरू झाले, पण थंडीच गायब.. असे म्हणावे अशीच यंदाच्या हवामानाची स्थिती आहे. कारण डिसेंबर महिना निम्मा झाला तरी आतापर्यंत गेले दोनच दिवस वगळता थंडी अशी पडलीच नाही. काहीशी अशीच स्थिती नोव्हेंबर महिन्यातही होती. त्यामुळे थंडीची लहर फिरलीय की काय, असा प्रश्न पडला तरी आश्चर्य वाटायला नको. मग या लहरीच्या मुळाशी नेमके काय आहे, हाही प्रश्न ओघाने येतोच. भारतातील थंडीची वैशिष्टय़े लक्षात घेतली की काही गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. एक तर भारतात थंडीचे आक्रमण होते ते उत्तर भारतातून! उत्तरेकडून येणारे थंड व कोरडे वारेच मुख्यत: देशभरातील थंडीचा मुख्य स्रोत ठरतात. समुद्रावरून वाहणारे काही वारे या थंडीला अडवतात. या वाऱ्यांच्या स्पर्धेत कोण जिंकते यावर आपल्याकडील थंडीचे भवितव्य अवलंबून असते. उत्तरेकडून येणारे वारे जिंकतात तेव्हा थंडी ताबा घेते. इतर वाऱ्यांची सरशी झाली तर मात्र थंडी पळून जाते. आपल्याकडील थंडीचे हे सामान्य नियम! भारताचा विचार केला तर उत्तरेकडील राज्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात थंडीची लाट पसरते आणि ती काही आठवडे कायम राहते. मध्य भारतातही त्याचा प्रभाव जाणवतो, मात्र आपल्याकडे उत्तर महाराष्ट्राचा काही भाग वगळता इतरत्र थंडी वेगळ्या प्रकारची असते. उरलेल्या प्रदेशात थंडीमध्ये सतत चढ-उतार होत राहतात. सलग आठ-दहा दिवस थंडी क्वचितच अनुभवायला मिळते. त्यामुळे आपण खूप काळ थंडीची अपेक्षा करणे योग्य नाही. हे वास्तव असले तरी थंडीच्या तीन-साडेतीन महिन्यांमध्ये जास्त काळासाठी रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा खाली राहणे अपेक्षित असते, निदान निम्मे दिवस तरी असे असतात, हे आजवरचे अनेकांचे निरीक्षण आणि अनुभवसुद्धा आहे. (या गोष्टी अजून तरी अनुभव आणि निरीक्षणाच्या आधारेच मांडाव्या लागतात, कारण पावसाळ्यातील ‘रेनी डेज’प्रमाणे थंडीच्या बाबतीत अशी निश्चित आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध नसते. त्यात दरवर्षी चढउतार होत असतात.) त्यामुळेच नेहमीच्या निरीक्षणाशी तुलना करायची तर या वर्षी विपरीत स्थिती आहे. आकडेवारीत सांगायचे तर बहुतांश ठिकाणी संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात रात्रीचे तापमान केवळ १२ दिवसांसाठीच सरासरीपेक्षा खाली गेले होते. या महिन्याचा जास्तीतजास्त काळ हा उबदारच होता. तेच डिसेंबरमध्ये अनुभवायला मिळाले. या महिन्याची सुरुवात उबदार वातावरणाने झाली. आता कुठे गेल्या दोन दिवसांपासून तापमानात घट व्हायला सुरुवात झाली आहे. गेल्या दीड महिन्यांमध्ये केवळ एकदाच म्हणजे दिवाळी संपता संपता पाच दिवसांसाठी थंडीचा कडाका अनुभवायला मिळाला. त्यानंतर ती नाहीशी झाली, त्यानंतर तिने आता दोन दिवसांपूर्वीच तोंड दाखवले. त्यामुळे या हिवाळ्याचा पुढचा काळ कसा असेल हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे. हिवाळ्यातील चढ-उतार गृहीत धरले तरी या वर्षी थंडीचा रंग काही वेगळाच दिसतो आहे. शहरी भागासाठी तो, गुलाबी थंडीचा अनुभव मिळाला नाही इतकाच असेल. ग्रामीण भागात मात्र गहू, हरभऱ्यापासून ते आंब्यापर्यंतच्या पिकांचे भवितव्य त्यावर अवलंबून असते.. त्यामुळे न पडलेल्या थंडीचे मोठे परिणाम या वर्षी दिसतील का, याची धास्ती आहेच.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा