फिक्शन
१) कॉन्ट अँड वोन्ट : लिडिया डेव्हिस,
पाने : ३०४६९९ रुपये.
लिडिया डेव्हिस या सध्याच्या आघाडीच्या अमेरिकन कथालेखिका आहेत.. त्यामुळे जागतिक स्तरावरीलही. शिवाय गतवर्षीचे मॅन बुकर प्राइज विजेत्या. त्यांचा हा नवा कथासंग्रह.. त्यांच्या नेहमीच्या काहीशा उपरोधिक, मानवी जगण्यातील गुंतागुंतीचा, व्यामिश्रतेचा आणि विसंगतींचा शोध घेणारा.. काव्यात्म भाषा आणि तत्त्वज्ञानाच्या पातळीवर जाणारं चिंतन यामुळे डेव्हिस यांच्या कथांना वाचनीयतेचा मोठा पैस मिळतो.
२) वन्स अपॉन अ क्रश :  किरण मनराल,
पाने : २२४१९५ रुपये.
हल्ली भारतीय इंग्रजीत ज्या प्रकारच्या पेपरबॅक कादंबऱ्या लिहिल्या जातात, त्याच प्रकारची ही कादंबरी आहे. पैशासाठी वाट्टेल ते करायला तयार असलेल्या उच्चभ्रू स्त्रीवर्गाचं प्रतिनिधित्व करणारी.  
३) वुमन एक्स्ट्रॉऑर्डिनरी : सुचिता मलिक,
पाने : २३९२९५ रुपये.
या कादंबरीची निवेदिका एक स्त्री असली तरी ही कादंबरी पाच स्त्रियांची आहे.. स्वतंत्र दृष्टिकोन असलेल्या, आत्मनिर्भर आणि काही करून दाखवण्याची धमक असलेल्या. या पाचही स्त्रियांच्या स्वत्वशोधाच्या आणि आत्मप्रेरणांच्या कहाण्या प्रत्ययकारीरित्या उलगडण्याचे काम लेखिकेने चांगल्या प्रकारे केले आहे.
नॉन-फिक्शन
१) द बिग कनेक्ट-पॉलिटिक्स इन द एज ऑफ सोशल मीडिया : शैली चोप्रा,
पाने : २२४२५० रुपये.
सध्या निवडणूक प्रचाराचे दिवस आहेत, त्यामुळे व्यक्तिमाहात्म्य आणि राष्ट्राची प्रगती याविषयीच्या पुस्तकांची चलती आहे. हे त्यातील थोडय़ा वेगळ्या प्रकारचे पुस्तक आहे. सध्याचे राजकीय पक्ष, राजकीय नेते ट्विटर, फेसबुक या सोशल मीडिया म्हटल्या जाणाऱ्या साधनांचा कसा वापर करून घेत आहेत, त्याविषयीचे हे पुस्तक. २००८ आणि २०१२ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपली सोशल मीडियावरील प्रचार मोहीम कशा प्रकारे राबवली त्याच्याशी भारतीय नेत्यांच्या प्रचार मोहीमेची तुलना केली आहे, ती मनोज्ञ आहे.  
२) कॉन्व्हर्सेशन विथ वहिदा रहमान : नसरीन मुन्नी कबीर,   पाने : ४०८४९९ रुपये.
हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेत्री वहिदा रहमान यांच्या प्रदीर्घ मुलाखतीचं हे पुस्तक. यातून वहिदा यांची चित्रपट कारकिर्द उलगडतेच पण त्यासोबत तत्कालीन चित्रपटसृष्टीचा इतिहासही काही प्रमाणात उलगडतो.
३) मॅटर फॉर अ मॉर्टल मून : आदिल जुसावाला, पाने : ३६०/४९५ रुपये.
आदिल जुसावाला हे इंग्रजीत लिहिणारे भारतातील एक आघाडीचे कवी, समीक्षक आणि स्तंभलेखक. हा त्यांचा निबंधसंग्रह त्यांनी गेल्या चाळीस वर्षांत भारतात झालेल्या सांस्कृतिक आणि राजकीय बदलांविषयी लिहिलेल्या लेखांचा आहे. याचं संपादन जेरी पिंटो यांनी केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wish list for reading