विशलिस्ट
फिक्शन
१) नून टाइड टॉल : रोमेश गुन्सेकेरा, पाने : २४८, ४९९ रुपये.
श्रीलंकन लेखक रोमेश यांचा हा कथासंग्रह. यातल्या कथा या रूढार्थाने युद्धकथा म्हणाव्यात अशा आहेत, पण त्या केवळ युद्धकथा राहत नाहीत. माणसांच्या वैश्विक सुखदु:खांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. श्रीलंकन समाजवास्तव जाणून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
२) प्रिझनर, जेलर, प्राइम मिनिस्टर : टॅब्रिक सी, पाने : ३२३, ३५० रुपये.
ही राजकीय रहस्यकथाप्रधान कादंबरी आहे. हॉर्वर्ड विद्यापीठात शिकलेला, अत्यंत हुशार आणि महत्त्वाकांक्षी तरुण भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान होतो, तेव्हा त्याच्या पुढय़ात दहशतवादापासून विरोधी पक्षांपर्यंत अनेक संकटं उभी ठाकलेली असतात.. त्यांचा तो कसा सामना करतो, गोंधळलेल्या देशाला मार्गावर आणण्यासाठी काय करतो, असे काहीसे आदर्शवादी कथानक आहे.
३) सॉर्टिग आऊट सिद : यशोधरा लाल, पाने : ३२०, ५० रुपये.
‘जस्ट मॅरिड प्लीज एस्क्यूज’ या खूपविक्या पुस्तकाच्या लेखिकेची ही दुसरी कादंबरी. या नव्या कादंबरीच्या मुखपृष्ठावर एक सूचना लिहिली आहे- मॅन इन प्रोग्रेस. सध्याच्या धकाधकीच्या जगात घरी आणि ऑफिसमध्ये, मित्रांमध्ये आणि सहकाऱ्यांमध्ये जगताना, वावरताना नात्यांची होणारी ओढाताण आणि घुसमट यांचं चित्र रेखाटणारी ही कादंबरी आहे.
नॉन-फिक्शन
१) रिसर्जन्ट इंडिया- ग्लिमप्सेस ऑफ राजीव गांधीज् व्हिजन ऑफ इंडिया : पी.डी.टी. आचार्य,
पाने : ३०४, ५९५ रुपये.
राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीचे विश्लेषण करणारे हे पुस्तक लिहिले आहे, प्रदीर्घ काळ लोकसभेचे सेक्रेटरी जनरल राहिलेल्या आचार्य यांनी. त्यामुळे या पुस्तकाकडे जरा आस्थेवाईकपणे पाहायला हरकत नाही. आचार्य यांनी न्याय्य, समतोलपणे मांडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२) बॅटल्स हाल्फ वोन- इंडियाज इम्प्रॉबल डेमॉक्रसी : आशुतोष वष्णने, पाने : ४३२, ५९९ रुपये.
भारतीय लोकशाहीपुढील १९४७ पासूनच्या आव्हानांचा आढावा घेणारा हा लेखसंग्रह. हिंदू राष्ट्रवाद, जातीय राजकारण, उत्तर-दक्षिण आर्थिक असमतोल, आर्थिक सुधारणांमागचं राजकारण यांविषयी प्रकरणनिहाय विश्लेषण केलं आहे.
३) गेटिंग अवे विथ मर्डर- बेनझिर भुत्तोज् असॅसिनेशन अॅण्ड द पॉलिटिक्स ऑफ पाकिस्तान : हेराल्डो मुनोज, पाने : २७२, ३९५ रुपये.
भुत्तो यांची हत्या झाल्यापासून त्यांच्यावरील गेल्या सहा-सात वर्षांतील हे सातवे-आठवे पुस्तक असेल. अमेरिकेचे राजदूत असलेल्या लेखकाने अभ्यासूपणे आणि कष्टपूर्वक लिहिलेले.