क्रिकेटमध्ये अपयशाचे खापर संघनायकावर फोडणे ही परंपरा आहे. संघाची निवड समिती मात्र नामानिराळी राहते. निवड प्रक्रियेत संघनायकाचा सहभाग हा गुलदस्त्यात राहणारा विषय आहे. निवड समितीने दिलेल्या संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेणे व त्यासाठी डावपेच आखणे एवढेच तरी महत्त्वाचे काम संघनायक करू शकतो. खेळाडूंनी संघनायकाकडून प्रेरणा वगैरे घेणे/ देणे हा खेळाचा वैयक्तिक भाग झाला.
निवड समितीने आपली निवड क्रिकेट रसिकांसमोर स्पष्ट करणे आवश्यक आहे. संघ संतुलित ठेवणे व भविष्यातील संघासाठी तरुण रक्ताला वाव देणे हे उद्देश कितपत साध्य झाले हे सामान्य प्रेक्षकांना कळणे महत्त्वाचे आहे. इथे पारदर्शकता जरुरीची आहे. उदयोन्मुख खेळाडूंसाठी ‘अनुभव नाही म्हणून निवड नाही आणि निवड नाही म्हणून अनुभव नाही’ हाच अनुभव वारंवार येताना दिसतो, त्याला यामुळे आळा बसू शकेल.
निवड समितीने प्रत्येक खेळाडूबाबतचे विश्लेषण जाहीर केल्यास, संघ जिंकला की त्याला डोक्यावर घेऊन नाचणे आणि हरला की पायदळी तुडवणे हा प्रकार बंद होऊ शकेल. खेळाकडे खेळ म्हणून पाहण्याची वृत्ती वाढीस लागेल. निवड समितीचा निर्णय जरी अंतिम असला तरी प्रेक्षकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. समंजसपणाच्या उंबरठय़ावर असलेल्या प्रेक्षकांना हा बदल सकारात्मक वाटेल, अशी आशा वाटते.
जयंत गुप्ते, लिंकिंग रोड, खार.
.. हे कलावंत, शिस्त पाळूनही इतरांच्या बेपर्वाईचे बळी!
आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे या मराठी नाटय़-चित्रसृष्टीतील उमद्या कलावंतांच्या आकस्मिक अपघाती निधनाच्या बातमीवरील स्फुट (२५ डिसें.) वाचून सखेद आश्चर्य वाटले. कलावंतांच्या तथाकथित अस्थिर जीवनशैलीचा, पैशाच्या मागे धावण्याचा आणि वेळीअवेळी प्रवास करण्याचा या अपघाताशी बादरायण संबंध जोडताना आपल्याच शब्दांत सांगायचे तर- आपली गाडी काळ-काम-वेगाच्या द्रुतगती मार्गावर घसरलेली दिसते. या संपूर्ण स्फुटामध्ये कलावंतांच्या जीवनशैलीची गावगप्पांसारखी चर्चा केली आहे. ती या अपघाताच्या संदर्भात सर्वस्वी अनाठायी तर आहेच, शिवाय तिच्यातून आनंद आणि अक्षय यांचा बळी त्यांच्या जीवनशैलीने घेतला असल्याचे सूचित होत असल्याने, ते अश्लाघ्यही आहे. रात्री ११ वाजता, एकाची पत्नी व बाळ यांना घेऊन प्रवास करताना कोणीही निष्काळजीपणा करणार नाही. कदाचित या काळजीपोटीच आनंद यांनी ड्रायव्हरला बाजूला बसवून स्वत: गाडी चालवण्याचा निर्णय घेतला असेल.
हा अपघात समोरच्या लेनमधून येणाऱ्या एका बेशिस्त, बेजबाबदार आणि बेपर्वा वाहनचालकाच्या चुकीमुळे घडलेला आहे. तो डिव्हायडर तोडून या कलावंतांच्या गाडीवर येऊन आदळला आणि त्यांच्या मृत्यूला कारण ठरला. आपण कितीही शिस्तीत, वाहतुकीचे सर्व नियम पाळून वाहन चालवले तरी इतरांच्या बेदरकारपणाचे बळी ठरण्यापासून आपल्याला कोणी वाचवू शकत नाही, याचे भयाकुल करणारे दर्शन घडवणारा हा भीषण अपघात आहे. या अपघाताला जबाबदार असलेल्या वाहनचालकाची तांत्रिक कारणांनी किरकोळ शिक्षेवर सुटका होऊ नये, त्याला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी याकरिता संबंधित यंत्रणांना जागे करण्याच्या दृष्टीने या स्फुटात काही मार्गदर्शन असते, तर ते समयोचित ठरले असते. त्याऐवजी कलावंतांच्या जीवनशैलीच्या अघळपघळ गप्पा चघळाव्यात, हे संतापजनक आणि आश्चर्यकारक आहे.. इतरांचे ठीक आहे; ‘लोकसत्ता’कडून अशा उथळपणाची अपेक्षा नव्हती.
मिकी मच्याडो, वसई.
आरोप अजामीनपात्र ठरवावा
‘मानसिकता बदलावी लागेल’ हा अन्वयार्थ (२१ डिसेंबर) वाचला. ‘घटना घडूच नयेत यासाठी काय करता येईल यावर विचार व्हायला हवा’ हे या स्फुटातील म्हणणे पटले. आणखी विचार केल्यावर दोन मुद्दे प्रकर्षांने मांडावेसे वाटतात ते असे :
१) कायद्याचा धाक कमी झाला आहे याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अत्याचार करणाऱ्या आरोपीला जामीन मिळतो. तो मिळू नये. कायद्याचा धाक नक्कीच वाढेल.
२) अत्याचारांची प्रकरणे ३० दिवसांच्या आत निकाली काढली पाहिजेत व गुन्हेगाराला सजा झाली पाहिजे. जर प्रकरण खूप काळ लांबत गेले तर गांभीर्य कमी होते. याचा गैरफायदा आरोपी घेऊ शकतो. न्याय विलंबाने देणे हे न्याय नाकारण्यासारखेच ठरते, ते असे.
सां. रा. वाठारकर, चिंचवड.
मानधन कापा आणि फॉर्मकडेच पाहा
सध्याच्या भारतीय क्रिकेटची जी दैन्यावस्था आहे,ती होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे क्रिकेटपटूंना मिळणारा अमाप पैसा. शिवाय, सामना हरला तरी मानधन कमी होत नाही. सामन्यातील कामगिरीवर मानधन ठरवण्यात यावे.
दुसरे म्हणजे, एखाद्याला संघात घ्यायचे की बाहेर ठेवायचे, हे निवड समितीने त्याच्या फॉर्मवरच ठरवावे, पूर्वपुण्याईकडे पाहू नये!
धैर्यशील सूर्यवंशी, दादर, मुंबई</p>
हा अण्णांचा तर प्रभाव नव्हे?
ग्रीस आणि भारत हे दोन्ही देश जगातील प्राचीन संस्कृती. त्यामुळेच की काय, या दोन देशांत आजही आणखी एका बाबतीत प्रचंड साम्य आहे. ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल या जगातील अत्यंत नामवंत संस्थेने नुकताच (५ डिसेंबर रोजी) १७६ देशांतील लाचलुचपत आणि तेथील नागरिकांचा आपला देश किती भ्रष्ट आहे याविषयीचा अंदाज (करप्शन परसेप्शन इंडेक्स) यांआधारे वार्षिक भ्रष्टाचार-विश्व अहवाल प्रकाशित केला, त्यात भ्रष्ट देशांची क्रमवारी लावलेली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारत आणि ग्रीस या दोन्ही देशांचा सारखाच, म्हणजे ९४ वा क्रमांक लागला.
गेल्या वर्षी (२०११) आपल्या देशाचा क्रमांक ९५ वा होता (ग्रीसचा क्रमांक २०११ मध्ये ८० वा होता!).. याचा अर्थ आपल्या देशातील लाचलुचपतीचे प्रमाण अत्यंत अल्प प्रमाणात का होईना, घसरू लागले, असे लोकांना वाटते आहे.
अण्णा हजारे यांच्या लाचलुचपतविरोधी लढय़ाचा हा प्रभाव तर नाही ना?
सूर्यकांत अरदकर,, गोरेगाव (पूर्व)
चातुर्वण्र्य, जातिव्यवस्थेचे समर्थन स्त्री कसे करते?
कॅप्टन भाऊराव खडताळे यांचे ‘राज्यघटनेमुळे मनुस्मृती कशी बदलणार?’ हे पत्र (लोकमानस, १४ नोव्हें.) आणि त्याला उत्तर देऊ पाहणारे ‘सदाचार व उत्कर्षांची संधी आता प्रत्येकाच्या हाती’ (२८ नोव्हें.) ही पत्रे वाचली. सरोजिनीताईंच्या म्हणण्याप्रमाणे, चातुर्वण्र्य आणि जातिव्यवस्था ही त्या (प्राचीन) काळाची गरज होती, हे योग्य वाटत नाही.. कारण चातुर्वण्र्य व जातिव्यवस्था त्या काळाची गरज होती; तर त्या व्यवस्थेतील विचारसरणी, रूढी-परंपरा, याही गोष्टी गरजेतून आलेल्या होत्या असे म्हणावे लागेल आणि जर तसे असेल तर पतिनिधनानंतर स्त्रीने सती जाणे, तिचे केशवपन करून तिला विद्रूप बनवणे, तिला शिक्षणाच्या संधी नाकारणे, एखाद्या समाजाने दुसऱ्या समाजाचा स्पर्श टाळणे, या सर्व गोष्टींतून कोणती कौशल्ये जोपासली जात होती? याज्ञवल्क्य स्मृतीत काळाला अनुरूप बदल केलेले आहेत, तर हे बदल समाजामध्ये प्रसारित करण्यात समाजातील किती स्त्रियांनी प्रयत्न केले आहेत, हेही तितकेच महत्त्वाचे वाटते. एखादी स्त्री चातुर्वण्र्य व जातिव्यवस्थेचे समर्थन करते, ही बाब खेदजनक आहे, असे म्हणावे लागेल.
मनीषा तानाजी चंदनशिवे, आंबेगाव, पुणे.