समाज भ्रष्टाचाराच्या विरोधात ओरड करीत असला तरी संधी मिळाली नाही म्हणून स्वच्छ राहणाऱ्यांची संख्या बरीच असते. संधी मिळताच स्वभावातील वाकडेपणा चटकन पुढे सरसावतो व चांगली माणसे बघताबघता भ्रष्ट होऊन जातात हे आता विविध प्रयोगांतून सिद्ध झाले आहे..
व्यक्ती आणि परिस्थिती यामध्ये महत्त्व कोणाला द्यावे या प्रश्नावर पुरातन काळापासून विचार झाला आहे. व्यक्ती परिस्थितीला निर्णायक वळण कसे देते याचे दाखले इतिहास देतो. त्याचप्रमाणे परिस्थितीने संपूर्ण समाजाला हतबल केल्याचीही उदाहरणे सापडतात. तू असा का वागलास, असे कोणालाही विचारले तर तो परिस्थितीकडे बोट दाखवितो. स्वार्थ साधण्यासाठी असा वागलो, असे कुणी सांगणार नाही. तसे सांगायला धैर्य लागते आणि असे धैर्य अंगी बाळगणारा सहसा परिस्थितीला शरण जात नाही.
देशातील भ्रष्टाचाराबद्दल एकमत आहे. सरकार, पोलीस, न्याय, अर्थ, बाजारपेठ, वित्तीय व्यवस्था, शिक्षणसंस्था, वाहतूक व्यवस्था अशा माहीत असलेल्या प्रत्येक व्यवस्थेला भ्रष्टाचाराची लागण लागली आहे. पण व्यवस्था भ्रष्ट नसून काही मोजके आंबे सडके आहेत, असे नेहमी सांगितले जाते.
वस्तुस्थिती वेगळी असते. संधी मिळताच आपल्यातील दुर्गुण चटकन क्रियाशील होतात. आपली ओळख लपवून ठेवता आली, कुणी व काय निर्णय घेतला आहे हे सहजासहजी कळू शकले नाही तर भ्रष्टाचाराला ऊत येतो. सरकार ही अशी व्यवस्था असते. तेथे ओळख लपविता येते, सत्तेची उतरंड फार मोठी असल्यामुळे जबाबदारी टाळता येते आणि सुरक्षेचे कवचही असते. या तीनही गोष्टी कमी प्रमाणात असल्यामुळे खासगी कंपन्यांत भ्रष्टाचार कमी होतो. मात्र या कंपन्या वेगळ्या मार्गाने बाजारपेठेत भ्रष्टाचार करतात. बाजारपेठेत अनामिक राहता येते व जबाबदारीही टाळता येते.
भ्रष्टाचार झाला की आपण भ्रष्ट व्यक्तीला जबाबदार धरतो. ते बरोबरही असते. कारण भ्रष्ट न होण्याचा पर्याय समोर असूनही त्याने तो वापरलेला नसतो. परंतु, भ्रष्ट माणूस ज्या परिस्थितीत असतो त्याच परिस्थितीत स्वच्छ राहण्याची ताकद आपल्यात आहे का, याची तपासणी आपण करीत नाही. उलट मी नक्कीच भ्रष्ट झालो नसतो, असे आपण छातीठोकपणे सांगतो. मी पोलीस असतो, मंत्री असतो तर ‘त्यांच्यासारखा’ झालो नसतो, यावर आपली श्रद्धा असते.
ही श्रद्धा तपासून पाहण्याचे स्टॅनफोर्ड विश्वविद्यालयातील फिलीप झिम्बाडरे यांनी ठरविले. काही चांगल्या, गुणवान, चारित्र्यसंपन्न लोकांना त्यांनी मुद्दाम विपरीत परिस्थितीत ढकलले. विपरीत परिस्थिती हे नाटक होते, पण ते इतके हुबेहुब वठविण्यात आले होते की खरेखोटेपणा तपासणे कठीण जावे. चांगली माणसे कोणत्याही परिस्थितीत चांगलीच वागावीत अशी अपेक्षा असते. तसे बिलकूल झाले नाही. उलट संधी मिळताच तथाकथित सज्जनांमधील सैतान आक्रमक झाला, अगदी नाटक असूनही.
झिम्बाडरे यांनी उच्चवर्गातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन प्रयोग केला. विद्यार्थ्यांचे दोन गट करण्यात आले. एक गट पोलिसांचा तर दुसरा कैद्यांचा. कैदी झालेल्यांना खरोखर अटक करण्यात आली व एका तुरुंगात डांबण्यात आले. पोलीस झालेल्यांना तेथे डय़ुटी लावण्यात आली. पहिला दिवस काही झाले नाही. दुसऱ्या दिवसापासून पोलीस पोलिसांप्रमाणे व कैदी कैद्याप्रमाणे वागू लागले. तीन दिवसांत कैद्यांवर अत्याचार सुरू झाले. पुढील दिवसांत पोलिसांचे अत्याचार व कैद्यांची बंडखोरी वाढत गेली. तुरुंग या व्यवस्थेने दोन्ही गटांना पुरते खाऊन टाकले. कल्पना करतानाही शिशारी येईल असे अत्याचार मध्यमवर्गीय कुटुंबव्यवस्थेतील पोलिसांकडून कैद्यांवर केले जाऊ लागले आणि कैदीही हिंस्र होऊ लागले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यावर हा प्रयोग सहाव्या दिवशी थांबविण्यात आला.
झिम्बाडरे यांचा हा प्रयोग व त्यावरील निष्कर्ष हा खूप वादाचा व चर्चेचा विषय झाला. कैदी व पोलीस यांच्या परस्परसंबंधातून एक परिस्थिती निर्माण झाली, पण त्यापुढे जाऊन तुरुंग नावाची ‘व्यवस्था’ तयार झाली व या व्यवस्थेचा पगडा दोघांवरही बसला असा झिम्बाडरे यांचा निष्कर्ष होता. तुरुंग या व्यवस्थेचा प्रभाव पडला कारण त्यामध्ये ‘सत्ता’ होती. सत्तेबरोबर भ्रष्टाचार करण्याची संधी येतेच. ही संधी साधायची की नाही हा प्रत्येकाचा स्वतंत्र निर्णय असतो. बहुसंख्य लोक सत्ता राबविण्याची संधी साधतात. त्यातही लगोलग शिक्षा होण्याचा धाक नसेल तर साधतातच साधतात. तुरुंग या व्यवस्थेचा पगडा केवळ नाटकात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांवरच नव्हे तर स्वत: झिम्बाडरे यांच्यावरही पडला. ते स्वत:ला अभावितपणे तुरुंग अधीक्षक समजू लागले व अचानक तसेच वागू लागले. इतकेच नव्हे तर आपल्या वागण्याचे समर्थनही करू लागले. त्यांच्या मैत्रिणीने त्यांना भानावर आणले व हा प्रयोग थांबला.
अमेरिकेत हिटलर जन्माला येऊ शकतो का, असा सवाल स्टॅन्ले मिलग्राम यांनी ६०च्या दशकात केला होता. अमेरिकी समाज अत्यंत सुसंस्कृत असल्याने व तेथे लोकशाही असल्याने हे शक्यच नाही असे सर्वानी उत्तर दिले. मिलग्राम यांना ते पटले नाही. त्यांनी एक प्रयोग करून सर्वसामान्य लोकांना दुसऱ्यांना विजेचे धक्के देण्याची संधी दिली. दुसरा माणूस चुकला असेल तर त्याला जोरदार शॉक द्या, काही काळजी करू नका, आम्ही जबाबदारी घेऊ, अशी परिस्थिती उभी करणारे नाटक केले गेले. प्रत्येकाने तथाकथित दोषी व्यक्तीला सणसणीत शॉक दिले. तुम्ही इतके हिंसक कसे झालात, असे विचारले असता शॉक देणाऱ्यांनी नाटकातील अधीक्षकाकडे बोट दाखविले. जर्मनीने हिटलरकडे बोट दाखविले तसेच इथे घडत होते. परिस्थिती पूरक असेल तर अमेरिकेतही हिटलर निर्माण होणे अशक्य नाही हे मिलग्राम यांनी दाखवून दिले.
मिलग्राम यांनी ६०मध्ये व झिम्बाडरे यांनी ७०साली केलेले प्रयोग हे नाटक होते. नाटकातील निष्कर्ष प्रत्यक्ष समाजात जसेच्या तसे लागू पडणार नाही, असे सर्वजण मानत होते. पण २००७मध्ये अबू गरीब या इराकी युद्धकैद्यांसाठी उभारलेल्या छळछावणीतील छायाचित्रे प्रसिद्ध झाली व अनेकांचे डोळे उघडले. झिम्बाडरे यांच्या प्रयोगातील पोलिसांनी केली होती तशीच वर्तणूक अबू गरीबमधील अमेरिकेच्या लष्करी पोलिसांनी केली. झिम्बाडरे यांच्याकडील प्रयोगाची चित्रफीत आणि अबू गरीबमधील छायाचित्रे यांमध्ये प्रचंड साम्य होते. परिस्थिती माणसातील सैतान कसा बाहेर काढते याचा हा सज्जड पुरावा होता. अन्य अनेक प्रयोगांतून याच निष्कर्षांला पुष्टी मिळाली.
माणूस आपल्या वर्तनातून परिस्थिती घडवितो. या परिस्थितीतून व्यवस्था निर्माण होते. या व्यवस्थेमध्ये सत्तेचे बीज असते. या सत्तेची चव चाखायला देऊन व्यवस्था माणसाला गिळून टाकते. सत्ता चाखायला मिळाली की माणसातील करुणा संपते. दुसऱ्याला काय वाटत असेल याचा विचार करणे तो थांबवितो. राजसत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता, कुटुंबसत्ता या प्रत्येक ठिकाणी माणूस व्यवस्थेच्या पूर्ण आहारी गेलेला आढळतो व संधी मिळताच सत्ताधीशासारखा वागतो. झिम्बाडरे याला ‘ल्यूसीफर इफेक्ट’ म्हणतात. ल्यूसीफर हा देवाचा आवडता, पण देवाची आज्ञा न पाळल्यामुळे त्याला नरकात पाठविण्यात आले. समाजातील बहुसंख्य असे ल्यूसीफर असतात.
अर्थात देवाची आज्ञा पाळण्याचा पर्यायही प्रत्येकासमोर असतो. समाज तीन प्रकारच्या लोकांनी बनलेला असतो. समाजात पूर्ण सज्जन अत्यल्पच असतात. मात्र हेच व्यवस्थेतील दोष सुधारत असतात. या तुलनेत, संधी मिळताच व शिक्षा होण्याची शक्यता कमी असल्यास वाकडय़ा मार्गाने जाणाऱ्यांची संख्या बरीच जास्त असते. समाजातील तिसरा गट हा निष्क्रिय व उदासीन असतो. तो फक्त स्वत:चा फायदा पाहतो. हा तिसरा गट बहुसंख्यांचा असतो आणि ते सज्जन होण्याची धडपड करण्याऐवजी उदासीन राहून वा स्वत:चा फायदा पाहत, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे, भ्रष्ट लोकांना मदत करीत असतात. विविध प्रयोगांतून पुढे आलेली सांख्यिकी माहिती हे तीन गट स्पष्टपणे दाखविते.
समाजात बहुसंख्येने असणाऱ्या या तिसऱ्या गटाची उदासीनता घालवून त्यांना सज्जनांच्या मार्गाला कसे लावायचे हा प्रश्न आहे. आदर्शाची जोपासना, असे उत्तर झिम्बाडरे सुचवितात. शिवाजी वा गांधींसारखे अलौकिक आदर्श नव्हेत तर आजूबाजूचे साधेसुधे पण वेगळे वागणारे आदर्श. गांधींसारख्या आदर्शाना हिरो म्हटले जाते. त्यांना देव बनवून त्यांची पुजा सुरू होते. पण आपल्यातील प्रत्येकजण ‘हीरो इन वेटिंग’ असतो हे विसरले जाते याकडे झिम्बाडरे लक्ष वेधतात. अलौकिक कामापेक्षा सर्वसामान्य परिस्थितीतच सज्जनपणा जपणाऱ्या साध्या व्यक्ती त्यांना जास्त महत्त्वाच्या वाटतात. त्यांची कामगिरी चमकदार नसली तरी परिस्थितीला शरण जाण्यापेक्षा परिस्थिती बदलण्याचा पुरुषार्थ या व्यक्तीही दाखवत असतात. असा पुरुषार्थ दाखविणे ही अलौकिक गोष्ट नव्हे तर तेच माणसाचे माणूसपण आहे हे दाखवून देण्यासाठी झिम्बाडरे यांनी वयाच्या ८०व्या वर्षी चळवळही हाती घेतली आहे.
सज्जन पुरुषार्थाची जोपासना, असे त्यांचे साधे सूत्र आहे. येथे पुरुषार्थ म्हणजे लढाई मारणे वा श्रीमंत होणे नव्हे तर कोणत्याही परिस्थितीत सज्जनपणाची कास धरणे. लढाई मारण्यापेक्षा वा श्रीमंत होण्यापेक्षा हे कठीण असते. अशा सज्जनांना ज्ञानेश्वरांनी ‘ईश्वरनिष्ठ’ म्हटले आहे व अशा ईश्वरनिष्ठांची मांदियाळी उभी राहावी, असे पसायदान मागितले आहे. झिम्बाडरे आध्यात्मिक नाहीत, विज्ञाननिष्ठ आहेत. पण ‘नेटवर्क ऑफ हीरोज्’ जगात उभे राहावे अशीच अपेक्षा ते व्यक्त करतात आणि ते शक्य आहे असे प्रयोगातून सांगतात तेव्हा नकळत ज्ञानदेवांच्या जवळ येतात. ज्ञानाच्या क्षेत्रात पूर्व-पश्चिमेचा संयोग होतो तो असा.
संधीविना सज्जन ?
समाज भ्रष्टाचाराच्या विरोधात ओरड करीत असला तरी संधी मिळाली नाही म्हणून स्वच्छ राहणाऱ्यांची संख्या बरीच असते. संधी मिळताच स्वभावातील वाकडेपणा चटकन पुढे सरसावतो व चांगली माणसे बघताबघता भ्रष्ट होऊन जातात हे आता विविध प्रयोगांतून सिद्ध झाले आहे..
First published on: 11-12-2012 at 05:49 IST
मराठीतील सर्व आकलन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Without chance gentleman