आज जागतिक महिला दिवस आहे. वर्तमानपत्रांचे रकाने महिलांच्या गुणगौरवाने भरून गेलेले आहेत. देशभर अनेक कार्यक्रम होत आहेत; अनेक पुरस्कार दिले घेतले जात आहेत… महिलांना शुभेच्छा संदेश दिले जात आहेत – पण अनेकदा हे पुरस्कार आणि या शुभेच्छा अगदी वरवरचे वाटायला लागतात. आपल्या देशात महिलांना मोकळेपणाने वावरण्यासाठी आवश्यक त्या किमान सोयीसुविधा देखिल अजून उपलब्ध नसतात.
शौचालयांची सुविधा ही अशीच एक सगळ्या महिलांना अतीशय आवश्यक वाटणारी आणि क्वचितच मिळणारी सुविधा! संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेने सप्टेंबर २०१० मध्ये; सर्वांना पाणी व मलमूत्रविसर्जनाच्या सुविधा मिळण्याचा मानवी हक्काच्या कायद्यात समावेश केला आहे. या कायद्यानुसार, पिण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी सुरक्षित आणि पुरेसे पाणी तसेच मलमूत्रविसर्जनासाठीच्या सुविधा मिळणे हा आता सर्वांचा हक्क ठरला आहे…. पण आपल्या देशात आजही ६०% पेक्षा जास्त लोक उघड्यावर मलमूत्रविसर्जन करतात.  असं म्हणतात की भारतात घरी संडास असलेल्या लोकांपेक्षा हाती मोबाईल असलेल्या लोकांची टक्केवारी जास्त आहे. पुरुषांपेक्षाही स्त्रीयांनाच ह्या समस्येचा जाच खूप मोठ्या प्रमाणावर सोसावा लागतो.
संडासाच्या अभावी पुरुष दिवसाच्या कोणत्याही वेळी रस्त्यावरदेखिल बसू शकतात – पण बायकांना मात्र असं करायला आपली संस्कृती परवानगी देत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात बायकांना पहाटे सूर्य उगवायच्या आत किंवा संध्याकाळी अंधार पडल्यावरच संडासला जाता येते. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर जनावराचा हल्ला होण्याची शक्यता वाढते. अशा प्रकारे अंधारात संडासला जावे लागल्यामुळे अनेक महिलांना लैंगिक अत्याचारालाही बळी पडावं लागलेलं आहे. स्त्रीयांना फक्त मलमूत्रविसर्जनासाठीच बंदिस्त स्वच्छतागृहाची गरज असते असे नाही – तर गरोदरपणाच्या काळात आणि मासिकपाळी सुरू असतानादेखिल त्यांना खासगीपणाची गरज असते. या काळात अस्वच्छ संडासात जावे लागले तर जंतुसंसर्गाचा धोकादेखिल मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो. त्यांच्या आरोग्यावर तर अनेक दुश्परिणाम होतातच पण भारतासारख्या अनेक गरीब देशांमध्ये मुलींच्या शिक्षणावरही वाईट परिणाम होतात. युनिसेफ आणि अम्नेस्टी इंटरनॅशनल सारख्या संस्थांनी केलेल्या पहाणीमध्ये असे लक्षात आले आहे की, शिक्षणामधून मुलींच्या गळतीचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. शाळांमध्ये सुरक्षित संडासाची उपलब्धता नसल्यामुळे मासिक पाळीच्या दिवसात मुली शाळेत जायचे टाळतात, गैरहजेरीमुळे अभ्यासात मागे पडतात आणि कधीकधी या कारणामुळे त्यांना शाळेत पाठवणेच टाळले जाते. पाळी सुरू झाल्यानंतर अनेक मुलींना वर्षातून साधारण पन्नास दिवस शाळा बुडवावी लागते – असे दिसून आले आहे. शहरात आणि ग्रामीण भागात महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांबद्दल सारखीच बेफिकिरी असते.
मुंबईत केलेल्या एका पाहणीत तर असे दिसून आले आहे की स्त्रीयासाठी असलेली बहुतेक सार्वजनिक स्वच्छतागृहे अनेकदा कुलूप लावून बंदच ठेवली जातात. शिवाय या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेची पातळी खूपच भयानक असते. पाण्याच्या अभावी तिथे अतोनात दुर्गंधी पसरलेली असते. आपण अशा ठिकाणी गेलो तर आपल्याला जंतुसंसर्गाने आजारच होतील या भितीने मुंबईत अनेक महिला सार्वजनिक शौचालयात जाण्याचेच टाळतात. अगदी फारच गरज पडली तर त्या ऑफिसमध्ये, कॉलेजमध्ये किंवा मॉलमध्ये असलेली स्वच्छतागृह वापरतात. पण एकदा घराबाहेर पडल्यावर बहुधा बराच काळ लघवीला देखिल जाता येणार नाही- याची जाणीव असल्यामुळे कितीतरीजणी दिवसभर पाणी पिणेही टाळतात. वर्षानुवर्षे अशा वागणुकीमुळे अनेक जणींना योनीमार्गाचे आजार, किडनीस्टोन देखिल होतात. मुंबईच्या महानगरपालिकेत निम्म्याहून अधिक संख्येने नगरसेविका असूनही महिलांसाठी इतक्या मूलभूत सुविधांकडे इतके मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होते  ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे!
मुंबईसारख्या शहरामध्येच जर इतकी वाईट परिस्थिती असेल तर खेडोपाडी किती दुरवस्था असेल याची आपण कल्पनादेखिल करू शकत नाही! एकीकडे महाराष्ट्राने निर्मल भारत अभियान मध्ये सुरक्षित पाणीपुरवठा आणि संडास बांधण्याच्या कामात अनेक पुरस्कार मिळवले आहेत. पण त्याचवेळी ही कामे कायमस्वरुपी टिकतील अशा पद्धतीने न झाल्यामुळे प्रत्यक्षात बंदिस्त संडासांच्या वापरात फारसा फरक पडलेला दिसत नाही. आजही संध्याकाळच्या वेळी खेड्यातल्या रस्त्यांवरून जाताना हातात लोटा घेऊन गावाबाहेर चाललेल्या अनेक बायका नजरेस पडतात. रस्त्याने एखादी गाडी येताना दिसली की त्यांची जी तारांबळ उडते ते पाहून फार वेदना होतात. चंद्रपूर,लातूर सारख्या जिल्ह्यांमध्ये मात्र हे चित्र आज पालटलेले आहे. अनेक संवेदनशील सरकारी अधिकाऱ्यांचे प्रयत्न,युनिसेफ सारख्या संस्थांची मदत आणि मुख्य म्हणजे गावातील महिलांचा पुढाकार यामुळे हा फरक पडलेला आहे. २००५ ते २००९ या काळात महाराष्ट्रात निर्मल ग्राम अभियानात जिथे बायकांचा सहभाग आवर्जून वाढवला गेला तिथे तयार झालेल्या सुविधा टिकलेल्या दिसतात. त्या वेळी महिला बचतगटांसाठी काही योजना राबवल्या गेल्या होत्या.  पण पैशांचे अजिबात प्रलोभन नसताना देखिल गावोगावी महिलांनी हिरीरीने संडास बांधायच्या कामात पुढाकार घेतला. कऊठवाडेसारक्या छोट्यासा गावात कुणी नथ गहाण टाकून संडास बांधला, तर उदगीर सारख्या ठिकाणी मुलींनी खाऊचे पैसे जमवून संडास बांधायचा हट्ट धरला. बुलढाण्यासारख्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी महिला पाणिपुरवठा आणि स्वच्छता योजनेत पार मेन्टेटेनंन्सचे  कामसुद्धा करतात.
चंद्रपूर मधल्या किशोरवयीन मुलींच्या गटांनी तर संडासाची गरज आणि मासिकपाळीदरम्यानचे आरोग्य या विषयावर अर्ध्यातासाचे नाटक “युनिसेफ” च्या सहकार्याने खेडोपाडी करायला सुरुवात केली आहे. या नाटकाचे नाव आहे – “आता तुझी पाळी!” नाटकाचा प्रयोग झाल्यावर प्रेक्षक आणि नाटक करणाऱ्या मुली मिळून आरोग्याबद्दल तासभर चर्चा करतात. त्याबद्दलच्या अंधश्रद्धा आणि शास्त्रीय कारणे यांचा विचार करतात. मलमूत्रविसर्जनाच्या सुविधा या स्वच्छ पाणीपुरवठा, मुलींचे शिक्षण, मासिकपाळी दरम्यानची स्वच्छता  आणि एकूणच आरोग्य या सगळ्याशी जोडलेल्या आहेत ही समज ग्रामीण महिलांमध्ये आता निर्माण झाली आहे. महिलांनी मनावर घेतले तर संघटितपणे ही समस्या त्या परिणामकारकपणे मार्गी लावू शकतात हे अशा उदाहरणातून सिद्ध झाले आहे. म्हणूनच कदाचित जयराम रमेश देखिल “ ज्याच्या घरी संडास नसेल अशा माणसाशी लग्न करू नका”असे आवाहन मुलींनाच करताना दिसताहेत!

Story img Loader