विन्स्टन चर्चिल यांची युद्धनीती, ठोस राजकारण वगैरे सगळं ठीक आहेच. त्याविषयी बोललं-वाचलंदेखील बरंच गेलं आहे. हे पुस्तक या सगळ्यापेक्षा वेगळं आहे. त्यांचा हजरजबाबीपणा, धारदार बुद्धी ही तर त्यातून दिसतेच. त्याहीपेक्षा उठून दिसतं भाषेवरचं प्रेम. भाषेवर प्रेम करणं अधिक चांगलं. कारण ते व्यक्त करायची..
त्याचा इजहार करायची संधी अधिक असते आणि ती इतरांना समृद्ध करते.
समाजजीवनात ज्याला रस आहे त्याच्या जिभेला धार असली तर त्या व्यक्तीचा प्रभाव अधिकच वाढतो. या गुणामुळे होतं काय की जे काही सांगायचंय ते अत्यंत हव्या त्या शब्दांत, मोजकेपणानं आणि थेट समजेल असं सांगता येतं. अर्थातच अशा व्यक्तींचं संवादकौशल्य वादातीत असतं. त्यामुळे या मंडळींना ऐकायला, त्यांची मतं जाणून घ्यायला अनेकांना आवडतं. इतकं की अनेकांना रस नसेल एखाद्याच्या विषयात. पण तरी उत्तम संभाषणकला, वाक्चातुर्य असलेली व्यक्ती नक्की म्हणतीये तरी काय हे जाणून घेण्यात जवळपास सर्वानाच रस असतो. कितीतरी उदाहरणं सांगता येतील. आपल्याकडे पिलु मोदी असे होते. राम मनोहर लोहिया यांची जीभ दुहेरी कात्री होती. अलीकडच्या काळातलं असं उदाहरण म्हणजे अटलबिहारी वाजपेयी. आणीबाणीच्या काळात संजय गांधी मारुती मोटार करत होते तेव्हा वाजपेयी म्हणाले होते मुलगा मागे आहे मारुतीच्या, लेकिन वहाँ माँ रोती है.. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे रमाकांत खलप यांचं व्यक्तिमत्त्व चंदेरी केसांमुळे खूपच लोभस वाटायचं. पण त्यांचं आणि शिवसेनेचं एकदा फाटलं. तर गोव्यातल्या सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचं वर्णन वरून खलप आणि आतून कलप.. असं केलं होतं. अलीकडे त्याच सेनाप्रमुखांचा पुतण्या राज मराठीला असं लवलवीतपणे वाकवण्यासाठी ओळखला जाऊ लागलाय. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. बाबासाहेब भोसले हेही असे होते. ते विख्यात इतिहासकथाकार प्रा. शिवाजीराव भोसले यांचे बंधू. एकदा एका बैठकीत त्यांना कोणीतरी प्रा. शिवाजीरावांविषयी विचारलं. तर बाबासाहेब म्हणाले, हो तो माझा भाऊ.. त्याच्या जिभेवर सरस्वती नाचते तर माझ्या जिभेवर ०. बाबासाहेबांचा कल तसा आचरटपणाकडे असायचा. यांच्याशिवाय प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, भाषेला फर्मास ग्रामीण गंध असलेले केशवराव धोंडगे.. झालंच तर आचार्य अत्रे आहेतच.. अशी अनेक नावं सांगता येतील. या मंडळींसमोर मराठी अशी लवचिक व्हायची की ते भाषेचे विभ्रम पाहण्यात मोठा आनंद व्हायचा.
इंग्रजीच्या स्तरावर या क्षेत्रातलं सर्वोच्च शिखर म्हणजे अर्थातच विन्स्टन चर्चिल. त्यांच्या आधी अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन हे अशा पाणीदार भाषेसाठी प्रसिद्ध होते. पण चर्चिल यांच्याइतका विखार त्यांच्याकडे नव्हता. कदाचित तो त्या वेळच्या राजकारणाचाही प्रभाव असेल. दुसऱ्या महायुद्धातल्या अमानुष हिंसेला सामोरं जावं लागल्यामुळेही असेल. पण चर्चिल यांच्या वाणीतून निखाऱ्यांचा वर्षांव व्हायचा. त्यांचे असे वाग्बाण ऐकले होते. वाचलेही होते. त्यातून आनंद मिळायचाच. पण उलट त्यामुळे तहान वाढायची. त्यामुळे त्यांच्या वाग्बाणांचा असा एखादा संग्रह कुणी प्रकाशित केलाय का..याच्या शोधात होतोच. तो आहे कसं कळलं. पण आपल्याकडे मिळत नव्हता. अखेर लंडनला सापडला.
‘द विकेड विट ऑफ विन्स्टन चर्चिल’ असं या संग्रहाचं नाव. ज्याचं ज्याचं भाषेवर प्रेम
आहे- मग ती मराठी असो वा इंग्रजी- त्यांनी वाचायलाच हवं असं हे पुस्तक आहे. आणि परत गंमत म्हणजे ते वाचताना अजिबात त्रास करून घ्यावा लागत नाही. म्हणजे अशा अर्थानं की चर्चिल यांची अन्य पुस्तकं- बोर युद्धावरची वगैरे- ही पूर्ण इतमामानं वाचावी लागतात. त्यात उलटसुलट करून चालत नाही. या पुस्तकाचं तसं नाही. कुठूनही वाचायला सुरुवात करता येते आणि हव्या त्या ठिकाणी थांबून हवी तितकी मजा घेता येते. प्रचंड आनंददायी असं हे पुस्तक आहे. आंतरराष्ट्रीय विषय असो किंवा वाङ्मयाशी संबंधित किंवा आर्थिक किंवा राजकीय किंवा केवळ विरोधकाची संभावना असो.. चर्चिल यांची वाणी तितक्याच स्वैरपणे सगळय़ाचा समाचार घेते. त्याचे काही दाखले दिल्याशिवाय या माणसाची भाषिक थोरवी कळणार नाही.
अमेरिकेत रिचमंड इथं चर्चिल यांच्या अर्धपुतळ्याचं (इंग्रजीत ज्याला बस्ट म्हणतात) अनावरण होतं. तर त्यासाठी चर्चिल यांची एक चाहती भल्या पहाटे उठून दोनेकशे किलोमीटर मोटार चालवत आली होती. चर्चिलना भेटली. अत्यंत देखणी आणि सर्वागाने पुष्ट अशी ती तरुणी चर्चिलना म्हणाली.. मी तुमच्या पुतळ्याच्या (बस्टच्या)अनावरणासाठी इतके कष्ट घेऊन आले. त्यावर चर्चिल उत्तरले : मॅडम आय वाँट यू टु नो दॅट आय वुड हॅपिली रेसिप्रोकेट द ऑनर.
आता हे वाचतानादेखील ठोऽ करून हसायला येतं.. तेव्हा चर्चिल जेव्हा जाहीरपणे असं म्हणाले तेव्हा त्या महिलेचं काय झालं असेल याची कल्पनाही करवत नाही.
एका कार्यक्रमात त्यांना सूचना दिली गेली होती की फ्रान्सचे जनरल द गॉल यांचं जरा कौतुक करायचंय. तर हा माणूस म्हणाला.. मी त्यांच्या दोन्ही गालांचा मुका घ्यायला तयार आहे आणि तुम्हाला आणखी काही हवं असेल तर चारही गालांचादेखील घेईन. दुसरं महायुद्ध संपलं आणि याल्टा परिषदेला ते, स्टालिन, रूझवेल्ट वगैरे जमले होते. तर तिथं वाइनचा चषक उंचावून स्टालिन यांचा गौरव करताना चर्चिल म्हणाले : टु प्रीमिअर स्टालिन, हूज फॉरिन पॉलिसी मॅनिफेस्ट्स अ डिझायर फॉर पीस.. अ पीस ऑफ पोलंड, अ पीस ऑफ झेकोस्लोवाकिया, अ पीस ऑफ रूमानिया..
इतक्या टोकदार शाब्दिक कोटीमुळे स्टालिन यांच्या लफ्फेदार मिशादेखील थरारल्या असतील.
चर्चिल यांच्या या वाग्बाणांनी अनेकांना घायाळ केलंय. काही तर रक्तबंबाळ झाले असतील. त्यातले एक म्हणजे मजूर पक्षाचे पंतप्रधान क्लेमंट अॅटली. अलीकडचा शब्द वापरायचा तर अॅटली हे चर्चिल यांचं कायमचं गिऱ्हाईक होतं. मिळेल तेव्हा ते त्यांचा पाणउतारा करायचे. अॅटली यांच्याविषयी एकदा ते म्हणाले..परलमेंटसमोर रिकामी टॅक्सी उभी राहिली आणि त्यातून अॅटली उतरले.. आता काय म्हणायचं या वाक्याला. चर्चिल स्वभावानं उद्दाम होते. त्या तुलनेत अॅटली सभ्य आणि नम्र. त्याचं वर्णन चर्चिल यांनी केलं.. ही इज अ मॉडेस्ट मॅन विथ मच टु बी मॉडेस्ट अबाउट.. हे अॅटली म्हणजे चर्चिल यांच्या मते अ शीप इन शीप्स क्लोदिंग.
अत्यंत उच्च प्रतीचं मद्य हा चर्चिल यांच्यासाठी बारमाही जिव्हाळ्याचा.. आणि जिव्हालौल्याचादेखील.. विषय होता. एकदा पत्नीनं त्याबाबत नाराजी व्यक्त केली. तर हे तिला म्हणाले: एक लक्षात ठेव.. या मद्यानं मला इतकं दिलंय, पण त्या तुलनेत मी मात्र काही त्याला दिलेलं नाही. कोनॅक (असंस्कारी मूढजन तिचा उल्लेख कॉग्नॅक असा करतात..) ही अप्रतिम ब्रँडी चर्चिल यांच्या मते.. कोनॅक इज लाइक अ ब्यूटिफुल वुमन. डु नॉट असॉल्ट इट. कडल आणि वॉर्म इट इन युवर हँड्स बिफोर यू सिप इट.
एकदा चर्चिल यांना सौदी अरेबियाचा संस्थापक महंमद बिन इब्न सौद याच्याबरोबर भोजनाची नौबत आली. इब्न सौद शुद्ध धर्मपंथी. जेवताना मद्य वगैरे काही नाही. चर्चिलनं विचारलं, तर त्यावर सौद म्हणाले.. आमच्या धर्मात या सगळ्याला अनुमती नाही. त्यावर चर्चिल यांचं विधान बहारदार आहे..मी असं जाहीर करतो की धूम्रपान आणि मद्यपान हे माझ्यासाठी जीवनधर्म आहेत आणि त्यानुसार दोन भोजनांआधी, मध्ये किंवा हव्या त्या वेळी ते सेवन करणे हे माझे कर्तव्य ठरते. जनरल माँटगोमेरी यांना आपण मद्यपान, धूम्रपान करत नाही याविषयी वैतागवाणा दुरभिमान होता. ते एकदा चर्चिल यांच्या समोर म्हणाले.. मी धूम्रपान करत नाही, मद्यपान करत नाही आणि त्यामुळे मी १०० टक्के तंदुरुस्त आहे. त्याक्षणीच चर्चिल उद्गारले..मी धुम्रपान करतो, मद्यपान करतो आणि त्यामुळे २०० टक्के तंदुरुस्त आहे.
आपल्या मद्यप्रेमाविषयी चर्चिल यांचं भाष्य आहे.. मी जेव्हा तरुण होतो तेव्हा भोजनाआधी कडक मद्य घेत नसे. वय वाढल्यावर मी हा नियम न्याहारीच्या बाबत लागू केलाय. हे असे अनेक किस्से सांगता येतील.
चर्चिल यांची युद्धनीती, ठोस राजकारण वगैरे सगळं ठीक आहेच. त्याविषयी बोललं वाचलंदेखील बरंच गेलं आहे. हे पुस्तक या सगळ्यापेक्षा वेगळं आहे. त्यांचा हजरजबाबीपणा, धारदार बुद्धी ही तर त्यातून दिसतेच. त्याहीपेक्षा उठून दिसतं भाषेवरचं प्रेम. कशावर ना कशावर प्रेम करणं केव्हाही चांगलंच. पण भाषेवर करणं अधिक चांगलं. कारण तिथं ते व्यक्त करायची.. त्याचा इजहार करायची.. संधी अधिक असते आणि ती इतरांना समृद्ध करते.. या त्यांच्या भाषासौष्ठवाचा गौरव अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी १९६३ साली एका खास समारंभात केला. चर्चिल यांना अमेरिकेचं नागरिकत्व बहाल करण्यात आलं. त्यावेळी केनेडी म्हणाले : ही मोबिलाइज्ड द इंग्लिश लँग्वेज अँड सेंट इट इंटु बॅटल.
हे पुस्तक म्हणजे भाषेला असं समृद्ध करणाऱ्या विन्स्टन चर्चिल यांच्या वाग्बाणांची परडी .. लोभस आणि संग्राह्य..
द विकेड विट ऑफ विन्स्टन चर्चिल : संकलन- डॉम्निक एनराईट,
प्रकाशक : मायकेल ओमारा बुक्स,
पाने : १६०, किंमत : ९.९९ पौंड्स.