लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येतील तसे राष्ट्रीय राजकारणातील शाब्दिक हिंसाचाराला उधाण येईल.  रेडिओ, टीव्ही, इंटरनेट, डिजिटल मीडियासारख्या विविध मैदानांवर भाजप आणि काँग्रेसमध्ये झडणाऱ्या चकमकी अधिकच उग्र होत जातील. या चकमकींत काहीही निषिद्ध असणार नाही..

अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांची प्रसिद्धीमाध्यमे आणि सोशल मीडियावर एवढी पकड आहे तर त्यांच्याकडे काँग्रेसच्या प्रसिद्धी विभागाची जबाबदारी का सोपविली जात नाही? असा सवाल काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याला केला, तेव्हा त्याने दिलेले उत्तर समर्पक होते. दिग्विजय सिंह काँग्रेसच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख बनले तर इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया तसेच सोशल मीडियामध्ये काँग्रेसची अनधिकृत भूमिका कोण मांडणार? असा त्याचा युक्तिवाद होता. दिग्विजय सिंह यांच्या महत्त्वाकांक्षी राजकारणाविषयी काँग्रेसमध्ये उलटसुलट मतप्रवाह असले तरी निदान मीडियाच्या बाबतीत तरी त्यांच्या भूमिकेविषयी पक्षात ‘स्पष्टता’ आहे. सोनिया आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाला न मानवणाऱ्या भाषेत विरोधी पक्षांवर, विशेषत: संघ आणि भाजपवर कमरेखाली वार करून घायाळ करण्याचा प्रयत्न करण्याची जबाबदारी दिग्विजय सिंहांनी ‘समर्थ’पणे सांभाळली आहे. विरोधकांचा समाचार घेताना दिग्विजय सिंहांनी केलेली टीका आणि त्यांची भाषा खूपच अश्लाघ्य ठरली तर त्यांच्या विधानाशी पक्षाचा काडीचाही संबंध नसल्याचे सांगून किंवा त्यांच्या मताशी पक्ष सहमत नसल्याचे सांगून काँग्रेसचे अधिकृत प्रवक्ते सहज निसटून जातात. पण विरोधकांना बचावात्मक पवित्रा घेणे भाग पडल्याने दिग्विजय सिंहांच्या अर्धसत्य, प्रसंगी असत्य वचनांमुळे हवी तशी ‘परिणामकारता’ साधली जाते.
उत्तराखंडवर ओढवलेली भीषण नैसर्गिक आपत्ती असो, बोधगयेतील बुद्ध मंदिरात झालेले बॉम्बस्फोट असोत, की इशरत जहाँच्या कथित बनावट चकमकीत सीबीआयच्या तपासावरून उद्भवलेला वाद असो, सोशल मीडियावर झडणाऱ्या युक्तिवादांमुळे मूळ मुद्दे बाजूला पडून चर्चेला राजकीय रंग चढत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या किंवा ट्विटरसारख्या मायक्रोब्लॉगच्या माध्यमातून मोजक्याच शब्दांतील मतप्रदर्शनाने राजकीय चर्चेला अनेकदा कलाटणी लाभते. भाजपचे पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार नरेंद्र मोदी आधीपासूनच मीडिया आणि सोशल मीडिया काबीज करून बसले आहेत. आता दिग्विजय सिंहही गेल्या काही महिन्यांपासून दंड थोपटून उतरले आहेत. मीडियाच्या माध्यमातून शाब्दिक अतिरेक आणि हिंसाचार करणाऱ्या या नेत्यांना समर्थन किंवा तिरस्कार अशा दोन ध्रुवांचा अनुभव त्यांच्या वाटय़ाला येत आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, दिल्ली आणि मिझोराममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रीय राजकारणातील हा शाब्दिक हिंसाचार थांबणार तर नाहीच, उलट रेडिओ, टीव्ही, इंटरनेट, डिजिटल मीडियासारख्या विविध मैदानांवर भाजप आणि काँग्रेसमध्ये झडणाऱ्या चकमकी अधिकच उग्र होत जातील. निवडणुका तोंडावर आल्या असताना झडणाऱ्या राजकीय चकमकीत काहीही निषिद्ध नाही आणि सारे काही क्षम्य आहे, हे दिग्विजय सिंह आणि नरेंद्र मोदी यांच्यासारख्या जबाबदार नेत्यांनी प्रसंगी बेजबाबदारपणाकडे झुकणारी विधाने करताना दाखवून दिले आहे.
नरेंद्र मोदींची संस्कार केंद्र नावाची एक संस्था असून त्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील किमान पन्नास व्यावसायिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसच्या विरोधात मोहीम चालविण्यासाठी नियुक्त करण्यात आल्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी सहा महिन्यांपूर्वी जयपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरादरम्यान केला होता. कुठलीही वैचारिक बांधीलकी नसलेले हे व्यावसायिक २४ तास सोशल मीडियामध्ये मोदींचा प्रचार करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करीत असतात. मोदी, भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध प्रतिकूल टिप्पणी होताच त्याविरुद्ध शेकडो प्रतिक्रियांनिशी तात्काळ तुटून पडतात आणि काँग्रेसला लक्ष्य करतात. मोदींच्या समर्थकांनी मांडलेल्या या ‘उच्छादा’ला सडेतोड उत्तर देण्यासाठी काँग्रेसलाही कंबर कसावी लागेल, असेही ते तेव्हा म्हणाले होते. सोशल मीडियावरून होणाऱ्या हल्ल्यांच्या बाबतीत भाजप वरचढ ठरला होता. आजही भाजपचे सोशल मीडियावरचे वर्चस्व कमी झालेले नाही. पण काँग्रेसकडून भाजपच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी दिग्विजय सिंह यांनी आपल्या शिरावर घेतली. तेव्हापासून भाजप आणि काँग्रेस यांच्यातील शाब्दिक युद्ध आणखीच पेटले आहे. अन्य राजकीय पक्ष या दोन प्रमुख पक्षांच्या खिजगणतीतही नाहीत.
मध्य प्रदेशात तब्बल दहा वर्षांपासून अर्थमंत्री असलेले वयोवृद्ध राघवजी यांनी वर्षांनुवर्षे एका मुलाचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस येताच ट्विटरवर सक्रिय होण्याचे दिग्विजय सिंहांना स्फुरण चढले. ‘बच्चा बच्चा राम का, राघवजी के काम का’ अशा भोपाळमध्ये घोषणा दिल्या जात असल्याचे सोशल मीडियाच्या ‘निदर्शना’स आणून देणे किंवा ‘उत्तराखंड मे प्राकृतिक आपदा आयी है और मध्य प्रदेश मे अप्राकृतिक आपदा आयी है’ असा एसएमएस मध्य प्रदेशातील एका पत्रकार मित्राने आपल्याला केल्याचे ट्विटरवर जाहीर करणे किंवा ‘आता मध्य प्रदेशात केवळ मुलीच नव्हे तर मुलेही सुरक्षित नाहीत,’ असा पत्रकार मित्राने केलेल्या एसएमएसचा हवाला देत ट्विट करणाऱ्या दिग्विजय सिंहांनी भाजप आणि रा.स्व.संघाचा यथेच्छ मानसिक छळ केला. स्वत:ला नामानिराळे ठेवत मर्यादापुरुषोत्तम रामाचे नाव घेत असभ्यतेची मर्यादा पार करणारी टिप्पणी अर्थातच सार्वजनिक जीवनात सभ्यतेचा आग्रह धरणाऱ्या व रामावर श्रद्धा असलेल्या कर्मठांचा तिळपापड करणारी ठरली आहे. रामाचे नाव घेऊन राघवजीला टोला लगावणे दिग्विजय सिंह आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाला शोभते काय, असा संतप्त सवाल केला जात आहे. काँग्रेसच्या अधिकृत भूमिकेशी विसंगत असे मतप्रदर्शन करणारे दिग्विजय सिंह यांची टीका ही अशी अनेकदा जिव्हारी लागणारी असते. गुजरात दंगलींमध्ये जीव गमावणाऱ्या हजारो मुस्लिमांची तुलना भरधाव मोटारीखाली नकळत चिरडल्या जाणाऱ्या कुत्र्याच्या पिल्लाशी करून मोदींनीही अशीच जिव्हारी लागणारी असंवेदनशील टिप्पणी केल्याबद्दल त्यांच्यावर सध्या टीकेची झोड उठत आहे. पण फरक एवढाच आहे दिग्विजय सिंहांनी केलेल्या गैरसोयीच्या विधानाला काँग्रेस पक्ष केराची टोपली दाखवतो आणि मोदींच्या प्रत्येक विधानाचे, मग ते कितीही वादग्रस्त असले तरी भाजपकडून ठामपणे समर्थन केले जाते.
शाब्दिक चिखलफेकीच्या आखाडय़ात सोशल मीडियाच्या कोणत्याही साधनांचा वापर न करता बेनीप्रसाद वर्मा आणि उत्तर प्रदेशात सत्तेत असलेल्या समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांचीही कुस्ती गेल्या अनेक महिन्यांपासून रंगत आहे. पोलाद मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे वर्मा यांनी मंत्री म्हणून बजावलेल्या कामगिरीपेक्षा मुलायमसिंह यादव यांची जमेल तशी जाहीर बदनामी करून दिलेले योगदान काँग्रेसच्या दृष्टीने मोलाचे आहे. गेल्या काही महिन्यांत मुलायमसिंहांची बेनीप्रसाद वर्मानी जेवढी बदनामी केली तेवढी त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत कधी झाली नसेल. असभ्य शब्दांचा अतिरेक केल्यामुळे अनेकदा वर्माना काँग्रेसश्रेष्ठींकडून जाहीरपणे समजही देण्यात आली. वर्माचा आग्य््राातील वेडय़ांच्या इस्पितळात इलाज करायला हवा, अशी समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी चिडून प्रतिक्रिया दिली. पण वर्माचा तोफखाना सुरूच राहिला. ‘पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणाऱ्या मुलायमसिंहांची पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाडू मारण्याचीही लायकी नाही,’ असे विधान केल्यानंतर मात्र तूर्तास वर्मानी तिखट शाब्दिक हल्ल्यांना विराम दिला आणि मुलायमसिंह पंतप्रधान झाले तर आपण त्यांचे हार घालून स्वागत करू किंवा मुलायमसिंह माझ्या भावाप्रमाणे आहेत, अशा उपरोधिक भाषेत त्यांना खिजवणे सुरू केले.
दिग्विजय सिंह यांच्याप्रमाणे विरोधकांना त्रस्त करून सोडण्यासाठी लागणारे चातुर्य आणि उपद्रवमूल्य शब्दांचा खेळ करण्यात पटाईत असलेल्या भाजपमधील अनेक नेत्यांमध्ये आहे. ट्विटर जन्माला येण्यापूर्वीही एका वाक्यात कुणाचीही खिल्ली उडविण्यात तरबेज असलेले हजरजबाबी वेंकय्या नायडू किंवा सभ्य व अचूक शब्दात वर्मी घाव घालण्याची क्षमता असलेले सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्यासारख्या नेत्यांनी सोशल मीडियाचे आव्हान स्वीकारून आपले शब्दचातुर्य पणाला लावले तर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसवर कुरघोडी करून राजकीय चर्चेचा नूर बदलू शकतात. पण अंतर्गत कलहाने ग्रासलेल्या भाजपची नेमकी दिशा अजून निश्चित झालेली नसल्यामुळे शाब्दिक झटापटीत निष्णात ठरलेल्या त्यांच्यासारख्या नेत्यांची शब्दसंघर्षांच्या रणांगणात उतरण्याची मानसिकता दिसलेली नाही. दिग्विजय सिंह यांच्या या चतुरतेचा आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला कितपत फायदा होतो हे लवकरच दिसेल. पण कुठल्याही चर्चेला फाटे फोडून सर्व आघाडय़ांवर निष्क्रिय आणि गलथान कारभार करणाऱ्या मनमोहन सिंग सरकारचा आणि पक्षाचा बचाव करण्यात काँग्रेसच्या अधिकृत प्रसिद्धी विभागाला त्यांनी मागे टाकले आहे. दुसरीकडे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पक्षात समर्थन मिळो वा ना मिळो, मीडियाच्या माध्यमाने मोदींनी आपले घोडे चांगलेच दामटले आहे. समाजात नरेंद्र मोदी किंवा दिग्विजय सिंह यांचा तिरस्कार करणाऱ्यांची संख्या कमी नाही. पण देशाच्या राजकारणात स्वत:ला प्रस्थापित करून सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठल्याही राजकीय चर्चेला कशी कलाटणी द्यायची याचा ‘आदर्श’ प्रस्थापित करताना तंत्रज्ञानाचा राजकीय स्वार्थासाठी वापर करण्यात आपण इतरांपेक्षा खूपच पुढे गेलो असल्याचे या दोन्ही नेत्यांनी दाखवून दिले आहे, यात शंकाच नाही. या शब्दसंघर्षांत अन्य प्रस्थापित राष्ट्रीय नेते उतरत नाहीत, तोपर्यंत राजकारणाचा पाठपुरावा करणाऱ्यांना मोदी आणि दिग्विजय सिंह यांच्याच शाब्दिक अतिरेकावर समाधान मानावे लागणार आहे.
    

Story img Loader