कार्यपद्धती: बेशिस्त वाहनांची आणि पोलिसांची
आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांच्या अपघाती मृत्यूच्या बातमीबरोबरच २५ डिसेंबरच्या अंकात एकीकडे महामार्ग-विभागाचे अतिरिक्त पोलीस संचालक विजय कांबळे यांचे एक निवेदनही प्रसिद्ध झालेले आहे. ‘‘अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी आम्ही घेतो,’’ असे त्यांचे विधान पूर्णत: खोडसाळपणाचे आहे, हे महामार्गावरून नेहमी प्रवास करणारा कोणीही प्रवासी सांगू शकेल. रात्री दहाच्या नंतर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पूर्णपणे जंगलराज असते. घाटाच्या दोन ओळींच्या अरुंद मार्गामध्ये मुंबईच्या गोदीतून माल भरून निघालेली जड व अवजड वाहने सर्वच ओळींमधून मुक्तपणे रांगत वाहतूक अडवतात. त्याउलट रिकाम्या मालगाडय़ा वेगात स्वैरपणे इथून तिथून विहरत असतात. त्यातून मार्ग काढण्यासाठी लहान गाडय़ा हुतुतू खेळत प्रत्येक फटीतून घुसत असतात. अनेक जड वाहनांना पुढचे किंवा मागचे दिवे नसतात. मागे परावर्तक नसतात. काहींच्या वाहनातील सळ्या किंवा वाहनातील अवजड यंत्राचा लांबुळका भाग बाहेर आलेला असतो आणि तो रात्री अगदी जवळ आल्याशिवाय मागच्या वाहनचालकाच्या लक्षात येत नाही. पण प्रत्येक टप्प्यावर समांतर पोलीस व्यवस्थेचा खासगी कर भरल्यामुळे त्यांना कोणीच अडवत नसते. याउलट दिवसा अनेकदा पोलिसांची एक गाडी व चार-पाच पोलीस अधिकारी घाटाचा चढ सुरू होण्याच्या भागात विशिष्ट मोक्याच्या ठिकाणी उभे असतात. मग बाजूने जाणाऱ्या प्रत्येक जड वाहनातून एक हात बाहेर येतो, एक पोलीस त्याच्या हाताला हात लावतो आणि मग पोलीस तोच हात आपल्या खिशात घालतो. असे मूकनाटय़ उघडपणे चाललेले अनेकदा दिवसाढवळ्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दिसते. आता या पाश्र्वभूमीवर कांबळेंचे निवेदन ऐकून त्या बिचाऱ्यांना आपल्या खात्याच्या कार्यपद्धतीची माहितीच नसावी असे वाटते.
– सलील कुळकर्णी, कोथरूड, पुणे.
पटणारे नसेल; पचवले पाहिजे!
मोदींच्या विजय मागील सत्यासत्य हा सुहास कुलकर्णी यांचा लेख (लोकसत्ता, २६ डिसें) वाचला. मोदी यांनी हा ६ कोटी लोकांचा विजय आहे हे केलेले विधान लेखकाला अतिशयोक्तीपूर्ण वाटलेले दिसते. पण निवडणुका आणि त्यांचे निकाल यांचा अभ्यास असलेल्या तज्ज्ञांना यात फारसे काही वावगे वाटता कामा नये . निवडणूकशास्त्र (Psephology) ही दुर्दैवाने भारतीयांची एक दुबळी बाजू आहे हे आजपर्यंतच्या अनेक निवडणुकांनी सिद्ध केले आहे, त्यांचे अंदाज भरघोस चुकतात. एकदम वेगळेच निकष आणि पलू समोर येतात आणि मग माध्यमे आणि हे पंडित मूग गिळून गप्प बसतात. कुलकर्णी यांनीही आकडेवारीचे वरवर विश्लेषण केले आहे. भारतातील बहुसंख्य निवडणुका या ५० टक्क्यांपेक्षा कमी मते मिळवूनच जिंकल्या गेल्या आहेत हे वास्तव आहे. या लेखाची गंमत अशी की आकडय़ांशी प्रामाणिक राहत केलेले विश्लेषण ३३ मुस्लीम मतदारसंघात जेव्हा २२ ठिकाणी भाजप विजयी होतो तेव्हा मात्र असे का झाले याबद्दल अजून काही स्पष्ट झाले नाही, असा पलायनवादी पवित्रा घेते. लेखक एके ठिकाणी म्हणतो, मुस्लिमांचा मोदींना पाठिंबा आहे हाही दावा तितकासा पचणारा नाही. हे विधान लेखकाची पूर्वग्रहदूषित भूमिका स्पष्ट करते. ‘पटणारा नाही’ चालले असते पण ‘पचणारा नाही’ या शब्दाचा अर्थ स्वीकारायला अवघड जातो, असा आहे. ‘‘आपली मानसिक संस्था होणारे प्रागतिक बदल पचवायला आपणच सक्षम केली नाही असा होतो,’’ तेव्हा आकडेवारीत फार गुंतून न जाता सामाजिक बदलाचे पदरव मोकळ्या आणि निर्वषि मनाने ऐकणे श्रेयस्कर होईल.
– शुभा परांजपे , पुणे</strong>
सचिनच्या अर्धविरामाचे ‘टायमिंग’
शिवसेनेचा पाकिस्तान दौऱ्याला विरोध आहे. सचिन निवृत्त झाला नसता तर त्याची एकदिवसीय सामन्यासाठी निवड नक्की होती. पाकिस्तानचा एकही सामना महाराष्ट्रात नसल्यामुळे शिवसेनेच्या विरोधाला तसा अर्थ नाही. (त्यामुळे शाब्दिक विरोध करण्यापलीकडे शिवसेनेवर काही जबाबदारी नाही.) पण सचिनची संघात निवड झाली असती तर शिवसेनेपुढे (व सचिनपुढेही) धर्मसंकट उभे राहिले असते. कारण लाजेकाजेस्तव तरी शिवसेनेला सचिनला विरोध करावा लागला असता व त्याच्या घरावर मोर्चा काढावा लागला असता. (अन्यथा मनसेने हा मुद्दा उचलण्याची शक्यता होती.) केवळ पाकिस्तानविरुद्ध न खेळणेही सचिनला अडचणीचे होते. कारण त्यामुळे त्याला राज्यसभेवर निवडणाऱ्या काँग्रेसची नाराजी ओढवली असती.
मी आधी भारतीय व नंतर मराठी आहे, अशी स्वत:ची इमेज ‘जाणीवपूर्वक’ घडवणाऱ्या सचिनला ‘परवडणारे’ नव्हते. नाही तरी सचिनचे क्रिकेट संपत आलेच होते. निवृत्तीचा निर्णय घेऊन त्याने स्वत:ची (व शिवसेनेचीही) embarrassing position मधून सुटका करून घेतली आहे. कारण तो काही काळ असाच खेळत राहिला असता तर एकदिवसीय सामन्यातील पन्नास शतके व शंभर अर्धशतके कदाचित त्याला साधता आली असती. हे सामने पाकिस्तानऐवजी दुसऱ्या एखाद्या देशाविरुद्ध असते तर सचिनने इतक्यातच निवृत्ती पत्करली असती का?
सचिन निवृत्त झाला नसता तर त्याची एकदिवसीय सामन्यासाठी निवड नक्की होती. पाकिस्तानचा एकही सामना महाराष्ट्रात नसल्यामुळे शिवसेनेच्या विरोधाला तसा अर्थ नाही. असा विचार मनात येतो.
— शंकर गोसावी
विकाऊ व्यवस्थेत जीव टाकाऊच?
आनंद अभ्यंकर व अक्षय पेंडसे हे दोन मराठी कलाकार अपघातात निधन पावले. नेहमीप्रमाणे काही दिवसांनी सर्व जण सारे काही विसरून कामाला लागतील. निसर्गनियम आहेच तसा. प्रश्न असा आहे की, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग व आमच्या राज्यातील सर्व रस्ते खरोखरच सुरक्षित आहे का? सर्वसामान्य लोक प्रामाणिकपणे टोल भरून (टोल चुकवायला आम्ही थोडेच पुढारी, राजकारणी आहोत.) याचकरिता प्रवास करतात का? महामार्गावर रात्रीच्या वेळी मोठमोठे ट्रक-ट्रेलर मागील बाजूचे दिवे न लावता (पुष्कळशा वाहनांना पुढील दिवेसुद्धा नसतात.) बिनधास्त धावत असतात. काही वेळेला खूप जवळ गेल्याशिवाय समोर काय आहे ते कळतसुद्धा नाही. त्यांना ना वाहतूक पोलिसाची भीती, ना कुठल्या शिक्षेची भीती.. कारण आमची व्यवस्था अवघ्या १०-२० रुपयांत विकली जाते. द्रुतगती महामार्ग अनेक ठिकाणी खराब झालेला आहे तरी टोल मात्र आम्ही पूर्ण भरायचा. ही व्यवस्था कधी सुधारणार? की याकरिता कोणी तरी मोठा नेता मरण्याची गरज आहे? बघूया कोण बलिदानाला तयार आहे ते? खूप वर्षांपूर्वी कुठला तरी पुढारी कसारा घाटात पाच-सहा तास अडकला होता. त्यानंतर नाशिक महामार्ग चौपदरी झाला. असेच घडावे ही जर ‘श्रीं ची इच्छा’ असेल त्याला कोण काय करणार? यापुढे तरी असे अपघात घडू नयेत व सडलेली, विकाऊ झालेली व्यवस्था रस्तोरस्ती मार्गी लागावी.
– चिंतामणी चांदसरकर, डोंबिवली
रोटेशन पद्धतीचा अवलंब करा
आपल्याकडे जुन्या खेळाडूंनी खेळताना नव्यांची निराशा होईस्तोवर खेळणे किंवा नव्या खेळाडूंना निराशा येऊ नये म्हणून जुन्यांना बासनात टाकणे, हे दोन्ही पर्याय संघासाठी घातकच ठरतात. गोलंदाज किंवा फलंदाज हे जसे संतुलनाचे दोन घटक आहेत, तसेच कनिष्ठ आणि वरिष्ठ हेही दोन घटक असावेत. म्हणूनच भारतीय क्रिकेटमध्ये रोटेशन पद्धतीचा अवलंब करायला हवा. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट असे दोन स्वतंत्र संघ तयार करायला हवेत. आयपीएलसारख्या क्रिकेटच्या नुकसान करणाऱ्या स्पर्धा तत्काळ बंद करायला हव्यात. भारतीय क्रिकेटला बुडवायला निघालेल्या या स्पर्धा भारतातच आयोजित केल्या जातात, हेच आपले मोठे दुर्दैव आहे.
– दादासाहेब उल्हास येंधे, काळाचौकी, मुंबई.