जगायचं कसं, हे कळलेला प्राणी म्हणजे माणूस! म्हणून तर, मृत्यू अटळ असल्याचं माहीत असूनही तो टाळण्याची धडपड.. जगबुडी होणार नाही, म्हणून सेलिब्रेशन!!
‘डूम्स डे’ झाला. पृथ्वी जिवंत राहिली. तिला आणखी एकदा जीवदान मिळालं. आजपर्यंतची ही सगळी जीवदानं कल्पनेतलीच होती. त्यामुळे पृथ्वीला आपलं प्रेमगीत गाण्याची पूर्ण मुभा मिळाली. मागे एकदा एक तबकडी पृथ्वीवर आदळणार असून आता सर्वनाश अटळ आहे, अशी आवई उठली होती. गेली काही कोटी र्वष ही पृथ्वी तिच्यावरील मानवप्राण्यासाठी गूढ बनून राहिली आहे. सगळं काही कळलंय, अशी आत्मविश्वासी प्रौढी मिरवणाऱ्या माणसाला तिनं अगदी एका फुंकरीनं उडवून लावलंय. २१ डिसेंबर २०१२ हा पृथ्वीच्या प्रलयाचा दिवस मुक्रर झाला, त्या दिवशीच्या वृत्तपत्रातील सगळय़ा बातम्या भविष्याचा वेध घेणाऱ्या होत्या. तिकडे गुजरातेत मोदी नव्यानं राज्यावर येणार आहेत, तर हिमाचल प्रदेशात काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळाल्यानं येत्या २०१४च्या निवडणुकीत काय करता येईल, याचं नियोजन सुरू झालंय. जग आणखी कित्येक कोटी र्वष जगणार आहे आणि आपणही अमर आहोत, अशा मानसिकतेत माणूस गेली काही कोटी र्वष जगतो आहे. या प्रलयदिन ऊर्फ डूम्स डे वर आलेल्या इंग्रजी चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली. त्या कमाईतून येत्या दशकभरातील नव्या चित्रपटांच्या योजनाही आखण्यात आल्या. ‘नासा’ या अवकाश संशोधन संस्थेलाही राहवलं नाही. तिनं गुप्तपणे प्रलयदिनावर एक लघुपट तयार केला. तो गुप्त अशासाठी ठेवला की समजा, प्रलय झालाच, तर मग तो दाखवण्याचं कारणच उरणार नाही आणि झाला नाही, तर कुणाला कळण्याची गरजही नाही. आपल्या भारतीयांच्या संस्कृतीत प्रलय ही कल्पना फार पूर्वीपासून आहे. त्या काळातल्या माणसानं माणसाच्या आयुष्याबरोबरच पृथ्वीच्या आयुष्याचंही चक्र बनवलं. त्याला युग असं संबोधलं. सत्य, द्वापार, त्रेता आणि कलियुग अशा या कल्पनेतल्या कलियुगात पृथ्वीवर प्रलय होणार आणि सर्वसंहार होणार अशी मूर्ख खात्री बाळगणाऱ्या माणसाला त्या काल्पनिक जगातच राहायला आवडत आलं आहे. त्यामुळे दर काही वर्षांनी अशा काही आवया उठवणं, हा त्याचा छंद बनतो आणि त्यातून भीतीच्या दडपणाखाली जगण्याचं समाधान त्याला मिळतं.
अगदी प्रारंभीच्या काळात माणसाला रात्रीच्या अंधारात आकाशात दिसणारा चंद्राचा भव्य गोळाही भीती घालत असेल. पृथ्वीवरची प्रत्येक वस्तू वरून खाली पडते, या अनुभवामुळे हा गोळा आपल्या अंगावर पडला, तर काय करायचं, या काळजीनं त्याची झोपही उडाली असेल. तो गोळा रोजच्या रोज आपले आकारमान बदलत तसाच तरंगत असल्याची ही अनुभूती कदाचित त्या आदिमानवाला जगण्याचं इंजेक्शन देत असेल. असं भीतीचं सुख अनुभवण्याची मानसिकता पृथ्वीवरच्या सगळय़ा प्राणिमात्रात दिसत नाही. माणसासह सगळय़ा सजीवांना जिवंत राहण्याची प्रेरणा असते. त्यांच्यातील वंशसातत्याची त्यांच्यातील भावना पुढच्या अनेक शतकांची व्यवस्था लावत असते. पुढच्या दहा पिढय़ांना पुरेल इतकी संपत्ती गोळा करण्याची त्याची जिद्द त्यातूनच जन्माला येते. तरीही मूल जन्माला घालणं आणि त्याचं संगोपन करणं, यामधील कविता फक्त माणसालाच कळली. मरेपर्यंत जगायचं आणि भोगायचं बरंच काही राहून गेलंय, अशी भावना फक्त माणसाच्याच ठायी जिवंत असते. आदिम प्रेरणाच जणू! तरीही जगज्जेत्या अलेक्झांडरला आपलं शव डॉक्टरांनीच वाहून न्यावं, असं वाटलं. वैद्यकशास्त्र माणसाला अमरत्व देऊ शकत नाही आणि माणसानं मिळवलेली संपत्ती तो इथंच ठेवून जातो, हे त्याला कळलं, पण जगातल्या प्रयोगशाळांमध्ये प्रलयाच्या दिवशीही माणसाचं आयुष्यमान वाढवण्याचे प्रयोग थांबलेले नव्हते. शस्त्रांच्या मदतीनं मृत्यूचं तांडव ज्या माणसानंच निर्माण केलं, त्याला शस्त्रांच्या वाढत्या वापरातून मिळणारा पैसाही हवा असतो. सत्ता आणि त्यातून येणारी शारीर सुखं त्याला सतत वाकुल्या दाखवत असतात आणि त्यामुळे तो आयुष्यात अनेकदा बहकतो. थिजतो. थांबतो. प्रलय होईल न होईल, पण पृथ्वीला वाचवण्याचे त्याचे प्रयत्न त्याला स्वस्थ बसू देत नाहीत. ग्लोबल वॉर्मिग असेल नाहीतर कीटकनाशकं असतील. माणसाची चिंता पृथ्वी वाचवण्याची आहे. एका बाजूला वाचवण्याचे हे अथक प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूला तिच्या प्रलयाच्या वल्गना अशा हेलकाव्यांमध्ये समस्त मानवसमूह सापडला आहे. जगण्याच्या इच्छेला मृत्यूचं ग्रहण त्यानंच लावलं. त्यामुळे २१ डिसेंबर २०१२ हा दिवसही त्यानंच ठरवला. गेली काही र्वष इंटरनेटवर याविषयी जी अतिरेकी चर्चा सुरू आहे, त्यानं सारं महाजाल जॅम झालं आहे. फेसबुक आणि ट्विटरवर जगण्याच्या आणाभाका घेण्यात आणि त्या जगाला ओरडून सांगण्यात त्याला धन्यता वाटू लागली आहे. फ्रान्समधल्या एका गावातल्या ग्रामस्थांनी एका टेकडीवर आश्रय घ्यायचं ठरवलं. जगबुडीत ही टेकडी तरून जाणार आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. घरदार सोडून टेकडीवर जगण्याच्या हमीनं तग धरणाऱ्या त्या गावकऱ्यांचं अभिनंदनच करायला हवं.
ऑस्ट्रेलियामध्ये पृथ्वीवर सर्वात आधी सूर्य प्रकट होतो. जगातल्या लाखोंनी ऑस्ट्रेलियातील पर्यटन विभागाच्या संकेतस्थळावर तिथं कुणी जिवंत आहे का, याची विचारणा केली. तिथंच काय, पण जगातल्या सगळय़ा देशांमधील पंचतारांकित हॉटेलांनी प्रलयदिनी अधिक उत्साह दाखवला. कुणी घरपोच टॅक्सी पाठवण्याचं आश्वासन दिलं, तर कुणी खास प्रलयाचा मेन्यू जाहीर केला. आयुष्यात शेवटचाच अनुभव घेण्याच्या या नाना कल्पना राबवणाऱ्या सगळय़ांना त्यातून मिळणारा नफा भोगता येण्याची खात्री नव्हती. तरीही पृथ्वीचा शेवटचा दिवसही धूमधडाक्यात साजरा करण्यावर त्यांचा भर होता. जगण्याचं असं जाहीर प्रदर्शन करण्याची त्यांची हौस अनावर व्हावी असा हा प्रलयदिन होता. दर काही वर्षांनी अवकाशातला कोणता तरी धूमकेतू, लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याच्या बातम्या येतात. पुन्हा एकदा असोशीनं जगण्याची चढाओढ सुरू होते आणि त्या संकटावर मात करण्यासाठी सर्वसज्जता होते. माणसाला जे कमी कळलंय असं वाटतं, ते आहे त्याचं मन. त्या मनाला खेळवणं हा त्याचा सततचा उद्योग. कधी भीती दाखवून तर कधी उन्मादी आनंदाचं आकर्षण दाखवून. हा उद्योग माणसाला जिवंत राहण्याची प्रेरणा देतो. जगण्याचंही बळ देतो आणि त्यातूनच त्याला आणखी नव्या सर्जनाच्या शक्यताही सापडतात. स्वप्नं पाहणाऱ्या माणसाला भुताचीही भीती वाटते आणि मृत्यूचीही. भूत जगण्याला छळाची किनार प्राप्त करून देतं, तर मृत्यू जगण्यातली अधीरता वाढवतो. भुताची जागा मग कधी प्लँचेट घेतं, तर कधी अतींद्रीय शक्ती. कशासाठी जगायचं हे कळायच्या आतच तो मृत्युपंथाला लागतो. प्रलयदिनी झालेल्या जगातल्या हजारो अपघातांमध्ये अनेकांचे जीव गेले असतील. ‘सुटलो बुवा जगबुडीतून’ अशी काही त्यांची भावना असण्याची शक्यता नाही. जगबुडी झालीच असती तर ते आधीच सुटले, असं म्हणायला तरी कोण शिल्लक राहणार होतं म्हणा! जगातल्या माणसांचा या विषयावरील आत्मसंवाद पाहिला, की त्यांना जगण्यात रस आहे की मृत्यूमध्ये असा प्रश्न पडतो.
पृथ्वीचा प्रलयदिन धामधुमीत साजरा झाला. सकाळी उठल्यावर कार्यालयात जाण्याची नेहमीची लगबग थांबली नाही. लेट मार्क वाचवण्याची गडबड संपली नाही. उद्याचं प्लॅनिंगही बिनचूक झालं. जगलो वाचलो तर.. असा प्रश्न मनालाही शिवला नाही. शाळेतल्या मुलांमध्ये गेले काही दिवस सर्वात अधिक चर्चेचा असलेला हा विषय घरात कुणीच गांभीर्यानं घेत कसं नाही, याचं आश्चर्य वाटणाऱ्या शाळकरी मुलांनीही आदल्या दिवशी गृहपाठ केला आणि शाळेत जाण्यासाठी दप्तरंही चोख भरली. शाळेच्या संमेलनातल्या नाटकाचे संवाद उद्या, प्रलय होणार असल्याच्या भीतीपोटी विसरणार तर नाहीत ना, अशी शंका घोळवत मुलांनी चेहरे रंगवले. मंचावर शेवटच्या रांगेत उभं राहून कवायत करणाऱ्या त्या छोटय़ाला आपण सगळय़ांना दिसतो आहोत ना, याचीच काळजी लागून राहिली. आई-बाबाही प्रलयाच्या भीतीनं गळाठले नाहीत ना, याची त्यालाच जास्ती चिंता. २२ डिसेंबरच्या सकाळी सगळय़ांना खूप हायसं वाटणार आहे. स्वत:ला पुन:पुन्हा चिमटा घेऊन जिवंत असल्याची खात्री करून घेत कालच्या प्रलयापूर्वीच्या रात्री केलेली मौजमजा आठवून ही सगळी माणसं खूप आनंदी होतील. पुन्हा नव्यानं जगण्याची उमेद अंगी बाणवत आणखी एका मृत्यूच्या वावटळीत सापडवून घेण्याची तयारी करणाऱ्या तमाम मानवांना जगण्यासाठी शुभेच्छा देताना पु. ल. देशपांडे यांची छोटी कविता आठवल्यावाचून राहात नाही.
आताशा बुडणाऱ्या सूर्याला म्हटलं, की बरंय भेटूया,
तर तो म्हणतो, कशावरून? आजच्या रात्रीची तुला खात्री आहे?
‘जगबुडी’ आणि नंतर ..
जगायचं कसं, हे कळलेला प्राणी म्हणजे माणूस! म्हणून तर, मृत्यू अटळ असल्याचं माहीत असूनही तो टाळण्याची धडपड.. जगबुडी होणार नाही, म्हणून सेलिब्रेशन!! ‘डूम्स डे’ झाला. पृथ्वी जिवंत राहिली. तिला आणखी एकदा जीवदान मिळालं. आजपर्यंतची ही सगळी जीवदानं कल्पनेतलीच होती.
आणखी वाचा
First published on: 22-12-2012 at 12:17 IST
मराठीतील सर्व रुजुवात बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World end and thereafter