शेक्सपिअरचा जन्मदिवस (२३ एप्रिल) जगभर पुस्तकदिन म्हणून साजरा केला जातो. परवाचा त्याचा जन्मदिवस ४५० वा आहे. त्यानिमित्ताने पुस्तकांच्या प्रतिविश्वाची ही सफर.
‘गॉन विथ द विंड’मध्ये सुरुवातीला १५० वर्षांपूर्वीच्या अमेरिकेतल्या जगाचे वर्णन आहे. या कादंबरीच्या कथानकात एका सायंकाळी मेजवानी असते. आपली गाडी तेथपर्यंत गेली की पहिली त्रेपन्न पाने संपतात. ‘‘सर. यू आर नॉट जंटलमन्!’’, ‘‘अॅन अॅप्ट ऑबसव्र्हेशन, अॅन्ड मिस् यू आर नॉट अ लेडी.’’ या संवादाने व त्या प्रसंगातल्या नाटय़मयतेने कादंबरी शेवटच्या पानापर्यंत खेचून नेते. पण ‘गॉन विथ द विंड’लाच जर आपण एवढे ओढेवेढे घेऊ लागलो तर निकोस क्झान्टकीसच्या झोर्बाबद्दल सांगायलाच नको. मग त्या अॅना कॅरनिनाचे काय? ‘द नाइव्ह अॅण्ड सेंटिमंटल नॉव्हॅलिस्ट’ हे ओरान पामुखचे पुस्तक वि. का. राजवाडे यांच्या ‘कादंबरी’ या लेखासारखे पण अधिक तरल. पामुख म्हणतो, ‘कथानकातले वर्णन वाचताना वाचक प्रतिमांच्या जगात प्रवेश करतो.’ हे वाचताना हसू येते, कारण कादंबरीवरून चित्रपट बनवताना ज्या अडचणी येतात त्याबद्दल सत्यजीत रे यांनी हेच म्हटले आहे. बल्झाकच्या कथेतला उतारा देऊन त्यांनी म्हटले होते, ‘दिग्दर्शकाचे अर्धे काम येथे झालेले आहे.’ त्यांनी पुढे जाऊन रवींद्रनाथांच्या कथांवर चित्रपट बनवणे सोपे नाही (कारण त्यात वर्णनात्मक भाग कमी आहे) असेही मत दिले होते. जुन्या वा परक्या जगाविषयी वाचकाला ओढ असते. त्यातल्या अडचणी न भोगता ते जग हवेसे वाटते. ‘गॉड इज इन डिटेल्स’ हे चांगल्या कादंबरीला लागू असते.
शालेय वयात वाचलेले लेखक त्यांचे लेखन वाचण्याआधी ऐकून माहीत होते. पण डॉ. अतुल गवांदे हा माझा फाइड होता. त्याच्या ‘बेटर, सर्जनस् नोटस् ऑन परफॉर्मनस्’ व ‘कॉम्प्लिकेशन्स’ या दोन्ही पुस्तकांचे अपरूप होते. पेशंटचे किस्से सांगण्यापलीकडचे हे लेखन होते. तत्त्वज्ञानाच्या दिशेने जाणारे. पण या शोधालाही आता काही वर्षे होऊन गेली. वाचणारा माणूस बऱ्याचदा पुस्तकांबद्दल गावभर बोलत फिरतो. मग परिचितही सध्या काय वाचतोयस, असे विचारत राहतात. मग काहीतरी नाव सांगावे लागते. खरेच काही चांगले हाताशी येण्याआधी किती भरताड वाचावे लागते!.. पार्टीग्स सो मेनी अँड मीटिंग सो फ्यु..
‘ब्रिजस् ऑफ मेडिसिन कौटी’ हा सिनेमा बघून तो ज्या कादंबरीवरून बनवला होता, ती राबर्ट वॉलरची कादंबरी मोठय़ा आशेने वाचली तरी ती अगदीच प्राथमिक दर्जाची निघाली. लेखकाची भाषा संपन्न नसेल तर एक चांगले कथानक कसे वाया जाते याचे ते उत्तम उदाहरण होते. पण त्याचेही नाव एकदा ‘काय वाचतोयस? या प्रश्नावर घ्यावे लागले व ऐकणाऱ्याच्या चेहऱ्यावरही अज्ञानापोटी आदरयुक्त भाव येतात. केवळ वेळ मारून नेण्यासाठीसुद्धा काही पुस्तके वाचावी लागतात. पण नेहमीच असे होत नाही. ‘ब्रेकफास्ट अॅट टिफनीस’ या गाजलेल्या सिनेमाच्या कथानकाचा शोध घेताना ट्रमन कपोते या लेखकाचा शोध लागला. मग त्याची ‘इन कोल्डब्लड’ ही कादंबरी हाताशी आली. ‘इन कोल्डब्लड’ म्हणजे थंडपणाने केलेले कृत्य. क्लासमधल्या एका रान्चवरल्या घरात एका संपन्न शेतकऱ्यांच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या होते. यथावकाश त्यांचे दोन्ही मारेकरी पकडले जाऊन त्यांना फाशीची शिक्षा होते. या सत्य घटनेचे रिपोर्टिग म्हणजे ही कादंबरी. गुन्हेगारांची फाशी अमलात येईपर्यंतचा घटनाक्रम कपोतेने यात वर्णन केला आहे. दोन्ही गुन्हेगार बेकार व मूर्ख असतात. चार जणांची हत्या करून केवळ ८० डॉलर त्यांच्या हाती लागतात. नंतर खटला उभा राहतो. त्या गुन्ह्यांची पाश्र्वभूमी उलगडत जाते. निकालात गुन्हेगारांना फाशी होते. लेखकाने गुन्हेगाराचे व्यक्तिमत्त्व समजावून घेण्यासाठी त्यांच्याशी मैत्री केली व तुरुंगात त्यांच्या अनेक वेळा भेटी घेतल्या. कादंबरीतल्या त्यांच्या वर्णनाने गुन्हेगारांचे माणूसपण जाणवते व त्यांना फाशीची शिक्षा होऊन ती अमलात येतानाचे वाचले तेव्हा समाजाचा व कायद्याचा निष्ठूरपणा जाणवतो. दोघांची फाशी शिक्षा एकाच दिवशी व एकाच ठिकाणी अमलात येणार असते. साहजिकच दोघांपैकी कोणाला आधी फाशी द्यायची असा प्रश्न निर्माण होतो. तुरुंगातला अधिकारी थंडपणे म्हणतो, ‘लेटस् डू इट अल्फाबेटिकली.’ आधी वाटते गुन्हेगारांनी केलेली चार जणांची हत्या हे थंडपणाने केलेले कृत्य. पण नंतर ती समाजाने थंडपणाने केलेली गुन्हेगारांची हत्या ठरते. वाचल्यावर कोण दोषी याचा निर्णय मन घेऊ शकत नाही.
मेरी इव्हान्स या लेखिकेचे जॉर्ज इलियट हे पुरुषी टोपणनाव. आपण स्त्री असल्याने आपल्या लेखनाला कोणी गंभीरपणे घेणार नाही असे वाटल्याने तिने टोपणनावाने लिखाण केले आणि व्हिक्टोरियन युगाबद्दलचा तिचा हा अंदाज बरोबरच होता. ‘मिडलमार्च’ या कादंबरीत ती लिहिते, ‘‘जर आपल्याला दृष्टी असेल व सामान्य मानवी जीवनाविषयी आस्था असेल तर गवत वाढताना व खारीचे हृदय धडधडताना आपल्याला ऐकू येईल आणि नि:शब्दाच्या पलीकडे असलेल्या भयंकर गर्जनेने तर आपण उद्ध्वस्त होऊ.’’ ‘द अदर साइड ऑफ सायलेन्स’ असा शब्दप्रयोग करताना मेरी इव्हान्स साहजिकच स्त्री जीवनाविषयी बोलते. उर्वशी बुटालिया या स्त्रीला हे बरोबर समजले. याच शीर्षकाचे तिचे पुस्तक फार उशिरा हातात आले. मुख्यत: भारताच्या फाळणीच्या आवर्तात भरडल्या गेलेल्या स्त्रियांच्या मुलाखतींवर हे पुस्तक आधारले होते. लेखिकेने दहा वर्षे अनेक कुटुंबांच्या व स्त्रियांच्या मुलाखती घेण्यात खर्च केले. हे पुस्तक हाती येऊन बरेच दिवस होऊन गेले होते. आजपर्यंत कोणतेही पुस्तक उघडावे का न उघडावे असा प्रश्न कधीच पडला नाही. पण या पुस्तकाभोवती नुसतेच फिरण्यात बराच काळ गेला. या अंधाऱ्या गुहेत शिरल्यावर कोणत्या सांगाडय़ाला अडखळून पडू हे काही सांगता येत नव्हते आणि तसेच घडले. अखेर ते मधूनच उघडले व वाचायला घेतले. रावळपिंडीजवळच्या थोहा खालसा खेडय़ातली ती फाळणीच्या वेळची घटना होती. ‘‘माझ्या वडिलांनी कुटुंबातल्या दोघांना मारले. नंतर तिसरी माझी बहीण होती. मान कौर. ती वडिलांसमोर स्वत:च येऊन बसली आणि हाती कृपाण घेतलेल्या वडिलांच्या कुडत्याचे टोक घट्ट पकडून मी उभा होतो. वडिलांनी कृपाण फिरवले, पण मध्येच त्यांचा धीर खचला वा दुपट्टय़ाला त्यांचा हात अडखळला. शेवटी बहिणीनेच दुप्पटा बाजूला केला. वडिलांनी कृपाण फिरवले आणि बहिणीचे शीर काही अंतर गडगडत गेले.’’ चमकून प्रकरणाच्या शीर्षकाकडे पाहिले. ते होते ‘ऑनर’. धर्माच्या व कुटुंबाच्या ‘इभ्रती’साठी हवेलीतल्या सव्वीसपैकी पंचवीस स्त्रिया कुटुंबाने ‘शहीद’ करून टाकल्या. या पुस्तकाविषयी अनेक दिवस कुठे बोलायचेच टाळले. शेवटी पुस्तकातील वरील घटना मित्राला सांगावीच लागली. ऐकल्यावर गंभीरपणे त्याने विचारले, ‘‘मग काय करायला हवे होते त्यांनी?’’ अशा प्रश्नांची उत्तरे देता येत असती तर एका पुस्तकाकडून दुसऱ्या पुस्तकाकडे कशाला धावाधाव केली असती?
एका पुस्तकातून दुसरे पुस्तक निघत जाते. उर्वशी बुटालियाचा उल्लेखदेखील आयेशा जलालने लिहिलेल्या मंटोच्या चरित्रात होता. त्यामुळे जगातल्या सगळ्या पुस्तकांचा आद्य पुस्तक कर्ता कोण आहे, असा हास्यास्पद प्रश्न कधीतरी भेडसावतो. अशी पुस्तकांतून निघालेल्या पुस्तकांना अंत नाही, हे माहीत असताना पुस्तकांच्या हाका ऐकून ती अनेक ठिकाणावरून गोळा केली. शहरातल्या त्या जागा आता अंगावर येतात. जुन्या ठिकाणी पाय परत परत वळतात व निराशा होते.
पुस्तकाच्या अशाच हाका कवी सफदर हश्मीलाही ऐकू येत.
‘किताबें करती हैं बातें जमाने की। आज की कल की एक एक पल की।
खुशियों की, गमों की, फूलों की, बमों की। जीत की, हार की, प्यार की, मार की।’ असे लिहून शेवटी त्याने विचारले आहे, ‘‘क्या तुम नहीं जाना चाहोगे इस संसार में?’’ कालांतराने वाचलेल्या कथानकांचे, पात्रांचे, इतिहासातल्या व्यक्तींचे, घटनांचे, त्यातल्या संगतींचे व सामान्यांच्या जीवनप्रवासाचे जणू विश्वामित्राने जन्माला घातल्यासारखे एक प्रतिविश्व तयार होते. त्यात शिरता येते पण बाहेर पडता येतेच असे नाही.
पुस्तकांचे प्रतिविश्व
शेक्सपिअरचा जन्मदिवस (२३ एप्रिल) जगभर पुस्तकदिन म्हणून साजरा केला जातो. परवाचा त्याचा जन्मदिवस ४५० वा आहे. त्यानिमित्ताने पुस्तकांच्या प्रतिविश्वाची ही सफर.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-04-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World of books