कुस्ती हा क्रीडा प्रकार ऑलिम्पिकमध्ये होताच. परंतु कुस्तीविरोधी संघटनांनी या खेळालाच मूठमाती देण्याचा प्रयत्न चालविला होता. मात्र ते अयशस्वी ठरले आणि अब्जावधी चाहत्यांच्या बळावर कुस्ती जिंकली. २०१६च्या ऑलिम्पिक स्पर्धेतून वगळण्यात आलेल्या कुस्तीचा समावेश आता पुढच्या, २०२०च्या स्पर्धेमध्ये करण्यात आला आहे. आशियाई आणि त्यातही प्रामुख्याने भारतीय मल्लांसाठी ही शुभवार्ताच आहे. या निमित्ताने ऑलिम्पिकमधील पौर्वात्य विरुद्ध पाश्चिमात्य राजकारणाचा पर्दाफाश झाला हेही बरे झाले. एकूण २६ क्रीडा प्रकारांचा समावेश असलेल्या या जागतिक स्पर्धेत कोणत्या खेळांचा समावेश असावा हे ठरविण्याचे अधिकार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला असतात. या समितीवर नेहमीच युरोपीय क्रीडा संघटकांचे वर्चस्व राहिलेले आहे. त्यांची ‘खिलाडूवृत्ती’ अशी, की एखाद्या खेळात आशियाई खेळाडूंना घवघवीत यश मिळत आहे असे दिसले, की त्यातील आशियाई देशांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी त्यांनी बाह्य़ा सरसावल्याच समजा. मग त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळांचे नियम बदला, स्वरूप बदला, ते शक्य तेवढे आशियाई खेळाडूंना त्रासदायक ठरतील असे करा, असे त्यांचे उद्योग सुरू होतात. मातीवरील हॉकीत भारत व पाकिस्तान या देशांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी अॅस्ट्रो टर्फ मैदानांचा उपयोग सुरू झाला. त्यावरही आशियाई संघांची कामगिरी चांगली होऊ लागल्यानंतर निळ्या रंगांच्या कृत्रिम मैदानाचा उपयोग सुरू करण्यात आला. कुस्तीबाबतही तसेच. तिच्या तर अस्तित्वावरच घाला घालण्याचे प्रयत्न झाले. कुस्ती हा वेळखाऊ, खर्चीक खेळ आहे. त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद नसतो आदी कारणे देत हा खेळ वगळण्यासाठी युरोपियन संघटकांनी खटाटोप केले. स्क्वॉश, बेसबॉल-सॉफ्टबॉल यांच्या तुलनेत कुस्ती हा कमी खर्चीक, कमी वेळ लागणारा खेळ आहे. कुस्ती पाहण्यास प्रेक्षकांची खचाखच गर्दी असते हेही अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये दिसलेले आहे. पण केवळ आशियाई संघटनांची मक्तेदारी मोडण्यासाठी कुस्तीविरोधकांनी खोटी कारणे दिली गेली. गेल्या दोन ऑलिम्पिकमध्ये भारताला कुस्तीत एक रौप्य व दोन कांस्यपदके मिळाली. आता कुठे या खेळात भारतासाठी आशादायक चित्र दिसू लागले असतानाच भारताची पदकांची स्वप्ने मातीतच गाडली जाणार की काय अशी भीती निर्माण झाली होती. तथापि या खेळाचे पुनरागमन भारतीय मल्लांसाठी प्रोत्साहन ठरणार आहे. आपल्या खेळाचा पुन्हा समावेश झाला असला तरी हा खेळ अधिकाधिक लोकाभिमुख व प्रेक्षणीय करण्याची जबाबदारी कुस्ती संघटकांवर आली आहे. या खेळाच्या विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या संयोजनात व्यावसायिकता आणली पाहिजे. २०२०च्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत पदकांची लयलूट करण्याची संधी आता भारताला मिळणार आहे. त्यासाठी आतापासूनच भारतीय मल्लांना नियोजनबद्ध सराव करावा लागणार आहे. चीन, जपान, अमेरिका आदी देशांचे खेळाडू किती आधीपासून या स्पर्धाची तयारी करतात हे सर्वश्रुत आहे. आपण मात्र ऐनवेळी जागे होतो असा आजपर्यंतचा अनुभव आहे. कुस्ती टिकली आहे. तेव्हा या खेळात आपल्याला अधिकाधिक पदकांचा फड मारायचा आहे, हाच दृष्टिकोन भारतीय कुस्ती संघटकांनी ठेवला पाहिजे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा