प्रकाशन व्यवसायात ते काहीसे अपघातानेच आले. पुण्याच्या ‘देशमुख आणि कंपनी’चे रा.ज. आणि सुलोचना देशमुख यांच्यानंतर या प्रकाशन संस्थेची मालकी गोडबोले यांच्याकडे आली. ते सुलोचनाबाईंचे भाचे. रा. ज. यांच्या निधनानंतर सुलोचनाबाईंना ते प्रकाशनाच्या कामात १९९५ पासून मदत करू लागले होते. ९८ मध्ये सुलोचनाबाईंचे निधन झाल्यावर त्यांनी ‘देशमुख आणि कंपनी’चा प्रकाशन व्यवहार पूर्णपणे बघायला सुरुवात केली. प्रकाशनासाठी कुठलेही पुस्तक स्वीकारताना संबंधित लेखकाबरोबर सविस्तर चर्चा करून त्याला पुन:पुन्हा त्याच्या हस्तलिखिताचे पुनर्लेखन करण्यास उद्युक्त करून त्याचे पुस्तक शक्य तितके परिपूर्ण करण्यावर गोडबोले यांचा कटाक्ष असे. त्यामुळे एकेका पुस्तकावर ते तीन तीन वर्षे काम करत. ‘वेध महामानवाचा’ (शिवाजी महाराजांवरील श्रीनिवास सामंत यांची कादंबरी), ‘निवडक माटे’, ‘बा. भ. बोरकरांची समग्र कविता’, ‘धर्मक्षेत्रे-कुरुक्षेत्रे’ (विश्वास दांडेकर), ‘उत्तरायण’ (रवींद्र शोभणे), ‘निवडक कुरंदकर’ अशी मोजकीच, पण महत्त्वाची पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. गेल्या तीन वर्षांत त्यांनी केवळ दोनच कादंबऱ्या प्रकाशित केल्या. गोडबोले हे व्यवसायाने केमिकल इंजिनीअर. काही काळ त्यांनी विविध नोकऱ्याही केल्या. नंतर महाविद्यालयातल्या तीन मित्रांबरोबर त्यांनी अॅक्व्ॉरिअस टेक्नॉलॉजीज ही कंपनी १९९१ साली सुरू केली. बांधकामाला लागणारी वेगवेगळ्या प्रकारची यंत्रसामग्री ते बनवत. रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग दर्शवणारे पट्टे, भिंतींना प्लास्टर करणारे यंत्र यांची भारतातील पहिली निर्मिती त्यांचीच. या कंपनीच्या अनेक उत्पादनांची युरोपकडे मोठय़ा प्रमाणावर निर्यात केली जाते. या कामातही त्यांची विचक्षण दृष्टी पाहायला मिळते. थोडक्यात गोडबोले निराळ्या वाटेने विचार व कृती करणारे आणि प्रत्येक कामात अचूकतेचा आग्रह धरणारे प्रकाशक आणि उद्योजक होते. विचाराने आधुनिक असले तरी गोडबोले यांना प्राचीन भारतीय संस्कृतीबद्दल डोळस कौतुकही होते. त्यामुळे परंपरा आणि आधुनिकता यांचा अतिशय चांगला संगम त्यांच्यामध्ये पाहायला मिळत असे.
गेल्या पाचेक वर्षांत त्यांना महाभारताने झपाटले होते. महाभारताच्या प्रमाण संहितेपासून या विषयावरील अनेक पुस्तकांचे त्यांनी अतिशय बारकाईने वाचन केले होते. त्यातून ‘महाभारत- संघर्ष आणि समन्वय’ या पुस्तकाची निर्मिती झाली. महाभारताकडे इतक्या चिकित्सेने पाहणारा इरावती कर्वे यांच्या ‘युगान्त’नंतरचा हा ग्रंथ असे त्याचे वर्णन जाणकारांनी केले आहे. ‘औरंगजेब- शक्यता आणि शोकांतिका’, ‘सम्राट अकबर’, ‘इंद्राचा जन्म’ आणि ‘वेदांचा तो अर्थ’ या चार संशोधनपर पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. ही पुस्तके म्हणजे त्यांची चिरस्थायी ओळख ठरेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा