कोणतीच गोष्ट फारशा गांभीर्याने घ्यायची नाही, असे ठरवले की सर्वच पातळ्यांवर कसा बट्टय़ाबोळ होतो, हे पाठय़पुस्तकांमधील चुकांमुळे समोर आले आहे. दहावीच्या भूगोलाच्या पाठय़पुस्तकात अरुणाचल प्रदेश चीनमध्ये दाखवणारा नकाशा देण्यात आला आहे. त्यावर कारवाई करणार, संबंधित भाग बदलणार, असे खुलासे होत असताना हीच चूक इतिहासाच्या पाठय़पुस्तकातही झाल्याचे पुढे आले आहे. भूगोलाच्या पुस्तकातील एका नकाशात अंदमान-निकोबार बेटेच नाहीत, अशीही तक्रार काहींनी केली आहे, ती नवी आहे. राज्यातील १७ लाख विद्यार्थ्यांना जो इतिहास आणि भूगोल शिकवायचा, तो वस्तुस्थितीदर्शकच असला पाहिजे, यासाठीचा कटाक्ष ठेवण्याची गरज लेखकांना आणि संपादकांना वाटली नाही. गेल्या काही वर्षांत इतिहासाच्या पाठय़पुस्तकात काय असावे, हे ठरवणाऱ्या मंडळींचे महाराष्ट्रात पेवच फुटले आहे. कागदपत्रांच्या आधाराने काय घडले आहे, याची संगती लावणाऱ्या इतिहासाऐवजी आपल्याला हवा तसाच इतिहास विद्यार्थ्यांनीही शिकला पाहिजे, असा आग्रह धरला जातो, तेव्हा वस्तुस्थितीचा विपर्यास होणे स्वाभाविक ठरते. पाठय़पुस्तके तयार करणे हे जोखमीचे काम असते, कारण त्याद्वारे पुढच्या पिढीला ज्ञानाच्या वाटेने जाणे सुकर होते. दहावीच्या विद्यार्थ्यांना इतिहास आणि भूगोल हे विषय गुण मिळवण्याच्या दृष्टीने फारसे ‘उपयोगाचे’ वाटत नाहीत. समाजाच्या जडणघडणीसाठी ज्या विषयांचे महत्त्व असते, तेच विषय ‘स्कोअरिंग’चे नाहीत म्हणून दुर्लक्षिले जातात. एकीकडे विद्यार्थ्यांना या विषयात रस नाही आणि दुसरीकडे या विषयाचे तज्ज्ञ म्हणवून घेणाऱ्यांना त्याचे गांभीर्य नाही. त्यामुळे ब्रह्मपुत्र नदी थेट बंगालच्या उपसागरात पोहोचते किंवा आफ्रिका हा जगातील सर्वात मोठा खंड आहे, अशी माहिती दिली जाते. जे नकाशे इंग्रजी पाठय़पुस्तकात छापले गेले आहेत, त्यामध्ये लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार ही बेटेच गायब होतात. हे सारे घडते, कारण पाठय़पुस्तके तयार करणे हे अतिशय जोखमीचे आणि महत्त्वाचे काम आहे, याचाच विसर पडतो. शिक्षण खात्यातील गोंधळाचाच हा आरसा आहे. सरकारी पातळीवर कोणत्याच बाबींकडे लक्ष न देण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस बळावते आहे. ‘कोण बघतंय’ अशा मानसिकतेमुळे आपण केवढे नुकसान करीत आहोत, हेही लक्षात येत नाही. शिक्षकांच्या मागण्या असोत नाही तर पाठय़पुस्तकांचे काम. सगळेच सरकारी पद्धतीने हाताळले जाते आहे. राज्यातील कोणत्याही खात्यात कामाबाबतची आस्था नाही. पाटबंधाऱ्यांपासून ते सार्वजनिक बांधकामापर्यंत आणि अर्थ खात्यापासून ते वनखात्यापर्यंत सगळीकडे कर्तव्यांबाबतची जी उदासीनता दिसते आहेत, ती या राज्याचे फार मोठे नुकसान करीत आहे. हीच वृत्ती पाठय़पुस्तके तयार करणाऱ्या तज्ज्ञांमध्येही उतरावी, हे अधिक क्लेशकारक आहे. तीन महिने संपावर गेलेल्या प्राध्यापकांमध्ये जशी व्यवसायाबद्दलची निष्ठा नाही, तशीच ती पुस्तके लिहिणाऱ्यांमध्येही नाही. शिक्षण हे समाजाच्या जडणघडणीतील अतिशय महत्त्वाचे आणि उपयुक्त माध्यम आहे, याचे भान आता सुटले आहे. पुस्तकांमधील ज्या चुका पुढे आल्या, त्या फारशा महत्त्वाच्या नाहीत, असे म्हणून सारवासारव होऊ शकते, पण त्यामागची गोलमाल वागण्याची मनोवृत्ती मात्र लपवता येऊ शकत नाही.