दोन वर्षांपूर्वी, जेव्हा येड्डियुरप्पा यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्यास भाजपने भाग पाडले तेव्हा त्यांनी पक्षापासून फारकत घेऊन स्वत:चा पक्ष स्थापन केला होता. कर्नाटकातील जातीच्या राजकारणामुळे सर्वच पक्षांना ज्या बेरीज-वजाबाक्या कराव्या लागल्या, त्याला भाजपदेखील अपवाद ठरला नाही. म्हणून अखेर भ्रष्टाचाराचा आरोप असलेले येड्डियुरप्पा यांना पुन्हा सन्मानाने माहेरी आमंत्रित केले गेले. खासदार येड्डियुरप्पा हे आता पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांच्या मानाच्या पदावर, पक्षाचे नवे राष्ट्रीय प्रवक्तेप्रवक्तेराम माधव यांच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत. संघविचार आणि राजकीय आचार यांच्यात गल्लत करावयाची नाही, ही जणू संघस्थानावरून मिळालेली शिकवणच असावी इतक्या सहजपणे संघनिष्ठांनी स्वत:ला राजकारणात कसे मुरवून घेतले, त्याच्या नमुनेदारपणाची ही केवळ सुरुवात आहे. येड्डियुरप्पा यांना तर भाजपच्या संघटनात्मक रचनेतील मानाचे स्थान मिळाले आहे. भाजपच्या राजकारणाची दिशा यातून स्पष्ट झाली आहे. भाजपच्या कारभारात संघ हस्तक्षेप करीत नाही, असे संघस्थानावरून वारंवार स्पष्ट केले जाते. येड्डियुरप्पा यांच्या नियुक्तीबाबत हे खरे मानले, तरीही मोदी यांचा उजवा हात असलेले नवे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकारिणीचा चेहरा मात्र संघीय राहील याची पुरेपूर दक्षता घेतली आहे. मोदी-शहा यांची पसंती आणि संघाची संमती असे सूत्र वापरून तयार झालेल्या या कार्यकारिणीत येड्डियुरप्पा हे अनेक अर्थानी वेगळे व्यक्तिमत्त्व ठरते. अमित शहा यांच्या कार्यकारिणीतील साठ टक्के नेते पन्नाशीच्या आतील असल्याने, भाजप हा तरुणांचा पक्ष असल्याचे चित्र ठसविण्याचा प्रयत्न शहा यांनी जाणीवपूर्वक केला आहे. सत्तरी उलटलेले एकटे येड्डियुरप्पा हे एकच अपवाद. प्रत्येक राज्य भाजपमय करण्याचा संकल्प कर्नाटकातही पूर्ण करावयाचा असेल, तर तेथील जातीच्या राजकारणाची गणिते डावलून चालणार नाहीत, याची जाणीव असलेल्या शहा यांनी आपल्या कार्यकारिणीची सरासरी वयोमर्यादा येड्डियुरप्पा यांच्यासाठी शिथिल केली, आणि संघाने पक्षाकडे वळविलेल्या सात जणांना महत्त्वाची पदे देऊन संघालाही वर्चस्वाचा मान दिला. स्वदेशी जागरण मंचाचे मुरलीधर राव, राम लाल, व्ही. सतीश, सौदान सिंग, शिव प्रकाश आणि बीएल संतोष या संघ व्यवस्थेतील नेत्यांचे आता पक्षावर लक्ष राहील. नितीन गडकरी यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या काळातच येड्डियुरप्पा यांना पक्षाबाहेर जावे लागले होते. आता येड्डियुरप्पा यांच्या बरोबरच, गडकरी यांचे महाराष्ट्रातील निकटवर्तीय असलेले विनय सहस्रबुद्धे यांचीही पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करून शहा यांनी एक आगळा समतोल साधला आहे. नव्या कार्यकारिणीत येड्डियुरप्पा यांचा समावेश केल्याने विरोधकांमध्ये टीकेचा सूर उमटला आणि वरुण गांधी या तरुणास वगळल्याने अनेकांच्या भुवयाही उंचावल्या. शहा यांच्या कार्यपद्धतीला धक्कातंत्र असे म्हणता येणार नसले, तरी नरेंद्र मोदी यांच्या मनाचे आणि विचारांचे प्रतिबिंब त्यांच्या कार्यशैलीतून उमटत असते, याची भाजपमध्ये सर्वानाच कल्पना आहे. वरुणच्या आईचा- मेनका गांधींचा- मंत्रिमंडळात समावेश झाल्याने एका कुटुंबातील एकच व्यक्ती हा मोदी यांचा विचार शहा यांनी अमलात आणला, असे सांगितले जात असले, तरी वरुण गांधींच्या अलीकडच्या वक्तव्यांचा तो परिणाम असावा, अशीही चर्चा आहे. वरुण गांधींना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावर बसलेला पाहण्याची त्यांच्या आईची खूप इच्छा आहे. व्यक्तिगत इच्छा-आकांक्षांना पक्षात स्थान नाही, हा संदेश देण्याची योग्य वेळ शहा यांनी साधली. संघाच्या संमतीने भाजपवर ‘मोदीबिंब’ उमटविण्याची नैसर्गिक जबाबदारी शहा यांनी पार पाडली आहे.
संघसंमतीचे ‘मोदीबिंब’..
दोन वर्षांपूर्वी, जेव्हा येड्डियुरप्पा यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्यास भाजपने भाग पाडले तेव्हा त्यांनी पक्षापासून फारकत घेऊन स्वत:चा पक्ष स्थापन केला होता.
First published on: 18-08-2014 at 01:38 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yeddyurappa get place in new team of amit shah