मलाला युसुफझाई आज आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आहे. एवढय़ा लहान वयात शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी नामांकन मिळालेली ही पहिलीच मुलगी. तिचं ‘आय अ‍ॅम मलाला’ हे पुस्तक वाचकांना तिच्या अनुभवांचं, तिनं पाहिलेल्या स्वप्नांचं सरळ सोप्या भाषेत ओळख करून देतं.
एका कुमारवयीन मुलीचं हे आत्मकथन म्हणजे आपल्या वडिलांच्या बरोबरीनं मुलींच्या शिक्षणाच्या हक्कासाठी झगडणाऱ्या एका ‘कार्यकर्ती’चे अनुभव आहेत.  पाकिस्तानी तालिबान्यांनी तिला ‘लक्ष्य’ का केलं, त्यामागील कारणही सर्वाना माहीत आहे. तो सर्व तपशील या पुस्तकात येतोच. पण त्याहीपेक्षा स्वात खोऱ्यासारख्या दुर्गम भागात राहून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत धार्मिक मूलतत्त्ववाद अन् जहालपणा व त्यातून होणारी हिंसा यांच्या कचाटय़ात सापडूनसुद्धा आपल्या मार्गावरून चालू पाहणाऱ्या एका जिद्दी मुलीची कहाणी आहे.
मलाला जे सांगू पाहतेय ते गेल्या दशकभरातलं पाकिस्तानचं वास्तव आहे. जोडीला पाकिस्तानच्या इतिहासातील काही घटनांची उजळणी आहे. पण मलालाची पाश्र्वभूमी पाहता परंपरावादी-धार्मिक पगडा असलेल्या सामान्य कुटुंबात जन्मलेली एक मुलगी या सर्व घटनांकडे कशी पाहते, त्याचा काय अर्थ लावते, हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे. मलाला-स्वात-पाकिस्तान असा हा त्रिकोण आहे.
मलालाची कहाणी तिच्या जन्मापासून सुरू होते. हा कालखंड फारच अलीकडचा म्हणजे सोळा वर्षांपूर्वीचा.. स्वात खोऱ्यातील ‘पश्तुन’ कुटुंबात तिचा जन्म झाला. मुलीचा जन्म ही ‘साजरी’ करण्यासाखी घटना नाही अशी ‘पश्तुनी’ परंपरा. पण वडील झियाउद्दीन या परंपरेला फाटा देत आपल्या अपत्याच्या जन्माचं स्वागत करतात. कारण ही मुलगी भविष्यात वेगळं काहीतरी करेल असा त्यांना आशावाद असतो. पुढे हेच वडील तिचं प्रेरणास्थान बनतात. पश्तुन परंपरेत मानाचं स्थान असलेल्या शूर ‘मलालाई’ या स्त्रीवरून झियाउद्दीन आपल्या कन्येचं नाव मलाला ठेवतात. परंतु गावातल्या मौलानाला ते आवडत नाही. तो म्हणतो, या नावाचा अर्थ वाईट आहे. म्हणजे ‘दु:खाने ग्रासलेली’. इथं मलालाच्या बरोबरीनं तिच्या वडिलांचा भूतकाळ अन् स्वातचा इतिहास समोर येतो.
मलालाला स्वात खोऱ्याविषयी भरपूर प्रेम आहे. ‘मी पहिली ‘स्वाती’, नंतर ‘पश्तुनी’ व शेवटी पाकिस्तानी आहे’ असं ती म्हणते. निसर्गसंपन्न स्वात खोरे, हिमशिखरे, प्राचीन बौद्ध संस्कृतीच्या पाऊलखुणा अन् शांतता हा स्वातचा हजारो वर्षांचा वारसा आहे. लहान मलालाचं हेच जग आहे. त्यापलीकडील पाकिस्तान तिला माहीत नाही.
मलाला चार वर्षांची असताना अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरचे मनोरे उद्ध्वस्त होतात अन् सगळेच भू-राजकीय संदर्भ झपाटय़ानं बदलतात. जगाच्या नकाशावर न्यूयॉर्क-अमेरिका नेमके कुठे आहेत हे कळण्याचं मलालाचं वय नव्हतं, पण तिचे वडील या घडामोडींनी चिंताग्रस्त होतात. अखेर अमेरिका अफगाणिस्तानवर हल्ला करते व मोठय़ा प्रमाणावर तालिबानी दहशतवादी ‘सुरक्षित’ आसऱ्यासाठी अफगाण-पाकिस्तानच्या सीमेकडील प्रदेशांकडे आपला मोर्चा वळवतात. हा स्वायत्त प्रदेश आहे व पाकिस्तान सरकारचं यावर ‘दुरून’च नियंत्रण आहे, पण ते सांगण्यापुरतं वा नावापुरतंच आहे.
मलालाची शाळा, शाळेतील तिची खास मैत्रीण मोनिबा, मलालाच्या आवडत्या शिक्षिका मरयम अन् स्वातची शांतता हे सर्व मलालापासून लवकरच हिरावून घेतलं जाणार याची लहान मलालाला कल्पना नाही. अखेर स्वातच्या खोऱ्यात तालिबान्यांचा वावर दिसू लागतो. धार्मिक मूलतत्त्ववादाच्या कचाटय़ात सापडलेल्या पाकिस्तानसाठी हे नवीन आव्हान उभं राहतं. उजवा पाय पोलिओग्रस्त असलेला मुल्ला फझलुल्लाह हा त्यांचा म्होरक्या. स्वातमध्ये तो अनधिकृत एफएम रेडिओ केंद्र स्थापन करतो व त्यावरून जहाल भाषणं करू लागतो. थोडय़ाच काळात ‘रेडिओ मुल्ला’ या नावानं ओळखला जाऊ लागतो. या रेडिओ मुल्लावर या आत्मकथनात एक स्वतंत्र प्रकरण आहे. यानंच पहिल्यांदा स्वात खोऱ्यातील मुलींच्या शाळेवर बॉम्बहल्ले करायला सुरुवात केली. पुढे यानंच मलालाच्या हत्येची ‘सुपारी’ दिली.
मलालाचा टी.व्ही, त्यावरील तिचे आवडते बॉलीवूडचे कार्यक्रम बंदीच्या वावटळीत सापडतात. पण शेवटी तिच्या शाळेवरच बंदीची वेळ येते, त्या वेळी मात्र ती गप्प बसत नाही. ‘स्वात’मधील वास्तव परिस्थिती बाहेरील जगाला कळावी म्हणून अखेर मलाला वडिलांच्या पत्रकार मित्राच्या मदतीनं ‘गुल मकाई’ या टोपणनावानं बीबीसी उर्दूच्या संकेतस्थळासाठी लिखाण करू लागते. परंतु शेवटी ‘शाळा’ बंद पडतेच, पण लष्करी कारवाईमुळे ‘स्वात’पण मलाला व तिच्या कुटुंबाला सोडावं लागतं. तीन महिने मायदेशातच ‘देशांतर्गत निर्वासित’ म्हणून राहण्याची वेळ येते. स्वात तालिबानमुक्त केल्याची घोषणा लष्करानं केल्यानंतर तीन महिन्यांनंतर मलाला परतते, तेव्हा ती ‘रक्ताळलेले’ स्वात पहिल्यांदाच पाहते.
‘थांबणं’ मलालाला पटत नाही. स्वातमध्ये परतल्यानंतर ‘शाळा’ पुन्हा सुरू होते. मलालाच्या जन्माआगोदर तिच्या वडिलांनी एक छोटी भाडय़ाची इमारत, सहा शिक्षक व जवळपास शंभर मुलांना घेऊन सुरू केलेल्या शाळेचा विस्तार आता तीन इमारती, हजार मुलं-मुली, सत्तर शिक्षक-शिक्षिकांपर्यंत विस्तारतो. साहजिकच पुन्हा डोके वर काढू पाहणाऱ्या पाकिस्तानी तालिबान्यांकडून मलालाच्या वडिलांना धमक्या येऊ लागतात. ‘मुलींना शिक्षण देणं थांबवा!’ पण मलालाला ते ‘लक्ष्य’ करतील असं वडिलांना मात्र वाटत नाही.
मलाला, तिचे वडील, तिची आई या तिघांचाही ‘इस्लामवर गाढ विश्वास’ आहे. आपण जे काम करतोय ते इस्लामच्या विरोधात नाही यावर मलाला व तिचे वडील ठाम आहेत.
या आत्मकथनातला वाचनीय भाग म्हणजे ९११ नंतरचं मलालाचं आयुष्य.. स्वात ते बर्मिगहॅम रुग्णालयापर्यंतचा तिचा प्रवास.. या सगळ्यात एक ‘नाटय़’ आहे. म्हणूनच ते अधिक उत्कंठावर्धक आहे.
आय अ‍ॅम मलाला : मलाला युसुफझाई
प्रकाशक : वेडेनफेल्ड अँड निकोलसन
पाने : २७६, किंमत : ३९९ रुपये.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Story img Loader