जागतिकीकरण ही संकल्पनादेखील जन्माला आलेली नव्हती, त्या ब्रिटिशचलित भारतात जन्माला येऊन ज्यांनी भारताचा झेंडा सातासमुद्रापार लावला अशा महानुभावांत योगगुरू बीकेएस अय्यंगार होते. ऋषी पतंजली यांनी घालून दिलेल्या योगिक यमनियमांचे ते कडवे अनुयायी होते. अलीकडच्या काळातील गर्भसंस्कारादी छाछुगिरीस त्यांचा सक्त विरोध होता. त्यामुळे देहावर प्रेम करण्यास शिकवणारा हा योगगुरू कधीच कंटाळवाणा ठरला नाही.
ही गोष्ट १९५१ सालची. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्हायोलिनवादक यहुदी मेन्युहिन विविध व्याधींनी जर्जर होते. व्हायोलिनसारख्या वाद्याच्या सतत वादनाने त्यांचे खांदे दुखत, दंडात वेदना होत असे आणि एकूणच बसणे-उठण्यासारख्या साध्या क्रिया करतानाही त्यांना त्रास होत असे. अस्थिव्यंगतज्ज्ञाकडून उपचार घेणे हाच एक मार्ग होता. त्यासाठी ते दवाखान्यात गेले आणि डॉक्टर व्यस्त असल्यामुळे दवाखान्यातील नियतकालिके चाळत बसले. त्यातील एक होते योगाविषयी. ते पाहून या कलाकाराची इच्छा चाळवली. आपल्या व्याधीवर योगासने हा उपचार असू शकतो असे त्यांच्या मनाने घेतले आणि तेव्हापासून योगगुरूचा त्यांचा शोध सुरू झाला. त्यानंतर तशी आसने वगैरे शिकवणारे बरेच जण त्यांना भेटले, परंतु ते सर्वच कुडमुडे होते. चोखंदळ मेन्युहिन यांना काही ते भावेनात. पुढच्या वर्षी त्यांचा भारत दौरा होता. या दौऱ्यात एका कार्यक्रमानंतर त्यांना भेटायला आलेल्यांत होते साक्षात पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. मेन्युहिन हे पंडितजींच्या आवडत्या कलाकारांपैकी एक. आगतस्वागत झाल्यावर मेन्युहिन यांनी आपली उत्तम योगगुरूच्या शोधाची कैफियत पंडितजींच्या कानी घातली. भारतीय पंतप्रधानास वाटले, पाश्चात्त्य देशांतील अनेकांना भारतीयांविषयी बरेच बेगडी आकर्षण असते आणि मेन्युहिन हे अशांपैकीच एक असावेत. तेव्हा त्यांच्या योगप्रेमाची परीक्षा घेण्याची उबळ पंडितजींना आली. त्यांनी या जगप्रसिद्ध कलाकारास आव्हान दिले ते शीर्षांसन करून दाखवण्याचे. नुसते आव्हानच देऊन ते थांबले नाहीत, तर स्वत: नेहरूंनी ते करून दाखवले. त्यांना वाटले मेन्युहिन यांना आश्चर्य वाटेल. परंतु त्याच क्षणी मेन्युहिन यांनीदेखील लगेच ते आसन करून दाखवले आणि आपले योगावरचे प्रेम किती सच्चे आहे, याची जाणीव पंडितजींना करून दिली. याच दौऱ्यात मग त्यांना योग्य भारतीय योगगुरू मिळेल अशी व्यवस्था पंडितजींनी केली. त्यानंतर काय घडले याचे वर्णन खुद्द मेन्युहिन यांनीच लिहून ठेवले आहे. आपल्या पहिल्याच भेटीत या आंतरराष्ट्रीय कलाकाराने अत्यंत अपरिचित अशा भारतीय योगगुरूस आपल्या व्याधींची कल्पना दिली आणि या शारीर, मानसिक ताणतणावांमुळे साध्या झोपेसदेखील आपण कसे पारखे झालो आहोत, याचे वर्णन केले. ते ऐकून तेथल्या तेथेच त्या योगगुरुजींनी काही आसने करायला लावली आणि ती करत असतानाच हा कलाकार निद्रेच्या सुखकारक प्रजासत्ताकात अलगद शिरला. ज्या गोष्टीस तो कित्येक महिने मोताद झाला होता ती झोप इतक्या सहजपणे प्राप्त झाल्याने मेन्युहिन हरखून गेले. त्यामुळे हा महान कलाकार आपल्या भारतीय योगगुरूचा प्रचारकच बनला. त्या भारतीय योगगुरूचे बेल्लुर कृष्णम्माचार सुंदरराज अय्यंगार यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. बीकेएस अय्यंगार या नावाने ते ओळखले जातात.
ज्या काळात जागतिकीकरण ही संकल्पनादेखील जन्माला आलेली नव्हती, त्या काळात, म्हणजे ब्रिटिशचलित भारतात जन्माला येऊन ज्या मंडळींनी भारताचा झेंडा सातासमुद्रापार लावला अशा महानुभावांत बीकेएस अय्यंगार मोडतात. सतारवादक पंडित रवीशंकर, पंडित भीमसेन जोशी, विलायतखाँ आदी अन्य नावेही या संदर्भात घेता येतील. अलीकडे जागतिकीकरण म्हणजे स्वत:चे सोडणे, असे थिल्लर मंडळींना वाटते. या सर्व मान्यवरांचे जगणे आणि वागणे या आणि अशा उथळ विचारधारेच्या बरोबर विरोधी होते. भारतीय तत्त्व पूर्ण पचवून जगाच्या मुशाफिरीस निघालेली ही मंडळी. त्यांचे स्वत्व, मातीशी असलेले इमान सच्चे होते आणि म्हणूनच त्यांचे आपापल्या क्षेत्रांतील जागतिकीकरण प्रामाणिक होते. भारतीय योगशास्त्राची पताका सर्व जगात पोहोचवण्याचे महत्कार्य बीकेएस अय्यंगार यांच्याकडून घडले. परंतु हे आपले आंतरराष्ट्रीयत्व बीकेएस यांनी कधीही मिरवले नाही. ज्या काळात किरकोळ यशास तोफखान्याची सलामी दिली जाते, त्या काळात बीकेएस यांचे यश मापणारी मोजपट्टी नाही. आज तब्बल ७२ देशांत अय्यगांर यांची योग प्रशिक्षण केंद्रे आहेत. जगभरातल्या प्रमुख १३ भाषांतून त्यांच्या योग मार्गदर्शक ग्रंथांचे अनुवाद झाले आहेत. नावाने अय्यंगार असले तरी बीकेएस यांचा जन्म कर्नाटकातील बेल्लुरचा. घरात मेहुण्याकडूनच त्यांना योगशास्त्राचे धडे मिळाले. मुंबई आणि पुण्यात त्यांच्या योगप्रशिक्षण कार्यास सुरुवात झाली. त्यामुळे असेल पण बीकेएस उत्तम मराठी बोलत. पुणे ही त्यांची कर्मभूमी होती. त्यांनी अखेरचा श्वास घेतला तोही पुण्यात. बीकेएस यांचा जगभरात संचार असे. गेल्याच वर्षी ते चीनच्या मोठय़ा दौऱ्यावर होते आणि बीजिंगमध्ये योग प्रशिक्षण केंद्रविस्तारासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. अय्यंगार यांच्यामुळे परदेशात योग पद्धती चांगलीच लोकप्रिय झाली. परंतु योगासनांच्या बाबा रामदेवी सुलभीकरणास आणि फुकाच्या लोकप्रियीकरणास बीकेएस यांचा विरोध होता. याचे कारण ते स्वत: पतंजली याने घालून दिलेल्या योगिक यमनियमांचे कडवे अनुयायी होते. ऋषी पतंजलीने जे काही सांगून ठेवले आहे, त्याच्या पलीकडे जाण्याची काही गरज नाही, असे ते मानत. त्यामुळे अलीकडच्या काळात विशिष्ट तापमानातील योगासने वगैरे छाछुगिरीस त्यांचा सक्त विरोध होता. गर्भसंस्कार वगैरे भारदस्त नावांनी अनेकांच्या हातचलाख्या अलीकडे जोरात आहेत. तशी कोणतीही उटपटांगगिरी कधी बीकेएस यांनी केली नाही. त्यामुळे ते शेवटपर्यंत आदरणीयच राहिले. बीकेएस यांनी योगप्रसाराच्या कार्यात स्वत:ला झोकून दिल्यानंतर पुढे अष्टांग, हठ, तांत्रिक वा अन्य आदी योग पद्धतींची फॅशन आली. परंतु बीकेएस यांची पतंजल निष्ठा कधीही ढळली नाही. याचा अर्थ ते पोथीनिष्ठ होते असा अर्थातच नाही. योगासनांत विविध आयुधांचा वापर बीकेएस यांनी सर्रास सुरू केला. महत्त्व आहे ते योगासनांना, त्यांच्या साहय़ाने तंदुरुस्त राहण्याला, याची जाणीव कायम त्यांना होती. त्याचमुळे अगदी खुर्ची, स्टुल आदी साधनांचा देखील कशा पद्धतीने उपयोग करून घेता येईल हे त्यांनी दाखवून दिले होते.
या आधुनिक दृष्टिकोनामुळे आणि सतत नवनव्याचा शोध घेण्याच्या वृत्तीमुळे अय्यंगार यांना अमाप प्रसिद्धी आणि चाहतेगण लाभले. अनेक आंतरराष्ट्रीय व्यक्ती त्यांच्या जवळच्या प्रभावळीत होत्या. त्यांच्याशी अय्यंगार यांचा वैयक्तिक स्नेह होता. अशांतील एक नाव म्हणजे बेल्जियमची महाराणी क्वीन एलिझाबेथ. वयाच्या ६५व्या वर्षी पक्षाघाताने ग्रासल्यावर राणीस उपचारांची गरज वाटली ती फक्त अय्यंगार यांच्या. त्यासाठी त्यांनी अय्यंगार यांना बोलावून घेतले. त्यांच्याकडून उपचार शिकून घेतले आणि काही महिन्यांनंतर हातपाय हलू लागल्यावर या राणीने स्वत:च्या हातांनी योगाचार्याचा अर्धपुतळा बनवून त्यांना भेट म्हणून पाठवून दिला. तो अय्यंगार यांच्या कार्यालयात असे आणि त्याची कहाणी ते अभिमानाने सांगत. याच राणीस वयाच्या ८५व्या वर्षी पुन्हा एकदा व्याधिग्रस्त झाल्यावर अय्यंगार यांच्याकडूनच उपचार हवे होते. वय लक्षात घेता त्या पूर्ण बऱ्या होणे शक्य नव्हते. पण अय्यंगार यांच्या उपचारांमुळे त्यांच्या वेदना तरी सुसह्य़ झाल्या. त्यानंतर अय्यंगार मायदेशी परतण्यासाठी निरोप घेण्यास गेल्यावर राणी एलिझाबेथ यांच्या मनात त्यांच्याविषयी कृतज्ञता दाटून आली आणि डोळ्यातील अश्रूंच्या मार्गे ती व्यक्त होऊ लागली असता त्या अय्यंगार यांना म्हणाल्या, आता काही पुन्हा मी गेल्या खेपेसारखा तुमचा पुतळा बनवू शकत नाही.. मी काही देऊ शकत नाही.. एवढे मात्र करू शकते. असे म्हणत त्यांनी आपला गाल अय्यंगार यांच्या समोर पुढे केला आणि त्यांना चुंबन देऊ केले. वयोवृद्ध राणीकडून मिळालेल्या दुसऱ्या बालपणातील या पारितोषिकाचे वर्णन अय्यंगार तितक्याच बालसुलभ कौतुकाने करीत.
कारण जगण्यावर त्यांचे प्रेम होते. योगवाली मंडळी एरव्ही खूप कंटाळवाणी असतात. वयस्कर होऊनही अय्यंगार असे कंटाळवाणे कधीच झाले नाहीत. आनंदी वृत्तीने जगा आणि राजवृत्तीने मरणास सामोरे जा, असे ते म्हणत. तसेच ते जगले आणि गेले. देह म्हणजे एक वाद्य आहे आणि चांगला कलाकार ज्या निगुतीने आपल्या वाद्याला जपतो, त्याच्यावर प्रेम करतो त्याप्रमाणे आपले आपल्या देहावर प्रेम हवे, असा त्यांचा उपदेश असे. त्या अर्थाने बीकेएस हे देहवाद्याचे उपासक होते. ‘लोकसत्ता परिवारा’तर्फे त्यांना श्रद्धांजली.
देहवाद्याचा उपासक
जागतिकीकरण ही संकल्पनादेखील जन्माला आलेली नव्हती, त्या ब्रिटिशचलित भारतात जन्माला येऊन ज्यांनी भारताचा झेंडा सातासमुद्रापार लावला अशा महानुभावांत योगगुरू बीकेएस अय्यंगार होते.
आणखी वाचा
First published on: 21-08-2014 at 12:33 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yoga legend bks iyengar