वास्तविक क्रिकेट म्हणजे ब्रिटिशांचा खेळ, पण सचिनने आपल्या सातत्यपूर्ण दमदार खेळीने क्रिकेटचा चेहरा बदलून भारतीय क्रिकेटला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक उंची मिळवून दिली आणि बघता बघता सचिन आणि क्रिकेट हे जणू एक समीकरणच बनले. तो वर्षांनुवष्रे क्रिकेटचा आनंद उपभोगत राहिला आणि आपल्या प्रत्येक खेळीतून चाहत्यांना आठवणींचा ठेवा देऊन गेला. खरे तर मला क्रिकेट खेळायला फारसं जमत नाही, परंतु क्रिकेट खेळण्यापेक्षा क्रिकेट जगणं काय असते हे मी सचिनकडून शिकलो. आपल्या खिलाडूवृत्तीने त्याने देशाची खूप सेवा केली. लाखो-करोडो भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे बाळगत त्याखाली दडपून न जाता तमाम देशवासीयांच्या मनात त्याने आनंदाचे मळे फुलवून आपली कारकीर्द सार्थकी ठरवली. वानखेडेवर सर्व चाहत्यांचे अभिवादन स्वीकारून निरोप देताना सचिनने जे काही भावुक मनोगत व्यक्त केले ते अगदी काळजाला भिडले आणि डोळ्यांच्या कडा पाणावल्या. सचिनने आयुष्याच्या जडणघडणीत प्रत्येक वळणावर साथ देणाऱ्या सर्वाचे व्यक्तिश: आभार मानले. त्याचे ते भाषण बरेच काही सांगून गेले. बालपणातले संस्कार त्याला आजवर मिळालेल्या यशापेक्षा किती अनमोल आहेत याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. सचिन महान खेळाडूपेक्षाही माणसातील माणुसकी जपणारा देवमाणूस आहे. यश, वैभव तसेच प्रसिद्धी पायघडय़ा घालून तयार असताना हुरळून न जाता तो चाहत्यांशी किती नम्रपणे आदराने कृतज्ञ होऊन संवाद साधतो हे विशेष लक्षवेधी आहे. अगदी निर्मळ आणि निष्कलंकपणे त्याने व्यावसयिक व व्यक्तिगत आयुष्याची सांगड घातली. सचिनच्या खेळाची मोहिनी एवढी की, देशातील मानाच्या पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, खेलरत्न, महाराष्ट्रभूषण पुरस्कारांनीही त्याला गवसणी घातली. एवढंच नाही तर त्याच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारनेही ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराच्या पात्रतेच्या नियमात बदल करून सचिनला पुरस्कार जाहीर केला. सचिन क्रिकेटच्या ध्यासातून निवृत्त झाला तरी आमच्या श्वासातून निवृत्त होणार नाही. खरेच आम्हास अभिमान आहे, तू मराठीचा झेंडा घेऊन जग पादाक्रांत केल्याचा. सचिन, तू अगदी प्रामाणिक आणि नि:स्वार्थीपणे खेळाचा आनंद लुटलास व आपल्या वागणुकीतून जगासमोर एक आदर्श निर्माण केलास. सर्वाच्या हृदयात स्थान मिळवण्यासाठी या आपल्या मराठमोळ्या मावळ्याने घेतलेल्या कठोर मेहनतीला, जिद्दीला तसेच वेळोवेळी केलेल्या त्यागाला मानाचा मुजरा..

इतिहास, भूगोल आणि मोदी
अभिनिवेशाने बोलण्याच्या भरात सहज टाळता येण्याजोग्या चुकांचे माप विरोधकांनी पदरात टाकल्यामुळे खवळून गेलेल्या मोदींनी त्यांच्या शैलीनुसार मुद्दय़ांची सरमिसळ करून आपल्या विद्वेषविषय काँग्रेसवर बाजी उलटवण्याच्या प्रयत्न केला आहे. कारण ‘भूगोल बदलणे’ आणि ऐतिहासिक स्थळांच्या स्थानात गफलत करणे यात फरक आहे हे ते जाणत नाहीत असे नाही.
त्या काळातील बहुसंख्य जनतेचा आवाज व प्रतिनिधी म्हणून काँग्रेसने फाळणी स्वीकारली हे खरे. कारण जातीय तेढ मर्यादेबाहेर चालली होती व स्वातंत्र्य लांबणीवर पडत होते. पण फाळणी रोखण्यासाठी भाजपच्या आधीचे हिंदुत्व व अखंड भारताचे पुरस्कर्ते हिंदू महासभावाले व मोदींची पितृसंघटना रा. स्व. संघ यांनी नेमके काय केले? केवळ गांधीजी आणि काँग्रेसवर जहरी टीका करण्यातच त्यांनी धन्यता मानली हा इतिहास आहे.
भारतीय उपखंडाचा इतिहास व राजकीय नकाशा (भूगोल) बदलला तो इंदिरा गांधी यांनी. बांगलादेशची निर्मिती आणि सिक्कीम भारतीय संघराज्यात आणून. हे खरे इतिहास व भूगोल बदलले – ते मोदींना आठवत नाही हे दुर्दैव.
मोदी व त्यांचा कंपू यांना ‘जुन्या इतिहासाचे’ पुनर्लेखन करण्यातच रस आहे, उदात्तीकरणात रस आहे. नवा इतिहास घडवणे त्यांच्या कुवतीबाहेरचे आहे. जनतेची दिशाभूल व न केलेल्याचे श्रेय उपटण्याखेरीज ते दुसरे काही करू शकत नाहीत.
श्रीधर शुक्ल, ठाणे.

फाडलेल्या गुणपत्रिकेतून घ्यावयाचा बोध
‘शिक्षणाला नापास करणारी गुणपत्रिका’ या बातमीवरील (१४ नोव्हें.) ‘गुणपत्रिका फाडण्याचे कौतुक नको’ ही प्रतिक्रिया (लोकमानस, १६ नोव्हें.) वाचून लक्षात आले की, मूळ बातमीकडे तारतम्याने पाहिलेले दिसत नाही किंवा सचिनचे होणारे प्रत्येक कौतुक, बातमी अवाजवी वाटते. आपल्या देशात नापास होणारे कित्येक विद्यार्थी आहेत, जे यांसारख्या निकालांनी आपले जीवन संपवून टाकतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी हा फाटका तुकडा नक्कीच उभारी देणारा आहे. सगळेच सचिन नाही होऊ शकत, पण जीवनात आपल्या आवडीच्या क्षेत्रात नक्कीच चांगली कामगिरी करू शकतील. त्याच्यापासून क्रिकेटच घ्यावे असे नाही. चिकाटी, अविश्वसनीय अशी निष्ठा आणि अफाट प्रयत्न करण्याची तयारी हे सगळे गुण घेण्यासारखे आहेत. ते सगळीकडे उपयोगी पाडण्यासाठी आहेत, मग ते शिक्षण क्षेत्र असो वा इतर कोणतेही. लोकांमध्ये यातले एक एक गुण खूप मुश्किलीने मिळतात, तिथे या एका माणसात एकवटलेले दिसतात हे अलौकिक असेच आहे.
अमरेंद्र जोशी

आदरार्थी संबोधूया
भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळणे हे ब्रिटिश परंपरेनुसार क्रिकेटविश्वात दिलेल्या सर या बहुमानाप्रमाणेच मोठे समजून यापुढे आपण हा सन्मान मिळालेल्या श्री. सचिन तेंडुलकर यांचा उल्लेख अधिक सन्मानपूर्वक करणे शिकले पाहिजे. ही व्यक्ती कितीही प्रिय असली तरी तिचा उल्लेख योग्य प्रकारे केला तरच या मिळालेल्या सन्मानाचा आदर राखला जाईल. अगदी या क्षणापासून सर्व प्रसारमाध्यमांनी भारतरत्नप्राप्त या व्यक्तीचा उल्लेख लिहिताना आणि बोलताना एकेरी न करता बहुवचनी शब्दांनी आदरपूर्वक करावा.
मुकुंद नवरे, गोरेगाव पूर्व, मुंबई</strong>

ही चिखलफेक का?
सर डॉन ब्रॅडमन ‘फेअरवेल टू क्रिकेट’ या आत्मचरित्रात म्हणतात, ‘कप्तानाला पुढे काय घडेल हे माहीत होण्यापूर्वी निर्णय घ्यावे लागतात. टीकाकार मात्र घटितांवर आपली टीका बेततात; त्यामुळे त्यांना बहुधा काही धोका पत्करावा लागत नाही.’ हे विधान वेदवाक्यासारखे टीकाकारांनी उराशी बाळगले पाहिजे, पण वि. वि. करमरकरांनी हे पुस्तक वाचले नसावे. तसेच ‘क्रिकेट हा अलौकिक अनिश्चिततेचा खेळ आहे’ हेही त्यांना माहीत नसावे; अन्यथा द्रविडने सचिनला द्विशतक पुरे करण्यासाठी आणखी २ षटके द्यायला हवी होती, असे ते म्हणाले नसते. (सचिनने भारतीय क्रिकेटला काय दिले?.१६ नोव्हें.) या २ षटकांत सचिन बाद झाला असता तर? किंवा द्विशतक पुरे झाले नसते तर? पण ही चर्चा निर्थक आहे.  द्रविडने डाव घोषित केल्यामुळे असे कोणते आकाश कोसळले? भारताने सामना तर जिंकला व तेच महत्त्वाचे, अगदी सचिनसाठीही! सचिनचे एक द्विशतक कमी झाल्याने त्याच्या कीर्तीला बट्टा लागला का?  द्रविड व गांगुलीवर चिखलफेक करून आपण सचिनच्या कीर्तीत भर घालीत आहो, असे करमरकरांना वाटते की काय?
सुहास सहस्रबुद्धे, पुणे</strong>

नांदेड येथील सुरेंद्र वेळकोणीकर यांनी चित्रातून पाठविलेली प्रतिक्रिया.