‘सामान्यत: मुसलमानांनी पाश्चात्त्य शिक्षणास नकार दिला व गतराज्याचे पुनरुत्थान करण्याच्या दिवास्वप्नात ते रंगून गेले.. हिंदूू मात्र शिक्षणात व नोक ऱ्यांत त्यांच्या किती तरी पुढे निघून गेले.’ आधुनिकतेला, नवसंस्कृतीला होकार वा नकार देण्याची कारणे इतिहासातही शोधता येतात..
बंगालचा नवाब सिराजुदौल्ला याच्यावर ब्रिटिशांनी १७५७ मध्ये झालेल्या प्लासीच्या लढाईत मिळवलेला विजय हा भारतातील ब्रिटिश राज्यस्थापनेचा शिलान्यास मानला जातो. या लढाईत हिंदूंनी ब्रिटिशांना मदत केली होती. अनेक इतिहासकारांनी यास ‘ब्रिटिश-हिंदू युती’ म्हटले आहे.
अशा प्रकारे बंगाल ब्रिटिशांच्या अमलात गेला नि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्याचा ऱ्हास सुरू होऊन १७३७ पासून दिल्लीवर मराठय़ांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. या ऱ्हासाची कारणे शोधून त्यावर उपाय सांगणारा एक महान धर्मपंडित व विचारवंत त्या काळात उदयास आला. त्यांचे नाव शाह वलीउल्लाह (मृ.१७६२). ‘दक्षिण आशियात उदयाला आलेले सर्वश्रेष्ठ धर्मपंडित’ असा त्यांचा सार्थ गौरव केला जातो. अनेक संस्था, संघटना व नेते त्यांच्या विचार प्रेरणेतूनच निर्माण झाले. राष्ट्रवादी देवबंद धर्मविद्यापीठ तर त्यांच्या विचारांतूनच निर्माण झाले, परंतु अलीगडच्या इंग्रजी-शिक्षित मुस्लीम नेत्यांवरही त्यांचा प्रभाव कमी नव्हता. त्यास भारतातील ‘वहाबी चळवळ’ असे चुकीने म्हटले जाते. ती वस्तुत: त्यांच्या विचारांतून निर्माण झालेली ‘वलिउल्लाही चळवळ’ होय. वहाबी चळवळ ही अरेबियातील मुहंमद अब्दुल वहाब (मृ.१७८७) यांनी सुरू केलेली चळवळ होय. अरेबियातील विशुद्ध इस्लाम न पाळणाऱ्या मुस्लिमांविरुद्धची ती चळवळ होती. तेथे कोणीही बिगर-मुस्लीम नव्हते. वलिउल्लाही चळवळ हिंदूंच्या सान्निध्यामुळे मुस्लीम समाजात शिरलेल्या गैर-इस्लामी प्रथा व चालीरीतींविरुद्ध होती. मुस्लिमांचे सामथ्र्य विशुद्ध इस्लाम पाळण्यावर अवलंबून असते व त्यापासून ते दूर गेल्यामुळे त्यांचे राजकीय प्रभुत्व कमी झाले, अशी त्यांची कारणमीमांसा होती. त्यांनी वहाबसारखी कडवी भूमिका घेतली नव्हती. हिंदूंसोबतच्या सहजीवनास त्यांची मान्यता होती.हिंदूंसोबतच्या सहजीवनास त्यांची मान्यता होती.
त्यांनी शरियतच्या प्रमुख चार प्रणालींचा समन्वय घडवून आणला होता. ते नक्षबंदी सूफी विचारांचे असले, तरी त्यांनी प्रमुख चारही सूफी पंथांचा समन्वय घडवून आणला होता. सूफी पंथाचा स्वीकार करताना चारही पंथांच्या प्रमुख संतांची नावे घेण्याची प्रथा त्यांनी सुरू केली होती. सुन्नी व शिया यांच्यातही त्यांनी सलोखा घडवून आणला होता. तेव्हा वलिउल्लाही चळवळ म्हणजे वहाबी चळवळ नव्हे. भारतात कधीही वहाबी चळवळ सुरू झाली नाही. शाह वलिउल्लाह यांचा एवढा प्रभाव पडलेला आहे, की त्यांच्या विचारांचा व कार्याचा अभ्यास केल्याशिवाय ब्रिटिश, हिंदू व मुसलमान यांच्यातील परस्पर संबंधाचा इतिहास नीट समजणार नाही.
त्यांचे मुख्य ध्येय मुस्लिमांचे राजकीय प्रभुत्व कायम ठेवणे हे होते. मराठय़ांच्या वाढत्या प्रभावामुळे ते दु:खी झाले होते. यासाठी त्यांनी अहमदशाह अब्दालीला पत्र पाठविले होते, की ‘येथे मराठय़ांचे राज्य उदयास आले आहे.. त्या आक्रमकांनी संपूर्ण भारत आपल्या प्रभावाखाली आणला आहे.. दिल्लीचा बादशाह त्यांच्या हातातील बाहुले बनला आहे.. आता तुमचे अनिवार्य कर्तव्य आहे, की तुम्ही भारतावर चालून यावे व मराठा सत्तेचा अंत करून असाहाय्य मुसलमानांची मुक्तता करावी.’ त्यानुसार पानिपतची लढाई (१७६१) झाली. अब्दालीला जय मिळाला. पण त्याला मोगलांचे साम्राज्य काही पुन्हा उभे करता आले नाही. पुढच्याच वर्षी शाह इहलोक सोडून गेले. पानिपतचा परिणाम मराठय़ांची ताकद कमी होण्यात व ब्रिटिशांचा प्रभाव वाढण्यात झाला. क्रमाने ब्रिटिशांचे वर्चस्व वाढत गेले व १८०३ मध्ये मराठय़ांचा पराभव करून त्यांनी दिल्ली जिंकून घेतली. मोगल बादशाह आता मराठय़ांऐवजी ब्रिटिशांच्या अंकित आला. त्यानंतर १५ वर्षांनी ब्रिटिशांनी पुण्याजवळ पेशवांचा पराभव करून पेशवाई बुडविली. आता मुसलमानांचे खरे प्रतिस्पर्धी ब्रिटिश बनले होते.
मराठय़ांच्या राज्यापेक्षा ब्रिटिशांचे राज्य मुसलमानांसाठी अधिक हानिकारक ठरणार, हे बंगालमधील राज्यकारभारावरून स्पष्ट झाले होते. मराठय़ांनी राजकीय वर्चस्व स्थापन केले असले, तरी त्याचा मुसलमानांच्या धार्मिक, सामाजिक व एकूण सांस्कृतिक जीवनावर परिणाम झालेला नव्हता. ते मुस्लीम राज्याचे प्रदेश जिंकून घेत, तेथील प्रमुखांकडून खंडणी, चौथाई वगैरे आर्थिक लाभ मिळवीत; त्यांच्याकडून शरणागती स्वीकारीत व निघून जात. तेथे पूर्वीचेच कायदे वगैरे राहू देत. यामुळे मुस्लीम समाजाच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनावर परिणाम होत नसे. मात्र ब्रिटिशांचे तसे नव्हते. ते जिंकलेल्या प्रदेशात ब्रिटिश पद्धतीची राज्यव्यवस्था लावून देत. याचा परिणाम हिंदू व मुसलमानांच्या केवळ राजकीय व आर्थिकच नव्हे तर सामाजिक व सांस्कृतिक जीवनावर होत असे. दुसऱ्या भाषेत सांगायचे म्हणजे त्यांनी येथे आपली आधुनिक पाश्चात्त्य संस्कृती आणली होती. त्यांचे राजकीय वर्चस्व हे पाश्चात्त्य संस्कृतीचे वर्चस्व ठरणार होते. हिंदू व मुसलमान दोघांकरिताही ती नवीन होती. त्यांना आपापल्या संस्कृतींचा अभिमान होता. परंतु, त्या दोन्ही समाजांकडून मिळालेला प्रतिसाद मात्र सर्वस्वी भिन्न होता.
ब्रिटिशांनी दिल्लीवर विजय मिळविला, त्याच वर्षी (१८०३) वलिउल्लाही चळवळीचे नेते व शाह वलिउल्लाह यांचे पुत्र शाह अब्दुल अझीज (मृ.१८२४) यांनी ‘दक्षिण आशियाच्या मुस्लीम इतिहासातील सर्वात महत्त्वाचा व युगप्रवर्तक’ मानला गेलेला धर्मादेश घोषित केला. त्यानुसार ब्रिटिश अमलाखालील भारत मुस्लीम कायद्यानुसार चालत नसल्यामुळे ‘दार-उल-इसलाम’ राहिला नसून ‘दार-उल-हरब’ (शत्रुभूमी) झाला असल्याचे घोषित करण्यात आले. नंतर १९४७ पर्यंत या धर्मादेशाची सतत चर्चा होत राहिली.
मात्र याउलट हिंदूंची भूमिका ब्रिटिश राज्याचे आनंदाने स्वागत करणारी होती. इतिहासकार रमेशचंद्र मजुमदार यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘बंगालमधील हिंदूंनी ब्रिटिश राज्याची स्थापना हे अत्याचारी मुस्लीम राज्यापासूनच्या मुक्तीचे ईश्वरी वरदान मानले. असे जाहीरपणे म्हणणाऱ्यांत राजा राममोहन राय, द्वारकानाथ टागोर.. प्रभृतीचा समावेश होता.’ महाराष्ट्रातील समाजसुधारकही ब्रिटिश राज्याला ईश्वरी वरदान मानत होते. बाळशास्त्री जांभेकर यांनी १९३२ साली लिहिले होते, ‘बंगाल प्रांत इंग्रजांचे हाती जाऊन ६०-७० वर्षे झाली. परंतु, इतक्यातच त्या देशाचे स्थितीत जे अंतर पडले, ते पाहिले असता विस्मय होतो.. तेथील लोकांस युरोप खंडातील विद्या आणि कलांचे विशेष ज्ञान होत आहे.. जो अज्ञानांधकार फार दिवसपर्यंत या देशास व्यापून होता, तो जाण्यास प्रारंभ झाला आहे.’
१८४९-५० या काळात लोकहितवादींनी लिहिले होते, ‘हिंदू लोकांमध्ये मूर्खपणा वाढला, तो दूर होण्याकरिताच हे (इंग्रज) गुरू दूर देशातून इकडे ईश्वराने पाठविले आहेत.. त्यांच्या राज्यामुळे हिंदू लोकांत जागृती जहाली व पृथ्वीवर काय काय आहे हे कळू लागले.. सरकारने विद्या वाढवून या लोकांस शहाणे करावे.’ तसेच, ‘यास्तव सुज्ञांनी इंग्रज जाण्याची इच्छा कदापि करू नये. याप्रमाणे सरकार व चांगले सुधारलेले लोक हिंदू लोकांस सोबतीस कदापि मिळणार नाहीत.. जेव्हा हिंदू लोकांचा मूर्खपणा जाईल, तेव्हा ईश्वर इंग्रजास या देशातून जाण्याची आज्ञा करील.’
ब्रिटिश राज्यास हिंदू व मुसलमानांचा असलेला परस्परविरोधी प्रतिसाद हा पाश्चात्त्य संस्कृतीकडे पाहाण्याच्या त्यांच्या भिन्न दृष्टिकोनांतून निर्माण झाला होता. त्याच कारणास्तव १८५७ पर्यंत हिंदू ब्रिटिशांचे मित्र तर मुसलमान कडवे विरोधक बनले होते.
या परस्परविरोधी प्रतिसादाविषयी इतिहासकारांनी भरपूर लिहून ठेवले आहे. जामिया मिलिया विद्यापीठाचे प्रा. मुजीब अश्राफ यांनी लिहिले आहे, की ‘ब्रिटिश राज्याविरुद्ध होण्याचे हिंदूंना काहीच कारण नव्हते, परंतु मुसलमानांना ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक व मानसिक अशी अनेक कारणे होती.’ ब्रिटिश सरकारने नवी शिक्षणपद्धती आणली. मोगल काळापासून राज्यकारभाराची व शिक्षणाची असलेली पर्शियन वा उर्दू भाषा बदलून इंग्रजी भाषा आणली (१८३७). त्या शिक्षणाचे व भाषेचे हिंदूंनी स्वागत केले, तर त्यावर मुसलमानांनी बहिष्कार टाकला. हे मुसलमानांसाठी अतिशय घातक ठरले.
डॉ. एम. टी. टायटस यांनी लिहिले आहे, ‘मौलवींचे ऐकून मुसलमानांनी भरभराटीस येत असलेल्या (विविध) पाश्चात्त्य संस्थांवर बहिष्कार टाकला.. आवेशपूर्ण भाषेत परंपरावादी मौलवींनी अशा काफिरांच्या (शिक्षण) संस्थांवर टीकेचा भडिमार केला.. त्यांना गंभीर ताकीद दिली, की अशा शाळांत जाणाऱ्यांना व जाऊ देणाऱ्या पालकांना इस्लाम त्यागी मानले जाईल.. हिंदूंनी मात्र नव्या शिक्षणाचा लाभ उठविला व शासनाशी जुळवून घेतले.’ पं. नेहरूंच्या भाषेत सांगायचे, तर ‘सामान्यत: मुसलमानांनी पाश्चात्त्य शिक्षणास नकार दिला व गतराज्याचे पुनरुत्थान करण्यात दिवास्वप्नात ते रंगून गेले.. हिंदूू मात्र शिक्षणात व नोक ऱ्यांत त्याच्या किती तरी पुढे निघून गेले.’
अशा प्रकारे आर्थिक वगैरे सर्वच क्षेत्रांत मुसलमान मागे पडले. त्यांच्याकरिता ब्रिटिश राज्य शाप तर हिंदूंकरिता वरदान ठरले होते. ब्रिटिश राज्यामुळे भारतात हिंदू, इस्लामी व पाश्चात्त्य या तीन संस्कृतींच्या परस्परसंबंधाचा प्रश्न निर्माण झाला. हिंदू व इस्लामी संस्कृतींच्या प्रवाहाच्या काही धारा परस्परात मिसळल्या असल्या, तरी मुख्य प्रवाह स्वतंत्र व समांतर वाहत आला होता. आता त्यांच्यासमोर पाश्चात्त्य संस्कृतीचे आव्हान उभे ठाकले. त्यांना अज्ञात असणाऱ्या राष्ट्रवाद व सेक्युलॅरिझम या पाश्चात्त्य संस्कृतीतील प्रबल आधुनिक विचारशक्तींना त्यांचा प्रतिसाद कसा राहील, यावरून भारताचा पुढील इतिहास घडणार होता.
लेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत.