अर्जुनदेव अंत:करणाने मृदू, श्रद्धामय संत होते. पण परिस्थितीनं त्यांना कणखर, लढाऊ आणि निडर बनविलं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ते उभय विशेष शीख संप्रदायाचेही विशेष ठरले आणि भारतीय भक्तिपरंपरेत त्या संप्रदायाचं ते वेगळेपण अखंड उमटून राहिलं.

भक्तिसंप्रदायांचा इतिहास हा सर्व काळ, सर्व प्रांतांत प्रेमानं आणि शांतीनं भरलेला इतिहास नाही. तो अनेकदा, अनेक प्रदेशांत उग्र संघर्षांचा, लढायांचा, रक्तलांच्छित इतिहास आहे. शीख संतांनी तर शांतीच्या संदेशाला शिरोधार्य करण्यासाठी अनेक वेळा तलवार हाती धरली आहे.
भारतात शक, हूण, अफगाण, मोगल आक्रमक आले ते उत्तरेकडून, पंजाबच्या भूमीतून खाली उतरले. पंचनद्यांच्या दुआबाचा तो समृद्ध, सजल-सुफल प्रदेश परकीयांच्या अत्याचारांनी वारंवार चिरडला आहे आणि या प्रदेशाची संपन्न, सुखी शांतता पुन्हा परत आणण्यासाठी शीख गुरूंनी वारंवार अशांतीचा, अराजकाचा, आक्रमणांचा सामना केला आहे.
गुरू अर्जुनदेव हे याच संतमालिकेतलं एक प्रातिनिधिक नाव आहे. गुरू नानकांनंतर गादीवर आले ते गुरू अंगद आणि नंतर अमरदास. अमरदासांचा नातू आणि गुरू रामदासांचा धाकटा मुलगा अर्जुनदेव. शिखांचे ते पाचवे गुरू. सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात गोईंदवाल नावाच्या गावी अर्जुनदेवांचा जन्म झाला आणि लाहोरमध्ये सतराव्या शतकाच्या अगदी प्रारंभीच त्यांचा मृत्यू झाला. अवघं त्रेचाळीस वर्षांचं आणि तेही अत्यंत संघर्षमय आयुष्य त्यांना मिळालं.
असं सांगितलं जातं की, अर्जुनदेवांच्या आईनं – बीबी भानीनं आपले पती – शिखांचे चौथे गुरू रामदास यांच्याजवळ एक वर मागितला होता. संप्रदायाचं गुरुपद आपल्याच घराण्याकडे अखंड राहावं, असा वर. त्यावर रामदासांनी तिला म्हटलं होतं की गुरुपद राहील; पण त्यामुळे आपल्या वंशजांना मात्र पुढे अखंड यातना सोसाव्या लागतील. आपल्या मुलाला गुरूच्या गादीवर बसलेलं बीबी भानीनं पाहिलं असेल, आनंदानं पाहिलं असेल, अभिमानानं पाहिलं असेल पण अर्जुनदेवांपासूनच गुरू रामदासांचे शब्दही खरे ठरत गेल्याचं इतिहासानं निर्मम कठोरपणे दाखवलं आहे.
अर्जुनदेव हा रामदासांचा धाकटा मुलगा होता. त्याला उत्तराधिकारी म्हणून मान्यता मिळाल्याचा राग पृथीचंद आणि महादेव या त्याच्या वडीलभावांना आला. विशेषत: पृथीचंदानं अर्जुनदेवांना आयुष्याच्या अखेपर्यंत सतत त्रास दिला. जोडीला चंदूशाह नावाच्या आणखी एका द्वेष्टय़ाची भर पडली. व्यक्तिगत कारणाने अर्जुनदेवांचा द्वेष करणाऱ्या चंदूशाहने अकबर आणि जहांगीर या दोघांनाही अर्जुनदेवांविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न केला.
अकबर उदार धर्मकारणी असल्यामुळे अर्जुनदेवांना त्यानं धक्का लावला नाही. मात्र जहांगीरनं त्यांना इस्लामविरोधक ठरवून गुरू ग्रंथसाहिबातली इस्लामविषयक वचनं वगळण्याची सूचना केली. अर्जुनदेवांनी ती मागणी साहजिकच अमान्य केली. कारण ग्रंथसाहिबात असा कोणताही गैरमजकूर नव्हताच. मग सुरू झाला त्यांचा अतोनात छळ. जहांगीरच्या आज्ञेनं अर्जुनदेवांना तुरुंगात टाकण्यात आलं. त्यांच्यावर भयंकर अत्याचार केले गेले. पाच दिवसांच्या नरकयातना सोसल्यानंतर रावी नदीत स्नानासाठी अर्जुनदेवांना आणण्यात आलं आणि तिथेच या महान गुरूनं देहत्याग केला.
फुटो अंडा भरमका
मनहि भइउ परगासु।
काटी बेडी पगह ते
गुरि कीता बंदि खलासु।।

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
cultural and educational rights under indian constitution article 29 and 30
संविधानभान : भाषेचा मायाळू विसावा
two kerala ias officers suspended over hindu muslim whatsapp group
अन्वयार्थ : ‘कर्त्यां’चा बेभानपणा!
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”

कोष भ्रमाचा फुटला
मनभर प्रकाश झाला
बेडी होती पायी
ती तुटली लवलाही
कृपा गुरुची झाली
बंधनमुक्ति मिळाली
त्यांच्या मुखी शेवटीही असे उजेडाचे शब्द होते. एखाद्या थोर हुतात्म्याला साजेसे, करुणोदात्त रीतीने अर्जुनदेव मरणाला सामोरे गेले. शेवटपर्यंत त्यांचं मन प्रकाशानं झगमगतच राहिलं.
अर्जुनदेवांनी आयुष्यभर शत्रूंच्या उपद्रवांना तोंड देत पंथाचा प्रसार केला. शीख समुदायाचं संघटन केलं. देवभक्तांच्या अचल निष्ठेचा धर्मदंड सतत उंच धरला. सतलजच्या किनाऱ्यावरचं कर्तारपूर त्यांनी निर्माण केलं. संतोखसरचे घाट बांधवले आणि तरणतारणची निर्मिती करून तिथे त्यांनी एक विशाल जलाशय खोदवला.
त्यांचं सर्वात मोठं रचनात्मक काम म्हणजे त्यांनी उभं केलेलं अमृतसरचं सुवर्णमंदिर. शिखांचं सर्वश्रेष्ठ धर्मकेंद्र ही अर्जुनदेवांची निर्मिती आहे.
अर्थात सुवर्णमंदिराइतकंच मौलिक असं त्यांचं आणखी एक श्रेष्ठ कार्य म्हणजे त्यांनी केलेलं गुरू ग्रंथसाहिबाचं संकलन-संपादन! सततचं अस्थिर आणि संघर्षमय जीवन असतानाही अर्जुनदेवांनी हा द्रष्टा उद्योग आरंभला आणि तडीसही नेला. गुरू नानकदेव, गुरू अंगद, गुरू अमरदास आणि गुरू रामदास या चारही पूर्वसुरींची इतस्तत: विखुरलेली पदं त्यांनी जमवली. शुद्ध करून घेतली. कालक्रम सांभाळून त्यांची व्यवस्था लावली आणि गुरू ग्रंथसाहिबाची निर्मिती केली.
अर्जुनदेवांनी केलेलं हे काम अवघड होतं आणि असाधारणही होतं. भाई गुरुदासांसारख्या शिष्योत्तमांच्या मदतीनं निरनिराळ्या ठिकाणी विखुरलेली आणि निरनिराळ्या शिष्यांकडे असलेली गुरुवाणी एकत्रित करून गुरू ग्रंथसाहिबाचं रूप अर्जुनदेवांनी सिद्ध केलं. खडूर, गोईंदवाल, कर्तारपूर अशा ठिकठिकाणाहून मोठय़ा प्रयत्नानं त्यांनी गुरूंची रचना मिळवली आणि खात्री करून, जातीनं लक्ष घालून तो ग्रंथराज तयार केला. त्यांच्या मृत्यूपूर्वी दोनच वर्ष ते काम त्यांनी पुरं केलं.
या ग्रंथाचा आणखी एक विशेष अर्जुनदेवांच्या सहिष्णू, उदार, सर्वसमन्वयक अशा धर्मदृष्टीचा प्रत्यय देणारा आहे. आपल्या गुरूंच्या अस्सल पदांबरोबरच बाबा फरिद, कबीर, जयदेव, रैदास आणि महाराष्ट्राच्या अभिमानाचा विषय झालेले संत नामदेव यांच्यासारख्या भारतभरातल्या इतर थोर संतांची पदंही त्यांनी ग्रंथसाहिबात समाविष्ट केली.
अर्जुनदेवांनी जाट समाजाला पंथप्रवेशासाठी दारं खुली केली. पंथ संरक्षणासाठी शस्त्र धारण करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली आणि शिखांच्या देवभक्तीला पराक्रमाचा लढाऊ रंग चढला. धर्मसंघटनाच्या टिकाऊपणासाठी, दीर्घजीवित्वासाठी त्यांनी संघटनेचा आर्थिक पाया मजबूत करणं कर्तव्य मानलं आणि आपकमाईचा दहावा हिस्सा प्रत्येकानं धर्मदक्षिणा म्हणून देण्याची पद्धत अमलात आणली. त्यांचं हे कार्य पंथाच्या दृष्टीनं इतकं मोठं ठरलं, की पुढच्या अनेक धर्मधुरिणांनी त्यांची मुक्त प्रशंसा केली.
अर्जुनदेवांची स्वत:ची पदरचनाही फार मोठी आहे. असं मानलं जातं की सहा हजारांपेक्षा अधिक पदं त्यांनी रचली आहेत. बावन अखरी, सवैये, छंत, फुनहे, वारे आणि सहसकृतीचे सलोक अशा विविध प्रकारांमधली त्यांची पदं गोड आहेत, संगीतमय आहेत आणि भक्तीनं भिजलेली आहेत.
नम्रता, त्याग, समर्पण, क्षमाशीलता आणि श्रद्धा यांनी भरलेला उपदेश रागदारीत घोळून त्यांच्या पदांमध्ये सामावलेला आहे. त्याचप्रमाणे ‘सुखमनी’ ही त्यांची रचना शीख बांधवांना ‘जपुजी’च्या खालोखाल शिरोधार्य आहे. चोवीस सुंदर अष्टपदींमध्ये बांधलेली ही सरस रचना पंजाबीपेक्षाही हिंदीचा रंग अधिक प्रकट करणारी आहे. आत्म्याची ईश्वराविषयीची तळमळ व्यक्त करणारी आहे.
अर्जुनदेव अंत:करणाने मृदू, श्रद्धामय संत होते. पण परिस्थितीनं त्यांना कणखर, लढावू आणि निडर बनविले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ते उभयविशेष शीख संप्रदायाचेही विशेष ठरले आणि भारतीय भक्तिपरंपरेत त्या संप्रदायाचं ते वेगळेपण अखंड उमटून राहिलं.
    aruna.dhere@gmail.com