लेखिका, नाटककार मनस्विनी लता रवींद्र आणि तिचा जोडीदार दिग्दर्शक सतीश मनवर दोघेही नाटकवेडे. ‘‘मी लिहू शकेन असं मला कधी वाटत नसताना सतीशला माझ्याबद्दल खात्री होती. हा विश्वास अगदी सुरुवातीला आम्हाला एकमेकांबद्दल होता,’’ असं सांगत एकमेकांसाठी ठामपणे उभे रहाणारे मनस्विनी आणि सतीश यांच्या दहा वर्षांच्या सर्जनशील वैवाहिक सहप्रवासाविषयी..

‘‘मी कधी लिहीन असं मला वाटलं नव्हतं, का कोण जाणे सतीशला मात्र माझ्याबद्दल खूप विश्वास वाटत होता. दिग्दर्शन करण्याचं स्वप्न बघत मी पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून बाहेर पडले. पण लवकरच सतीशच्या सांगण्यावरून मी लिखाणाकडे वळले. त्यानंच मला लिहितं केलं, असं म्हणायला हरकत नाही.’’ वयाच्या विसाव्या वर्षी ‘सिगारेट्स’ नाटक लिहून अनेकांकडून वाहवा मिळवणाऱ्या मनस्विनी लता रवींद्रचा आतापर्यंतचा प्रवास असाच काहीसा अनपेक्षित वळण घेत झाला. मनस्विनीचा आयुष्याचा जोडीदार सतीश मनवर हादेखील ललित कला केंद्राचाच विद्यार्थी. मात्र, दोघांची भेट शिकत असताना झाली नव्हती. सतीश १९९८ मध्ये एम.ए. झाला, तर मनस्विनी २००० मध्ये ललित कला केंद्रात दाखल होऊन २००२ मध्ये पदवी घेऊन बाहेर पडली. मनस्विनी आणि सतीशसारखेच इतरही काही विद्यार्थी काही तरी करून दाखवायचं या विचाराने एकत्र आले होते. या भारावलेपणातून ‘मुंबई ललित संस्था’ सुरू झाली.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
Lagnanantar Hoilach Prem New Promo
लग्नानंतर होईलच प्रेम : ‘या’ तामिळ मालिकेचा रिमेक, मृणालचं कमबॅक अन्…; पाहा जबरदस्त नवीन प्रोमो

‘‘त्या वेळी सतीश त्याच्या मित्रांबरोबर लोअर परळला एका रूममध्ये राहायचा, मी गोरेगावला. मी एकूणच सतीशच्या व्यक्तिमत्त्वाने इतकी भारावलेली होते की, रोज सकाळी गोरेगावहून लोअर परळला त्यांच्या रूमवर जायचे. सतीश तेव्हा सकाळी उठून अगदी शिस्तीनं लिहायचा. एका सूटकेसवर व्यवस्थित कागद ठेवून लिहायचा. त्याचं ते लिहिणंदेखील मला खूप आवडायचं. त्याचं पाहून मीही लिहायला लागले. पण मी काही फार गंभीरपणे लिहीत नव्हते. त्याच्या प्रभावाखाली येऊन काहीतरी करत होते एवढं मात्र नक्की.’’ याच काळात सतीशनं मनस्विनीला लिहिण्याचा आग्रह केला. ‘‘तिला लिही असं सांगण्याचं कारण मात्र वेगळं होतं. तेव्हा मला नाटक बसवायचं होतं. पण नाटकांचं अर्थकारण पाहता, तिथं नवख्या दिग्दर्शकांना लवकर संधी मिळत नाही. नावाजलेले लेखक तशाच दिग्दर्शकांसाठी लिहितात. त्यामुळे मला नाटक बसवायचं तर होतं, पण नाटक मिळत नव्हतं. त्यामुळे मग मी मनस्विनीला लिहिण्याचा आग्रह केला. म्हणजे मला स्वत:ला नाटक हवं होतं. आणि ते ती लिहू शकेल याची मला अगदी खात्री होती.’’ सतीश सांगत होता.

दिग्दर्शनाचं स्वप्न घेऊन बाहेर पडलेल्या मनस्विनीनं अशा तऱ्हेने लिखाणाला सुरुवात तर केली. कोणत्याही नव्या नाटकवेडय़ांसाठी असतात, तसेच सतीश आणि मनस्विनीसाठी हे दिवस खूप धडपडीचे, भरपूर मेहनतीचे, काहीतरी करण्याची उमेद राखण्याचे होते. ग्रुपमध्ये सगळेच नवीन असल्यानं तातडीनं यश मिळणं सोपं नव्हतं. या काळात सतीशचंही लिखाण सुरू होतं. ‘‘मी स्वत:ची गरज म्हणून लिहीत होतो. मला रस होता तो नाटक बसवण्यात, दिग्दर्शन करण्यात. आम्हाला लगेच चित्रपट करायला मिळावा अशी आमची मागणीही नव्हती. याच काळामध्ये मनस्विनीनं लिहिलेल्या ‘सिगारेट्स’ नाटकाची खूप चर्चा झाली. अगदी विजय तेंडुलकर, सत्यदेव दुबे यांनी तिची प्रशंसा केली. हे मातब्बर लोक नाटक पाहून एकमेकांना ते बघण्याची शिफारस करत होते. त्यातून तिचा आत्मविश्वास खूप वाढला. हे नाटक तिच्यासाठी टर्निग पॉइंट ठरला. ’’

पुढची ५-६ र्वष मनस्विनी निरनिराळी नाटकं लिहीत होती. त्यातली काही सतीशनं बसवली तर काही तिनं स्वत: बसवली. लेखनाबरोबर दिग्दर्शनाचीही इच्छा पूर्ण झाली. ‘‘या दरम्यानच्या काळात सतीशबरोबरची मैत्री अगदी घट्ट झाली होती. आमच्यामध्ये ८ वर्षांचं अंतर होतं. मी आधीपासूनच सतीशनं भारावलेली होतेच, आता आपण आयुष्यभर एकत्र राहू शकतो असं आतून वाटायला लागलं आणि मग आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. २००७ मध्ये गोरेगावलाच अगदी साध्या पद्धतीने, सोसायटीतच रजिस्ट्रारला बोलावून आमचं लग्न झालं.’’ मनस्विनी सांगते. ‘‘लग्न झाल्यानंतरही टिपिकल नवरा-बायको असं नातं नव्हतंच. आम्ही जसे आधी होतो, तसेच लग्नानंतरही होतो.’’

त्याच सुमाराला मनस्विनीला रॉयल कोर्ट लंडनतर्फे महिन्याभरासाठी वर्कशॉपला बोलावण्यात आलं. तो एक प्रकारचा सन्मानच होता तिच्यासाठी. त्या वेळी तिनं ‘माझ्या वाटणीचं खरंखुरं’ हे नाटक केलं. त्याचे वर्षभरात १० प्रयोगही झाले. ‘सिगारेट्स’नंतर आम्ही ‘अलविदा’, ‘बारबार’ ही नाटकं केली. त्यांचे प्रत्येकी २५-२५ प्रयोगही झाले. त्यानंतर मग आम्ही एक नाटय़महोत्सव केला. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला, शिवाय आम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकलो.’’ सतीश सांगतो.

हा सर्व काळ भरपूर घडामोडींचा होता. युवा नाटय़कर्मीना प्रोत्साहन देण्यासाठी ‘साहित्य संस्कृती’ फेलोशिप सुरू झाली, ती पहिल्याच वर्षी सतीशला मिळाली आणि तिसऱ्या वर्षी मनस्विनीला. लग्नानंतर दोन वर्षांनी म्हणजे २००९ मध्ये सतीशनं ‘गाभ्रीचा पाऊस’ लिहिला. पण चित्रपट तयार व्हायला २ र्वष लागली. कारण तेच, निर्माता मिळत नव्हता.

‘‘मी २५ निर्मात्यांना ही गोष्ट वाचून दाखवली होती. निर्मात्यांकडून कौतुकाचे शब्द मिळत होते, पण चित्रपट तयार करायला कोणीच तयार होत नव्हतं. अखेर प्रशांत पेठे तयार झाला. चित्रपटाचं कौतुक होत होतं, पण वितरणासाठीदेखील

आम्हाला परदेशातून फंडिंग मिळवावं लागलं. देशोदेशीच्या चित्रपट महोत्सवामध्ये त्याचं कौतुक झालं, पुरस्कार मिळाले. फ्रान्स, अमेरिका या देशांमध्ये तो प्रदर्शितही झाला. त्याच्यावर ग्रामीण चित्रपटाचा शिक्का बसला खरा, पण शहरातले लोकही त्याच्याशी रिलेट करू शकत होते.’’ सतीश सांगत होता. पण वस्तुस्थिती ही होती की दोन र्वष त्यासाठी खस्ता खाव्या लागल्या. मग घराचं अर्थकारण सांभाळण्यासाठी मनस्विनीनं टीव्हीवरच्या काही मालिका लिहिल्या. ‘‘माझी पहिली मालिका ईटीव्हीवर होती, ‘लेक लाडकी या घरची’, ती खूप लोकप्रिय झाली आणि खूप चाललीसुद्धा. त्यानंतर झी मराठीवर ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ लिहिली. ती मालिका लिहितानाही मला मजा आली. एकतर मनासारखं लिहायला मिळालं. ती टिपिकल सासू-सुनेची मालिका नव्हती. ती लोकप्रियही खूप झाली. सीरियलची कामं करता करताच चित्रपटांचीही कामं करायला लागले. पण त्याचं पुढे फार काही झालं नाही, अशा बऱ्याच ‘अडकलेल्या’ चित्रपटांनंतर मी मृणाल कुलकर्णीचा ‘रमा माधव’ लिहिला. त्याचं कौतुक झालं.

त्यानंतर गेल्या वर्षी आलेला सतीश राजवाडेचा ‘ती सध्या काय करते’ हा चित्रपट लिहिला. त्या चित्रपटाचा शेवट निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक तिघांनाही मान्य होता, त्यामुळे मोकळेपणानं लिहिता आलं. दुसरीकडे ‘दिल, दोस्ती, दुनियादारी’ आणि ‘बन मस्का’ या मालिकाही लोकप्रिय झाल्यामुळे समाधान मिळालं. ‘अमर फोटो स्टुडिओ’ नाटकालासुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. एकदमच या सगळ्या गोष्टी जुळून आल्या. त्यापूर्वी त्याच्यामागे अर्थातच काही वर्षांची मेहनत होती.’’

एकीकडे मनस्विनीची स्वत:ची ओळख निर्माण होत असताना सतीशचा संघर्ष अजूनही सुरू आहे. ‘त्याचा कधी त्रास होत नाही, तुलना वगैरे?’ या प्रश्नावर सतीश मोकळेपणानं उत्तर देतो, ‘‘मनस्विनीशी तुलना अशी मी करत नाही, पण माझं काम ठप्प झालं तर मी अस्वस्थ असतोच. त्या वेळी मी तुलना करत नाही, पण काम थांबल्याची अस्वस्थता असतेच.’’ ‘‘आम्हा दोघांच्या संवेदना आणि समज खूपशा सारख्या होत्या. आम्ही दोघांनीही मनासारखं काम करण्यावर लक्ष केंद्रित केलं. या सुमाराला आम्हाला घरच्यांनीही चांगला पाठिंबा दिला. म्हणजे पैशांची मदत असं नाही, पण ते आपल्यासोबत आहेत हा दिलासा महत्त्वाचा होता,’’ मनस्विनी सांगते. ‘‘विशेष म्हणजे सतीशला भेटल्यापासून मी भारावलेली असली तरी आधी मी त्याचं एकही नाटक पाहिलं नव्हतं, मी लिहू शकेन असं मला कधी वाटत नसताना सतीशला माझ्याबद्दल खात्री होती. हा विश्वास अगदी सुरुवातीला आम्हाला एकमेकांबद्दल होता.’’ सतीशनं मनस्विनीला लिहायला प्रोत्साहन दिलं, मग त्याला तिचं कुठलं लिखाण आवडतं? ‘‘मी तिला माझ्यासाठी नाटक लिहायला लावलं, तरी तिनं लिहिलेलं आणि मी न बसवलेलं ‘एकमेकांत’ हे नाटक मला खूप आवडतं. ‘अलविदा’ हे नाटक मी बसवलं. ते मला खूप आवडतं. तिला २०१५ मध्ये ‘ब्लॉग्जच्या आरशापल्याड’ या कथासंग्रहासाठी ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’ मिळाला. तिच्या कथा मला खूप आवडतात. आणि तरीही ती नाटक सर्वोत्तम लिहू शकते, असं मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं. तिच्या कलाकृतींमधून तिचे विचार अगदी आपोआप पोहोचतात. त्यासाठी तिला विशेष वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत. ते आपोआप होतं. कलावंत म्हणून आम्ही एकमेकांचं खूप कौतुक करतो. आमची तात्त्विक भांडणंही होतात. भूमिका अमूक एका पद्धतीने का मांडली यावरून वाद होतात. प्रतिगामी काही लिहिलं की आमचे वाद होतात. त्याबरोबरच माझी भूक आणि तिची झोप हे आमचे हमखास भांडणाचे मुद्दे असतात.’’

लग्नानंतर दोघांनी पुन्हा एकत्र नाटक केलेलं नाही. आता पुन्हा एकत्र नाटक करण्याची जुळवाजुळव सुरू आहे. मनस्विनीच्या लेखनाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आता ती कादंबरी लेखनाकडे वळतेय. त्यातून तिच्या लेखनाचा आणखी नवा पैलू समोर येईल, अशी अपेक्षा तिच्या चाहत्यांना नक्कीच असेल.

क्षेत्र कोणतंही असो, त्यामध्ये यश मिळवायचं असेल तर संघर्ष आलाच. त्या संघर्षांकडे त्रास म्हणून पाहायचं की तो संघर्षही मनापासून जगायचा यावर त्या प्रवासाची जडणघडण ठरते. आपण काही संघर्ष केलाय यावर लक्ष केंद्रित न करता आपल्याला काय करायचं आहे त्याकडे लक्ष देणाऱ्या मनस्विनी आणि सतीशसाठी हा प्रवास त्यामुळेच अधिक आनंदाचा झालाय.

निमा पाटील

nima_patil@hotmail.com

Story img Loader