मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर आणि नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या करिअरची सुरुवात एकत्रितपणे झाल्यामुळे वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच गोष्टी तुलनेने सोप्या झाल्या. एकमेकांना, एकमेकांच्या कामांना समजून घेता आलं. पतीपत्नीच्या नात्यातलं मैत्र टिकवता आलं आणि त्याचमुळे पुढे त्यांची पोस्टिंग एकाच जिल्ह्य़ात झाल्यावर तिथली कामंही लवकर पूर्ण होत गेली; अर्थात त्याचा लोकांनाही फायदा झाला.

Narendra modi Uddhav Thackeray sharad pawar
“…म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष फुटले”, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं पंतप्रधान मोदींकडून विश्लेषण
Actor Makrand Anaspure
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर मकरंद अनासपुरेंचं परखड भाष्य, “आम्हा मतदारांची फसवणूक…”
Chandrashekhar Bawankule,
“अपघाताच्या घटनेवरून राजकारण करणे चुकीचे”, बावनकुळेंनी काँग्रेसचे आरोप फेटाळले; म्हणाले, “महाराष्ट्रात घातपात…”
supriya sule water shortage in maharashtra
“ट्रिपल इंजिनचे खोके सरकार असंवेदनशील, त्यांना…”; राज्यातील पाणी टंचाईवरून सुप्रिया सुळेंची शिंदे सरकारवर टीका!

‘‘इंग्लंडचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द इंग्लंडच्या आणि जगाच्याही राजकारणावर कायमचा ठसा उमटवून गेली. ते जगलेही भरपूर. ९० व्या वर्षी त्यांना प्रश्न विचारण्यात आला, तुमचं सर्वात मोठं यश कोणतं? त्यावर त्यांनी उत्तर दिलं, ‘मी माझ्या बायकोला माझ्याशी लग्न करायला राजी केलं हेच माझ्यासाठी सर्वात मोठं यश आहे.’ मीही असंच म्हणेन, मनीषाने मला लग्नाला होकार दिला, हा माझ्यासाठी सर्वात मोलाचा ठेवा आहे,’’ मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर २५ वर्षे जुन्या, आणि तितक्याच टवटवीत प्रेमाच्या आठवणींना उजाळा देताना सांगतात. तर, ‘‘प्रत्येक मनुष्य चांगल्या आयुष्याच्या शोधात असतो, असं आयुष्य घडवताना चांगला जोडीदार मिळणं फार महत्त्वाचं असतं, मिलिंदसारखा जोडीदार मिळाल्यामुळे मला माझं आयुष्य घडवता आलं,’’ नगरविकास खात्यामध्ये प्रधान सचिव पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मनीषा म्हैसकर सहजीवनाबद्दल सांगतात.

‘‘मनीषा आणि मी एकाच बॅचला होतो, मसुरीला दोन र्वष आम्ही एकत्र होतो. मी सोलापूरचा, मनीषा नागपूरची. आयएएसला जाण्यापूर्वी मी आयआयटी मुंबईला होतो. त्यानिमित्ताने मला घरापासून दूर राहण्याची सवय होती. मनीषा प्रथमच घराबाहेर पडली होती. तिचं शाळा-महाविद्यालय सगळं नागपूरलाच झालं होतं. मसुरीला पहिल्यांदाच ती घरापासून दूर राहत होती. त्या काळात ती प्रचंड होमसिक व्हायची. तेव्हाच आमची मैत्री झाली. दोन वर्षांमध्ये आम्ही घट्ट मित्र झालो. पुढे मी मनीषाला लग्नासाठी विचारलं आणि तिनेही होकार दिला.’’ मिलिंद आणि मनीषा यांच्या करिअरची सुरुवात एकत्रच झाल्यामुळे वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच गोष्टी तुलनेने सोप्या झाल्या. मिलिंद त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगतात, ‘‘आम्ही दोघं स्टेट इन्स्टिटय़ूट फॉर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्समध्ये एकत्र होतो. त्यानंतर १९९२ मध्ये मसुरीला फाउंडेशन कोर्ससाठीही एकत्रच होतो. पुढच्या वर्षी फील्ड वर्क होतं, तेव्हा आम्ही नागपूर आणि चंद्रपूरला होतो. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे १९९४च्या डिसेंबरमध्ये आम्ही लग्न केलं. तेव्हा निवडणुकांचे दिवस होते, आम्ही दोघेही निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत होतो. तेव्हा ईव्हीएम नव्हते, मतपत्रिका असायच्या. टी.एन. शेषन यांनी निवडणुकीची व्यवस्था लावून दिली होती. त्यामुळे कामंही वाढली होती. आम्हाला लग्नासाठी फक्त ३ दिवस रजा मिळाली होती. प्रत्येक राज्याच्या कॅडरमध्ये पहिल्या एकतृतीयांश अधिकाऱ्यांना त्यांच्याच राज्यात सेवेत रुजू होता येतं, उरलेल्या दोनतृतीयांश अधिकाऱ्यांना इतर राज्यांमध्ये पाठवलं जातं. सुदैवाने आम्ही दोघंही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यामुळे आम्हाला महाराष्ट्रातच सेवा करण्याची संधी मिळाली. आमची पहिली पोस्टिंग वध्र्याला होती. पती-पत्नी असल्यामुळे आम्हाला एकत्रच काम करायची इच्छा होती, मात्र अमुक एका ठिकाणी असा आग्रह आम्ही धरला नाही. गडचिरोली, चंद्रपूर.. आम्हाला काहीही चालणार होतं. सुदैवानं महाराष्ट्राचं राजकीय नेतृत्व प्रगल्भ आहे. त्यामुळे आम्हाला एकाच जिल्ह्यत पोस्टिंग मिळत गेल्या.’’

‘पण एकत्र पोस्टिंग मिळाल्याचा फक्त वैयक्तिक फायदा झाला की त्यामुळे तुम्हाला टीका सहन करावी लागली?’ या प्रश्नावर मनीषा म्हैसकर यांनी सविस्तर उत्तर दिलं. ‘‘तसंच काही विशेष कारण असल्याशिवाय सरसकट टीका होत नाहीत. तुम्ही तुमचं काम व्यवस्थितपणे केलं, सर्वसामान्य लोकांच्या प्रशासनाकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण झाल्या तर ते तुमच्या खासगी आयुष्याकडे बघत नाहीत. मुळात प्रशासनाचा लोकांशी थेट संबंध येतो. विशेषत: शेतीच्या समस्या असतील तर किंवा दुष्काळ, पूर यासारखी नैसर्गिक संकटं आली की लोकांना तुमच्या कामाशी मतलब असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही एकाच जिल्ह्यत बदली घेण्याचा जसा आम्हाला वैयक्तिक फायदा झाला, तसाच फायदा आमच्या कामालाही झाला. जिल्ह्यत तीन पदांवर आयएएस अधिकारी नेमले जातात. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ आणि महापालिकेचे सीओ. यांच्यात कामाचा ताळमेळ असला की कामं पटकन होतात. उदाहरणार्थ जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे सीईओ. जिल्हाधिकारी निर्णय घेतात आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं काम जिल्हा परिषदेचे सीईओ करतात. एकाच जिल्ह्यत आम्हीच अशा पोस्टवर असल्यामुळे प्रशासकीय कामं पटपट व्हायची. म्हणजे पाणीटंचाई निवारणाच्या ज्या कामाला एरवी सहा महिने लागले असते, ती कामं आमच्या युतीमुळे महिन्याभरात व्हायची. अर्थात यात लोकांचाही फायदा झालाच. त्यामुळे टीका अशी काही झाली नाही. कारण आमच्या कामाचा फोकस आम्हाला नीट माहिती होता.’’

मनीषा आणि मिलिंद दोघेही एकाच बॅचचे, एकत्रच प्रशिक्षण घेतलेले. त्यामुळे तुलना होणंही स्वाभाविकच आहे. त्याचा एक किस्सा मिलिंद सांगतात, ‘‘आमच्या लग्नाला साधारण महिनाच झाला होता. त्या वेळी एक वरिष्ठ अधिकारी आमच्या घरी आले. छानपैकी गप्पा मारल्या. पण जाता जाता ते एक वाक्य बोलून गेले, ‘एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत.’ त्यांचं हे वाक्य आमच्या लक्षात राहिलं. विशेषत: मनीषाच्या डोक्यात तो किडा वळवळत राहिला.’’

‘‘पण आता २३ वर्षांनंतर मी असं म्हणू शकते की, आतापर्यंत असा काही प्रसंग आला नाही. आणि आता यापुढेही असं काही घडायला वाव नाही,’’ मनीषा किस्सा पूर्ण करतात.

लग्नानंतर आई होणं हा स्त्रीच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा काळ मानला जातो. कितीही कर्तव्यकठोर अधिकारी असली तर काही हळवे क्षण उरतातच. डिसेंबर १९९९मध्ये मन्मतचा जन्म झाला. मॅटर्निटी लीव्हवर त्या माहेरी नागपूरला होत्या. नवीन सहस्रक उजाडलं ते एक मनाची द्विधा अवस्था घेऊनच. नियमांप्रमाणे जिल्हा परिषदेचं सीईओपद सांभाळल्याशिवाय जिल्हाधिकारीपद मिळत नाही. पण बाळ इतकं लहान असताना आपण हे सीईओ पद स्वीकारावं का असा प्रश्न पडला. ‘‘पण तेव्हा मिलिंदनं मला समजून घेतलं आणि समजावून सांगितलंसुद्धा. मीही मग विचार केला आणि एप्रिल २०००मध्ये वर्धा जिल्हा परिषदेचा कारभार स्वीकारला. त्या वेळी दोघांचेही आई-वडील बाळाला सांभाळायला पुढे आले. त्यामुळे मग माझी तीही चिंता दूर झाली आणि मला माझ्या कामावर लक्ष केंद्रित करता आलं.’’

‘‘कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून गेली २३ वर्षे सेवा बजावताना अनेक कठीण, परीक्षा घेणारे प्रसंग आले पण मिलिंद सातत्याने माझ्यासोबत होता, मी अनेकदा त्याच्याशी चर्चा करायचे, अजूनही करते. विशेषत: काही कठोर निर्णय घ्यायचे असतील तर मी जे करतेय ते बरोबर आहे, हे मला माहिती असतं. पण तरीही मिलिंदशी त्या विषयावर बोलले की एकतर माझा आत्मविश्वास पक्का होतो आणि दुसरं म्हणजे माझ्या नजरेतून एखादा पैलू निसटला असेल तर तो लक्षात येतो. वर्धा, अमरावती या ठिकाणी असताना आम्ही पाण्याची टंचाई, दुष्काळ या प्रश्नांचा सामना केला. २००५ मध्ये मुंबईसह महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी महापूर आला तेव्हा आम्ही सांगलीला होतो. त्यापूर्वी २००३ मध्ये सांगलीला मोठा दुष्काळ पडला होता. तेव्हाही आम्ही तिथे होतो. मी जिल्हाधिकारी होते आणि मिलिंद महापालिकेचा सीओ होता. मी सांगलीला रुजू होणार होते तेव्हा हा फार अवघड जिल्हा आहे, महिला अधिकारी कसं काय काम करणार अशी मला सावधगिरीची सूचना काही जणांनी दिली होती, त्यामध्ये एक वरिष्ठ राजकीय नेतेसुद्धा होते. पण इतक्या वर्षांच्या अनुभवातून मला हे समजलं होतं, की अशा वेळी आपण शांतपणे प्रतिक्रिया द्यायची असते. मी त्यांना नम्रपणे सांगितलं की माझं काम १०० टक्के करण्याचा प्रयत्न करेन. २००३च्या दुष्काळामध्ये आम्ही बरंच काम केलं. तेव्हा जनावरांसाठी मोठय़ा प्रमाणात चारा छावण्या उभारल्या होत्या. आम्ही दुष्काळ निवारणासाठी जलसंधारणाची भरपूर कामं केली. बरीच शेततळी बांधली होती. त्या दीड वर्षांच्या काळामध्ये सतत फील्डवर काम होतं. लोकांशी जवळीक खूप वाढली. इतकी की पाऊस पडला, तेव्हा लोक फोन करून सांगत होते. शेततळं भरल्याची बातमी देत होते. हा अनुभव खूप समाधान देणारा होता. मुख्य म्हणजे सुरुवातीला माझ्यावर शंका घेणाऱ्या त्याच राजकीय नेत्यांनी नंतर प्रांजळपणे आपला अंदाज खोटा ठरल्याचं मान्य केलं होतं.’’ असे अनुभव आधीही आले होते. १९९८-९९ मध्ये मनीषा अमरावतीला महानगरपालिका आयुक्त होत्या. महापालिकेचं आयुक्तपद सांभाळणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी. त्या वेळी तर महिला महापालिका आयुक्त नको, अशी मागणी करणारी पिटिशन दाखल झाली होती, पण ती फेटाळण्यात आली.

‘लोकांना अधिकाऱ्यांना अजमावून बघण्याची सवय असते, त्यातही स्त्री अधिकारी असली की जास्तच अजमावतात, त्यांच्या कामाबद्दल जरा जास्तच कुतूहल असतं. पण एकदा कामाची तडफ दिसली की तितक्याच खुल्या मनाने मतही बदलतात’, मिलिंद महत्त्वाचं निरीक्षण नोंदवतात. त्यामुळे शंकासुरांच्या टीकांना प्रतिक्रिया द्यायची नाही. आपण संयमानं वागलं की आपलं काम आपोआप बोलतंच, असा मोलाचा सल्लाही देतात.

काही साध्या साध्या गोष्टी, पण त्या एकत्र केल्यामुळे पती-पत्नींमधली मैत्री अधिक वाढते. म्हैसकर पती-पत्नी गेली १७-१८ र्वष नित्यनियमानं पाऊण तास एकत्र ‘मॉर्निग वॉक’ घेतात. त्या वेळेमध्ये संपूर्ण दिवसाचा आराखडा ठरतो. त्यातच एकमेकांच्या कामाविषयीही चर्चा होते.

मनीषा आणि मिलिंद यांच्या कामामुळे त्यांची मैत्री वाढली आहे की मैत्रीमुळे चांगलं काम करता आलं, हे मात्र पटकन सांगता येणार नाही.

 

nima_patil@hotmail.com