नद्या, धरणं आणि लोक यांचे आपापसात संबंध, धरणांचा नद्या व लोकांवर होणारा परिणाम हे शोधण्याच्या निमित्ताने परिणीता दांडेकरने उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, ईशान्य भारत या भागात होऊ पाहणाऱ्या धरणांचा  भरपूर अभ्यास केला. ‘‘मी माझ्या कामासंबंधी, माझ्या विषयासंबंधी दीपकशी चर्चा करत असते. त्याचं वाचन अफाट आहे. त्याच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. एखाद्या गोष्टीमागील वैज्ञानिक सत्य काय आहे ते समजून घ्यायला मला त्याची नेहमी मदत होते.’’ परिणीता सांगते. तिच्या व दीपक यांच्यातल्या समजूतदारपणामुळेच त्याचं नातं प्रवाही झालं आहे.

‘‘दीपकला मी भेटले तेव्हा महाविद्यालयात होते. माझं वय जेमतेम २२ वर्षांचं. आमच्या आवडी-निवडी जुळल्या. महिनाभरात आमचा साखरपुडा झाला आणि सहा महिन्यांनी माझं लग्न झालं तेव्हा माझं शिक्षण पूर्ण व्हायचं होतं. मी अजूनही त्याला ऐकवत असते, माझा बालविवाह झालाय म्हणून!’’ नद्यांच्या संवर्धनासाठी अभ्यास, त्यानिमित्त देशविदेशात भरपूर प्रवास आणि त्यासाठी चळवळीत सक्रिय सहभाग.. परिणीता दांडेकर हे नाव आता सजग नागरिकांच्या परिचयाचं झालं आहे ते वन्यजीवविषयक, पर्यावरणीय प्रवाह, धरणांचा आणि त्याच्या परिणामांचा-दुष्परिणामांचा अभ्यास करण्यासंदर्भात!

परिणीता सांगते की, ‘‘मी माझ्या आई-बाबाची एकुलती एक मुलगी. बाबाला कर्करोग झाल्याचं निदान झालं. त्याचं आजारपण, उपचार, तो यातून बरा होईल अशी आशा या सगळ्यामध्ये मी गुंतून गेले होते, तेव्हा मी महाविद्यालयात होते. अखेर २००३ मध्ये बाबा गेलाच. त्यातून बाहेर पडण्यासाठी जी. ए. कुलकर्णीच्या साहित्याचा आधार होता.  तेव्हा मला दीपकने डेव्हलप केलेली वेबसाईट सापडली. त्या साईटवर मला जीए सापडले. त्या साईटमुळे मी इतकी प्रभावित झाले की, आम्ही भेटलोच. भेटल्यानंतर जाणवलं की दीपक आणि माझ्या आवडीनिवडी बऱ्याच सारख्या होत्या. जी.ए., बा.भ. बोरकर, साहित्य, विज्ञान,थोडीशी राजनीती, उत्क्रांती, भावना आणि विचार, साहित्य, गाणी हे सर्व धागे आम्हाला एकमेकांशी बांधत होते. आम्ही एकमेकांना आवडलो आणि आपण कायम एकत्र राहू शकतो असंही वाटलं. सगळ्या गोष्टी इतक्या झटपट झाल्या की भेटल्यानंतर एका महिन्यात आमचा साखरपुडा झाला आणि सहा महिन्यांमध्ये मी परिणीता देशपांडेची परिणीता दांडेकर झाले. लग्नाच्या वेळी थोडी घाई होतेय का असं मला वाटत होतं, एकदा निर्णय झालाय तर तो लांबणीवर कशाला टाकायचा हा दीपकचा मुद्दा होता.’’

दोघांच्या आवडी-निवडी जुळल्या तरी कल आणि सवयी मात्र बऱ्याच वेगळ्या आहेत. ‘‘परिणीता खूप वेंधळी आहे. वस्तू हरवण्यात तर ती ‘माहीर’ आहे. ती स्वत:लाही हरवू शकते. तिच्या या सवयीमुळे माझी सुरुवातीला चिडचिड व्हायची, अजूनही होते, पण आता सवय झाली आहे. मला नीटनेटकेपणाची सवय आहे, पण मला स्वत:लाच फार नीटनेटकं राहणं, ठेवणं जमत नाही, त्यामुळे तसा फारसा फरक पडत नाही.’’ दीपकचा मुद्दा परिणीता पुढे नेते, ‘‘लग्नानंतर दीपकपेक्षा माझ्या सासूबाईंनीच मला जास्त समजून घेतलं असं म्हणता येईल. त्यांच्या घरात अशी सून आली होती, जिला स्वयंपाक करायचा म्हणजे काय ते माहिती नव्हतं, माझी खोली कधी आवरलेली नसायची. सासरी सगळं नीटनेटकं. मी मात्र घरभर पसारा करणारी. पण त्यांनी समजून घेतलं मला. दीपकचं माझ्या आयुष्यात असणं फार महत्त्वाचं आहे. मी गोंधळलेली असते. त्याचे विचार स्पष्ट असतात. एकाच वेळी बऱ्याच गोष्टी माझ्या डोक्यामध्ये असतात, त्याचं तसं नसतं. आपल्याला काय हवं आहे हे जसं त्याला माहिती असतं तसंच आपल्याला काय करायचं नाहीये हेही त्याला व्यवस्थित माहिती असतं. त्यामुळे माझ्या डोक्यातला गोंधळ कमी करण्यासाठी त्याची मला बरीच मदत होते. तो स्वत: कठीण परिस्थितीतून वर आला आहे. एका अर्थाने तो सेल्फ-मेड आहे.’’

लग्नानंतर २००३ मध्ये परिणीताने एम.एस्सी. पूर्ण केलं. पुणे विद्यापीठातून तिने पर्यावरण विज्ञानाचे पदव्युत्तर शिक्षण घेतले, तिच्या प्रबंधाचा विषय वन्यजीव हा होता. त्यानंतर तिने ‘एशियन इन्स्टीटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ मधून जल व्यवस्थापनाची शिष्यवृत्ती मिळवली. नेदरलंडच्या बोथ एंड्स संस्थेची पर्यावरण कामासाठीची फेलोशीप मिळवली. या सगळ्यात दीपक, तिची आई, आणि परिवार ठामपणे तिच्याबरोबर होता. ‘‘ मला लहानपणापासूनच प्राण्यांची आवड होती. घरी मी बरीच कुत्री, मांजरं घेऊन येत असे. बाबानं कधी मला अडवलं नाही. तो मला अनेकदा नदीवर घेऊन जायचा. त्यामुळे नदीपात्रातल्या माशांविषयीही कुतूहल होतं. त्यांच्यासंबंधी मला अभ्यास करायचा होता. पण त्यानंतर प्रा. विजय परांजपे यांनी त्यांच्या ‘गोमुख’ संस्थेसाठी मला मुलाखतीला बोलावलं. एकात्मिक भीमा खोरे व्यवस्थापनाचा प्रकल्प होता. सरकारच्या प्रत्येक धोरणाचा नदीवर परिणाम होत असतो, हा विचार केंद्रस्थानी ठेवून हा अभ्यास करण्यात आला होता. मी नदीकडे ओढले गेले त्याची सुरुवात इथून झाली, असं म्हणता येईल. ही गोष्ट २००४ मधली. त्यानंतर पुढच्याच वर्षी २००५ चा महापूर आला. मुंबईच्या मिठी नदीचा प्रश्न ऐरणीवर आला आणि मग माझी अभ्यासाची आणि कामाची दिशा ठरून गेली असं म्हणता येईल. पाणी, नदी, लोक, प्रशासन अशा सर्व मुद्दय़ांचा संगम त्यामध्ये होता.’’ परिणीता सांगते.

पुढची दोन वर्षे परिणीतासाठी जितकी धावपळीची आणि व्यग्रतेची होती, तितकीच दीपकसाठी आव्हानाची. ‘‘परिणीता तिच्या कामानिमित्त खूप फिरते. विशेषत: २००४-२००७ या कालावधीमध्ये तिने खूप प्रवास केला. भारतात आणि भारताबाहेरही. उत्तराखंड, हिमाचल, ईशान्य भारत, गंगा, ब्रह्मपुत्रा हे सगळे तिच्या प्रचंड आवडीचे प्रांत होते. या कालावधीत तिला भौतिक वेळ सोडाच, पण मानसिक सवडही नव्हती. ती तिच्या कामामुळे जणू काही झपाटलेली होती. त्या काळात आमचे कधी वादही व्हायचे. मलाही प्रवास आवडतो. मीही तिच्यासोबत कधीकधी प्रवासाला जातो, जायचो. पण त्यावेळी थोडा तरी वेळ तिनं व्यक्तिगत राखून ठेवावा असं मला वाटायचं. पण ते तिला जमायचंच नाही. तिच्या कामासाठी तिच्याबरोबर सोडा, पण एरवीही कुठे गेलो तरी तिला नदी, पाणी, निदान एखादी विहीर असं काहीतरी दिसतंच, आता त्याचीही सवय झाली आहे. तिच्यासोबत प्रवास करताना, जिथे एरवी मी गेलो नसतो अशा ठिकाणी मी गेलो आहे, त्याचा मला आनंदच असतो,’’ दीपक परिणीताबरोबरचा अनुभव सांगतो. ‘‘माझा पहिला परदेश प्रवास इंडोनेशियाचा होता. माझ्यासाठी तो शिकण्याचा सर्वोत्तम अनुभव होता असं मी म्हणेन. मुख्य म्हणजे तिथल्या आणि आपल्याकडील नद्यांमध्ये बरेच समान धागे आहेत असं मला आढळलं. नदीचा भूगोल, इतिहास, संस्कृती अशा कितीतरी बाबतीत साधम्र्य आहे.’’ परिणीता सांगते.

दीपक सतत सोबत असला तरी कामाच्या स्वरूपावरून त्याच्याशी मतभेद होत असतात. ‘‘परिणीताने अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं, ती कार्यकर्ती म्हणून नव्हे तर अभ्यासक म्हणून ओळखली जावी, तिने पीएच.डी. करावं असं माझं मत आहे,’’ दीपक त्याच्या अपेक्षा व्यक्त करतो, पण परिणीताची कामाची पद्धत काहीशी वेगळी आहे. ‘‘मला स्वत:ला काम केल्याशिवाय समाधान मिळत नाही. खूप काम करतेस, वेग थोडा कमी कर असं तो मला सांगत असतो. पण ते काही माझ्याकडून होत नाही. मात्र, मी माझ्या कामासंबंधी, माझ्या विषयासंबंधी त्याच्याशी चर्चा करत असते. त्याचं वाचन अफाट आहे. त्याच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. एखाद्या गोष्टीमागील वैज्ञानिक सत्य काय आहे ते समजून घ्यायला मला त्याची नेहमी मदत होते. आणखी एक गोष्ट म्हणजे मी वाहवत जाते, पण तो बॅलन्सिंग फोर्स आहे. मला कुठे अडवायचं, कुठे थांबवायचं हे त्याला बरोबर कळतं. त्याचा मला माझ्या कामात फायदाच होतो.’’

२००७ हे वर्ष परिणीता आणि दीपकसाठी विशेष महत्त्वाचं आहे. याच वर्षी नचिकेतचा जन्म झाला. त्यानंतर परिणीताचे प्राधान्यक्रम काही काळ तरी बदलले. दीपक त्याबद्दल सांगतो की, ‘‘नचिकेत ३-४ महिन्यांचा झाल्यांतर परिणीताने घरातूनच कामाला सुरुवात केली. त्या काळात तिने संशोधनाच्या कामाला अधिक प्राधान्य दिलं. नचिकेत वर्षभराचा असताना आम्ही बंगळूरुला होतो, तिथेही तिने पर्यावरणीय प्रवाहासंबंधी अभ्यास केला. नचिकेतच्या जन्मानंतर तिला कदाचित तिच्या कामासाठी कमी वेळ मिळत असेल. कदाचित अजून १५-२० वर्षांनी असं वाटेल की आपल्याला त्याच्यासोबत जास्त वेळ घालवता आला नाही. पण हे चालायचंच.’’

‘‘२०१०मध्ये ‘साऊथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर अँड पीपल’ या संस्थेशी परिणीता जोडली गेली. हिमांशू ठक्कर त्याचे संस्थापक आहेत. त्यानंतर तिच्या कामाला पुन्हा खूप वेग आला. नद्या, धरणं आणि लोक यांचे आपापसात संबंध, धरणांचा नद्या व लोकांवर होणारा परिणाम यांच्यासंबंधाने ही संस्था खूप काम करते. त्या निमित्ताने परिणीताने उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, ईशान्य भारत या भागात होऊ पाहणाऱ्या धरणांचा आणि त्याच्या परिणामांचा-दुष्परिणामांचा भरपूर अभ्यास केला. ही संस्था जनजागृतीचंही काम करते.’’ परिणीताच्या कामाला आणखी एक पैलू मिळाला तो २०१२ ला. त्याबद्दल परिणीता अधिक माहिती देते, ‘‘त्या वर्षी महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. धरणांचा मुद्दा समोर आला, त्यातील गैरप्रकार समोर यायला लागले. त्याच काळात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या काळू धरणासंबंधीचा भ्रष्टाचार समोर आला. मुंबई, कोकण, विदर्भ एकापाठोपाठ धरणांतला भ्रष्टाचार समोर यायला लागला. या प्रश्नावर आम्ही आवाज उठवला. त्यानंतर घरी निनावी फोन यायला सुरुवात झाली. हा प्रकार घरात ताण वाढवणारा होता. हा प्रकार दीपकसाठी त्रासदायक होता. राजकारण त्याच्या आवडीचे क्षेत्र नाही. त्यामुळे राजकीय प्रश्नांमध्ये अडकू नये, असं त्याचं म्हणणं असतं. काहीही असलं तरी त्याने मला साथ मात्र दिली. तो त्याला नकोशा असलेल्या अनेक गोष्टी सहन करतो, पण त्याबद्दल मला अपराधी मात्र वाटू देत नाही, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे.’’

‘‘या राजकीय विषयांकडे मी दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतो. बऱ्याचदा त्यातून आमच्यात वादावादी होते. पण तोही समंजस होण्याच्या प्रक्रियेचाच भाग आहे असं मला वाटतं,’’ दीपक त्याची भूमिका स्पष्ट करतो. ‘‘परिणीतामुळे माझ्या बऱ्याचशा भूमिका अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक झाल्या आहेत, हेही मला जाणवतं. अजूनपर्यंत तरी गंभीर धमक्या आलेल्या नाहीत. आल्या तर मी काय भूमिका घेईन ते माहिती नाही, पण माझ्यासाठी कुटुंबाची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे.’’ दीपक प्रांजळपणे कबूल करतो. कधीकधी परिणीता नद्यांबद्दल ललित लेखही लिहिते. दीपक त्यावर अत्यंत परखड प्रतिक्रिया देतो.

या प्रचंड धबडग्यातूनही दोघे एकमेकांसाठी थोडा वेळ काढतात तेव्हा, ‘‘आम्ही भरपूर गप्पा मारतो. आम्हा दोघांनाही फिरण्याची, वाचनाची, जुन्या गाण्यांची आवड आहे. दीपकला तर गाण्यांची विशेष जाण आहे. दोघांनाही संगीत प्रचंड आवडतं. सवाई गंधर्वला आम्ही आवर्जून हजेरी लावतो. मला प्राणी आवडतात. ते मी घरी घेऊन येते, त्यांची जबाबदारी तो घेतो. तो जे वाचतो त्यातलं त्याला मला सांगायचं असतं. त्याच्यामुळे माझ्या कक्षा विस्तारत जातात. घरामध्ये तो एकटा नास्तिक आहे, बाकी सश्रद्ध आहेत. मी अज्ञेयवादी आहे, पण मला इतरांच्या श्रद्धा समजतात. या मुद्दय़ावरून जेव्हा वाद होतात, तेव्हा संतुलित भूमिका घेण्याची जबाबदारी माझ्यावर असते..’’परिणीता सांगते.

दोघांच्या नात्यानं नदीच्या प्रवाहीपणाचा गुण तंतोतंत उचलला आहे, परिणीताच्या आवडीची आणि दीपकच्या समंजसपणाची सांगड घालणारा..

निमा पाटील

nima_patil@hotmail.com