माहिती आहे त्याहून अधिकाचा शोध घेणे हा मानवी स्वभाव आहे. पृथ्वीबाहेर इतरत्र कोठे सजीवसृष्टी असेल का आणि असलीच तर ती कशी असेल ही तर विशेष मानवी जिज्ञासा. यासाठी परग्रहावर यंत्रमानव धाडून तिथले मातीचे वगरे नमुने पृथ्वीवर आणून त्यामध्ये एखादा सजीव आहे का, याचे विश्लेषण केले जाते. हाच धागा पकडून कल्पना करा. तुम्ही सहज टीव्ही लावला. सर्व वाहिन्यांवर एकच ब्रेकिंग न्यूज झळकतेय : मानवाला अमुक एका परग्रहावर सजीवाचा शोध लागला! जगभरात सनसनाटी पसरेल. या बातमीवर अत्यानंद ते अविश्वास ते दहशत अशा विविध प्रतिक्रिया उमटतात. चर्चाचे फड रंगतात. काही दिवसांनी हा ओघ आटतो न आटतो तोवर दुसरी ब्रेकिंग न्यूज येऊन आदळेल. परग्रहावरील नमुन्यात आढळलेला सजीव वास्तविक पृथ्वीचाच रहिवासी असून शोधमोहिमेवर गेलेल्या अवकाशयानातूनच तो त्या ग्रहावर पोचला असावा. ही दुसरी सनसनाटी महाभयंकर आहे. कारण १) अगणित साधने खर्ची घालून आखलेल्या अशा अवकाश मोहिमा निव्वळ जैविक शुचितेचे मूलभूत निकष पाळले गेले नाहीत म्हणून फसू शकतात. आणि २) पृथ्वीवासीयांचा असा  गलथानपणा म्हणजे परग्रहावरील सजीवसृष्टीमधे अनावश्यक हस्तक्षेप आणि समग्र उत्क्रांतीच्या प्रक्रियेत अक्षम्य उलथापालथ असेल. इतिहासातील सर्व घोटाळ्यांना लाजवेल असा मानव पुरस्कृत खगोलीय महाघोटाळा!
पण मग हे टाळायचे कसे? कोणत्याही परग्रहावर पाठवण्याअगोदरच अवकाशयाने काळजीपूर्वक र्निजतुक करायची. जेणेकरून पृथ्वीवरील कोणताही सजीव पृथ्वीबाहेर इतरत्र पोचणार नाही. पण प्रत्येक अवकाशयान असंख्य लहानमोठय़ा भागांचे बनलेले असते. म्हणूनच यानाच्या जुळणीसाठी आधीच र्निजतुक केलेले सुटे भाग वापरायचे आणि जुळणीच्या प्रत्येक टप्प्यावर र्निजतुकीकरण करायचे. नंतर यानामध्ये बसवले जाणारे प्रत्येक यंत्रसुद्धा र्निजतुक आहे याची खात्री करायची. आणि ही सर्व प्रक्रिया एका संपूर्ण नियंत्रित आणि र्निजतुक दालनात करायची हे ओघाने आलेच. अशा दालनाला ‘स्पेसक्राफ्ट असेम्ब्ली क्लीन रूम’ अर्थात ‘अतिस्वच्छ अवकाशयान जुळणी दालन’ म्हणतात. क्लीन रूमच्या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार अशा दालनात धूलीकण, सूक्ष्मजीव, धूर, सूक्ष्मतुषार वगरेंचे प्रमाण काटेकोरपणे नियंत्रित केले जाते. दालनाच्या अंतर्गत भागात सूक्ष्मजीवसुद्धा जिवंत राहू नयेत यासाठी विविध रसायने, उष्णता, अतिनील विकिरण वगरे प्रक्रिया वेळापत्रकानुसार राबवल्या जातात.
स्वच्छतेचे सोपस्कार केल्यानंतरही अशा दालनात ‘संपूर्ण र्निजतुक अवस्था’ फार काळ टिकत नाही. आणि काही सूक्ष्मजीव इतके तरबेज आणि हिकमती असतात की कोणत्याही प्रक्रियेला न जुमानता दालनात कोठेतरी तग धरून राहतातच. चिवट तरी  किती, काही सूक्ष्मजीवांचे उच्चाटन होत नाही  म्हणजे सगळे मुसळ केरात? नाही! ‘शून्य सजीव संख्या’ अशक्य असली तरी अशा दालनात किती प्रकारचे सजीव, मुख्यत्वे सूक्ष्मजीव आहेत याची शास्त्रशुद्ध नोंद ठेवायची. सूक्ष्मजीवांची नियमित जनगणना करायची. वारंवार अपडेट होणारा हा माहितीसाठा (क्लीन रूम बायोबर्डन डेटाबेस) संदर्भ म्हणून वापरायचा. जेणेकरून मोहिमेवरून परतलेल्या अवकाशयानात किंवा परग्रहावरून आणलेल्या नमुन्यात एखादा सजीव आढळलाच तर संबंधित सजीव पृथ्वीवरचाच आहे की परग्रहावरून आलेला अभ्यागत आहे हे शास्त्रीयदृष्टय़ा पडताळून पाहता येते. जगभरातील विविध अवकाशयान जुळणी क्लीन रूम्समध्ये आजवर आढळलेल्या विविध जीवाणूंच्या प्रजातींनी शंभरचा आकडा कधीच ओलांडलाय. नवी बातमी अशी आहे की अशा दोन स्पेसक्राफ्ट क्लीन रूम्समध्ये एक पूर्णत नवीन जातीचा जीवाणू आढळला आहे. टर्सीकोकस फिनिसिस. ‘टर्सी’ या लॅटिन शब्दाचा अर्थ आहे स्वच्छ. ‘कोकस’ म्हणजे दाणा किंवा बेरीसारखा गोलाकार (सोबतचे छायाचित्र पहा). हा गोलपेशीय जीवाणू क्लीन रूममध्ये सापडला म्हणून ‘टर्सीकोकस’ आणि मंगळ मोहिमेसाठीच्या फिनिक्स अवकाशयान जुळणीच्या क्लीन रूममधे आढळला म्हणून ‘फिनिसिस’. निर्मलगोलेराव फिनिक्सकर! सर्वप्रथम २००७ साली फ्लोरिडा येथील आणि नंतर २००९ साली दक्षिण अमेरिकास्थित फ्रेंच गयाना येथील अवकाशयान जुळणी दालनात तो आढळला. याची ओळख निश्चित करण्यासाठी अत्याधुनिक जैवरासायनिक, जनुकीय चाचण्या घेण्यात आल्या. क्लीन रूम्समध्ये आजवर सापडलेल्या तसेच सूक्ष्मजीवशास्त्राला ज्ञात असणाऱ्या समस्त सूक्ष्मजीवांशी तुलना केल्यानंतर या जीवाणूशी तंतोतंत जुळणारा एकही जीवाणू सध्याच्या डेटाबेसमधे नाही हे सिध्द झाले.
टर्सीकोकसचे काही गुणधर्म मायक्रोकोकस, आथ्रेबॅक्टर  या अवकाशयान क्लीन रूम्समधील परंपरागत भाईबंदांशी मिळतेजुळते असले तरी वंशवृक्षाच्या या शाखेनंतर त्याचे गुणधर्म कोणाशीही जुळत नाहीत. म्हणूनच जीवाणूंच्या वंशवृक्षावर मायक्रोकोकेसी कुटुंबामध्ये या नवागताला एक नवीन शाखा बहाल केली गेली. प्रमाणित नियमांनुसार विशिष्ट दोन अक्षरी नावही देण्यात आले. ‘‘टर्सीकोकस फिनिसिस’’. चार वर्षांच्या क्लिष्ट शास्त्रीय विश्लेषणानंतर नवीन जाती, नवीन प्रजाती अर्थात जीनस नोवा, स्पिसिज नोवा हा दर्जा मिळालेला हा जीवाणू नुकत्याच प्रकाशित झालेल्या शोधनिबंधात आपल्या खास नावासह झळकला. ‘आजवर माहीत नसलेला जीवाणू शोधला’ याचा जल्लोष करावा की ‘हा जीवाणू नेमका अवकाशयान क्लीन रूममध्ये सापडला’ याचा विषाद मानावा? या द्विधावस्थेत अडकून पडायलाही क्लीन रूमच्या कर्मचाऱ्यांना उसंत नाही. कारण त्यांच्यासमोर प्रश्नांचा चक्रव्यूह आहे. अवकाशयान जुळणी क्लीन रूम्समधील पारंपरिक जीवाणूंच्या तुलनेत कमी आयुधे असतानाही टर्सीकोकस अशा दालनात जिवंत कसा राहू शकतो? क्लीन रूम्सच्या र्निजतुकीकरण प्रक्रियेत नेमके कोणते बदल केल्याने टर्सीकोकस आणि किंवा तत्सम जीवाणूंची वाढ आणि प्रसार रोखता येईल? सूक्ष्मजीवांच्या तपास आणि मापनाच्या (बायोडिटेक्शन आणि बायोअ‍ॅसे) प्रचलित प्रक्रिया अधिक संवेदनशील कशा बनवता येतील? या प्रश्नांची उत्तरे आगामी संशोधनातून अपेक्षित आहेत.हा विषय केवळ अवकाशजीवशास्त्रापुरता मर्यादित नाही. कारण अवकाशयान जुळणी केंद्रांव्यतिरिक्त अगदी हुबेहूब तशाच, अनेक क्लीन रूम्स आपल्या आजूबाजूला कार्यरत आहेत. उदा. ऑपरेशन थिएटर्स, अति दक्षता कक्ष, साथीच्या रोगांच्या रुग्णांसाठीचे आयसोलेशन वॉर्ड्स, संसर्गजन्य रोगाणू हाताळणाऱ्या जैविक कचरा असलेल्या प्रयोगशाळा, एकाच कँपसवर हजारो प्रकारचे सूक्ष्मजीव साठवून ठेवणारी कलेक्शन सेंटर्स, पेटंटेड सूक्ष्मजीव वापरणाऱ्या जैवतंत्रज्ञान आणि फार्मा कंपन्यांच्या प्रयोगशाळा आणि पॅकेजिंग युनिट्स, सेमीकंडक्टर निर्मिती कक्ष इत्यादी. टर्सीकोकसचे संशोधन प्रसिद्ध झाल्यानंतर एक गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. नकोशा सूक्ष्मजीवांचा नायनाट करण्यासाठी आपण एकीकडे अधिकाधिक उग्र प्रतिजैविके विकसित करतोय. पण दुसरीकडे आपणच क्लीन रूम्स व तत्सदृश अतिविषम, अनसíगक पॉकेट्समधे जीवाणूनाशक अस्त्रांचा पाडाव करण्यासाठी सूक्ष्मजीवांना रीतसर निमंत्रण व प्रशिक्षण देतोय का ? अशा मानवनिर्मित परिसंस्थांमधील अतिनियंत्रित, अतिविषम वातावरण सूक्ष्मजीवांच्या ‘सुपरबग्ज’ आवृत्ती तयार होण्यास मदत तर करत नसेल? एकीकडे जीवाणूरोधी अस्त्रनिर्मितीचे अद्ययावत कारखाने आणि दुसरीकडे सुपरबग्जसाठी मोफत प्रशिक्षण केंद्रे ? नजीकच्या भविष्यकाळात हा विरोधाभास मावळण्याची शक्यता नाममात्र आहे. तो अधिक गडद होणार की काहीसा निवळणार हे आपल्या संशोधनाची दिशा आणि एकूणच जीवनशैली यांवर अवलंबून असेल.
 

chemical manufacturing industries in india stock market share prices
क्षेत्र अभ्यास अजब रसायन बाजार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
tripurari
लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
loksatta kutuhal artificial intelligence and research in mathematics
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गणितातील संशोधन
loksatta kutuhal artificial intelligence for good governance
कुतूहल : उत्तम प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
Dhirendrakrishna Shastri makes unscientific claims promote superstition under guise of spirituality
धीरेंद्रकृष्ण यांच्या कार्यक्रमास अंनिसचा विरोध, अंधश्रध्देस खतपाणी घालणाऱ्यांना परवानगी दिल्याबद्दल नाराजी