वैज्ञानिकांनी आता जैविकदृष्टय़ा विघटनशील असलेली विजेरी (बॅटरी) तयार केली असून ती साखरेवर चालते. चार्जिग न करता ती प्रदीर्घ काळ चालू शकते. येत्या तीन वर्षांत आपले सेलफोन, टॅबलेट, व्हिडीओ गेम व अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी लागणारी ऊर्जा या बॅटरीतून मिळू शकेल. व्हर्जिनिया टेक या संस्थेच्या संशोधक पथकाने ही बॅटरी तयार केली असून तिची ऊर्जा घनता जास्त आहे. त्यामुळे ती आपल्या नेहमीच्या बॅटरींपेक्षा वेगळी आहे. ही बॅटरी स्वस्त, पुनर्भरणयोग्य व जैविकदृष्टय़ा विघटनशील आहे. साखरेवर चालणाऱ्या बॅटऱ्या नाहीत असे नाही पण ही बॅटरी जास्त ऊर्जा घनतेची असल्याने ती जास्त काळ चालते. कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर अँड लाइफ सायन्सेस या संस्थेतील जैवयंत्रणा अभियांत्रिकी संस्थेचे सहाय्यक प्राध्यापक वाय. एच. पेरसिवल झांग यांनी सांगितले की, साखर हा ऊर्जेचा साठा करणारे संयुग आहे. त्यापासून पर्यावरणस्नेही मार्गाने नैसर्गिकरीत्या ऊर्जा मिळवता येते. सध्या आपण ज्या बॅटऱ्या म्हणजे सेल वापरतो ते कचऱ्यात जातात व नंतर प्रदूषण करतात ती हानी यात टळणार आहे. झांग व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनैसर्गिक म्हणजेच कृत्रिम विकरात एक अशी मार्गिका तयार केली ज्यात साखरेचा सर्व विद्युतभार काढून घेतला जातो व त्याच्या मदतीने वीज तयार केली जाते त्याला एनझायमेटिक फ्यूएल सेल (विकरांवर आधारित इंधन घट) असे म्हणतात. कमी किमतीचे जैव उत्प्रेरक असलेली विकरे वापरून यात स्वस्तात ऊर्जा निर्मिती होते. पारंपरिक बॅटऱ्यांमध्ये प्लॅटिनम या महागडय़ा धातूचा उत्प्रेरक म्हणून वापर केला जातो. इंधन घटांप्रमाणेच साखरेच्या या बॅटरीत माल्टोडेक्सट्रिन या पॉलिसॅकराइडचा वापर केला जातो ते स्टार्चचे हवेशी अंशत: हायड्रोलिसिस करून मिळवतात त्यातून वीज तयार होते व पाणी हे उपउत्पादन त्यात असते ज्याने प्रदूषण होत नाही. यात साखरेच्या द्रावणातील विद्युतभारित इलेक्ट्रॉन हे हळूहळू विकरांच्या मार्फत सोडले जातात. हायड्रोजन इंधन घटात व मेथॅनॉल इंधन घटांपेक्षा या बॅटरी वेगळ्या आहेत कारण यात साखरेचे द्रावण हे स्फोटक किंवा ज्वालाग्राही नसते. ही बॅटरी बनवण्यासाठी जी विकरे व इंधने वापरतात ती जैवविघटनशील असतात. ही बॅटरी पुनर्भरणयोग्य असून त्यात पिंट्ररच्या कार्टिजमध्ये शाई भरतात तशी येथे साखर टाकली जाते, नेचर कम्युनिकेशन्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Feb 2014 रोजी प्रकाशित
साखरेवर चालणारी बॅटरी
वैज्ञानिकांनी आता जैविकदृष्टय़ा विघटनशील असलेली विजेरी (बॅटरी) तयार केली असून ती साखरेवर चालते. चार्जिग न करता ती प्रदीर्घ काळ चालू शकते.
First published on: 08-02-2014 at 12:03 IST
मराठीतील सर्व Sci इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bio batteries powered by sugar