जग कितीही पुढे जात असले तरी आरोग्याच्या समस्या शोधण्यासाठी माणसाला अजून बरीच वष्रे लागतील. माणसाचे कुतूहल त्याच्यापुरते सीमित नाही. त्याची झेप महासागराच्या तळापासून अथांग अवकाशातील घडामोडींविषयी आहे. अमेरिकेच्या सायन्स नियतकालिकाकडून दरवर्षी महत्त्वाच्या दहा वैज्ञानिक घडामोडींचा आढावा घेतला जातो, पण त्यापलीकडेही अनेक प्रकारचे संशोधन झालेले असते. त्यातूनच आपली जीवनशैली पुढे घडणार असते.
कर्करोगावर नवे संशोधन
कर्करोगाचे संशोधन या वर्षी मोठय़ा प्रमाणात झाले आहे. या रोगातील उपचार योजनात बदल करता येण्यासाठी अनेक वष्रे जे संशोधन सुरू आहे त्यात कर्करोगाच्या विरोधात प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या दिशेने प्रयत्न करण्यात आले. कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करण्यापेक्षा टी पेशींच्या माध्यमातून कर्करोगाचा मुकाबला करण्यावर भर देण्यात आला. त्यातून कर्करोगावर एकदम नवीन उपचार पद्धती पुढे आकारास येणार आहे. आज कर्करोगावरील प्रतिकारशक्ती प्रणालीवर जे संशोधन चालू आहे ते १९८० मध्ये फ्रान्सच्या संशोधकांनी शोधलेल्या टी पेशी संग्राहकांवर अवलंबून आहे. टी पेशींवरील या संग्राहकाचे नाव सीटीएलए-४ असून त्यांचा यात मोठा वाटा असतो. आता टेक्सास विद्यापीठाच्या अँडरसन कॅन्सर सेंटरने हा संग्राहक म्हणजे रिसेप्टर टी पेशींना कर्करोग पेशींवर पूर्ण सामर्थ्यांनिशी हल्ला करण्यापासून रोखतो असे दिसून आले आहे. साधारण १९००च्या मध्यावधीत असे दिसून आले, की सीटीएलए-४ या संग्राहकाचे काम रोखले तर टी पेशी प्राण्यांमधील कर्करोगकारक पेशींवर हल्ला करून त्यांची वाढ रोखू शकतात व या कर्करोगकारक पेशी आकुंचन पावतात. तर सीटीएलए-४ हा संग्राहक कर्करोगात खलनायक आहे हे उंदरांवरील प्रयोगात तेव्हाच दिसून आले होते. १९८७ मध्ये सीटीएलए-४ या (सायटो टॉक्सिक टी लिंफोसाइट अँटीजेन-४) टी पेशींवर असलेल्या संग्राहकाचा शोध लागला होता, त्यानंतर १९९६ मध्ये जेम्स अॅलीसन यांनी प्रथम असे दाखवून दिले होते की, उंदरांमध्ये सीटीएलए-४ संग्राहकाचे काम थांबवल्यास टी पेशी कर्करोगकारक पेशींवर हल्ला करून कर्करोगाच्या गाठी कमी करतात. दरम्यानच्या काळात जपानी वैज्ञानिकांनी पीडी-१ या टी पेशींच्या संदर्भात मोठे काम केले आहे. २००६मध्ये वैद्यकीय चाचण्यात कर्करोग्यांवर त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. थोडक्यात, कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यासाठी टी पेशींमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांच्यात जनुकीय बदल करणे आवश्यक आहे. २०११मध्ये चिमरिक अँटीजेन थेरपी किंवा सीएआर थेरपी विकसित करण्यात आली. रक्ताच्या कर्करोगात ती बरीच यशस्वीही ठरली आहे. औषध कंपन्याही आता शरीराची प्रतिकारशक्ती प्रणाली सुधारणाऱ्या औषधात गुंतवणूक करू लागल्या आहेत. असे असले तरी अशाप्रकारे प्रतिकारशक्ती यंत्रणेत बदल घडवून रुग्णांना किती फायदा होईल हे अजून स्पष्ट नाही. यात उपचार अधिक प्रभावी करण्यासाठी काही जैवदर्शक म्हणजे बायोमार्कर्सचा वापर करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.
क्रिसपर (सीआरआयएसपीआर)- जनुके जर नीट काम करू लागली व त्यातील रोगकारक जनुकांचे काम बंद करता आले तर.. हा निबंधाचा विषय नाही, तर जनुक संपादन नावाचे तंत्रज्ञान जिवाणू वापरतात व त्यामुळे ते अनेकदा आपल्याला वरचढ ठरतात असे दिसून आले आहे. आता जिवाणू प्रतिजैविकांना दाद देत नाहीत, कारण त्यांच्यात बदल घडवून ते टिकून राहतात. आता गुरूची विद्या गुरूला या न्यायाने संशोधकांनी हे तंत्र मानवातील जनुकांच्या शस्त्रक्रियेत वापरले असून ते लोकप्रिय ठरत आहे. अनेक प्राणी, वनस्पती, प्राणी व मानवी पेशींमध्ये अशाप्रकारे जनुकांचे चक्क संपादन करण्यात आले. संपादन म्हणजे आपल्याला हवी ती गोष्ट ठेवणे, हवी ती काढणे व शरीरास उपकारक असा जनुक तयार करणे हे तंत्र पुढे नेता आले तरी अनेक रोगकारक जनुके काढून टाकता येतील.१९२० मध्ये सूक्ष्मदर्शकाच्या शोधामुळे शल्य प्रक्रियेत जी क्रांती घडून आली तशीच जिवाणूमधील सीएएस ९ या प्रथिनामुळे होणार आहे. त्यामुळे जनुके बदलणे, दुरूस्त करणे, निष्क्रिय करणे यासाठी लागणारा रेणीवीय साधनांचा संच कालांतराने उपलब्ध होऊ शकेल.
पेरोव्हस्काइट सौरघट- पृथ्वीवर खनिज तेलाचे साठे संपतील त्याला वेळ लागेल हे खरे असले तरी तहान लागल्यावर विहीर खोदण्यात अर्थ नसतो, त्यामुळे आता सर्वाच्या नजरा सौरऊर्जा तंत्रज्ञान अधिक किफायतशीर व कार्यक्षम कसे करता येईल याकडे आहे. आता वैज्ञानिकांनी नव्या प्रकारचे सौर घट म्हणजे सोलर सेल तयार केले असून, ते सिलीकॉन घटांपेक्षा बनवायला सोपे आहेत. हे पेरोव्हस्काइट घट व्यावसायिक सौर घटांइतके कार्यक्षम नाहीत, पण त्यात सुधारणा करता येतील.
रचनात्मक जीवशास्त्रातून लसींची निर्मिती- या वर्षी संशोधकांनी प्रतििपडाचा वापर करून इम्युनोजेनची निर्मिती केली. इम्युनोजेन हा कुठल्याही लसीचा प्रमुख घटक असतो. लहानपणी अनेकांना श्वसनमार्गात सायनॅसायल विषाणूचा संसर्ग होऊन रुग्णालयात जावे लागते. या संशोधनामुळे सायनस, सर्दी यावर लस तयार करता येईल.
मेंदूचे प्रतिमाचित्रण- मेंदूच्या छायाचित्रणासाठी एक क्लॅरिटी हे नवे तंत्रज्ञान वापरले असून त्यात मेंदूचे न्यूरॉन्स पारदर्शकपणे दिसतात. मेंदूच्या अभ्यासात त्यामुळे फरक पडणार आहे. यात मेंदूच्या उतींमधील प्रकाश पसरवणारे मेदाचे रेणू काढले जातात. त्यांच्या जागी विशिष्ट प्रकारचे जेल टाकले जाते. यात न्यूरॉन्सला धक्का लावला जात नाही, त्यानंतर मेंदूची स्पष्ट प्रतिमा पडद्यावर दिसते. त्यामुळे मेंदूतील न्यूरॉन्सची संख्या समजू शकेल. शवविच्छेदनाच्यावेळी मेंदूच्या तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक पद्धतीही बाद होतील.
अवयवाची निर्मिती- मिनी आर्गन्स म्हणजे छोटे मानवी अवयव तयार करून वैज्ञानिकांनी मानवसदृश ऑर्गनॉइड तयार केला आहे. त्यात मानवी अवयव तयार करून ते वापरले आहेत. मानवी रोगांवरील औषधांचे प्रयोग प्राण्यांवर करण्यापेक्षा थेट अशा मानवावर प्रयोग करणे त्यामुळे सोपे होईल. यात यकृत, मेंदू, मूत्रपिंडे तयार करण्यात यश आले आहे. हे ऑर्गनॉइड औषधांचा नेमका काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी प्रारूप (मॉडेल)म्हणून उपयोगी पडतील.
अति नवताऱ्याच्या अवशेषात वैश्विक किरणांचे अवशेष- वैश्विक किरणांचा खरा शोध १०० वर्षांपूर्वी लागला, हे खरे असले तरी अवकाशातून उच्च ऊर्जा कणांच्या रूपातून येणारे वैश्विक किरण नेमके कुठून येतात हे माहीत नव्हते. स्फोट झालेल्या ताऱ्याच्या ढगासारख्या कचऱ्यातून हे वैश्विक किरण येतात असे स्पष्ट झाले आहे.
मानवी गर्भपेशींचे क्लोिनग- संशोधकांनी मानवी स्कंदपेशीपासून क्लोिनग तंत्राने मानवी गर्भाच्या पेशी तयार केल्या. मानवी अंडपेशीतील महत्त्वाच्या व नाजूक रेणूंना स्थिर करण्यात कॅफीन महत्त्वाची भूमिका पार पाडते असे यात आढळून आले आहे. मानवी गर्भपेशींचा संशोधनासाठी वापर करण्यावरून नतिकतेचे अनेक मुद्दे उपस्थित केले जात होते त्याला आता हे वेगळे उत्तर आहे. २००७ मध्ये संशोधकांनी बीव्हरटन येथील ओरेगॉन नॅशनल प्रिमेट रीसर्च सेंटर येथे माकडांच्या गर्भपेशींचे स्कंदपेशींच्या मदतीने क्लोनिंग केले होते.
आपण का झोपतो- उंदरांवरील प्रयोगात असे दिसून आले, की ते झोपतात त्या वेळी न्यूरॉनमधील माíगका अधिक रुंदावतात व सेरेब्रोस्पायनल या अर्धद्रव स्वरूपातील घटकाला वाट मोकळी करून दिली जाते. सेरेब्रोस्पायनल हा अर्धद्रवासारखा घटक शरीराची हानी भरून काढीत असतो, त्यामुळे झोप ही शरीराला फारच आवश्यक असते.
आपले जिवाणू- आपले आरोग्य- जिवाणूंमुळे क्षयापासून अनेक रोग होतात. काही ट्रिलियन जिवाणू आपल्या शरीरात सुखेनव वास्तव्यास असतात. पण यातील काही जिवाणू उपकारकही असतात. त्यामुळे आपल्या शरीरात भाडेकरूसारखे राहणाऱ्या जिवाणूंचा विचार व्यक्तिगत पातळीवर औषधे देताना करावा लागणार आहे. लॅन्सेट नियतकालिकाने केलेल्या संशोधनानुसार सांडपाणी व पेयजल शुद्धीकरण प्रकल्पाच्या ठिकाणीच महाजिवाणू म्हणजे सुपर बॅक्टेरियांची वाढ होत असते, कारण त्यांच्यात बदल होऊन ते इतके निर्ढावतात, की कुठल्याही औषधांना दाद देत नाहीत. इ कोलाय या जिवाणूंचाही त्यात समावेश आहे.(आधारित)
कर्करोग संशोधनात आता प्रतिकारशक्ती यंत्रणा सुधारण्यावर भर
जग कितीही पुढे जात असले तरी आरोग्याच्या समस्या शोधण्यासाठी माणसाला अजून बरीच वष्रे लागतील. माणसाचे कुतूहल त्याच्यापुरते सीमित नाही.
First published on: 31-12-2013 at 06:56 IST
मराठीतील सर्व Sci इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Research on improving the immune system of cancer