सध्याचा जमाना त्रिमितीचा आहे. काही वर्षांपूर्वी शोधलेले एलईडी तंत्रज्ञान वापरात यायला जसा बराच उशीर लागला, तसेच या तंत्रज्ञानाचंही आहे. हे तंत्रज्ञान शोधले गेल्यानंतर आता कुठे त्याचा वापर किफायतशीर दरात करणे शक्य झाले आहे. या तंत्रज्ञानाने तुम्ही चॉकलेटच्या बंगल्यापासून खऱ्या बंगल्यापर्यंत काहीही करता येते. नवीन संशोधनानुसार आता त्रिमिती मुद्रक वापरून २५०० चौरस किलोमीटरचा बंगला अवघ्या २४ तासांत बांधता येतो. दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्रा. बेरहोख खोशनेविस यांनी सांगितले की, या थरावर थर चढवत नेण्याच्या या तंत्रज्ञानाने एका दिवसात तुमच्या स्वप्नातला बंगला साकार होतो. यापुढचा काळ बांधकाम मजुरांच्या पोटावर पाय आणणारा आहे, कारण यंत्रमानव हे बांधकाम कामगार म्हणून काम करतील, फक्त त्यांना काँक्रीट देण्याचा अवकाश आहे. ते लगेच संगणकावर तुमच्या घराचे जे चित्र आहे त्याबरहुकूम जसेच्या तसे घर स्वप्नातून प्रत्यक्षात साकारतील. बांधकामात त्रिमिती तंत्रज्ञानाचा वापर हा असा होणार आहे. कंटूर क्राफ्टिंग हे थरावर थर देत इमारत रचण्याचे तंत्र आहे व त्यात माणसाचे महत्त्व बरेच कमी होणार आहे. घरबांधणीतील अगदी लहानसहान भागही सुबक व अचूक पद्धतीने त्यात तयार केले जातील. त्यात तुम्ही घरांच्या रचनात विविधता आणता येते. अगदी वीज व पाणी जोडणी, वातानुकूलन जोडणीसह घर तयार होते. त्यामुळे घरांच्या निर्मितीचा खर्च कमी होईल हे खरे असले तरी कामगारांची गरजही कमी होईल, पर्यायाने रोजगारही कमी होईल, पण घराचा देखणेपणा, रेखीवपणा हा खूप जास्त असेल. दुसरा फायदा म्हणजे त्रिमिती मुद्रण तंत्राने मोठे सुटे भाग तयार करताना अचूकता तर येईलच, पण वीजही कमी वापरली जाईल, यांत्रिक बाहूंच्या मदतीने संगणक नियंत्रित गँट्री सिस्टीम नोझल पुढे-मागे करून वापरली जाईल. इतर ग्रहांवर वस्ती करायची असेल तरीही तेथे आवश्यक तशी घरे बनवण्यात या तंत्राचा वापर करता येईल असे संशोधकांचे मत आहे. चंद्र व मंगळावर वस्ती करण्याच्या योजना नाहीतरी आखल्या जात आहेतच. तेथे हे तंत्रज्ञान उपयोगी पडणार आहे, या तंत्रात थरावर थर दिले जातात, त्यामुळे  फॅब्रिकेशनचे फिनिशिंग म्हणतात ते अगदी सफाईदार होईल. त्यात साचेबंदपणा असणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा