मानवासाठी मंगळ हा नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे. त्याला कारणही तसंच आहे. रात्रीच्या निरभ्र आकाशाकडे बघताना आपल्या पूर्वजांना पाच प्रमुख बाबी लक्षात आल्या होत्या. सर्व प्रथम म्हणजे रात्रभरात सर्व ताऱ्यांचा प्रवास पूर्वेकडून पश्चिमेस होत असतो अगदी सूर्यासारखा. दुसरी बाब म्हणजे हे तारे एकमेकांपासून समान अंतरावरच असतात. म्हणजे असे की, जर आकाशात आपण काही ताऱ्यांना जोडून एखाद्या आकृतीची कल्पना केली तर ती आकृती बदलत नाही. तिसरी बाब म्हणजे सूर्याच्या तुलनेत दररोज ते थोडे लवकर उगवतात. त्यामुळे एखाद्या रात्री जे तारे एका ठराविक वेळी बरोबर डोक्यावर असतात ते तारे काही दिवसांनी आपल्याला त्याच दिवशी थोडे पश्चिमेला दिसतात तर त्या ताऱ्यांची जागा दुसऱ्याच ताऱ्यांनी घेतलेली असते. असे करत बरोबर एक वर्षांनी हेच तारे आपल्याला रात्रीच्या त्याच वेळी बरोबर डोक्यावर दिसतात. चौथी बाब म्हणचे यात ‘पाच’ तारे असे आहेत की ज्यांची जागा इतर ताऱ्यांच्या तुलनेत बदलत असते. म्हणजे हे पाच तारे इतर ताऱ्यांच्या तुलनेत स्वतंत्ररित्या नभांगणावर प्रवास करतात. पाचवी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्या प्रवासाचा मार्ग निश्चित आहे किंवा कसे याचा आपल्या पूर्वजांना उलगडा झाला नव्हता. सहसा ह्या पाच ताऱ्यांचा प्रवास इतर ताऱ्यांच्या तुलनेत पश्चिमे कडून पूर्वेस होत असतो पण मग कधीतरी हे तारे पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करताना दिसतात पण लगेच काही दिवसांनी ते परत पश्चिमे कडून पूर्व दिशेला जाताना दिसतात. बरं त्यांच्या अशा प्रकारे नभांगणावर भटकण्याचा कुठलाच नियम दिसून येत नव्हता. या भटक्याना पाश्चात्य देशात प्लॅनेट म्हणजेच भटके म्हणण्यात आलं तर भारतात आपण यांना ग्रह म्हणतो. ग्रहांची अशी पश्चिमेकडून पूर्वेला जात असताना दिशा बदलून पूर्वेकडून पश्चिमेला जाण्यास आपल्या पूर्वजांनी ग्रहाचं वक्रीभवन असे नाव दिले. कालांतराने असे ही लक्षात आले, की ग्रहाच्या वक्री जाण्याच्या काळात तो ग्रह अधिक प्रखर दिसतो.
ग्रहांच्या चलनाचे हे रहस्य सोडवण्याकरता टायको ब्राहे यांनी अनेक अचूक निरिक्षणे घेतली होती. या निरिक्षणांचा उपयोग योहांन्स केप्लरने केला. ग्रहांच्या गतीचे रहस्य सोडवले. त्यांनी ग्रहाच्या गती बद्दल आपल्याला तीन नियम दिले आणि यातील पहिला नियम होता की ग्रह हे सूर्याभोवती परिक्रमा करतात आणि त्याच्या परिक्रमेची कक्षा ही लंब वर्तुळाकार असते.
यातूनच ग्रहाच्या वक्री चलनाचे कारणहीआपल्याला दिसून येते. ज्या काळात आपल्याला एखाद्या ग्रहांचे वक्री चलन दिसते त्या काळात ग्रह आणि पृथ्वी यांच्यातील अंतर देखील कमी असतं. आणि स्वाभाविक तो ग्रह आपल्याला मोठा दिसतो. आणि त्याचे निरिक्षण पण चांगल्या प्रकारे होऊ शकतं.
मंगळ ग्रहाचे असेच निरीक्षण इटलीतीत जियोवानी शापरेली या प्रख्यात खगोल निरीक्षकांनी केले. त्याना मंगळावर काही खुणा परत परत दिसल्या आणि मग त्यानी मंगळाचा नकाशा बनवण्यास सुरवात केली. या नकाशात त्यानी मंगळावर काही रेषा एकमेकांना छेदून जात असल्याचे दाखवले.त्यांना इटलीत कनाली (म्हणजे खाचा सारखे) असे म्हंटले. ते वर्ष होते १८७७. जेव्हा ही बातमी इंग्लंड मध्ये पोचली तेव्हा या कनाली चे भाषांतर कॅनॉल असे झाले आणि लोकांच्या कल्पना शक्तीला जणू पंखच फुटले.
मंगळावर आपल्या सारखे किंवा आपल्याहूनही अधिक प्रगतीशी असे सजीव आहेत आणि त्यानी मंगळाच्या ध्रुवीय भागातून विषुववृत्तीय भागावर पाणी पोचवण्याकरिता हे कॅनॉल बांधले आहेत असा समज पसरू लागला. मंगळावरच्या कथित प्रगत सजीवांचा हा प्रचार करण्यात अग्रस्थानी होते अमेरिकेचे धनवान उद्योगपती पर्सव्हिल लॉवेल. यानी आपल्या आयुष्याचे दोनच उद्देश ठेवले होते – एकतर मंगळाचे निरीक्षण करणे आणि जेव्हा आकाशात मंगळ नसेल तेव्हा मंगळाच्या या प्रगत सजीवांबद्दल व्याख्याने देत जगभर प्रवास करणे. तसेच मंगळाचे निरीक्षण करणाऱ्या संस्था अस्तित्त्वात आल्या आणि मंगळाचे निरीक्षण करून मंगळावरच्या प्रगत सजीवांबद्दल बोलणाऱ्यांची संख्याही वाढत गेली. खरतर कुणाचीच निरीक्षणे बरोबर नव्हती पण ‘तेरी भी चुप और मेरी भी चुप’ या न्यायाने हा सर्व खेळ चालू होता. याच काळात काही शास्त्रज्ञ या प्रगत सजीवांच्या अस्तित्वाच्या विरूद्ध बोलत होते. पण त्यांच कोणी ऐकायला तयार नव्हते. प्रख्यात विज्ञान कादंबरीकार एच जी वेल्स यानी ‘वॉर ऑफ द वर्ल्ड’ ही कांदबरी लिहिली. यात त्यांनी मंगळवासी पृथ्वीवर आक्रमण करून पृथ्वी काबीज करण्याचा कसा प्रयत्न करतात आणि मग हे आक्रमण आपण कसे मोडून काढतो याच वर्णन केले होत. या कादंबरीचे रेडियो नाट्यरूपांतर तर इतक प्रभावी झाले होते की लोकांना ते खरं वाटलं होतं. जेव्हा अनेक जण निरीक्षणे घेऊ लागलो आणि मंगळावर आपल्यासारखे सजीव आहेत या कल्पनेच भूत उतरू लागलं आणि गायब देखील झालं. पण त्याचबरोबर शास्त्रज्ञांचे मंगळ प्रेम वाढू लागल होतं. निरीक्षणातून मंगळ हा बहुतांशी पृथ्वी सारखाच ग्रह आहे आणि कधी काळी यावर सजीव अगदी सूक्ष जीवांच्या स्वरूपात का असेना,असले पाहिजेत हा शोधाचा विषय होऊ लागला. भविष्यात मंगळावर आपण राहू शकू या कल्पनेने माणसाच्या मनाची पकड घेतली. मंगळाच्या दिशेने अंतराळ याने पाठवण्यात येऊ लागली. काही यानांनी मंगळावर उतरून मंगळाच्या पृष्ठ भागाची निरीक्षणे पाठवली. या सर्व मोहिमा अमेरिकेच्या नासा या संस्थेच्या होत्या. आज मंगळावरून क्युरिऑसिटी यान आपल्याला मंगळाबद्दल महत्वाची पूर्व माहिती पाठवत आहे. आणि त्यात भर पडणार आहे, भारताच्या इंडियन स्पेस रीसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोच्या मंगलयानाची. या पाश्र्वभूमीवर येत्या काही अंकात आपण मंगळाच्या दिशेने पाठवण्यात आलेल्या मोहिममांची चर्चा करूया.
विज्ञान पानासाठी लेख पाठवण्याचा पत्ता- निवासी संपादक, लोकसत्ता एक्सप्रेस हाऊस प्लॉट नं. १२०५/२/६ शिरोळे रस्ता, शिवाजीनगर पुणे-४ अथवा rajendra.yeolekar@expressindia.com
जिज्ञासा : मंगळाविषयीचे कुतूहल
मानवासाठी मंगळ हा नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे. त्याला कारणही तसंच आहे. रात्रीच्या निरभ्र आकाशाकडे बघताना आपल्या पूर्वजांना पाच प्रमुख बाबी लक्षात आल्या होत्या. सर्व प्रथम म्हणजे रात्रभरात सर्व ताऱ्यांचा प्रवास पूर्वेकडून पश्चिमेस होत असतो अगदी सूर्यासारखा.
First published on: 19-03-2013 at 12:01 IST
मराठीतील सर्व Sci इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curiosity about mars topic