मागच्या लेखाच्या संदर्भात उस्मानाबाद येथील अनिल ढगे यांचा प्रश्न आहे, की जर विश्व नुसतेच प्रसरण पावत नसून त्याची गतीही वाढत आहे, तर परिस्थिती एक प्रकारे ब्रेक फेल झालेल्या वाहनासारखी तर नाही ना, आणि विश्व भरकटत तर जात नाही ना?  तसेच, जर असे विश्वाचे प्रसरण होत असेल तर पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर व पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची गती यात धोकादायक बदल होइल का?  ही शंका रास्त आहे.
तर आपण प्रश्नाचा दुसरा भाग आधी बघू या. विश्व पसरत आहे म्हणजे त्यातील सर्व तारकाविश्व एकमेकांपासून दूर जात आहेत. कल्पना करा, की एका रेल्वेच्या स्टेशनवर तुम्ही एका गाडीत आणि तुमचा मित्र दुसऱ्या गाडीत आहात. दोन्ही गाडय़ा आता विरूद्ध दिशेला निघाल्या आहेत. म्हणजे तुम्ही आणि तुमचा मित्र वेगाने एक दुसऱ्यापासून दूर जात आहात. पण तुमच्या स्वतच्या गाडीत तुम्ही पुढे-मागे होऊ शकता. तुमच्या गाडीत तुम्हाला एक विशिष्ट दिशेनेच जायचे बंधन नाही. अर्थात तुम्ही गाडीतून बाहेर उडी माराल ही शक्यता आपण धरत नाही, तर विश्वात पसरणाऱ्या या तारकाविश्व किंवा दीर्घिकाच फक्त एकमेकांपासून दूर जात आहेत. या दीर्घिकाच स्वतच्या अक्षाभोवती परिक्रमा करत आहेत. तसेच या तारकाविश्वतील तारे आणि ताऱ्यांबरोबर त्यांचे ग्रहदेखील तारकाविश्वाच्या केंद्राभोवती परिक्रमा करत आहेत. आता विश्वाचे प्रसरणदेखील सैरभैर नाही. सर्व तारकाविश्व एकमेकांपासून दूर जात आहेत पण त्यातही लहान लहान बदल घडत आहेत. म्हणजे असे, की काही तारकाविश्वांचा समूह एका केंद्राभोवती परिक्रमा करत आहे आणि हे केंद्र दूर जात आहे, तर काही तारकाविश्वांची आपापसात टक्कर होत आहे.  या टकरीतून नवीन तारकाविश्व जन्माला येत आहेत. अशा अनेक गोष्टी विश्वात घडत आहेत. आणि या सर्व गोष्टीचा पृथ्वीला किंवा आपल्याला धोका होण्याची गोष्ट ; तर हे सर्व घडायला जो वेळ लागतो तो कोटीच्या कोटी वर्षांचा आहे. त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर काहीच परिणाम होणार नाही. अगदी जरी आपल्या आकाशगंगेची दुसऱ्या एका तारकाविश्वाशी टक्कर झाली तरी त्याचा परिणाम आपल्यावर तसा होणार नाही. आज अनेक वर्षे उलटली तरी नेहमी या विषयावर चर्चा करताना मलाच एक गंमत वाटते आणि ती म्हणजे फक्त आकाशातून येणाऱ्या प्रकाशाच्या माध्यमातून केवढं मोठं विज्ञान मानवाने तयार केले आहे. गेल्या वेळी सांगितले त्या प्रमाणे ग्रहांचे गणित शास्त्रज्ञांना सुटत नव्हते हे खरं होतं. आणि ते सोडवण्याकरता काही तरी चांगल्या गणिताचा शोध लागायला हवा होता. ते त्या काळातील शास्त्रज्ञांना कळून चुकलं होतं. असं तर नसेल, की कदाचित ग्रहांची आकाशातील अचूक स्थितींची माहिती नसल्यामुळे गणित चुकत असेल. असाच विचार केला होता टायको ब्राहे याने. तो अनेक विद्य्ोत पारंगत होता.  त्याने एका बेटावर एक संस्थानच उभारलं होतं.आणि इथे त्याने ग्रहांचे अचूक वेध घेण्याकरता अनेक उपकरणे स्वत बनवली होती.  त्यालाही कोपíनकसच्या सूर्यकेंद्रित विश्वाच्या संकल्पनेची माहिती होती. आणि बऱ्याच अंशी त्याला हेही पटत होतं, की जर ग्रहांना सूर्याभोवती फिरवलं तर गणित सोपं होत होतं. पण असं म्हणण्याचे परिणाम त्याला माहिती होते. त्यामुळे त्याने ही कल्पना पुढे आणण्याचा प्रयत्न केला, की ग्रह हे सूर्याभोवती फिरतात पण सूर्य पृथ्वीभोवती फिरतो – म्हणजे एकूण एकच, की विश्वाचे पृथ्वी हे केंद्र अबाधित राहत असे पण त्याचबरोबर ग्रहांचं गणित सोपं होतं.  पण टायको ब्राहेने माती खाल्ली ती गणितात. तो गणितात कच्चा होता. आणि त्याला आपल्या निरीक्षणांवरून स्वतच्या पृथ्वीकेंद्रित विश्वात ग्रहांचे सूर्याभोवती परिक्रमा करणे हा सिद्धांत प्रचलित करून मोठेपणा मिळवायचा होता.  त्या साठी त्याने जोहान्स केप्लर या गणितज्ञाला नोकरीवर ठेवले. केप्लर आपल्याला डावलेल या भीतीने ब्राहेने केप्लरला आपली सर्व निरिक्षणे कधीच दिली नाहीत आणि तो केप्लरला सदा हिणवतही असे. पण शेवटी केप्लरला हवे ते मिळाले आणि त्यानेआपल्याला दिले ग्रहांचे गणित – सोपे आणि सुटसुटीत. हे नंतर लक्षात आले, की केप्लरचे गणित फक्त ग्रहांपुरते मर्यादित नव्हते तर ते गणित स्वतंत्रपणे एकमेकांभोवती परिक्रमा करणाऱ्या कुठल्याही दोन खगोलांनाही (दोन तारे किंवा अगदी दोन तारकाविश्वही) तितकेच लागू पडते.
 paranjpye.arvind@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा