भारत देशाला अतिपुरातन इतिहास आहे. आपल्या देशातील कानाकोपऱ्यातील देवस्थाने, ऐतिहासिक वास्तू, किल्ले, कोरीव शिल्पे, शिलालेख, पत्रव्यवहार, भग्नावस्थेत सापडलेल्या विविध  प्रकारच्या वस्तू असा फार मोठा ठेवा आहे. परंतु ती भूतकाळातील संपत्ती बऱ्याच प्रमाणात विस्कळीत, दुर्लक्षित किंवा योग्य स्वरूपात न अभ्यासलेली आहे. भारतीयांनी जागतिक इतिहास घडविला परंतु त्या इतिहासाचे जतन केले नाही, असे उपहासात्मक सांगितले जाते.
विशेषत: भारतभर अनेक  राजघराण्यांनी राज्ये केली. त्या राजघराण्यांचे परस्पर संबंध विशेष सलोख्याचे नव्हते. एकमेकांत शत्रुत्व असल्याने शेजारच्या राजघराण्यावर हल्ले चढविणे, लुटून नेणे, तेथील ऐतिहासिक वास्तूंची तोडफोड करणे मोठय़ा प्रमाणात  घडले. गेल्या शतकभरात प्रथम इंग्रज राज्यकर्त्यांनी आणि स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेनुसार पुरातत्त्व विभाग (आर्किओलॉजी) स्थापन करून ऐतिहासिक ठेवा सुरक्षित ठेवण्यास सुरुवात झाली. काही राजघराण्यांनी प्रथम मोगलांना आणि नंतर इंग्रजांना कडाडून प्राणपणाने लढून विरोध केला. म्हैसूरचा टिपू सुलतान याने आपले साम्राज्य कायम ठेवण्यासाठी आयुष्यभर लढत दिली. टिपूच्या प्रखर विरोधामुळे दक्षिण भारतात इंग्रजांना साम्राज्य विस्तारणे खूप कठीण गेले. म्हैसूरजवळील श्रीरंगपट्टम या ठिकाणी अद्यापही शाबूत असलेला टिपूचा भव्य राजवाडा, भारतीय दर्जाची एक ऐतिहासिक वास्तू आहे. अठराव्या शतकात उभारलेल्या टिपूच्या साम्राज्यात हैदर अली आणि टिपू सुलतान यांनी इंग्रज सैन्याला सळो की पळो केले होते. इंग्रजांकडे उखळी तोफा, दूरवरून नेम साधता येणाऱ्या बंदुका आणि कडव्या शिस्तीचे पायदळ, घोडदळ यामार्फत अनेक राजघराणी सहजपणे नष्ट करता आली. राज्ये खालसा करता आली. विशेषत: टिपू सुलतानने इंग्रज सैन्यावर दूरवरून रॉकेट्स (अग्निबाण) डागून प्रचंड नुकसान केले होते. अलीकडच्या संशोधनानुसार टिपू सुलतानच्या राजवाडय़ाच्या एका भागातून अग्निबाण सोडले जात असत. अशा निश्चित खाणाखुणा सापडल्या आहेत. २००६ मध्ये शिवानू पिल्ले नावाच्या संशोधकाने टिपूच्या राजवाडय़ाच्या मागील एका भागात वेगवेगळी रासायनिक द्रव्ये पदार्थ, स्फोटके, मिश्रणे तयार करण्याच्या खाणाखुणांची निश्चिती केली होती. रसायनांचा वापर करून स्फोटक मिश्रणे (एक्स्प्लोसिव्ह मिक्सर्स) राजवाडय़ात तयार करण्याचा कारखाना कागदपत्रांवरून निश्चित केला होता. हेरखात्यामार्फत इंग्रज सैन्याच्या श्रीरंगपट्टणच्या जवळपास हालचाली लक्षात घेऊन साधारण तीनचार मैलांच्या अंतरावरून अग्निबाण फेकले जाऊन इंग्रज सैन्याचा धुव्वा उडविला जात असे. इंग्रजी फौज श्रीरंगपट्टणच्या जवळपास आक्रमण करू शकत नसे. अनेक वेळा हल्ले परतावून लावल्याची नोंद कागदपत्रांवरून उपलब्ध झालेली आहे. टिपूच्या प्रशस्त राजमहालातून आकाशमार्गाने अग्निबाण इंग्रजी फौजेवर कोसळत असत आणि त्यामुळे इंग्रजांची वाटचाल रोखली जात असे. अशा स्वरूपाच्या वृत्तान्त इंग्लंडमधील ‘रॉयर आर्टिलरी म्युझियम’मध्ये लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. २००९ पासून भारतीय सैन्यदलातील संशोधन विभागातील शास्त्रज्ञ, टिपू सुलतानच्या अग्निबाण विज्ञानाबद्दल संशोधन करीत होते. त्या विभागातील ज्येष्ठ संशोधक डॉ. सिल्व्हमूर्ती यांनी टिपूच्या राजवाडय़ातील मागील बाजूच्या भागातून अग्निबाण इंग्रज सैन्यावर फेकले जात असत, असे उत्खननामार्फत नुकतेच सिद्ध केले आहे. सिल्व्हमूर्तीच्या संशोधनानुसार भारतातील अग्निबाण विज्ञान सर्वप्रथम विकसित करून त्याचा इंग्रज फौजांविरुद्ध यशस्वी वापर केला असे सप्रमाण सिद्ध केले आहे. त्या राजवाडय़ातील साधारण तीस फूट उंच व दोन फूट रुंदीच्या भक्कम भिंतीच्या संशोधनातील महत्त्वाचा टप्पा आहे.  भिंतीतील माती, चुना इ. मटेरियलचे पृथक्करण केल्याने ती वास्तू अठराव्या शतकातील असल्याचे निश्चित होते. काही ठिकाणी अग्निबाणाला भक्कम रेटा देण्याच्या तळाच्या बांधकामाची माहिती मिळाली आहे. सिल्व्हमूर्तीच्या या संशोधनाला जागतिक दर्जाचे अग्निबाण संशोधक भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनीही दुजोरा दिला आहे.