नवे वर्ष सुरू झाले; त्याच्या उदरात काय दडले आहे हे सांगणे कठीण आहे. विज्ञान क्षेत्रात प्रत्येक वर्षी त्यातील शोधांनी मानवी जीवन समृद्ध होत असते. नवीन संशोधन हा अगोदरच्या वर्षांतील घडामोडींचाच विस्तारित भाग असतो. या वर्षांत विविध क्षेत्रात क्रांतिकारी संशोधन घडून येण्याची अपेक्षा आहे.

मूलपेशी
सध्याच्या काळात मूलपेशी उपचारांना फार महत्त्व प्राप्त झाले आहे.मूलपेशींच्या मदतीने नवीन अवयवच तयार करता येऊ शकतात, त्यामुळे पुनर्नवीकृत विज्ञान (रिजनरेटिव्ह मेडिसिन) या शाखेत बरीच प्रगती अपेक्षित आहे. मानवी गर्भातील मूलपेशींचा वापर करून अंधत्व दूर करण्याचे प्रयोग सुरू आहेत. कॅलिफोर्नियातील ‘अ‍ॅडव्हान्सड सेल टेक्नॉलॉजी’ ही संस्था किमान तीसहून अधिक रूग्णांवर मानवी गर्भपेशीपासून मिळवलेल्या रेटिनल पेशींचा प्रयोग करणार आहे.

महाविस्फोटाच्या पाऊलखुणा
विश्वाची निर्मिती महाविस्फोटातून झाली असे म्हणतात. विश्वाच्या बाल्यावस्थेवेळच्या लहरींच्या अवशेषांचे निरीक्षण प्लांक दुर्बीण करणार आहे, त्यात त्यावेळच्या गुरूत्वीय लहरींचा समावेशही असणार आहे.

गुरूत्वाचे स्पष्टीकरण
गेल्यावर्षी आपण नवीन बोसॉन कणाचा शोध लावला असला तरी स्टँडर्ड मॉडेल थिअरीच्या आधारे अणूपेक्षाही सूक्ष्मकणांचे स्पष्टीकरण केले असले तरी गुरूत्वाचे स्पष्टीकरण करता आलेले नाही. विश्वाचे प्रसरण वेगाने का होते हे समजलेले नाही. विश्वाच्या आकलनाविषयीचा अधिक परिपूर्ण सिद्धांत मांडावा लागणार आहे. त्यासाठी २०१४ मध्ये लार्ज हैड्रॉन कोलायडरचा प्रयोग करणाऱ्या विविध संस्था त्यांची सगळी माहिती एकत्र करून त्याचा नवा अर्थ लावतील. मार्चमध्ये ला थुले येथे उच्च ऊर्जाशक्ती भौतिकशास्त्र परिषद होत असून ते या दिशेने पहिले पाऊल असेल. जीनिव्हातील सर्न प्रकल्पातील लार्ज हैड्रॉन कोलायडर हे महायंत्र आता २०१५ पर्यंत बंद ठेवले जाणार आहे.

कृष्ण वस्तुमान
विश्वातील बरेचसे वस्तुमान कुठे हरवले आहे, त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नवीन वर्षांत कृष्ण वस्तुमान म्हणजे डार्क मॅटरचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी ‘लेक्स’ नावाचा प्रयोग अमेरिकेत दक्षिण डाकोटा येथे केला जाणार आहे. सध्या निरूपयोगी असलेल्या एका सोन्याच्या खाणीत हा प्रयोग केला जाणार आहे.

अंतराळ मोहिमा
नासाचे ‘लाडी’ नावाचे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत जाऊन तेथील चांद्रधुळीचा अभ्यास करणार आहे. नासाच्याच ‘मावेन’ मोहिमेत मंगळाच्या वातावरणातील वरच्या भागातील घटकांचा अभ्यास केला जाणार आहे. क्युरिऑसिटी रोव्हर गाडीकडून आणखी छायाचित्रे मिळणार आहेत. चिली येथील मोठय़ा डिश अँटेनाचे काम पूर्ण होणार आहे. भारताच्या मंगळयान मोहिमेची पूर्वतयारी सुरू झाली असून त्यात आणखी प्रगती अपेक्षित आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये पीएसएलव्ही प्रक्षेपकाच्या मदतीने मंगळयान झेपावणार असून ते तीनशेहून अधिक दिवस मंगळाच्या कक्षेत राहणार आहे. चीनही स्पर्धेत मागे राहणार नाही; त्यांचे ‘चेंज-२’ हे अंतराळयान चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे.

कर्करोग
आपल्या आतडय़ात अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव असतात. आहार व रोग यांच्यातील ते एक दुवा आहेत. विशेष म्हणजे कर्करोगाशी याचा संबंध आहे. इशेरिया कोलाय (इ.कोलाय) जिवाणूंच्या जास्त प्रमाणामुळे उंदरांना आतडय़ाचा कर्करोग होतो, तसेच आतडय़ांचा दाह निर्माण होतो. आतडय़ातील जिवाणूंवर आहाराचा काय परिणाम होतो याचा अभ्यास यावर्षी आणखी पुढे जाईल. ग्लॅक्सोस्मिथकलाईन या कंपनीच्या ट्रामेटिनिब या त्वचेच्या कर्करोगावरील औषधाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

महासागर तळांचा अभ्यास
अमेरिकेतील महासागर वेधशाळांनी महासागरांच्या तळाचा वेध घेण्यासाठी ३ कोटी ८६ लाख डॉलरची योजना आखली असून ती मार्च २०१५ पर्यंत पूर्ण होणार आहे. यात सागरी भूकंपांपासून ते महासागरी प्रवाहांचे तापमानवाढीवर होणारे परिणाम अभ्यासले जाणार आहेत.महासागरी रसायनशास्त्र व पर्यावरण यांचाही अभ्यास केला जाणार आहे. ब्रिटिश, अमेरिकी व रशियन संशोधक अंटाक्र्टिकामधील बर्फाच्या सरोवरांचा खोलवर वेध घेणार असून तिथे नेमके कुठले सजीव तग धरून आहेत यावर संशोधन करणार आहेत.

अनपेक्षित एकजूट
जॉर्डन येथे प्रकाशाचा एक नवा स्त्रोत सिंक्रोट्रॉन लाइट सोर्स तयार केला जाणार असून या प्रयोगात तुर्कस्तान, इराण व इस्रायल हे देश एकत्र येऊन संशोधन करणार आहेत. विज्ञान संशोधनासाठी इस्रायल या देशांबरोबर काम करण्यास तयार झाला हे विशेष.

चमत्कारिक गुणधर्म असलेले पदार्थ
पदार्थ विज्ञानात समारियम हेक्झाबोराईड नवीन नायकाच्या रूपात असणार आहे. त्याचे वैशिष्टय़ म्हणजे त्याचा वरचा पृष्ठभाग हा विद्युतवाहक असतो पण आतला भाग हा विद्युतरोधक असतो. ग्राफिनला तो प्रमुख स्पर्धक ठरणार आहे. बोरॉन नायट्राइड, टँटॅलम डायसल्फाइड या त्याच्याच कॉपीकॅट आवृत्त्या मानल्या जातात. अर्धवाहकांच्या दुनियेत त्यामुळे मोठा बदल घडून येणार आहे.