माणूस हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे; त्याप्रमाणेच आनंद, दु:ख इत्यादी भावनादेखील केवळ मानवालाच व्यक्त करता येतात, प्राण्यांना नव्हे; असा जो समज रूढ होता त्याला बहुधा संशोधनाच्या आधारे पहिला धक्का दिला तो जेन गुडाल यांनी. चिंपांझी वाळवीचे किडे वारूळातून काढण्यासाठी विशिष्ट प्रकारचे ‘हत्यार’ (टूल) बनवितात, हे गुडाल यांनी दाखवून दिले; त्याप्रमाणेच चिंपांझीमध्ये माणसाप्रमाणेच ‘अनाथां’विषयी वात्सल्याची, उमाळ्याची भावना असते हेही सिद्ध केले आणि प्राणिसृष्टीचा हा अनोखा पैलू जगासमोर आला. माणसाला जसा आनंद होतो, तसाच प्राण्यांनाही होतो; केवळ त्यांची अभिव्यक्ती निरनिराळ्या पद्धतीची असते, हेही संशोधकांनी दाखवून दिले आहे. माणसाच्या स्वभावाचा आणखी एक विशेष म्हणजे दु:खाची भावना. विशेषत: आपल्या प्रियजनांच्या विरहाने माणूस दु:खी होतो, कधी कधी वेडापिसा होतो, एकाकी पणाच्या भावनेने तो ग्रासला जातो. प्राण्यांना ‘मृत्यू’ या संकल्पनेविषयी काही ठाऊक असण्याचे कारण नाही. जन्म-मरणाचा फेरा वगैरे संकल्पना मानवाने तयार केल्या आहेत. पण या बाबतीतही प्राणी भावनाप्रधान असतात. जो जन्माला येतो, तो मरणारच हे उघड सत्य प्राण्यांच्या गावीही नसेल, पण जेव्हा आपल्या बरोबरच्या प्राण्याचा मृत्यू होतो, तेव्हा अन्य प्राण्याची त्यास सामोरे जाण्याची जी प्रतिक्रिया असते, ती शोकभावनेची, विरहाने दुखी होण्याचीच असते, असे संशोधकांनी आता दाखवून दिले आहे.
प्राणिशास्त्रज्ञ प्राध्यापक फ्रेड बर्कोविच, जैवशास्त्रज्ञ झो म्युलर यांचे जिराफांविषयीचे अनुभव, याकडेच अंगुलीनिर्देश करतात. म्युलर यांना असे आढळले, की आपल्या मेलेल्या नवजात पिल्लाभोवती त्या पिल्लाची आई जिराफ जणू खडा पहारा देत होती. एवढेच नव्हे, तर त्या पुढच्या चार दिवसात सतरा अन्य मादी जिराफांनी त्या पिल्लाच्या मृत शरीराभोवती रिंगण अनेकदा धरले. बर्कोविच यांनाही असेच काहीसे आढळले. आई जिराफाने आपले पाय फतकल मारल्यासारखे बाजूला केले नि मग मान खाली नेऊन ती आपल्या मेलेल्या नवजात पिल्लाला चाटत होती. दोन एक तास ती आई-जिराफ जणू आपल्या पिल्लाचे शरीर ‘तपासत’ होती- त्यात ‘प्राण’ का नाहीत यासाठीच बहुधा. यामागे दु:खाचीच भावना असावी; कारण आई-जिराफाचे पायाची फतकल मारण्याचे वर्तन हे तसे असामान्य मानले जाते. केवळ पाणी पिण्यासाठी किंवा खाण्यापुरते सोडले, तर जिराफ अशी फतकल कधी मारत नाहीत, असे निरीक्षण आहे. एलिझाबेथ मार्शल थॉमस यांनीही आपल्या पाळीव प्राण्यांचा असाच अभ्यास केला व त्यांनाही हे आढळले की माणूस व प्राण्यांच्या अभिव्यक्तीत फरक असला, तरी भावनांमध्ये साधम्र्य असते.
बार्बरा किंग या मानववंश शास्त्रज्ञांनी (अॅथ्रॉपालॅजिस्ट) आपल्या बरोबरच्या प्राण्याच्या मृत्यूवर अन्य प्राणी काय व कशी प्रतिक्रिया देतात, याचा सखोल अभ्यास केला, नि त्यांना जे आढळले ते थक्क करणारे होते. सामान्यत: माणसातच दुखाची भावना असते, नि काही अंशी ती प्रगत मेंदू असणाऱ्या सस्तन प्राण्यांमध्ये असू शकते असा समज असताना, किंग यांचे निरीक्षण असे, की अगदी घोडे, मांजरे, कुत्री, ससे, पक्षी यांच्यातही ही प्रिय ‘जना’ च्या विरहाने दु:खाची, शोकाची भावना आढळते. शिवाय, केवळ रानावनातीलच प्राण्यात ती असते असे नाही; तर माणसाळलेल्या प्राण्यांमध्येही ती दृग्गोच्चर असते. किंग यांनी आपला युक्तिवाद सिद्ध करण्यासाठी अनेक उदाहरणेही दिली आहेत.
स्टॉर्म वॉर्निग या घोडय़ाच्या पायाला गंभीर इजा झाली, नि ज्या शेतात त्या घोडय़ाचा वावर असायचा, तेथेच त्याचा मृत्यू झाला नि त्याला पुरण्यात आले. त्या संध्याकाळी जेव्हा एक शोकविवश महिला, त्या घोडय़ाला पुरले त्या जागी आली, तेव्हा तिला असे आढळले की शोक करणारी ती एकटी नव्हती. आणखी सहा घोडे, ज्यांचे स्टॉर्मशी काही ‘भावबंध’ होते, असेही त्या थडग्याभोवती जमा झाले होते. त्या घोडय़ांना ना खाण्यात स्वास्थ्य होते, ना धावण्यात. ते घोडे त्या थडग्याभोवतीच रेंगाळत होते नि दुसऱ्या दिवशी सकाळीही ते तेथेच होते. अवतीभवतीचे; पण स्टॉर्मच्या कळपात नसलेले घोडे मात्र तिकडे फिरकलेही नाहीत. हे सारे जसे अनपेक्षित होते, तसेच नि तितकेच प्राण्यांच्या भावविश्वावर नवा प्रकाश टाकणारे होते.
विला व कार्सन या दोन मांजरींची कथा अशीच आहे. या दोन सियामी मांजर-भगिनी. चौदा वर्षे त्या एकत्र राहिल्या, एकत्र खाल्ले, एकत्र झोपल्या. वयोपरत्वे कार्सनला आजार जडला नि अखेर त्यातच तिचा मृत्यू झाला. आपली ‘बहीण’ घरात नाही, याची जाणीव झाल्यावर विला खूप अस्वस्थ झाली. दोन-तीन दिवस झाले, तसा हा अस्वस्थपणा आणखीच वाढला आणि विला घरभर कार्सनचा शोध घेऊ लागली.. हा शोध पुढचे अनेक महिने संपला नव्हता. अनेक महिन्यानंतरच विला आपले स्वत:चे सामान्य आयुष्य जगू लागली. कोणी भावुकतेने अशा कथा सांगितल्या, तर कदाचित भाकडकथा वा रचित कथा म्हणून त्यांची टरही उडविली जाईल. पण संशोधक जेव्हा आपल्या कसोटींवर एखादी गोष्ट पारखून घेतात, तेव्हा त्याला शास्त्रीय सत्यतेचा आधार प्राप्त होतो. विलाची जी प्रतिक्रिया होती, ती कदाचित बदललेले वातावरण, किंवा आपल्या मालकालाच झालेल्या दु:खाला प्रतिसाद म्हणून असावी असा प्रश्न कोणी विचारू शकतो. मात्र, त्यावर संशोधकांचे उत्तर असे, की विला घरभर कार्सनचा शोध घेत असली तरी, ती त्याच विशिष्ट जागीच तो शोध घेत होती, जिथे या दोघी वावरल्या होत्या. केन्याच्या सांबुरू नॅशनल रिझव्र्हमध्ये २००३ मध्ये एलिएनॉर नावाच्या हत्तिणीच्या मृत्यूवर अन्य हत्तीं-हत्तिणींची जी प्रतिक्रिया होती, तीही अशीच भावनाविवशतेचा प्रत्यय देणारी होती. एलिएनॉर हत्तीण जेव्हा कोसळली, तेव्हा ग्रेस नावाच्या हत्तिणीने आपल्या हस्तिदंताच्या साहाय्याने एलिएनॉरला पुन्हा उभे करण्याचाही प्रयत्न केला. अर्थात एलिएनॉरचा नंतर लगेचच मृत्यू झाला. आयन डग्लस हॅमिल्टन यांनी या विषयी प्रदीर्घ काळ शास्त्रीय संशोधन केले नि त्या संशोधनाला खरे ठरविणारी ही प्रतिक्रिया होती. पाच वेगवेगळ्या ‘कुटुंबातील’ हत्तींनी एलिएनॉरच्या मृत्यूवर आपली शोकाकुल प्रतिक्रिया दिली होती. घोडा, मांजर, गोरिला यापेक्षा हत्तींमध्ये विरहाच्या दु:खाची भावना अधिक प्रबळ असते, याची साक्ष यातून पटली. टेनेसीच्या हत्ती अभयारण्यातील तारा हत्तीण व बेला नावाची कुत्री यांच्यातील मैत्री तर इंटरनेटवर धूम माजवणारी ठरली होती. पण, एके दिवशी ही कुत्री बेपत्ता झाली नि तारा अस्वस्थ झाली. ती खाईनाशी झाली; निराशेने ग्रस्त झाल्यासारखी वाटू लागली. बेलाला हिंस्र प्राण्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू आला होता. तिचे शरीर सापडले होते. ताराला आपल्या या अनोख्या मैत्रिणीच्या अंत्यविधीला उपस्थित राहता यावे, म्हणून बेलाच्या कर्मचाऱ्यांनी त्याच ठिकाणी पुरले. मात्र त्या वेळी तारा शंभरएक यार्ड दूरच राहिली. तथापि,दुसऱ्या दिवशी सकाळी, त्या ‘थडग्या’ पाशी कर्मचाऱ्यांना हत्तीच्या पावलाचा ठसा दिसला. याचा अर्थ उघड होता. ताराने रात्री आपल्या मैत्रिणीच्या थडग्याला एकटीने थोडा वेळ भेट दिली होती.
प्राण्यांमध्ये माणसाप्रमाणे काही भावना असतात का, याचा शोध संशोधक सतत घेत असतात, आणि आपल्या प्रियजनांच्या मृत्यूने माणूस जसा शोकाविव्हल होतो, तसेच प्राण्यांच्या बाबतीतही होते काय हा शोधही संशोधकांनी घेतला आहे. जन्माला येणारा प्रत्येक जण मरण पावणार ही जी जाणीव मनुष्याला असते, तशी ती प्राण्यांमध्ये असते, याचा अद्यापि पुरावा नाही. दुसरे असे की, मनुष्यस्वभाव असा आहे, की त्याचा आपल्या जवळच्या, लाडक्या माणसांच्या मृत्यूने दु:ख, शोक होतोच; पण जे अपरिचित आहेत त्यांच्यावरही असा प्रसंग गुदरला, तर त्यानेही माणूस दु:खी होतो. यात सहानुभूती, संवेदना या भावना असतात. याबाबतीत माणूस व प्राण्यांमध्ये अवश्य फरक आहे. तथापि, फ्रेड बर्कोविशपासून बार्बरा किंग यांच्यापर्यंत अनेक संशोधकांनी जे संशोधन केले आहे, त्याचा मथितार्थ हा अवश्य आहे, की प्राण्यांनाही भावना असतात नि आपल्या ‘प्रियजनां’च्या जाण्याने प्राणीही भावविवश होतात.
माणसात व प्राण्यांमध्ये अनेक फरक आहेत. विशेषत: विचार करण्याच्या बाबतीत हे अंतर जमीन-आसमानाचे आहे. पण विचार करण्याच्या क्षमतेत तफावत असली तरी आपल्या भावना काय आहेत, याविषयी मात्र माणूस व प्राण्यांमध्ये साम्य आढळते. ती भावना निराळ्या पद्धतीने प्रकट होते. बुद्धीच्या बाबतीत माणूस व प्राणी यांच्यात कमालीचे अंतर असले, तरी ‘हृदया’च्या बाबतीत हे अंतर कापून निघते, हाच या संशोधनाचा अर्थ म्हटला पाहिजे!
‘ प्रियजनां ’ च्या मृत्यूने प्राणीही शोकाकुल
माणूस हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे; त्याप्रमाणेच आनंद, दु:ख इत्यादी भावनादेखील केवळ मानवालाच व्यक्त करता येतात, प्राण्यांना नव्हे; असा जो समज रूढ होता त्याला बहुधा संशोधनाच्या आधारे पहिला धक्का दिला तो जेन गुडाल यांनी.
आणखी वाचा
First published on: 24-09-2013 at 08:33 IST
मराठीतील सर्व Sci इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Love ones death affected to animals