सोशल नेटवर्किंगच्या साहाय्याने वेगवेगळ्या प्रदेशातील वेगवेगळे आचार, विचार व आवड असलेले लोक एकमेकांच्या संपर्कात येऊ लागले. त्यात बऱ्याच कंपन्या आल्या आणि गेल्याही पण फेसबुकने जे वेड तरुण पिढीला लावले ते न समजण्यासारखेच आहे. परंतु आता ५० वर्षांनंतरच्या वयोगटातही लोकप्रियता वाढत आहे. आपण फेसबुकवर नाही अशी खंत वाटणारे काही कमी नाहीत, पण अशी खंत वाटण्याचे कारण काय? कशामुळे मनामध्ये अशी चलबिचल होते. बरेचजण अॅडिक्ट का होतात? हा संशोधनाचा विषय आहे.
आता सेलेब्रिटी ट्विटरवर काहीतरी लिहितात आणि मग त्याची बातमी होते. सेलेब्रिटी सहजपणे अशा माध्यमातून मत मांडून लाखो लोकांपर्यंत पोहचतात. अशा बातम्या छापणे वृत्तपत्राची अगतिकता का आहे हे समजत नाही. आजची पिढी तंत्रज्ञानाचा खूपच वापर करते ती उठल्यावर एसएमएस, मिसकॉल चेक करते, तसेच फेसबुकवर अपडेट केलेल्या फोटोंना किती लाईक मिळाले ते पाहते. असा त्यांचा रोजचा कार्यक्रम असतो. एवढेच नाहीतर अनेक विचारवंत आपले लेख, कथा फेसबुकवर अपलोड करतात. ते वाचून बरेच कॉमेंट कळतात. काहीजण विनोद, चित्र, सिनेमा, गाणी शेअर व अपलोड करतात. अशारीतीने जगातील लाखों लोकांपर्यंत पोहचता येते हीच तर या माध्यमाची खासीयत आहे.
अशा साईटच्या प्रेमात पडण्यासाठी एक रसायन कारणीभूत असल्याचे अभ्यासात आढळले आहे. ज्यावेळी कोणीही फेसबुकवर लॉगइन करते त्यावेळी तिला एखादे वाद्य वाजविल्याचा अथवा चित्र रेखाटल्याचा अनुभव येतो. तसेच याचवेळी मानसिक व शारीरिक बदल होत असल्याचे आढळून आले. त्यांची शारीरिक हालचाल, त्वचेची हालचाल, डोळ्यांची उघडझाप यावरून हे सर्व तरुण निवांतपणा किंवा शांतता अनुभवत असल्याचे दिसून आले आहे. मुलांना गप्पा मारण्यासाठी कट्टा असतो, पण मुलींना तशी जागा मिळत नाही. मग अशा मुली फेसबुकवर एकत्रपणे गप्पा मारतात. आपली मतं मांडतात, तसेच फोटो हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने तेही अपलोड करतात. त्याला किती लाईक अथवा कॉमेंट मिळतात यावर त्यांची नजर खिळून असते. अशामुळेच त्यांना काम करण्यास नवा हुरूप मिळतो. त्यांना मिळणाऱ्या कौतुकाच्या थापेमुळे आनंद द्विगुणीत होतो. अशा आनंदाच्या शोधातच आपण फेसबुकवर वेळ घालवतो. अनेकदा वैयक्तिक जीवनात फारच कमी बोलणारी व्यक्ती अशा आभासी विश्वात अतिशय अॅक्टिव्ह असतात. आपली बदललेली जीवनशैली त्यातून फारच कमी मिळणारा वेळ त्यामुळे आपल्या सर्व मित्रांना भेटणे जवळ जवळ अशक्यच होत आहे. जर हे सर्व मित्र आपल्याला ऑनलाईन भेटत असतील तर मग ही तंत्रज्ञानाची किमयाच म्हणावी लागेल. फेसबुकने जवळपास सर्वच सेवा मोफत दिल्या. त्यामुळेच फेसबुक तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला. वॉल या संकल्पनेमुळे तर आपण आपल्या व मित्राच्या भिंतीवर पाहिजे ते लिहू शकतो. एखादा महत्त्वाचा क्षण आपल्या आयुष्यात घडला तर त्याचे फोटो अपलोड करून आपल्या मित्रांना दाखवता येतात. न्यूजफीडच्या माध्यमातून मी आता जेवण केले ते मला पुरस्कार मिळाला अशी सर्व माहिती क्षणा क्षणाला देता येते. मेसेज, चॅट, ग्रुप, या सुविधांमुळेच तरुण फेसबुकवर चिटकून राहतात. अशात भर म्हणून की काय व्हिडिओ कॉलिंग मोफत देण्यात आले आहे. जर कंटाळा आलाच तर नवीन अॅप्स देण्यात आले आहेत. त्यातूनच गेम खेळणे, स्टोरी लिहिणे, प्रिय व्यक्तीला कार्ड पाठवणे करता येते. फेसबुकने प्लॅटफॉर्म ही सेवा देऊन तर जगातील सर्वच कंपन्यांना आपल्या साईटवर येण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे फेसबुकवरून कोणत्याही साईटवर जाता येते किंवा दुसऱ्या वेबसाईटवरून फेसबुकवर येता येते. अशामुळेच आपला मित्र कोठेही असला तरी त्याच्या संपर्कात राहता येते. प्रत्येक व्यक्तीला एक डिजिटल ओळख देण्याचे काम फेसबुकने केले आहे. फेसबुकवरील अकाउन्ट म्हणजे इंटरनेटवरील पासपोर्टच बनले आहे. अशा सुविधेमुळेच फेसबुकला सर्वजण आकृष्ट झाले आहेत व होत राहतील.
फेसबुकवरील प्रेमाचे गुपित
सोशल नेटवर्किंगच्या साहाय्याने वेगवेगळ्या प्रदेशातील वेगवेगळे आचार, विचार व आवड असलेले लोक एकमेकांच्या संपर्कात येऊ लागले. त्यात बऱ्याच कंपन्या आल्या आणि गेल्याही पण फेसबुकने जे वेड तरुण पिढीला लावले ते न समजण्यासारखेच आहे.
First published on: 21-01-2013 at 10:40 IST
मराठीतील सर्व Sci इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Love secret on facebook