वृत्तपत्रे आणि त्यामधील बातम्या हे एक अत्यंत घडामोडीचे, प्रचंड वेगाने येणाऱ्या नवनवीन बदलांचे, घटनांचे प्रवाही जग आहे. स्थानिक, प्रांतीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने लहान-मोठय़ा घटना घडत असतात. जास्तीत जास्त तातडीने त्या घटनांचे वृत्त वाचकांपर्यंत पोहचविण्याची धडपड म्हणजे काळ, काम, वेग याचे अफलातून मिश्रण असते.
टेलिफोन, टेलिप्रिंटर यावरून वृत्तपत्राच्या कार्यालयात ठिकठिकाणाहून बातमीदारांकडून बातम्यांचा ओघ सतत सुरू असतो. बातमीचे यथोचित संकलन करून आपल्या वृत्तपत्राच्या ‘एडिशन’ मध्ये त्या बातमीचा समावेश योग्यरीतीने होईल आणि इतर वृत्तपत्रांपेक्षा लवकरात लवकर बातमी वाचकांपर्यंत पोहचेल यासाठी मोठी कार्यक्षम यंत्रणा आवश्यक असते.
अमेरिका आणि काही प्रगत पाश्चिमात्य देशांमध्ये १९५० पासून दूरचित्रवाणीचे आगमन झाले. घटना प्रत्यक्षपणे प्रेक्षकांना दिसू लागली आणि वृत्तपत्रीय क्षेत्रात वेगवान बदल घडू लागले. बातमीतील टवटवीतपणा अतिशय गतीने साकारू लागला.
इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअरिंग आणि बातम्यांचे संकलन व प्रसारण यांची अत्यंत सफाईदारपणे वाटचाल सुरू झाली. काही जागतिक दर्जाच्या वृत्तपत्रीय संस्थांनी तर पुढचे पाऊल धडाक्यात उचलले. एखादा अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा महत्त्वाचा समारंभ अशा ठिकाणी अद्ययावत सामग्री घेतलेला तज्ज्ञ वार्ताहर कम छायाचित्रकार कॅमेऱ्याने घडामोड टिपू लागला. त्याक्षणीच ती बातमी त्याच्या वृत्तपत्राच्या कार्यालयात पोहचू लागली आणि सरळ छपाई विभागात प्रवेशून ‘लेटेस्ट एडिशन’ मध्ये समाविष्ट होऊ लागली. ही सर्व यंत्रणा खर्चिक असली तरी त्याची उपयुक्तता चर्चेपलीकडील होती. वेग हा या घडामोडींमधील प्रमुख आणि अत्यावशक मुद्दा ठरला. या क्षेत्रात वायुवेगाने बातमी मिळवून पाठविण्याचे प्राथमिक श्रेय जॉन डी सिल्व्हा या अमेरिकन टीव्ही इंजिनिअर आणि आघाडीच्या बातमीदारांकडे जाते.
लॉस एंजेलीस, कॅलिफोíनयाच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती, जागतिक दर्जाच्या हॉलिवूडमधील नटनटय़ांचे कार्यक्रम, राष्ट्रीय स्वरूपाचे समारंभ यासारख्या अतिमहत्त्वाच्या घडामोडींचे त्याला विलक्षण आकर्षण असे. शक्य तेथे हेलिकॉप्टरने जाऊन बातमी मिळविण्याचा छंद जॉनने जोपासला. वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सना सनसनाटी, बातम्या अचूकपणे आणि अत्यंत जलदगतीने देण्यामध्ये त्याने नाव कमावले. हेलिकॉप्टर मध्येच टेलिव्हीजन कॅमेरा बसवून प्रत्यक्ष छायाचित्रण करण्याची कल्पना त्याला १९५८ च्या जानेवारी महिन्यात सुचली. बेल हेलिकॉप्टर कंपनीच्या तंत्रज्ञांशी चर्चा करून बेली ४७ हेलिकॉप्टर मध्ये जॉनने तब्बल दोन हजार पौंड वजनाचे साहित्य बसविले. त्यात कॅमेरा, ट्रान्समीटर इ. यंत्रणा होती. सुरुवातीला त्याने ही
यंत्रणा वापरून हॉलिवूडच्या परिसरातील घटनांचे हवाई छायाचित्रण करण्यास सुरुवात केली. परंतु ती अवजड यंत्रणा, हेलिकॉप्टरच्या उड्डाण प्रक्रिया आणि जमिनीवर घडणाऱ्या घटना यांचा ताळमेळ साधता येईना. प्रयत्न
करून त्या अवजड सामग्रीचे वजन त्याने ३७० पौंडापर्यंत कमी केले.
अर्थातच शिल्लक राहिलेली यंत्रणा अतिशय कार्यक्षम ठरू लागली. तज्ज्ञ पायलट हेलिकॉप्टर सफाईदारपणे चालवू शकला. हेलिकॉप्टरची दिशा, कोन बदलून प्रसंगाचे छायाचित्रण अचूकफणे करू लागला. लॅरी शिअर नावाच्या तज्ज्ञ पायलटमार्फत त्याने बातम्या, घडामोडी प्रसारणाचा अगदी धडाका लावला. दर्जेदार कॅमेऱ्यामुळे जमिनीपासून हजार ते बाराशे फूट उंचीवरून जमिनीवर घडणाऱ्या असंख्य घडामोडींचे छायाचित्रण उत्कृष्टपणे साधता येऊ लागले. त्याच वेळी ते लाईव्ह दिसण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आणि अमेरिकेतील न्यूज चॅनल्सवर १९६० पासून व्यवस्थितपणे प्रसारण घडू लागले. हॉलिवूडमधील अनेक प्रसंग, घटना, अमेरिकेतील दूपर्यंत पसरलेल्या महामार्गावरील अपघात नैसर्गिक आपत्ती यासारख्या घडामोडींचे त्याक्षणीच होणारे प्रसारण अतिशय लोकप्रिय ठरले. ग्रेगरी पेक, एलिझाबेथ टेलर, मर्लिन मन्रो यासारख्या प्रसिद्ध नट-नटय़ांच्या प्रत्यक्ष शूटिंगच्या वेळचे प्रसंग अत्यंत हीट ठरले. अशा अभूतपूर्व शोधाबद्दल जॉनला दोन वेळा एमी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. १९५८ मध्ये ग्रेगरी पेकच्या अतिशय गाजलेल्या ‘‘द बिग कंट्री’’ या सिनेमाचा पहिला शो ग्रेगरीने प्रत्यक्षपणे टेलिकॉप्टरमधून प्रसारित केला. लक्षावधी सिनेरसिकांनी ती घटना भान हरपून प्रत्यक्षपणे पाहिली. शीअरने वापरलेले टेलिकॉप्टर १९७४ मध्ये लॉस एंजेल्समधील केनबीसी चॅनेलने तब्बल चार लक्ष डॉलर्सला खरेदी केल्याने जॉनला धक्का बसला. परंतु थोडय़ाच अवधीत त्याने फ्रान्सिस गॅरी पॉवर्स या पायलट मार्फत पुनश्च कार्याला सुरुवात केली. पॉवर्सने १९७२ मध्ये अमेरिकन बनावटीचे खास ‘स्पाय प्लेन’ वापरून ९५ हजार फुटावरून रशियातील अण्वस्त्रे आणि रॉकेट्सचे छायाचित्रण करून उत्कृष्ट हेरगिरीने जगाला हादरा दिला होता. १९७७ ते १९८४ पर्यंत गॅरी पॉवर्सने कामगिरी सांभाळली होती. सांता बार्बरा प्रदेशातील प्रचंड वणव्याचे छायाचित्रण करून परत येताना पॉवर्सचे अपघाती निधन झाले. त्यात रशियाचा हात होता. या बातमीने जगात खळबळ माजली होती.
टीव्ही प्रसारणाची संकल्पनाच बदलली
जॉनने बेल कंपनीच्या हेलीकॉप्टरमध्ये टीव्हीकॅमेरा बसवून ‘टेलिकॉप्टर’ ही संकल्पना ३ जुलै १९५८ रोजी प्रत्यक्ष साकारली. वृत्त जगतात आमूलाग्र वेगवान क्रांती करणाऱ्या जॉनचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. १९२० मध्ये कॅलिफोर्नियात जन्मलेल्या जॉनने स्टॅनफोर्ड विद्यापीठातून १९४२ मध्ये इंजिनिअरिंगची पदवी संपादित केली. त्या वेळी दुसरे महायुद्ध महत्त्वाच्या टप्प्यावर होते. तीन वर्षे त्याने अमेरिकन नौदलात रडर ऑपरेटर म्हणून प्रत्यक्ष युद्धभूमीवर कार्य केले. युद्ध समाप्तीनंतर १९४७ साली लॉस एंजेलीस येथील जगविख्यात ‘पॅरामाऊंट पिक्चर्स’ कंपनीत त्याने प्रमुख अभियंता म्हणून कार्यास सुरुवात केली.
बातम्यांच्या जगातील क्रांतिकारक शोध
वृत्तपत्रे आणि त्यामधील बातम्या हे एक अत्यंत घडामोडीचे, प्रचंड वेगाने येणाऱ्या नवनवीन बदलांचे, घटनांचे प्रवाही जग आहे. स्थानिक, प्रांतीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने लहान-मोठय़ा घटना घडत असतात.
First published on: 29-01-2013 at 12:02 IST
मराठीतील सर्व Sci इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New innovation in news telicopter world