कार्बन डायॉक्साईम्ड शोषून घेणारा स्पंजासारखा प्लास्टिक पदार्थ वैज्ञानिकांनी तयार केला आहे, त्यामुळे जीवाश्म इंधनांकडून हायड्रोजन निर्माण करणाऱ्या नवीन ऊर्जा स्रोतांकडे स्थित्यंतर घडू शकेल असे त्यांना वाटते. हा पदार्थ म्हणजे अनेक वस्तू तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचे भावंडच असून त्याच्या मदतीने कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन रोखता येते व ऊर्जा प्रकल्पांच्या धुराडय़ांच्या ठिकाणी तो लावला जाऊ शकतो. विशेष म्हणजे हे बहुलक (पॉलिमर) स्थिर असून ते चिपसारखे आहे. त्यामुळे कार्बन डायॉक्साईड मोठय़ा प्रमाणात शोषला जातो. वास्तव पर्यावरणात काम करू शकण्यास लायक असा हा घटक आहे, असे ब्रिटनमधील लिव्हरपूल विद्यापीठाचे अँड्रय़ू कूपर यांनी सांगितले. कालांतराने जिथे इंधन घट तंत्रज्ञान वापरले जाईल तेथे शून्य कार्बन उत्सर्जनासाठी याचा वापर करता येईल. कार्बन डायॉक्साईड शोषणारे पदार्थ हे हरितगृह परिणाम होत असलेल्या ठिकाणी म्हणजेच कोळसा व वायू यांचा वापर होत असलेल्या ठिकाणी वापरले जातात.
कूपर यांच्या व त्यांच्या पथकाच्या मते हा नवा कार्बन शोषक म्हणजे सूक्ष्म छिद्र असलेला कार्बनी बहुलक असून तो विविध उपयोगी आहे. नवीन पदार्थ हा ‘इंटिग्रेटेड गॅसिफिकेशन सायकल’ या तंत्रज्ञानात जीवाश्म इंधनाचे रूपांतर हायड्रोजनमध्ये करण्यासाठी केला जातो. हायड्रोजनचा वापर इंधन घटांमध्ये करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
कल्पना कशी सुचली
स्टायरोफोममध्ये वापरले जाणारे पॉलिस्टिरीन नावाचे प्लास्टिक असते, ते पॅकेजिंगसाठी वापरले जाते. पॉलिस्टिरीन कमी प्रमाणात कार्बन डायॉक्साईड शोषते, त्यावरून या स्पंजासारख्या प्लास्टिकचा शोध घेण्यात आला. आपल्या घरातील स्पंज जसा पाणी शोषल्यावर फुगतो तसा हा पदार्थही कार्बन शोषल्यानंतर फुगतो. हा घटक म्हणजे वाळूसारखा पदार्थ असून तो कार्बनचे अनेक रेणू एकत्र करून तयार केला आहे.