अवकाश संशोधनातील स्पर्धा
२०१३ या वर्षांत भारत व चीन यांच्यात अवकाश संशोधनातील स्पर्धा कायम राहिली. चीनने चंद्राचे लक्ष्य ठेवले तर भारताने मंगळाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेचे ‘मावेन’ हे अंतराळयानही मंगळाकडे भारताच्या पाठोपाठ रवाना झाले. २०१४ मध्ये भारत व अमेरिका यांची अंतराळयाने मंगळाच्या कक्षेत साधारणपणे काही कालावधीच्या अंतराने पोहोचतील. मंगळावर जीवसृष्टीस पोषक स्थिती आहे किंवा नाही हे या मोहिमांमुळे समजू शकेल. मंगळावर अमेरिकेची यंत्रमानवसदृश गाडी तेथील खडक कोरून खनिजद्रव्यांची व भूगर्भाची माहिती घेत आहे त्यात आणखी भर पडेल. भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाची खरी कसोटी जीएसएलव्हीच्या शनिवारच्या प्रक्षेपणात आहे. नेदरलँडसचे उद्योगपती लॅन्सडॉर्प यांनी मार्सवन ही जी योजना जाहीर केली होती, त्यासाठी १००० जणांची निवड झाली असून त्यात ६२ भारतीयांचा समावेश आहे. अर्थातच हा मंगळ दौरा परत न येण्याच्या बोलीवर आहे. मंगळावर वस्ती करण्याच्या मोहिमेत २०२४ मध्ये काही जणांना या योजनेत मंगळावर पाठवले जाणार आहे.
रोसेटा मोहीम
विशेष म्हणजे युरोपने दहा वर्षांपूर्वी सोडलेले रोसेटा यान ६७ पी- चुरयुमोव-गेरासिमेन्को या धूमकेतूचा वेध घेणार आहे. ऑगस्ट महिन्यात हे यान धूमकेतूच्या जवळ येणार आहे, एवढेच नव्हे तर या धूमकेतूचा नकाशा तयार करून फिली नावाचे लँडर यान धूमकेतूच्या पृष्ठभागावर उतरवण्याचा प्रयत्न केला जाईल. हा धूमकेतू सूर्यापासून ४५० दशलक्ष किलोमीटर अंतरावर असताना ही संधी साधून हे लँडर उतरवण्याचा प्रयत्न आहे. निदान काही काळ तरी ते धूमकेतूवर राहू शकेल अशी आशा आहे.
कृष्णद्रव्याचा शोध घेण्याचा प्रयत्न
आपल्या विश्वाचा अंदाजे एकचतुर्थाश भाग हा कृष्णद्रव्याने व्यापलेला आहे, त्यामुळे या द्रव्याचे कण शोधण्यासाठी एक प्रयोग केला जाणार असून, दक्षिण डाकोटातील सोन्याच्या खाणीत अगदी तळाशी असलेल्या झेनॉन डिटेक्टर (लक्स) या उपकरणाचा वापर त्यासाठी केला जाईल. तीनशे दिवस प्रयोग करून कृष्णद्रव्याचे कण आपल्या नेहमीच्या द्रव्यावर आदळतात. त्या दुर्मिळ घटनेचा वेध घेतला जाईल. विकली इंटरअॅक्टिंग मॅसिव्ह पार्टिकल्स म्हणजे विम्पस कणांचा शोध घेतला जाईल. हे कण विश्वात कशाशीही आंतरक्रिया करीत नाहीत, पण काही वेळा ते नेहमीच्या द्रव्यावर आदळतात असे मानले जाते. आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकात अल्फा मॅग्नेटिक स्पेक्ट्रोमीटर हे उपकरण आहे, त्याच्या मदतीने दोन अब्ज डॉलर खर्चाच्या प्रयोगातही गेल्या वर्षी इलेक्ट्रॉन व त्याचे प्रतिकण पॉझिट्रॉन एकमेकांना नष्ट करतात असे आढळून आले होते, पण त्याचे पुरावे अजून मिळणे अपेक्षित आहे.
चार मितींमध्ये मुद्रण
गेल्या वर्षी त्रिमिती मुद्रकाच्या क्षेत्रात बरेच संशोधन झाले. या वर्षी चार मितींचे मुद्रण अपेक्षित असून, त्यामुळे वस्तूंच्या आकार व रचनेत अनेक आकर्षक बदल घडवून आणता येतील, अगदी खेळण्यांपासून ते इलेक्ट्रॉनिक व इतर वस्तूंमध्येही त्याचा पुढे वापर होऊ शकेल.
‘सर्न’ची साठ वर्षे
हिग्ज बोसॉन म्हणजेच देवकणाचा शोध घेणाऱ्या सर्न या प्रयोगशाळेला साठ वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्त युनेस्कोने पॅरिस येथे खास कार्यक्रम आयोजित केले आहेत. असे असले तरी २०१५पर्यंत ‘सर्न’मधील लार्ज हायड्रॉन कोलायडर हे महाकाय त्वरणक यंत्र बंद राहणार असल्याने संशोधनाच्या पातळीवर मोठी बातमी तेथून अपेक्षित नाही.
स्फटिकशास्त्र वर्षांच्या निमित्ताने..
२०१४ हे आंतरराष्ट्रीय स्फटिकशास्त्र वर्ष आहे. या विज्ञान शाखेनेच आपल्याला डीएनएची गुपिते शोधण्यास व अनेक औषधांच्या निर्मितीत मदत केली. स्फटिकशास्त्राच्या मदतीने ग्राफिन या एका कार्बन अणूइतक्या जाडीच्या पदार्थाचे आणखी गुणधर्म कळतील. त्यामुळे कंडोम व सूक्ष्मदर्शक यंत्रे यांच्यात काहीतरी अभिनव बदल घडून येण्याची अपेक्षा आहे. बिल गेट्स फाऊंडेशनने मध्यंतरी कंडोममध्ये वापरकर्त्यांच्या दृष्टीने अभिनव बदल करण्यासाठी स्पर्धा जाहीर करण्यात आली होती, त्यात किमान ८१४ सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत. ग्राफिनमुळे स्मार्टफोनचे लवचिक टचस्क्रीन (स्पर्शपडदे) तयार करण्यातही त्याचा मोठा वाटा असेल.
अन्नसुरक्षा
वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवायचे कुठून, या प्रश्नावर सध्या जनुकसंस्कारित पिके हा एक मार्ग सांगितला जातो. पण ती कितपत सुरक्षित आहेत यावर वाद आहेत. नेदरलँड्स येथे या वर्षी अन्नसुरक्षा विज्ञान या विषयावर परिषद होत आहे. १९९६पासून अन्नसुरक्षा या संकल्पनेवर चर्चा सुरू आहे, पण पिकांसाठी जनुक संस्करण तंत्रज्ञान स्वीकारायचे किंवा नाही यावर मात्र मतैक्य नाही, त्यावरील चर्चेला नवीन दिशा या परिषदेतून मिळेल अशी अपेक्षा आहे.
हवामान बदल
जीवाश्म इंधनांच्या वाढत्या वापरामुळे हरितगृह वायूंचे प्रमाण वाढून पृथ्वीचे तापमान वाढते आहे. त्यावर दरवर्षी चर्चा होते, पण कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी अमेरिका-चीन यांच्यासारखे देश प्रयत्न करीत नाहीत व आम्हाला मात्र ते कमी करण्यासाठी धाकदपटशा दाखवतात असा विकसनशील देशांचा नेहमीचा आरोप आहे, त्यात बऱ्याच प्रमाणात तथ्यही आहे. त्या पाश्र्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी हवामान बदलविषयक शिखर बैठक २३ सप्टेंबर २०१४ रोजी बोलावली आहे. सागरांमध्ये कार्बन डायॉक्साईड शोषला गेल्याने त्यांची आम्लता वाढत आहे त्यावरही चर्चा अपेक्षित आहे.
विज्ञानवेध २०१४
२०१३ या वर्षांत भारत व चीन यांच्यात अवकाश संशोधनातील स्पर्धा कायम राहिली. चीनने चंद्राचे लक्ष्य ठेवले तर भारताने मंगळाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला
First published on: 04-01-2014 at 02:58 IST
मराठीतील सर्व Sci इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Science descry