काही वाचकांनी खगोलशास्त्राशी निगडित असलेल्या संकेतस्थळांबद्दल (वेबसाईट ) चौकशी केली आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा कोणी असा प्रश्न विचारायचे तेव्हा माझं उत्तर असायचं की, अरे एखाद्या सर्च इंजिन (गुगल वगरे ..) वर शोधा. तुम्हाला अनेक संकेतस्थळे सापडतील, पण काळाबरोबर आता अनेक संकेतस्थळे (वेबसाईट ) तयार झाली आहेत, होत आहेत आणि त्यामुळे नेमक्या उपयोगी संकेतस्थळांची निवड कदाचित अवघड होऊ शकते,  तर माझ्या आवडीच्या काही संकेतस्थळांबद्दल माहिती देत आहे.
यातील पहिले संकेतस्थळ- अर्थातच http://www.avakashvedh.com/    – अर्थातच म्हणायचं कारण असे की खगोलशास्त्राचा छंद असणाऱ्या जवळ जवळ प्रत्येक मराठी वाचकाला हे संकेतस्थळ माहिती असण्याची शक्यता आहे.  माझ्या मते खगोलशास्त्राच्या छंदाबद्दल संपूर्णपणे माहिती देणारे मराठी भाषेतील ते पहिले आणि एकमेव उकृष्ट संकेतस्थळ आहे. हे संकेतस्थळ तुम्हाला खगोलशास्त्राचे ज्ञान वाढवण्यास फारच उपयुक्त ठरेल. यात तुम्हाला आकाशात ग्रह-तारे कुठे दिसतील, त्यांच्या बद्दलची माहती, खगोलशास्त्र आणि निरिक्षणासंबंधी लेख वाचायला मिळतील. या शिवाय प्रश्नोत्तरे, खगोलशास्त्रावरील स्पर्धा, भारतीय खगोलशास्त्रज्ञांबद्दल माहिती असे अनेक स्तंभ या संकेतस्थळावर आहेत.
आणि गंमत म्हणजे एका खगोलप्रेमी वेडय़ाने फक्त स्वतच्या हिमतीवर ही साइट केली आहे. त्याचं नाव आहे सचिन सखाराम पिळणकर. या माणसाचा मोठेपणा असा की तो संकेतस्थळावर लिहितो की, ‘कमी ऐवजी जास्त चुका माझ्या हातून होण्याच्या शक्यता आहे. एखाद्या ठिकाणी माहितीमध्ये छोटीशी देखील चूक आपणास आढळून आल्यास कृपया मला कळवावे. कोणताही शब्द चुकीचा टाईप झाल्यास ( व्याकरण चुकल्यास ) मला कळवावे. आपण दाखविलेली प्रत्येक चूक लगेच सुधारण्यात येईल.’ आणि हे खोटं आश्वासन नव्हे तर तो हे कृतीत पण आणतो. या संकेतस्थळाला बक्षिसे पण मिळाली आहेत पण त्याचा गवगवा सचिनने केलेला नाही.
या साइटबद्दल जर तक्रार करायची असेल तर इतकीच की आता तिचा चेहरामोहरा बदलावा. काळ्या पाश्र्वभागावर पांढऱ्या किंवा लाल अक्षरात वाचणं थोडं किचकट वाटतं.
बिल अरनेट (Bill Arnett)यांचे नाईन प्लॅनेट ही साइट ( http://nineplanets.org/ ) हे आपल्या सूर्यमालेच्या माहीती बद्दल एक अत्यंत महत्त्वाचे आणि विषेशत शालेय विद्यार्थासाठी तर फारच उपयुक्त संकेतस्थळ आहे.  एका सूत्रबद्ध पद्धतीने अरनेट यांनी या संकेतस्थळावर आपल्या सूर्यमालेची माहिती दिली आहे. मुख्य म्हणजे या संकेतस्थळाचा कुठलाही ही कॉपीराईट नाही आणि तुम्ही अगदी स्वतंत्रपणे या संकेतस्थळाचा उपयोग तुमच्या शाळेच्या प्रकल्पासाठी करू शकता किंवा तुमच्या शाळेचे जर एखादे संकेतस्थळ असेल तर त्यावर या संकेतस्थळाची िलक देऊ शकता. या संकेतस्थळावर अरनेट यांनी प्रामुख्याने नासाची चित्रं वापरली आहेत. म्हणजे ही चित्रं पण तुम्ही कुणाची पूर्व परवानगी न घेता विज्ञान प्रकल्प किंवा विज्ञान प्रसारासाठी वापरू शकता. या संकेतस्थळावर ग्रहांची आणि ग्रहमालेतील इतर घटकांची  विविध प्रकारे केलेली तुलनात्मक सारणी सापडेल. या संकेतस्थळाचा एक वेगळा इतिहास आहे. गेल्या सुमारे २० वर्षांत यात गरजेप्रमाणे बदल होत गेले आहेत. नवीन शोधांबद्दल माहिती लगेच इथे सुधारित (अपडेट) होते.  जेव्हा २००६ साली ग्रहांची नवीन व्याख्या करून ग्रहमालेत नवीन बटू ग्रह हा नवीन गट बनवण्यात आला तेव्हा तो बदल या संकेतस्थळावर लगेच करण्यात आला. या संकेतस्थळाचा आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे यावर तुम्हाला इतर अनेक िलक सापडतील. शेवटी या संकेतस्थळावर तुम्हाला आजच्या विज्ञानाला न सुटलेल्या प्रश्नाची चर्चा केली आहे. जर तमचा कल शास्त्रज्ञ बनण्याच्या दिशेने असेल तर हे प्रश्न नक्की वाचा. अगदी खगोलशास्त्रात करीअर करू इच्छित नसाल तरी कारण या प्रश्नावरून तुम्हाला संशोधन कसे करतात याची माहिती मिळेल.   पृथ्वीच्या संदर्भात एक प्रश्न आहे की, आपण आपल्या वातावरणात किती कार्बन डाय ऑक्साईड टाकल्याने आपले वातावरण शुक्रासारखे होइल, या प्रश्नाच्या संदर्भाची चर्चा आपण नंतर करूया पण इथे लक्षात घेण्याची बाब इतकीच की, हा प्रश्न एक प्रकारे खगोलशास्त्र, हवामान शास्त्र आणि पृथ्वीवर पर्यावरणाचा ऱ्हास यांना जोडणारा दुवापण आहे. दररोज आपल्या समोर एक नवीन सुंदर खगोलीय छायाचित्र सादर करणारी ही अ‍ॅस्ट्रॉनॉमी पिक्चर ऑफ द डे  ( apod.nasa.gov/ ) हे संकेतस्थळ  रॉबर्ट आणि जेरी बोनेल या दोन शास्त्रज्ञांनी बनवलेले आहे. या संकेतस्थळावर प्रत्येक चित्रासोबत त्या छायाचित्राबद्दलची शास्त्रीय माहिती  देण्यात येते. या संकेतस्थळावरची प्रामुख्याने नासाने घेतलेली छायाचित्रे कुणालाही  वापरता येतील अशीच आहेत पण कधी इतर छायाचित्रेही इथे सापडतात. या संकेतस्थळाचा छायाचित्रांचा संग्रह आता खूप मोठा आहे. त्याचा उपयोग शाळा-कॉलेजच्या प्रकल्पांसाठी किंवा प्रदर्शनांसाठी करता येऊ शकतो. जर तुम्हाला नवीन धूमकेतू शोधायला आवडणार असेल तर ( http://sungrazer.nrl.navy.mil/ ) या संकेतस्थळाला आवश्य भेट द्या. या संकेतस्थळावर  युरोपियन स्पेस एजंसी आणि  नासा यांच्या अंतराळातील सोलार अँड हीलिओस्फेरिक वेधशाळेने घेतलेल्या छायाचित्रात तुम्हाला धूमकेतू शोधायची संधी मिळते.  त्यासाठी तुम्हाला एक संगणक आणि इंटरनेट कनेक्शन पाहिजे.  धूमकेतू कसा शोधावा या संबंधीची सर्व माहिती या संकेतस्थळावर आहे. भारताच्या संदर्भात आयुकाच्या विज्ञान प्रसाराच्या साइटला ( http://www.iucaa.ernet.in/~scipop/ ) अवश्य भेट द्या. या संकेतस्थळावर तुम्हाला प्रामुख्याने आपल्या आजूबाजूला काय घडत आहे तसेच आयुकाच्या कुठल्या कार्यक्रमात तुम्हाला भाग घेता येइल  याची माहिती मिळेल. इथली एक महत्त्वाची िलक म्हणजे जर तुम्हाला खगोलशास्त्रज्ञ व्हायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे. आणि अगदी शेवटी मी दोन संकेतस्थळांचा उल्लेख करीन एक म्हणजे http://skytonight.wordpress.com/ या साइटवर आकाश निरिक्षणांसबंधी माहिती, दर महिन्याचे आकाश याबद्दल माहिती आहे.  तर https://sites.google.com/site/diy100atm/ तुम्हाला स्वतची दुर्बणिी कशी बनवायची या बद्दल माहिती मिळेल. ही दोन्ही संकेतस्थळे माझी आहेत पण ती अजून अपूर्ण आहेत.
paranjpye.arvind@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा