स्त्री आणि पर्यावरण यांच्यातील अनोख्या साधम्र्याचा आणि म्हणून नाते काय आहे  याचा वेध घेणारे आणि त्यामुळेच पर्यावरणाचे रक्षण आणि नैसर्गिक स्रोतांची राखण करण्याची जबाबदारी आणि क्षमता स्त्रियांचीच कशी आहे हे पैलू उलगडून दाखविणारे ‘स्त्री आणि पर्यावरण’ हे वर्षां गजेंद्रगडकर यांनी लिहिलेले पुस्तक वाचकांना आणि पर्यावरण चळवळीतील कार्यकर्त्यांना केवळ वाचनीयच वाटेल असे नाही, तर ते त्यांच्या विचारांनाही चालना देईल. भारती विद्यापीठाच्या ‘शाश्वती’ या स्त्रियांच्या सर्जनशीलतेचा  विविधांगी शोध घेणाऱ्या आणि त्यांच्या सबलीकरणासाठी उपक्रमशील असणाऱ्या  केंद्राच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या अभ्यास प्रकल्पाची फलनिष्पत्ती म्हणजे हे पुस्तक होय.
पर्यावरणाचा होणारा ऱ्हास हा सध्या चिंतेचा आणि म्हणून व्यापक चर्चेचा व ऊहापोहाचा विषय बनला आहे व ते स्वाभाविक आहे. या पाश्र्वभूमीवर लेखिकेने प्रामुख्याने स्त्री आणि पर्यावरण हा आगळा विषय हाताळला आहे. विशेषत: भूमीची सुफलनक्षमता आणि स्त्रीची सर्जनशीलता यातील साधम्र्य भारतातील प्राचीन समूहांना कसे जाणवले होते नि त्याचा परिणाम अगदी सणांची योजना करण्यापासून कृषी व त्याच्याशी निगडित देवता या स्त्रीरूपातच कशा ठेवण्यात आल्या व कायम राहिल्या, याचे दर्शन लेखिका घडविते, ते विलक्षण आहे. पुरुषसत्ताक पद्धती प्रबळ  झाल्यानंतरही सीता, उर्वरा, अनघा या स्त्रीरूपातील देवता कायम राहिल्या. भूमीच्या तीन मुख्य रूपांची कल्पना लोकसंस्कृतीने केली, तशाच पद्धतीने स्त्रीच्याही तीन अवस्था मानण्यात आल्या. एवढेच काय, पौष महिन्याचा भाकड किंवा शून्य महिना म्हणण्यामागे देखील स्त्री-भूमी अभेद्यतेचे कारण कसे असावे याचा शोध नि स्पष्टीकरण लेखिका देते. जमिनीतील उत्पादनाची कापणी झाल्यानंतरचा विश्रांतीचा काळ आणि याच काळात विवाहसंस्कार न करण्याचा प्रघात यातून हे साधम्र्य अधोरेखित होते. या पाश्र्वभूमीवर हे नाते कसे बदलत गेले याचा शोध लेखिका  पुढील प्रकरणांमध्ये-विशेषत: ‘बदलत गेलेले नाते’ या प्रकरणात घेते. पर्यावरणीय संहाराच्या पाश्र्वभूमीवर जगणाऱ्या स्त्रिया आणि नैसर्गिक स्रोतांशी मग ती जमीन असो, पाणी असो, जंगले असोत- त्यांचे बदलत गेलेले नाते यांचा सांगोपांग विचार लेखिकेने मांडला आहे. व्यावसायिक शेती, त्यातून आलेला साचेबद्धपणा याचा परिणाम वैविध्य घटण्यात झाला आणि पर्यायाने स्त्रीचे ज्ञान, तिचे अधिकार, समाजातील तिचे स्थान कमी होत गेले असे साधार प्रतिपादन लेखिका करते. ते मुळातूनच वाचावे असे विवेचन आहे. यावर उपाय हा स्त्रियांना शेतजमिनींची मालकी देण्याचा आहे, असे त्या सुचवितात. कारण स्त्रियांना अधिकार मिळण्याने त्यांचे वैयक्तिकच नव्हे, तर सामाजिक कल्याण साधते. स्त्रियांना एकटीच्या बळावर हे शक्य नाही म्हणून त्यांनी एकत्र येऊन हे केले पाहिजे, या भावनेतून विविध ठिकाणी जे पथदर्शक प्रयोग झाले आहेत, त्यांचा प्रेरणादायी  धांडोळाही पुस्तकात आहे.
‘इकोफेमिनिझम’ चळवळ त्या अर्थाने भारतात रुजलेली नसली तरी वंदना शिवा यांच्यासारख्या कार्यकर्त्यां ‘इकोफेमिनिस्ट’ म्हणून ओळखल्या जातात. ही संकल्पना काय आहे याचा उलगडा पुस्तकात आढळेल. शिवा यांच्यासह सुनीता नारायण, सी. के. जानू यांच्या विलक्षण कार्याचा परिचय लेखिकेने करून दिला आहे. चिपको आंदोलनासारख्या आंदोलनाने स्त्रियांच्या पुढाकाराने पर्यावरणरक्षणाची आंदोलने यशस्वी होतात हे सिद्ध होतेच, पण त्या पलीकडे जाऊन, पर्यावरणरक्षणाबाबतचे अग्रक्रम नि विचार स्त्री-पुरुष यांच्याबाबतीत किती भिन्न असू शकतात याचेही दर्शन घडविते, असे लेखिकेचे मत आहे.
अनेक संदर्भ, उदाहरणे यांचा आधार घेत लेखिकेने स्त्री आणि पर्यावरणातील नात्याच्या प्राचीन संकल्पनेचा मागोवा घेत सांप्रत असणाऱ्या समस्या व त्यावर तोडगा काढण्याची स्त्रियांची क्षमता या अनोख्या पैलूंचा शोध घेतला आहे. छाया दातार यांची प्रस्तावनाही वाचनीय!
पुस्तक- स्त्री आणि पर्यावरण लेखिका- वर्षां गजेंद्रगडकर प्रकाशक- पद्मगंधा प्रकाशन, पुणे. पृष्ठे-१७२, मूल्य- रु. १८०/-